क्विन व्हिक्टोरीयाचा ब्रिटीशकालीन मखर सापडला

दि. २५ एप्रिल २०१६ रोजी मराठीसृष्टीवर लिहिलेल्या `मुंबईतील पुतळे – हलवलेले आणि हरवलेले – हर हायनेस क्वीन व्हिक्टोरीया‘ या लेखानंतर झालेल्या घडामोडींवर आधारित हा नवा लेख..


चर्चगेटच्या ‘सीटीओ’च्या मागे असलेल्या टेलिकम्युनिकेशन बिल्डींगच्या जागी, ब्रिटीश काळात ‘हर हायनेस क्विन व्हिक्टोरीया’चा ४० फुट उंच कलाकुसर केलेल्या संगमरवरी मखरात बसवलेला देखणा पुतळा होता. स्वातंत्र्योत्तर काळात हा पुतळा राणीच्या बागेतील ‘भाऊ दाजी लाड’ वस्तू संग्रहात हलवला गेला आणि तो आजही तिथेच आहे. परंतू त्या पुतळ्याच्या मखराचा काही शोध लागत नव्हता.

मध्यंतरी हे मखर विजयपत सिंघानियांच्या जुहूच्या बंगल्याच्या आवारात असल्याची माहिती मिळाली होती. मी आणि माझे मित्र श्री. मुसा शेख गेल्याच रविवारी जुहूला सिंघानीयांच्या बंगल्यात शोध घेऊन आलो, मात्र ते मखर तिथून हलवलं असल्याची माहिती मिळाली.

माझ्यापूर्वी काही लोकांनी या मखराचा शोध घ्यायचा प्रयत्न केला होता. त्यातील काहींना त्या शोधात यशही मिळालं होतं. परंतू मला काही तो अद्याप सापडला नव्हता.

पण मनापासून शोधलं की देवही सापडतो म्हणतात, तसं काहीसं माझं झालं. पंधरा दिवसांपूर्वीच मी राणीचा पुतळा आणि ते मखर याची माहिती देणारा माझा जुना लेख फेसबुकवर पुन्हा पोस्ट केला होता. नुकताच तो मखर शोधण्यासाठी जुहुलाही जाऊन आलो.

या सर्व शोधकार्याचा ‘प्रसाद’ म्हणून मला माझे फेसबुक मित्र श्री. मंगश खोत यांचा प्रतिसाद आला आणि तो मखर नेमका कुठे आहे त्याची माहिती त्यांनी मला कळवली. नविन काही मिळालं, की लगेच तिकडे धावायचं या माझ्या उतावळ्या स्वभावानुसार मी तिकडे निघालो. पण हा आनंद एकट्याने का उपभोगायचा, म्हणून माझा मुंबईवर प्रेम करणारा मित्र चंदन विचारेला फोन केला आणि सोबत येतोस का म्हणून विचारलं. तो लगेच तयार झाला आणि आम्ही मंगेशने सांगीतलेल्या ठिकाणावर पोचलो आणि काय आनंद वर्णावा, क्विन व्हिक्टोरीयाचा तो संगमरवरी मखर साक्षात आमच्या समोर उभा होता..मखरावर मराठीत काहीतरी लिहिलेलंही आहे. आम्ही त्याचे फोटो काढले मात्र रात्र झाल्यामुळे मखराचे आणि त्यावरील त्या लिखाणाचे फोटो नीट्से आले नाहीत..बहुतेक या रविवारी सकाळा पुन्हा तिकडे जायचा विचार करतोय..

हे मखर कुठे आहे?

महालक्ष्मीच्या भुलाभाई देसाई रोजवर ब्रिच कॅन्डी हाॅस्पिटल आहे. या हाॅस्पिटलच्या समोरच्या उंचं इमारतीत ‘रेमंड्स’चं मोठं शोरुम आहे. ही इमारत म्हणजे रेमंड्सच्या सिंघानीयांचं नवं घर. या इमारतीच्या दर्शनी भागावरच हे मखर आणि त्यात एक पुतळा बसवलेला पाहायला मिळेल.अगदी हमरस्त्यावर आणि सहज दिसेल अशा ठिकाणी हे मखर आहे. इच्छुकांनी जाऊन जरूर बघून यावं.

— ©नितीन साळुंखे
9321811091

मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा लेखमाला

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..