नवीन लेखन...

मोरे चं मोर

गावाच्या खालतुन गायरानातल्या जंगलात दोन-चार पारद्यायचे पालं पडले व्हते.पालं ठोकले की शिरस्त्यापरमाणं त्या पारद्यायनं पाटलाच्या घरी जाऊन आपली नावं नोंदवली.त्या काळात बाहेरचं कोणी गावात राह्यालं आलं की त्याची नोंद पाटलाकडं करायचे..सुकर्‍या मोरे,डेबरा मोरे,कान्या मोरे,लखुबा मोरे,हारण्या मोरे आसे नांव पाटलाच्या दफ्तरी नोंदवले गेले.पारद्यायच्या बाया बापड्या गावात भिक मांघणं,सुया,पोथा,ईकणं,कोणाचे कान,नाक,टोचनं, कानात बाळ्या भरनं आसे काम करायच्या तं गडीमाणसं लाव्हर्‍या,चित्तोर पकडणं,शिकारी करणं आसे कामं करायचे.पहिले पाच सात महिने सुखात गेले.पण मंग अचानक गावात चोऱ्या व्हया लागल्या.कुणाच्या शेतातली जवारी,उडीद,मुंग,कापुस,आसं तं कुणाच्या शेतातलं माळवं टाळवं आसं काहीबाही चोरी व्हवू लागलं.सगळ्या लोकांचा रोख पारद्यांवर व्हता.पण ते काय रंगेहात गावत नवते.

पारद्यांचा सुकर्‍या मोरे हे लय भैताड अन रगेल पारदी व्हता.शरीरानं आगडबंब आसलेला सुकर्‍या आवचिंदासारकाच व्हता.वाढलेली गजगज दाढी,ईस्कटलेले केसं आन तोंडाच्या बोळक्यातुन बाहीर आलेले दाताचे फनाळे पाहुन कोण बी घाबरावं आसं हे लक्षण व्हतं.त्यानं गावात आल्यापसुन पाटलालं लाव्हर्‍या,चित्तर,गांजा असं काय काय ते आणुन देऊन पाटलाची मर्जी मिळवली व्हती.पाटलाच्या जिवावर आत्ता ते लय रगेली करू लागलं.पाटलाच्या बैखटीतले हार्‍या झेले अन नार्‍या कोल्हे बी सुकर्‍याच्या करतबीवर खुश व्हते.हार्‍या -नार्‍या गावातं हातभट्टी चालवायचे.ते पाटलाच्या बैखटीतले पाटलाची हाजी हाजी करणारे गावानं सोडलेले बिनकामी वळु व्हते.सुकर्‍याची लवकरच हार्‍या नार्‍यासंग गट्टी जमली.तिघायनं मिळुन गावाच्या नाकात दम आनला व्हता.गावातं कव्हा कुणाची बकरी तं कुणाची कोंबडी गायब व्हयाची.आत्ता गावकर्‍यायलं घराबाहीर टंबरेल बी ठेवायच भेव वाटु लागलं.सुकर्‍यानं शिकार करायची आन पाटलाच्या आखाड्यावर हर्‍या-नार्‍याच्या पहिल्या धारच्या औषिदासंगं पाटील अन त्या तिनं तिघोळ्यायनं मैफलं सजायची.कव्हा कव्हा त्या मैफीली रात रात रंगायच्या.तं कव्हा बव्हा आंधुन मंधुन ढोलकिचा खनखनाट ऐकायलं मिळायचा.आत्ता सुकर्‍या मोरे,नार्‍या कोल्हे,अन हार्‍या झेले संगटच पाटलाच्या मर्जीतला झालता.
तसं पाह्यलं तं गावात पारद्यायचे दोन चारच घरं व्हते.ते बाहीर गावांतून आमच्या गावात आलते.ना जमिन जुमला न धंदा पाणी.बरं त्या लोकायलं शेतीतले काम बी येत नवते मनुनं मंग तेह्यलं कोणी कामावर बी सांगत नवतं.गावापसुन तुटक राहणार्‍या या समाजाच पोट हातावरचं व्हतं.मिळल ती मोलमजुरी करायची,भिक मांघायची,शिकारी करायच्या नाय तं कोणाच्याबी शेतातला माल वरबडुन आनायचा अन पोट भरायचं आसं तेह्यचं व्हतं.

आमच्या आंबराईतली पारी नावाची रांडव बाई व्हती.नवरा मरून चार पाच साल झाले तरी त्या बाईनं स्वतःलं संबाळुन ठुलं व्हतं.डळस हाडाची अन भरल्या अंगाची पारी,दिसायलं सुंदर आसल्यानं लय दिसापसुन पारीवर सुकर्‍या नजर ठुवून व्हता.एक दिवस हार्‍या नार्‍या,आन सुकर्‍यानं दुपारपसुनच हातभट्टी घ्यायलं सुरू केलती. गाव बढाईच्या गप्पा रंगल्या.हार्‍या अन नार्‍या आत्ता रंगात आलते.तेंनी सुकर्‍यालं झाडावर चढवायलं सुरवात केलती.हार्‍या मनु लागला कि ,“ब्वा,काल रस्त्यानं जातांनी पारी तुह्याकडं तिनदा तिनदा वाकु वाकु पाहु लागली.” तं नार्‍याबी मनु लागला कि ,“व्हयं मलं बी तिच्या नजरेतं तुह्याबद्दलं वल दिसतेय.आरं मर्दा सारका मर्द तु अन तुलं बाईचं काळीज समजत नाही व्हयं.चलं आजच काय ते फैसला करून टाकु.” सुकर्‍याच्या डोस्क्यातं हातभट्टी भिंगरीसारकी शिरली व्हती.आत्ता हार्‍या नार्‍यानं पारीचं खुळ त्याच्या डोस्क्यात भरल्यानं सुकर्‍याबी चेकाळला.आत्ता त्याच्या डोस्क्यातं पारी नाचाया लागली.सुकर्‍या लडखडतच उठला अन मंग तेह्यनं मोर्चा पारीच्या घराकडं वळवला.हार्‍या नार्‍या वरून शेर आसले तरी फुसक्या बाण्याचे व्हते.तेंचा लय दिसापसुन पारीवर डोळा व्हता.पण ती काय गटत नवती.मनुन मंग तेंनी सुकर्‍यालं पुढं करून डाव खेळला व्हता.पारी सुकर्‍यालं बधली तं तेह्यलं तिलं रंगेहात पकडुन डाव साधायचा व्हता.

आस्ते कदम ते तिघं पारीच्या घराकडं आले.गल्लीत सामसुम व्हती.हार्‍या नार्‍यानं आजुबाजुचा आंदाज घेतला.सामसुम पाहुन हार्‍या नार्‍यानं सुकर्‍यालं ईशारा केला.तसा सुकर्‍या बाजुच्या खांडुळ्यावुन पारीच्या घरावर चढला.सुकर्‍यानं घरावरचं पत्तर फाकवुन पारीच्या घरात उडी मारली.बेसावध पारीनं आचानक त्या आक्राळ विक्राळ सुकर्‍यालं पुढं पाहुन किंचाळी ठोकली,आन भवळं येवुन ती खाली पल्डी.ईकडं हर्‍या नार्‍या पारीची किंकाळी ऐकुन घाबरून ढुंगणालं पाय लागोस्तोर जंगलाकडं पळाले.तेह्यलं जंगलाकडं पळुन जातांनी लोकांनी पाह्यलं व्हतं.पाहता पाहता सगळी आंबराई पारीच्या घराभवती गोळा झाली.भावकीतले मोठे माणसं पारीलं आवाज देऊ लागले.पण पारी कायबी बोलत नवती.ईकडं लोकं गोळा झालेले पाहून सुकर्‍याच्या डोस्क्यातली दारू खन्नकन उतरली.तसं भानावर येवुन त्यानं पत्राच्या खिंडीतुन आला तसा पळाला.पारीचा उलटपक्षी आवाज येत नसल्यानं भावकितले दोन चार टोंग पोर्‍हं पारीच्या घराचा दरूजा तोडुन घरात घुसले.पारी तेह्याच्यापुढं जमिनीवर बेसुध पडली व्हती‌.दोन चार पाण्याचे सपकारे तोंडावर मारताच ती भानावर आली.भानावर येताच तीन घरात सुकर्‍या घुसला व्हता आसं सांगतलं.
तसय गावातल्या लोकायचा सुकर्‍यावर पह्यलाचं ताव व्हता त्यात त्यानं पारीच्या ईज्जतीवर हात घातला व्हता.प्रश्न पारीच्याच ईज्जतीचा नवता तं सगळ्या आंबराईच्या ईज्जतीचा व्हता.लोकं खवतळले.ते लाठ्या काठ्या घेऊनं जंगलातल्या पारद्यायच्या घराकडं पळाले.सुकर्‍या मदत मांघायलं पाटलाकडं पळाला पण पाटलानं सरळ हात वर्‍ही केलते.लोकायनं पारद्यायचे पालं उपटुन फेकले.सुकर्‍या आन बाकीचे पारदी जंगलाच्या बाजुलं उसात लपल्याची खबर लोकांना लागली व्हती.तेंनी हार्‍या,नार्‍या,सुकर्‍या अन बाकीच्या मोर्‍यायलं पकडुनं झाडालं बांधुन बेदम मारलं.
गावातुन पाटलाच्या सांगण्यावुन उस्मान हावंदारानं पोलीस ठेसनात खबर केली की,“ढालेवाडीच्या आंबराईवाल्या पोरायनं जंगलात जाऊन मेरीत लपलेल्या पारद्याच्या मोरेंना पकडुन मारलं”, पोलीस ठेसनात फिरयाद लेहणारा लेखनीक पोलीस बह्यर्‍या कानाचा व्हता.त्यानं मोरे ऐवजी मोर ऐकलं आन रिपोर्ट लेहला की,“ढालेवाडीत आंबराईतल्या जमावानं मेरीत जाऊंन पाच दहा मोरांना हुडकुन मारलं”….झालं खबर वरच्या हापीसापर्यंत गेली.सलमानचं परकरन तव्हा ताजच व्हतं.सगळ जिल्हा परशासन खडबडुन जागी झालं.ठाणे अंमलदारालं पोलीस आयुक्ताचे फोन यालं लागले.ईकडं.जिल्हाधीकारी जातीन सर्व घटनेवर लक्ष ठुवुन व्हते.जिल्हा स्तरावर स्पेशल टास्क फोर्सची स्थापना झाली त्यातं फॉरेन्सिक वाले,फॉरेस्ट डिपार्टमेंटचे कर्मचारी, ढोर डाक्टर,श्वानपथक,पक्षीमित्र,ई.सामील केले.मिडीयालबी खबर लागली व्हती.

दुसर्‍यादिशी ढालेवाडीतं भलामोठा फौजफाटा दाखलं झाला.पोलीसांच्या गाड्यायबरोबरच पाच सहा टि.व्ही चॅनलवाल्या गाड्याबी गावातं आलत्या.आंबराईतल्या पोरायची धरपकड चालु झाली.समद गांव परेशान झालं.हातातं माईक घेऊन फाडफाड मराठी,ईंग्रजी बोलणार्‍या सुटाबुटातल्या बाया पाहुन लोकांना आंजुकच अप्रुप वाटु लागलं.लोकं आपसात मनु लागले ,“मायझं,हे सकर्‍या आन ईतर पारधी परगावातुन आलेतं,पालात राहतेतं,भिक मांघुन खातेतं,दोन टायमाच्या भाकरीलं महाग यांना पोरायनं मारलं तं एव्हडा फौजफाटा…! नाही हे मोरे पारदी काय सादं बेनं दिसत नाहीतं….हे लय पव्हचलेलं दिसतयत….काही स्पाय फीय तं नसतीलं नं….!”

लोक आपापसात कुजबुजु लागले.व्हेटरणी डाक्टर आपली जणावरायच्या औषिदाची बॅग घेऊन सावध व्हते.तं फारेस्टवाले जमिनीवर कसल्या कसल्या खुना धुंडत व्हते.पुढं जमलेल्या गर्दीपुढं प्राणीमित्र भाषण देत व्हता.तो पशु,पक्षी यांच महत्व सांगत सांगतच पशु पक्षांची पर्यावरणासंगटच माणसालं आसलेली गरज यावर सांगतं व्हता.तसच त्यान प्राणीमित्र मनुन काम केल्यावर त्यालं काय काय पुरस्कार मिळाले हे सांगत शेखी मिरवतं व्हता.

तिकडं फॉरेंसीकवाले जंगलात मोठ मोठे भिंग घेउन काय बाय शोधत व्हते.अचानकं एका झाडाखाली तेंह्यलं एक फव्हटा दिसला.तेह्यनं हातातं ग्लव्हज घालुन ते अलगद उचलला.तेव्हड्यात चॅनलवाल्यांनी पव्हटा उचलुन आणणार्‍या त्या कर्मचाऱ्यांलं घेरलं.एक चॅनलवाली बाई आवेशात मनु लागली की,“हिच ती विष्ठा आहे…..हिच….जी गुन्हेगारांनी गुन्हा करायच्या आंधी केली व्हती.याच विष्टेच्या रासायनीक विश्लेषणातुन गुन्हेगाराच्या गुन्हा करायच्या आधीची माणसीकता शोधुन काढता येणार आहे.या विष्टेमुळं आपल्याला गुन्हेगाराचं मनोविष्लेशन करता येणार आहे.कॅमेरामन सुनयन तिरळेसह मंजीरी बोके,लोबीपी माझा”.गावकरी हे सगळं पाहून हैरान झालते.तेव्हड्यात दुसर्‍या एका चॅनलची बाई कॅमेरा घेऊन गावकर्‍यांपुढं आली.तिलं पाहताचं गावातले हौशै,नवसे पोरं आपला बावळा आवतार ठिक करत कॅमेर्‍यापुढं यासाठी लोटालोटी करू लागले.तिनं पोरांना ईचारलं की,“आपको क्या लगता है की यहां पे जो हुवा है वो ठीक था…? क्या ऐसा होना चाहीये…? त्या बाईनं माईक पुढं करताचं आपल्या बटबटीत तेल लावलेल्या केसांवर हात फिरवतं फिदीफिदी हसत राम्या डुकरे पुढं आला.त्यो हातावर हात ठुवुन एखाद्या विचारवंतासारखी पोज घेत बोलु लागला की,“यहां पे जो हुवा वो ठिकच हुवा.वैसे बी हमारे भाईलोग सल्लुभाई के फॅन है.उनके जैसी बावडी बनाके घुमते है.हम सल्लुभाई का आदर्श लेते है.उनो जैसे करते ना हम भी वैसेच करते.हमारे आंबराईके लडकोने वहीच किया जो सल्लुभाईने पहले किया है…वैसे तो मै जादा पढा लिखा नहीं हुं….ऐसे झमेले मे मै पडताच नही….अबितक मेरी शादीबी नहीं हुयी है……कोई आपके देखने मे है तो बताव मॅडम….!” असं मनत राम्या मुरकु मुरकु लाजु लागला. राम्यालं काय बोलावं त्या बाईलं कळयनं.सावरतं ती म्हणायं लागली की,“ तो हमने यहां के युवाओसे बात की तो पता चला की वो ये काम तो हर दिन करते है….और ईनको बुराभी नहीं लगता…..तो क्या ऐसी जनरेशन हमारे देश को आगे ले जायेगी …जल्दी बताईये एस.एम.एस.करके १२३४ नंबर पे….! कॅमेरामन निर्भय वाघ के साथ कोयल कावळे आपका पसंदीदा चॅनल बक बक………..!”

गावातले सगळे लोकं गोंधळुन गेलते.लोकं चक्रावून मनत व्हते ,“मायझं या पोरायनं हार्‍या,नार्‍या आन सुकर्‍याल बदकडलं तं हे पोलीसवाले मोठ मोठे भि़ंग घेऊन,वासाडे कुत्रे घेउन जंगलात काय काय पाह्यालेत कानु.कोण काय पाखरं,जनावरायचं महत्व सांगायलयं अन कोन काय कॅरी बॅगत ईष्टा काय भरून न्यायलयं….अन टि.व्ही. चॅनलंवालेबी काही बाही चर्चा करायलेतं.कोण कोण कसलं कसलं ईस्लेशन करायलय बाप्पा….!” हे काय व्हवू लागलं कोणालच कळयनं गेलं.या गोष्टींचा अन सुकर्‍या अन हार्‍या नार्‍यालं बदडणं याचा संबंधच काय? कशाचा कशालं मेळ नवता.कडील कडी जुळत नवती.सगळे गोंधळले व्हते.

ईकडं पोलीसायनं धरपकड करून आमची आख्खी आंबराई जेलात कोंबली व्हती.पोलीस लय सिरयसपणानं आमच्यासंग लागतं व्हते.जसं काय आम्ही लयच भयानक गुन्हा केला काय मनुन…!मंधात मंधातच पोलीस सलमानच नाव काढुन चर्चा करायचे.आम्हालं वाटल कि,“ब्वा,सलमान जसा पिच्चेरात गुंड्यायलं बुकलुन काढते तसं आम्हीबी बुकलुन काढलं काय की.” पोलीसायच्या बाता ऐकुन मह्या दंडातल्या बेंडकुळ्या तट तट उडु लागल्या.मलं तं क्षणभर सलमानचं झाल्यासारकं वाटु लागलं.तेव्हड्यातं एका पोलीसानं मलं ईचारलं,“कायं रं मोरायलं कामुन मारलं……!” तसं मह्या आंगात सलमान शिरला.म्या दंडातल्या बेंडकुळ्या उडवतं,छाती फुगवतं बोललो,“जो मै बोलता हुं…वो मै करता हुं….जो मै नहीं बोलता वो मै डेफीनिटली करता हूं…..!”.ताडऽऽकण मह्या कानाखाली आवाज झाला.मह्या डोळ्यापुढं आगीचा लोळ चमकला.म्या भांबावुन पुढ पाहतो तं एक पोलीसवाला डोळ्यातुन रघत वकत मह्याकडं पाहातं व्हता.“भिकारचोट साले,काम न धंदा,ईथं हे हिरोगीरी करणारं आन आम्ही साले येह्यच्या मांघं फिरणारं……सुक्काळीचे……..!” ते काय मनत व्हते ते मलं काहीच उमगतं नवतं.मह्यातला सलमान आत्ता कव्हाचाच गळपटला व्हता अन आत्ता मी आसराणी सारका व्हवुन गुमानं बसलो व्हतो.पोलीसाच्या एका झापडणं एवढा बदल झालता.

पोलीस मही ईचारपुस करून आम्ही त्यांना का मारलं मनुन ईचारत व्हते.आमच्यावर तेंनी चौदाव्या रत्नाचा वापर सुरू केला.आम्ही मनु लागलो की,“ब्वा, आंधी खोडेलपणा त्यानचं केलता.ते पारीच्या घरात घुसलं व्हतं,शेतातलं धान्य पळवु लागलं……आम्ही आंधी त्याच्या वाटलं गेलोच नवतो.त्यानचं आंधी आम्हालं मारलं” आसं मनु लागलो.मंग जरा जादाच खवळत पोलीस मनु लागले कि,“ते काय तुम्हालं मारायलं जनावर हाय व्हयं…?”

तसं मंग म्या चेकाळुन मनलो,“व्हय,व्हय….ते मानुस नायं तं जनावरच हाय….!”
म्या आसं मनताचं आम्हालं बदाडणारे पोलीस आंजुकच बदाडायलं लागले.काय होऊ लागलं काहीचं कळयनं गेलं.पोलीसायचा मार तं मह्या सहनशक्तीपुढं गेलता.मंग सगळा जिव एक करून म्या मोठ्यानं वरडलो,“.तुम्हालं खरं खोटं करायचं आसलं तं त्या सुकर्‍या मोरे आन हार्‍या नार्‍यालं आना पुढं आन करा खर काय नं खोटं काय ते…!” महे हे शब्द कानी पडताच एकदम पोलीस थांबले.

“काय?” एक पोलीस मनाला.

“मंजे तुम्ही काय मंता…यात सुकर्‍या मोरे, आन हार्‍या नार्‍याचा काय संबंध?”

तसं म्या मनलो,“सायबं,पारी आमच्या भावकीतली एक चांगली पण रांडव बाई हे.हार्‍या नार्‍या आन सुकर्‍याची तिच्यावर वाईट नजर. व्हती.एका दिशी हर्‍या नार्‍या पारीच्या घराम्होरं राखन उभे राह्यले आन सुकर्‍यानं घरात घुसुन पारीचा हात धरायचा प्रयत्न करू लागला.तेव्हड्यात पारी किंचाळली आन हे सगळे पळुन गेले.गावात हार्‍या नार्‍या अन सुकर्‍याचा तरास तसाबी लयच वाढला व्हता.त्यालं पारीचं निमीत्त ठरलं आन गावानं सगळा राग तेह्यच्यावरं काढला.मागच्या खुप दिसांपसुन गावात चोर्‍याबी वाढल्या व्हत्या.सगळ्यायलं माईत व्हतं की या चोर्‍यायमाघं हार्‍या नार्‍या आन सुकर्‍या पारदी हायत मनुन.त्या दिशी तावडीत गावले पण पळुन गेले.मंग आम्ही समदे गावकरी जमलो.आम्हालं माईत झालं की हे सगळेजनं जंगलाजवळच्या मेरीत लपलेतं मनुन.मंग आम्ही तेह्यलं पकडुन जंगलात झाडायलं बांधुन मारलं.सायब त्यान गावच्या अब्रुवर घाव घातला व्हता.”

तसं ईचार करतं सायब मनले की,” मंजे तूम्ही मोरांना नाही मारलं तरं….!”
“मोरांना…….!” मी आश्चर्यान किंचाळलो.
“होय,तसा रिपोर्ट लेहला गेलाय आमच्याकडं.”
“नाही हो सायब, तुमचा काय तरी गैरसमज व्हतोय.”

ठाणे अंमलदारानं तात्काळ खतवलेली फिरयाद अन फिरयाद लिहणार्‍या लेखनिकालं बोलावल.तसेच उस्मान हवंदारालंबी बलवायल सांगतलं.
सगळे समोरा समोर आले अन मंग एकदाचा घोळ लक्षात आला.लेखनिकानं मोरे चा मोर केला अन समदा गोंधळ झाला.पोलीस आयुक्तापसुन जिल्हा यंत्रणा समदे खडबडून कामालं लागले व्हते. मोरेचा मोर झाला….अन प्रशासनाचा पोपट….पण आमचा मातर या सगळ्या घटनेत उगाचचं ढोल झालता….आत्ता मी तं कव्हाचं कॉलरबी उडवत नाही,गॉगल बी उडवत नाही अन शर्ट काढुन डायलागबाजीबी करत नाही…..हं तव्हापसुन काना मात्रेलं मात्र जपतो…..कारण एका मात्रेनं घोळ केलता……!

©गोडाती बबनराव काळे,हाताळा,हिंगोली
9405807079

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..