नवीन लेखन...

माझं कोकण

स्वसामर्थ्याच्या तपोबलाने, सागरास मागे हटवून
परशुरामाने निर्माण केला, हा प्रदेश सुंदर कोकण

वळणावळणाची आहे, माझ्या कोकणची वाट
किती वर्णावे सौंदर्य तियेचे, सौंदर्याचा थाट

जरी बदलली अवघी दुनिया, जरी बदलला काळ
माझ्या कोकणच्या मातीसंगे, जुळली माझी नाळ

शहरात राहिलो, तरी खुणावते कोकणातली माती
कौलारू घर कोकणातले, दिसते या डोळ्यांपुढती

देशामध्ये स्वातंत्र्याची, ज्योत जयांनी चेतविली
स्वातंत्र्यवीरांनी रत्नागिरीची, ही भूमी पावन केली

स्वातंत्र्याचे वेड लावले, ज्यांनी ह्या देशाला
लोकमान्य टिळकांचा आहे, अभिमान आम्हाला

कौलारू घराशी जोडले गेले, प्रेमाचे सुंदर नाते
पै पाहुण्यांच्या स्वागतासाठी, सज्ज नेहमी असते

सागरावरती जाऊन पहावा, सूर्योदय देखावा
सागर लहरींचा धिंगाणा, गाजेमधूनी ऐकावा

खेळ पावसाचा रिमझिम चाले, कधी मुसळधार बरसे
इंद्रधनू आकाशी पडता, डोळ्यांना मोहक दृष्य दिसे

जांभळं, करवंदं, ओले काजू, आकर्षक मेवा कोकणचा
स्वाद रेंगाळतो रसनेवरती, तळलेल्या फणस गऱ्यांचा

फणस पोळी, आंबा पोळी, सरबत जांभूळ, करवंदाचे
रत्नागिरीच्या हापूसने नेले, दुनियेमध्ये नाव कोकणचे

छोट्या छोट्या उद्योगांमधूनी, पाऊल पडते प्रगतीचे
देशामध्ये, अन् परदेशातही नाव गाजते कोकणचे

लाल मातीमधूनी साकारली जाते, गणेशाची सुंदर मूर्ती
गणेश उत्सव साजरा करण्या, चाकरमानी नियमित येती

महत्त्व गडकिल्ल्यांचे कोकणच्या, शिवरायांनी ओळखिले
रायगड किल्ल्याला महाराजांनी, राजधानीचे बिरूद दिले

सागर मार्गाने स्वराज्यावरी, होईल गनिमाचा हल्ला
जाणून धोका शिवबाने, सिंधू सागरी सिंधूदुर्ग बांधला

दुष्कर स्वप्नाला कोकण रेल्वेच्या, प्रयत्नपूर्वक साकारले
कोकणी माणसाच्या या स्वप्नाला, मूर्त स्वरूप लाभले

कोकणातले विभ्रम पाहण्या, कमावते घर तिथे असावे
व्यास क्रिएशन्स्च्या मदतीने, या स्वप्नाला पंख फुटावे

विकास भावे

(व्यास क्रिएशन्स च्या कोंकण प्रतिभा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..