नाद करायचा नाय – माया खुटेगावकर

माया खुटेगावकर… अस्सल लावण्यवती नर्तिका… आई–बहिणीच्या मायेच्या पंखाखाली तिची लावणीबहरली…
अस्सल खानदानी लावणी सादर करण्यात मधू कांबीकर यांचा हातखंडा मानला जात असे. मधू कांबीकरांच्या लावणी समूहात रुक्मिणीबाई अंधारे या गायन, अभिनय आणि नृत्य सादर करीत. मधू कांबीकरांप्रमाणेच आपल्या मुलींनीही नावलौकिक मिळवावा, अभिनय, नृत्य अन् गायन क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवावा असं रुक्मिणीबाई यांना नेहमीच वाटत असे. गायन क्षेत्रात विजया तर नृत्यात छाया आणि माया यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आणि अल्पावधीतच विजया-छाया-माया हे नाव लावणी वर्तुळात अदबीनं घेण्यास भाग पडलं.

लातूर गावातल्या खुटेगाव या छोटय़ाशा खेडय़ातून सुरू झालेला हा लावणीचा प्रवास पुढे सातासमुद्रापारही जाऊन पोहचला. आपल्या गावाचं नाव पुढे जगाच्या इतिहासात कोरलं जाईल हे हेरून रुक्मिणीबाईंनी आधीपासूनच आपल्या मुलींची ओळख अंधारे या आडनावाने न करता खुटेगावकर या नावाने करून दिली आणि पुढे विजयासोबतच छाया-माया खुटेगावकर या नावानं त्या जगप्रसिद्ध झाल्या.


हा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावासह शेवटपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा...

छाया खुटेगावकरांचा लावणीचा हा प्रवास फार आधीच सुरू झाला होता, मात्र माया खुटेगावकर ही वयाच्या चौदा वर्षांपर्यंत यापासून वंचित राहिली होती. माया कुटुंबात सर्वात लहान आणि म्हणूनच लावणीपासून तिला दूर ठेवत शिक्षणासाठी पुण्यातील कर्वेनगर इथल्या हॉस्टेलला वेगळं ठेवण्यात आलं होतं. याउलट आपल्या आई आणि बहिणीप्रमाणेच आपणही या क्षेत्रात यावं असं मायाला वाटत असे. अखेर नववीपर्यंत शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिचा या क्षेत्रात अपघातानेच श्रीगणेशा झाला. अपघाताने होण्याचं कारण म्हणजे मुंबईत षण्मुखानंद हॉलला लावणीचा एक कार्यक्रम आयोजित केला गेला होता आणि या कार्यक्रमाला एक नृत्यांगना काही कारणास्तव येऊ शिकली नाही. या मुलीची जागा भरून काढण्यासाठी मायाला या कार्यक्रमात घेण्यात आलं आणि इथेच मायाची नाळ लावणीशी जोडली गेली.

छाया आणि मायाचे फोटो काढण्याची संधी मला अनेकदा मिळाली. कालांतराने छायाच्या गुडघ्याच्या दुखण्याने डोकं वर काढलं आणि तिचा नृत्यप्रवासाचा वेग मंदावला. त्यातच ती मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांना लावणी विषयाचे धडे देण्यात गुंग झाली. छाया-माया ही जोडी पुढे तुटली. यानंतर मग केवळ मायाचे फोटो काढण्याची संधी वारंवार मिळू लागली. पुणे, सातारा या ठिकाणी मायाचे अनेक कार्यक्रम सातत्याने होऊ लागले. त्यातच ‘नाद करायचा नाय’ या कार्यक्रमाला रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. याच कार्यक्रमात मायाचे बॅकस्टेजला काही फोटो मला टिपता आले. मायाचे फोटो काढताना ती फार कमी बोलते. तिला बोलतं केल्यानंतर तिने तिचा जीवनप्रवास हळूहळू उलगडून सांगितला. ‘‘माझे वडील माळकरी होते. त्यांना आईने या क्षेत्रात यावं असं अजिबात वाटत नव्हतं. त्यांचा विरोध झुगारून आईने तिचा प्रवास सुरूच ठेवला. शेवटी आई घर सोडून आम्हा तिघा बहिणींना घेऊन निघून आली.’ माया सांगत होती.

पारंपरिक लावणी सादर करण्यासाठी माया ओळखली जाते. तसंच बैठकीची लावणी, अदाकारीच्या लावणीसाठीही ती प्रसिद्ध आहे. तिच्या कलेला कॅमेराबद्ध करण्यासाठी मी महाराष्ट्रात विविध ठिकाणी तिचे कार्यक्रमात फोटो टिपले. कार्यक्रम, ठिकाण आणि तिच्या सादरीकरणावर यानुसार मायाच्या पेहरावात, शृंगारात बदल झालेला दिसला. बैठकीची लावणीसाठी पांढऱया रंगाची साडी, अदाकारीची लावणीसाठी हिरव्या, निळ्या, केशरी रंगाची तर विशेष कार्यक्रमात लाल, गुलाबी रंगाची साडी ती सहसा परिधान करत असल्याचं मला लक्षात आलं. त्यानुसार त्यावरचे दागिने आणि मेकअप, हेअर देखील बदलल्याचं लक्षात आलं. तिच्या याच विविध रूपांना कॅमेराबद्ध करण्यासाठी मी अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावली.

मायाचे या क्षेत्रातले नेमके गुरू कोण असं तिला विचारलं असता ती सांगते, ‘‘षण्मुखानंद हॉलला झालेल्या कार्यक्रमानंतर छायाताईने अभिनय आणि नृत्य यांचे धडे मला दिले, तर माझ्या आईने आणि पेटीवाले शंकर जावळकर यांनी गायनाचे धडे मला दिले. यानंतर याचं औपचारिक शिक्षण मला मिळावं म्हणून मला आईने साताऱयात एका शिबिरात घातलं. इथे भामिनाबाई आणि इतर गुरूंनी माझ्यावर संस्कार केले. सुरुवातीला छोटय़ा कार्यक्रमातून माझी सुरुवात झाली. नंतर हा प्रवास वेगाने सुरू झाला. या प्रवासात अनेक चढउतार मी पहिले. माझ्या आई आणि बहिणींमुळे मला दुःखाची झळ सोसावी लागली नसली तरीही त्यांच्यामुळे मला याची जाणीव कायम राहिली. आता छायाताई आजारामुळे या क्षेत्रात नाही तर विजयाताई सात वर्षांपूर्वी हे जग सोडून गेली. याचं दुःख सांगावं तेवढं कमीच.’’

माया बोलता बोलता भावुक झाली. कलेने मायाला भरभरून दिलं असलं तरीही तिच्या मनाच्या कोपऱयात तिच्या आई आणि बहिणींसाठीची ‘माया’ कायमच असल्याचं तिच्या बोलण्यात दिसून येतं. अनेक भावना मनात दाटल्या असतानाही त्याचा मागमूसही लागू न देता माया तिच्या कंठानं अन् नृत्यानं नेहमीच रसिकमन जिंकत आल्याचं आजवरच्या तिच्या या प्रवासात पाहायला मिळालं आहे.

धनेश पाटील
dhanauimages@gmail.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..