नवीन लेखन...

नाटकातील नाटक

स्व. सत्यदेव दुबे हे अनेक कलाकारांचे गुरू व नाटककार. पण मुख्यत: ते होते नाट्यदिग्दर्शक. त्यांचा आग्रह असायचा, नाटकात ‘क्रायसिस’ हवा. त्याशिवाय प्रेक्षक त्यात गुंतणार नाहीत. क्रायसिस म्हणजे पेचप्रसंग, ही जर थोडी वरच्या पातळीवरची संकल्पना वाटत असेल तर प्राथमिक स्तरावरचा शब्द वापरू. आपल्याला म्हणता येईल नाटकात संघर्ष हवा. हवाच हवा. त्याशिवाय नाटक रंगणार कसे? हा संघर्ष जुन्या काळापासून नाटकात असतो. पूर्वी कसे नायक/नायिका सदगुणांचे पुतळे व खलनायक दुष्ट, कारस्थानी. नंतर ग्रे शेड्सच्या व्यक्तीरेखा आल्या. नायक अगदीच सदगुणांचा पुतळा नाही, तोही माणूसच आहे, स्सखलनशील आहे, म्हणजे त्याचीही काही कमजोरी आहे हो! कधी तो वाईटसुध्दा वागतो. प्रेक्षकांना आणि नाटकातील इतर व्यक्तीरेखांना आधी वाटते हा नायक म्हणजे किती आदर्श आहे. नंतर हळूहळू त्याचे अवगुण दिसतात. त्याचेही पाय मातीचे आहेत कळते. पण शेवटी तो पडला नायक. मग त्यातून तो स्वत:ला सावरतो आणि शेवट गोड होतो. हो, शेवट मात्र आपल्याला अजूनही गोडच हवा असतो.

आता असे बघा, अखिल भारतीय नाट्यपरिषदेची निवडणूक १७ फ्रेबुवारी १३ला पार पडली (एकदाची!). त्यासाठी अनेक रंगकर्मी निवडणूकीसाठी ऊभे होते. विविध पॅनेलतर्फे किंवा स्वतंत्रपणे त्यांनी निवडणूक “लढवली”. शब्दश: लढवली. एक-दोन महिने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या आणि कोणत्या पातळीला जाऊन आरोप केले? मतपत्रिका गहाळ केल्या, बोगस मतदान, पैशाची अफरातफर, सर्व प्रकारचे आरोप झाले. मतदारांना दारू पाजली आरोप मात्र झाला नाही. दारू पाजण्याचा फारसा प्रभाव होत नसावा. एका निर्मात्याने एका कलाकारावर आरोप केला, अमेरिकेतील संमेलनासाठी जाण्यास रंगकर्मींना नाट्यपरिषदेने बॅगा वाटल्या, त्या खरेदीत त्या कलाकाराने गोलमाल केली, खोटी बिले दिली. त्या कलाकाराने आरोप करणार्‍याला कोर्टात खेचले. आता आपण कुठे प्रवासाला जातो, म्हणजे अमेरिकेला बिमेरिकेला नाही हो, आम्ही आपले चंद्रपूर, राजूरा, व्याहाड ब्रुद्रूक असे कुठे जातो, तर बॅग स्वत:च्या पैशाने खरेदी केलेली, स्वत:ची घेऊन जातो. नाही म्हटले अगदीच तर, कोणाला लग्नात वगैरे बॅग भेट म्हणून मिळाली असेल तर ती घेऊन तो जातो. म्हणजे अफरातफर बॅग खरेदीत आहे की मुळात सर्व फुकट मिळावे या मानसिकतेत भ्रष्टाचार आहे? आणखी काय, काय परिषदेने कलाकारांना दौर्‍यावर जाण्यासाठी विनामूल्य दिले? नाट्यपरिषदेला पाच कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे, त्यामुळे यावेळच्या निवडणूकीत ही इतकी मारामारी होत आहे असा एक आरोप ऐकायला मिळाला. चालायचेच, निवडणूक म्हटल्यावर आपल्याला असे प्रतिस्पर्ध्यांचे एकमेकावरचे आरोप ऐकण्याची सवय आहेच. मग राजकारणी काय आणि रंगकर्मी काय, काय फरक?

पण हे चित्र पाहून एक कल्पना सुचते. एखाद्या नाटककाराने या विषयावरच नाटक लिहिले तर? नाट्यपरिषदेची निवडणूक व त्यातील गडबड घोटाळे. बघा सुरवातीला म्हटले तसे, यात संघर्ष आहे, ग्रे शेड्सच्या व्यक्तीरेखा आहेत, नाट्यच नाट्य आहे. आणि नट यात काम करतील त्यांना किती स्वत:च्या आयुष्यातील घटनांवरचेच नाटक करतो आहे वाटेल. ते किती तल्लीन होऊन काम करतील? त्यांच्या अगदी ह्रदयाच्या जवळच्या विषयावरच्या नाटक असल्याने काय छान अभिनय होईल, कोणाला पुरस्कार द्यायचा प्रश्न पडेल. समजा जे दोन प्रमुख अभिनेते एकमेकांविरूध्द उभे होते, तेच नाटकातही समोरासमोर उभे राहिले तर? अत्यंत खरा अभिनय होईल खरे, पण स्वत:वर ताबा ठेवू शकतील ना? की नाटकात एकमेकांवर चाल करून जातील? नाटककाराने दोन शिव्या लिहिल्या असतील तर अॅडिशन घेत आणखी दोन पदरच्या टाकतील? त्याने मात्र फारसा फरक पडणार नाही.

हो, हे नाटक होऊ शकेल, पण शेवट गोड हवा हे तर ठरलेलेच आहे. मग समजा नाटकाच्या शेवटी भांडणारे दोन्ही दिग्गज, मान्यवर, लोकप्रिय, प्रभावशाली इत्यादी असे हे कलाकार एकत्र आले असे दाखवले तर? एकत्र येऊन त्यांनी रंगभूमीसाठी ठोस काम करायचे ठरवले, चांगल्या, गंभीर विषयावरच्या नाटकांना प्रेक्षक गर्दी करत नाहीत, ती नाटके कशी लोकप्रिय करायची? प्रायोगिकसाठी चांगले नाट्यगृह नाही ते कसे मिळवून द्यायचे? मुंबईत नाट्यगृहे कमी पडत आहेत, ती कशी उभी करायची? एलकुंचवाराच्या नागपुरात नाटकाची काय स्थिती आहे? तिथे प्रायोगिक नाटक मी बघितले दीक्षीत वाचनालयाच्या उघड्या पटांगणात. बाजूच्या मुख्य रस्त्यावरून ट्रक,बस ये-जा करत होते. वेगळे पार्श्वसंगीत नको. नागपुरसारखी गावोगावी नाट्यगृहांची काय स्थिती आहे? असे सगळे चिंतेचे विषय घेऊन ते एकदिलाने काम करत आहेत असे शेवटी दाखवले तर? नाटकात हो, आम्हाला माहीत आहे, नाटकात तरी असे दाखवता येईलच. काय म्हणता प्रेक्षकांचा विश्वास बसणार नाही? त्यांना फॅन्टसी वाटेल? मग काय रंगमंचावर फॅन्टसी येऊच नये की काय?

उदय कुलकर्णी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..