नवीन लेखन...

पैसा…. फक्त एक जगण्याचं साधन !

पैसा…. फक्त एक जगण्याचं साधन आहे !
माणसाच्या खिशात भरपूर पैसा असल्यावर माणसाला वाटतं की आपल्यासारखं सुखी कुणीच नाही. परंतु पैसा जवळ असला तरी आपण आनंदी असण्याची काहीच शाश्वती नसते. आणि जरी जवळ पुरेसा पैसा नसला तरीही दुःख  हमखास असतंच. खरं तर पैसा हे जगण्याचं फक्त साधन आहे. पैसा म्हणजेच सर्वकाही असेही नाही, आणि पैशाशिवाय आयुष्यात काहीच करताही येत नाही. आपल्याला ‘ पुरेसा पैसा ’ म्हणजे काय ? हे आयुष्यात कधीही समजत नाही. आणि त्याहून महत्वाची बाब म्हणजे ‘पुरेसा पैसा’ म्हणजे नक्की किती ? हे एकदा ठरवलं आणि तेवढा कामवलाच तरी तो ‘पुरत’ नाही आणि पुरेसा पैश्याची व्याख्या आयुष्यभर समजत नाही.
आपल्याला पैसा हा नेहमी आपल्या शिक्षण, लायकी आणि कष्टांच्या मानाने खूप कमीच मिळतो आहे असंच आपल्याला नेहमी वाटत असतं. आणि आपल्यापेक्षा कमी शिक्षण किंवा लायकी असलेल्या आणि नगण्य कष्ट करणाऱ्यांना खूप जास्त मिळतोय असंही वाटत असतं. आपल्याला जो पैसा मिळतो तो आपल्याजवळ टिकत नाही, मात्र इतरांकडे बरोबर टिकतो असंच आपल्याला वाटत असतं. कधीकधी तर आपल्याला आपल्या मूलभूत गरजांनाही कमावलेला पैसा पुरत नाही, परंतु इतरांकडे अफाट उधळपट्टी करायला पैसा असतो असं आपल्याला वाटत असतं. आणि हे असं वाटणं म्हणजे सगळ्यांच्याच नजरेत वाटत असतं!
ज्याच्याकडे मुबलक पैसा नाही त्याला अजून पैसा कमवावासा वाटतो. ज्याच्याकडे मुबलक पैसे असतो त्याला अफाट कमावावासा वाटतो आणि ज्याच्याकडे अफाट असतो त्याला कितीही कमावला तरी कमीच वाटत असतो. माझ्याकडे आहे तेवढा पुरेसा आहे, मला अजून जास्त पैसा नको असं समाधानाने म्हणणारा कुणीच नसतो. प्रत्येकाला अजून पैसा हवा असतो. कितीही पैसा आला तरी गरजा वाढत जातात आणि आलेला पैसा पुरत नाही.
काही जणांना दुसऱ्याकडून उधार घेतलेला पैसा कधीच लक्षात रहात नाही. आणि दुसऱ्याला उधार दिलेला पैसा मात्र कधीच विसरला जात नाही !! जे उधारीचं तेच मदतीचं, तेच दान-धर्माचं, तेच खर्चाचं वगैरे. आपल्याला मिळालेलंही आपलंच आणि आपण दिलेलंही आपलंच हे फक्त पैशाच्या बाबतीत घडतं, कारण पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे!!
पैसा म्हणजेच लक्ष्मी ! पैसा म्हणजेच सर्वस्व ! तो एका दरवाज्यानं जसा येतो तसा हजार खिडक्यांवाटे पसारही होतो! पैसा जवळ आला की खूप छान, भारी, मस्त, आनंदी वाटतं. पण तो नुसताच येऊन थांबल्यानं आणि घरात साचून राहिल्यानं त्यातून काही म्हणजे काही मिळत नाही. कधी कधी तर पैसा एकटा येतच नाही. तो येताना सोबत मोठे मोठे आजार देखील घेऊन येतो.  म्हणजे आपल्याकडे खूप पैसा आलाय हे भारी वाटलं तरी त्यानं पोटही भरत नाही आणि इतर सुखंही मिळत नाहीत. पोट भरायचं आणि इतर काही मिळवायचं तर त्याला अनंत खिडक्यांमधून बाहेरच जाऊ द्यावं लागतं. पैसा आल्यामुळे मिळणारं सुख मोठं? कि खर्च केल्यामुळे मिळणारं? हे ठरवता येत नाही, कारण पैसा अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे.
‘दैव देतं आणि कर्म नेतं’ ही म्हण पैशाला लागू होत नाही. पैसा कष्ट केल्यानं, म्हणजे ‘कर्मानं’च मिळतो. क्वचित कधी दैवामुळंही मिळू शकतो, लॉटरी वगैरे लागल्यावर, पण तो काही शाश्वत मार्ग नाही. अगदी नियमितपणे पैसा मिळवायचा असेल तर अफाट कष्ट पडतात, ‘कर्म’ करावं लागतं. पण ‘कर्मानं’ मिळालेला पैसा ‘दैवा’मुळे एका क्षणात नाहीसा होऊ शकतो. चोरी म्हणू नका, टॅक्स म्हणू नका, आजारपणं म्हणू नका, अपघात म्हणू नका, भूकंप म्हणू नका… काय वाट्टेल ते ‘दैव’ किंवा योगायोग समोर उभे ठाकतात. आणि कर्मानं कमावलेल्या पैशाचं क्षणार्धात होत्याचं नव्हतं होऊ शकतं… ‘कर्म कमावतं अन दैव हिसकावतं’ ही पैशाच्या बाबतीतली म्हण असायला हवी!!
‘पैशापाशी पैसा जातो!’ जिथे मुळातच खूप पैसा आहे तिथे अजून पैसा जात रहातो. जिथे खूप कमी पैसा आहे तिथून पैसा जमेल तेवढ्या लवकर संपत रहातो. पैसा मिळवण्यासाठी आयुष्यभर आपण खपतो. मग एक दिवस आपण ‘खपल्यावर’, आपण निघून जातो, पैसा मात्र इथेच रहातो!!!
— डॉ. शांताराम कारंडे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..