नवीन लेखन...

मुक्या प्राण्यांची ‘बोलकी’ सोबत

लहानपणी सुट्टीत गावी गेल्यावर घरातले आणि बाहेरचे सगळेच पाळीव पक्षी, प्राणी मला जवळचे वाटायचे. ‌घरातील कोंबडया येता जाता पायात आडव्या यायच्या. एखादी खुडुक कोंबडी कोनाड्यात अंगाचं मुटकुळं करुन बसलेली असायची. तिच्या जवळपास जरी गेलं, की ती ‘गुरगुर’ करायची. होळीच्या टेकावर भुईमुगाच्या शेंगांचं वाळवण घातलेलं असेल तर ओट्यावर बसलेली माझी आजी, कोंबड्या दाणे खायला शेंगांच्या जवळ गेल्या की, जागेवरुन ‘खुडऽऽ खुडऽऽ’ असं जोरात ओरडायची. तेवढ्यानंही त्या निघून गेल्या नाहीत तर त्यांना हाकलून लावण्यासाठी मला छोटे दगड आणायला सांगायची. याच दहा-बारा कोंबड्यांमध्ये एखादा तुरेवाला देखणा कोंबडा असायचा. तो सकाळी व दिवस उतरणीला लागल्यावर मान उंचावून ‘कुकुच कू’ अशी बांग द्यायचा‌. दिवसभरात एखाद्या कोंबडीनं अंडं घातलं की, ती ‘कुकऽ कुक’ करुन ते अंडं ताब्यात घ्या, असं पुन्हा पुन्हा ओरडून सांगायची. मग मी ते उबदार अंडं घरात नेऊन देत असे. संध्याकाळ झाली की, ओट्यावर ठेवलेल्या डालग्यात सर्व कोंबड्या स्वतःहून जाऊन बसायच्या. सगळ्या आल्याची खात्री केल्यावर मी डालग्यावर छोटं घमेलं, झाकण म्हणून ठेवायचो. एखाद्या कोंबडीने अंडी उबवून दहा बारा छोटी पिल्ले जन्माला घातली असतील तर, ती जाईल तिथे तिच्या मागेमागे फिरणारा तो ‘चिवचिवाट’ पाहून मौज वाटायची. तिला कुठे संकटाची चाहूल लागली तर ती लगेच विशिष्ट आवाज काढून सर्व पिल्लांना पंखाखाली घ्यायची..

गावी जवळपासच्या घरात शेळ्या असायच्याच. त्यांची काळी कुळकुळीत दोन चार करडं (लहान पिल्लं) आपल्या आईच्या आसपास एकाच वेळी चारही पाय वरती घेऊन उड्या मारताना दिसायची. त्यांना पकडून त्यांच्या लोंबणाऱ्या, रेशमी मुलायम कानांना स्पर्श करताना आनंद मिळत असे. त्या करडांना पकडले की, शेळी डोळे मोठे करुन माझ्या ‘जगावेगळ्या’ कृतीकडे पहात रहायची.

गोठ्यात गेल्यावर म्हैस, तिचं रेडकू, गाय, वासरु, बैल यांची भेट होत असे. टपोऱ्या डोळ्यांचं म्हशीचं रेडकू छान दिसायचं. त्याच्या डोक्यावरुन हात फिरवताना एखाद्या मोरीच्या ब्रशवरुन हात फिरवल्यासारखं वाटायचं. त्याचं ओलसर नाक तुकतुकीत दिसायचं. त्याला गोंजारताना म्हैस माझ्याकडे मान तिरपी करुन निर्विकारपणे पहात रहायची.

आमची पंडई नावाची गाय फार गुणी होती. तिच्या वासराच्या गळ्याखालील पोळीला मी गोंजारत असे. सायबा व मास्तर नावाचे बैल आमच्या बैलगाडीला जोडल्यावर जवळच्या गावचा प्रवास मजेत होतं असे.

घरात एखादं तरी काळं मांजर असायचंच. ते कधी हाताला लागायचं नाही. मात्र त्याचा वावर असल्यामुळं उंदीर कधीही दिसायचा नाही. शेजारच्या घरातील माणसाळलेलं करड्या रंगाचे मांजर अनेकदा चूल विझवल्यानंतर उब घेण्यासाठी राखेत जाऊन बसायचं. तिथून उठवल्यानंतर ते ‘ध्यान’ राख फासलेल्या गोसाव्यासारखं दिसायचं.

कधी निवांत दुपारी वानरांची टोळी झाडांवरुन कौलांवर व नंतर घरात शिरायची. लहान मुलं घाबरुन जायची. त्या टोळीत एखादी वानरीन आपल्या पिल्लाला पोटाशी धरुन घरावरच्या कौलांवरुन अंगणात यायची. त्यांना भाकर तुकडा दिल्यावर काही वेळानं ती टोळी निघून जायची.

प्रत्येक घरटी एक तरी कुत्रं असायचं. आमच्याकडे काळ्या रंगाचा एक कुत्रा होता. जिकडे आम्ही जाऊ, तो मागे मागे यायचा. दुसऱ्या गावचं कुणी आलं की, भुंकायचा. एरवी ओट्यावर पसरलेला असायचा. चतकोर अर्ध्या भाकरीच्या मोबदल्यात इमानेइतबारे घराची राखण करायचा.

जून महिना सुरु झाला की, या सर्व सोबत्यांना सोडून शाळेसाठी पुण्याला परतायचो. आठवी पर्यंत सुट्टीत गावी जाणे येणे चालू होते. नंतर हळूहळू कमी झाले. नंतर वर्षातून एकदा गुढी पाडव्याला ग्रामदैवत जानूबाई सोनूबाईच्या यात्रेसाठी न चुकता जात होतो. कधी नातेवाईकांच्या लग्न समारंभास हजेरी लावायचो.

लग्नानंतर, व्यवसायामुळे गावी जाणे कमी होत होते. दरम्यान आजी, आजोबा गेल्यानंतर परडं रिकामं झालं. गाय, बैल, म्हैस काही राहिलं नाही. चुलतीकडे दोन शेळ्या होत्या. ती गेल्यावर शेळ्याही राहिल्या नाहीत. आता गावात पहिल्यासारखं वातावरण राहिलेलं नाही. तेव्हा माणसं, जनावरांना जीवापाड जपायची. आता गावात बैलगाडी देखील दिसत नाही. गाव ओकंबोकं वाटतं.

कोरोनाच्या महामारीनं दोन वर्षे झाली, गावी जाऊ शकलो नाही. गावातील, नात्यातील कित्येकांना या कोरोनानं संपवलं. माणसांची ही अवस्था, तर त्या मुक्या बिचाऱ्या प्राण्यांची काय असेल?

© सुरेश नावडकर

मोबाईल ९७३००३४२८४

२१-४-२१.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..