नवीन लेखन...

नाती ‘रस’वंती

जेवणात जसं विविध चवींचं ‘सुग्रास’ जेवण तृप्तीची ढेकर देतं, तसंच आयुष्यात भेटलेली, असलेली विविध नाती, त्यांच्या लाघवी स्वभावामुळे आपलं जीवन समृद्ध करतात.. प्रत्येकाच्या जीवनात अशी विविध चवींची नाती घरात, बाहेर, नोकरीत, समाजात, व्यवसायात या ना त्या कारणाने जडत राहतात, त्यातून आपण चांगलं तेवढंच अनुभवायचं व वाईटाकडे दुर्लक्ष करायचं. माझ्याही आतापर्यंतच्या वाटचालीत असे अनेक नातेसंबंध निर्माण झाले.. त्यांच्या सहवासाने जीवन समृद्ध झालं…

काही नाती ही पाकात मुरलेल्या गुलाबजामसारखी गोड असतात. खरं तर इतकी जादा गोड ती असूच नयेत की, दोनच खाल्यावर ‘पुरे आता’ म्हणावं लागावं.. काहीजण असेच भेटतात, जे समोर आल्यापासून जाईपर्यंत आपली स्तुती करीत राहतात. ते ऐकून आपल्याला कसंतरीच वाटतं. अति केलेलं कौतुकही, काहीवेळा नकोसं वाटतं..

नाती कशी असावीत, तर टपरीवरच्या कांदाभजी सारखी! साधीच पण हवीहवीशी.. कधीही हाकेला धावून येणारी. ज्यांचा काही क्षणांचा सहवासही, आपल्या अस्तित्वाने दरवळून टाकणारी.. काही नाती असतात, गरमागरम चहाच्या पहिल्या भुरक्यासारखी! एक घोट घेतला की, डोकं शांत व मन उल्हसित करणारी..

कधीकधी बऱ्याच वर्षांनंतर भेटलेल्या मित्राबरोबर चहा घेणं हे खरं तर एक निमित्तच असतं. त्याच्यापाशी ‘मन मोकळं’ करण्यासाठी तेवढा वेळही खूप होतो…

काही नाती असावीत, साध्या वरणासारखी..गरम भाताबरोबर पचायला हलकी असणारी.. पुरणासारखी ती पचायला जड असणारी कधीही असू नयेत.. नाती सिताफळासारखी कदापिही असू नयेत. समज कमी आणि गैरसमजच जास्त. गैरसमजातून नात्यात दुरावा निर्माण होतो. पुन्हा एकत्र येणं दुरापास्त होतं. अहंकारामुळे पडती बाजू कोणी घ्यायची? यातच वर्षं निघून जातात..

नाती फणसासारखी असावीत. बाहेरुन काटेरी, आतून गोड! अशी माणसं दिसायला जरी कठोर असली तरी, ती सहवासात आल्यावर हृदयातच स्थानापन्न होतात… नाती असावीत सुधारसासारखी.. आपल्या चांगल्या व वाईट परिस्थितीतही हक्काचा पाठिंबा देणारी.. अशी माणसं मिळण्यासाठी ‘गतजन्मीचं पुण्यं’ आवश्यक असतं..

नाती कडूही असावीत, पण ती कारल्यासारखी नव्हे तर मेथीच्या कडवटपणा एवढीच.. जी भाजी खाल्ल्यानंतर, जीभेला चव येईल.. श्रीखंडासारखी श्रीमंत असणारी नाती एकवेळ नसली तरी चालतील.. पण ताकासारखी शिणवठा दूर करणारी नाती, मनाला तृप्त समाधान देऊन जातात..

नाती दुधासारखी नकोत, कारण त्यात कुणी मीठाचा खडा टाकला तर ते नासून जाईल.. जवळचीच माणसं अशा खड्याची भूमिका साकारायला तत्पर असतात.. त्यापेक्षा तुपासारखी अमर असावीत.. त्याच्या सुगंधी घमघमाटानं घर भरुन जावं…

नाती असावीत देवाला दाखविलेल्या नैवेद्याच्या पानासारखी. नैवेद्याच्या पानात वेगळं मीठ वाढलेलं नसतं कारण प्रत्येक पदार्थ करताना ते वापरलेलं असतंच. हे चवीपुरतं मीठ असावंच लागतं.. काही नाती या मीठासारखीच जीवनाला चवदार बनवतात.. नैवेद्याच्या पानातील सर्व पदार्थांना, आदराची पावित्र्याची वागणूक मिळते…तशीच नात्यांमध्ये, एकमेकांचा आदर करुन नात फुलवावीत… सजवावीत…

आज या सर्व मुरलेल्या लोणच्यासारख्या, नात्यांच्या सहवासाने मी व्यवसायात, समाजात काहीतरी वेगळं, लक्षात राहील असं करु शकलो.. याचं सर्व श्रेय, त्या ‘रस’वंती नात्यांनाच जातं….

© सुरेश नावडकर.

मोबाईल: ९७३००३४२८४

३-७-२१.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..