नवीन लेखन...

मी N.C.C. मध्ये जातो

इयत्ता सातवी पासून म्हणजे 1971 साली ठाण्याच्या न्यू इंग्लिश स्कूल या मराठी माध्यमाच्या शाळेत मी दाखल झालो, कारण आम्ही दादर सोडून ठाण्याला राहायला आलो होतो. सातवी इयत्ता पार पडली आणि आठव्या इयत्तेत आम्हाला NCC हा पायाभूत लष्करी शिक्षण देणारा ऐच्छीक विषय होता. दातार सर याचे प्रमुख होते. आता दातार सर हे दिसायला बोलायला अगदीच लळबळीत होते. म्हणजे NCC सारख्या विषयाचे ते अजिबात प्रमुख वाटत नसत. गणवेश वगैरे चढवला की जरा बरे वाटायचे इतकंच . शाळेत ते चित्रकला या विषयाचे शिक्षक होते. आता कुठे चित्रकला आणि कुठे NCC., असो.. मला मात्र NCC मध्ये जाण्याची प्रचंड फुरफुरी होती. तो इस्त्रीचा गणवेश, तुरा लावलेली कॅप, बेल्ट, चामड्याचे चकचकित बूट या सगळ्याचं मला फार आकर्षण होतं. पण घी देखा लेकिन बडगा नही देखा अशी माझी स्थिती होती. मी धावतच भाग घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या लाईन मध्ये जाऊन उभा राहिलो. माझी शरीरयष्टी त्यावेळी तशी यष्टी सारखीच होती. माझी उंची ही वयापेक्षा अधिक होती. काही विद्यार्थी या उंचीमुळे मला विचारायचे,
“तू नापास झालायस का एक दोन वर्ष?” केव्हढा अपमान ! मला फार राग यायचा अशा वेळी माझ्या उंचीचा.
तर सांगत काय होतो.. मी सुद्धा NCC निवडीसाठी रांगेत उभा होतो. माझा नंबर आल्यावर आमच्या कमांडरने मला एकदा आपादमास्तक न्याहाळलं आणि शेजारी उभ्या असलेल्या व्यक्तीच्या कानात काही तरी सांगितलं. दोघेही जरासे हसले आणि माझी फिटनेस चाचणी सुरु झाली. अहो आणि उंची, वजन, शारीरिक क्षमता या सगळ्यात (कसा कोण जाणे ) मी चक्क पास झालो. माझी NCC मध्ये निवड झाली. माझी इच्छा पूर्ण झाली. मला प्रचंड आनंद झाला. तो हसणारा कमांडरही माझ्याकडे आश्चर्य, हताश, दिढमुख, असे अनेक भाव चेहऱ्यावर आणून पाहत होता. आता तो गणवेश, बूट लगेच मिळणार असं आपलं मला वाटत होतं. पण कसलं काय ! त्यानंतर जवळजवळ महिनाभर आम्ही शाळेच्या गणवेशातच परेड करत होतो. मला कधी एकदा NCC चा गणवेश अंगावर चढवतो असं झालं होतं. अखेर तो सुदिन उगवला. प्रत्येकाला दोन शर्ट, दोन पॅन्ट, बेल्ट, कॅप, सॉक्स असा संपूर्ण सेट मिळाला. मग पाळी आली बुटांची. लहान मोठ्या नंबराप्रमाणे बूट ठेवलेले होते. माझा नंबर येईपर्यंत माझ्या पायाच्या नंबराचे बूट संपले. पण मी हे न दर्शवता एक नंबर आधीचा असलेल्या बुटाची जोडी उचलली आणि जागेवर आलो. बूट चांगलेच जड होते पण आनंदापुढे त्यांचं वजन जाणवत नव्हतं. घरी आल्याबरोबर संपूर्ण गणवेश अंगावर चढवला मात्र आणि एकदम थकल्यासारखं वाटू लागलं. तरीही हिम्मत न हरता मी बूट पायात चढवायला घेतले. पण ते काही पायात जाईनात. सगळी शक्ती एकवटली पण इंचभर तरी अंतर राहू लागलं. अहो बरोबरच होतं ते, मीच मूर्खासारखे लहान नंबराचे बूट आणले होते मग अजुन काय होणार? या सगळ्यात भरपूर शक्ती खर्च झाली होती. मी सगळा गणवेश उतरवला आणि मला इतकं हलकं वाटू लागलं की पुढच्या परिणामांची किंचितशी कल्पना मला आताच येऊ लागली. पण अजुनही उत्साह मात्र खूप होता. दुसऱ्या दिवशी मी बूट बदलायला गेलो तर सगळे जोड संपलेले होते. अखेर आलिया भोगासी….. म्हणत आमच्या घराजवळच एक मोचीदादांचं छोटंसं दुकान होतं त्यांना मी माझी समस्या सांगितली. ते म्हणाले, अर्धा एक इंचाचाच प्रश्न आहे ना? होऊन जाईल. हे ऐकून मला हायसं वाटलं. दोन दिवसांनी एकदाचे बूट मिळाले. मी घरी येऊन पायात चढवण्याचा प्रयत्न केला तेव्हा सुधारणा एकच होती की कसंबसं पाऊल बुटात जात होतं. मनाशी म्हटलं, ‘चला एक काम झालं’.
येणाऱ्या शनिवारी सगळा जामानिमा करून मी हजर झालो. थोडा वेळ गेला आणि दोन्ही पाऊलं प्रचंड दुखायला लागली. बुटांनी त्यांना घट्ट आवळून टाकलेलं होतं. बरं परेड लंगडत करू शकत नव्हतो, पनिशमेंट मिळाली असती. जिवाच्या आकांताने कशीबशी परेड आटोपून पाऊलांची एकदा बुटातून सुटका केली. दोन्ही पाऊलांना बोटाकडे आणि मागच्या बाजुला सोलवटून पाण्याचे फोड आले होते. मला संपूर्ण दोन वर्षांच्या NCC कोर्सचं भितीदायक चित्र दिसू लागलं. तुरुंगातल्या कैदयांवर दिवसभर मरमरून काम करून घेतल्यावर त्यांची जशी अवस्था होते तशी माझ्या पायांची अवस्था झाली होती. प्रत्येक परेडच्या वेळी मी अक्षरशः सगळी सहनशक्ती एकवटून शिस्तीत चालत होतो. कधी एकदा बूट पायातून काढतोय असं वाटायचं. अखेर माझी सहनशक्ती संपली आणि खूप विनवण्या करून मी कॅनव्हास बूट घालण्याची परवानगी मिळवली. चामड्याचे बूट घालण्याची हौसही संपली आणि पाऊलांचीही सुटका झाली. त्यानंतर एक दिवस आम्हाला शूटिंग रेंजवर नेण्यात आलं. रायफल चालवण्याचं शिक्षण देण्यासाठी लष्करातले जवान आले होते. पाच पाच
कॅडेट्सना उपडं झोपून लक्ष्यावर नेम कसा धरायचा आणि फायर करायचं हे शिकवत होते. रायफल किती जड असते हे तेव्हा मला कळलं. ती उचलून हाताला मुंग्या येऊ लागल्या, हात थरथरू लागला. रायफल मध्ये गोळी भरण्याची ऑर्डर मिळाली. कशीबशी तिच्याबरोबर ओढाताण करून गोळी एकदाची आत गेली. दट्ट्या मागे ओढला. आता नक्की आठवत नाही पण दट्ट्याच्या वर असलेल्या अर्धचंद्र भोक आणि रायफलच टोक हे नजरेच्या सरळ रेषेत आणून नेम धरायचा असतो. मी नेम धरला, शक्य होईल तेव्हढी रायफल स्थिर केली आणि “फायर” म्हटल्याबरोबर पहिल्याच फायरला डोळ्याजवळ असलेला दट्ट्या डोळ्याशी सलगी करूनच पुढे गेला. खांद्याला झटका बसून तो दुखायला लागला, डोळ्याकडे लाल झालं, मनात भिती बसली आणि पुढचे सगळे नेम डोळा सांभाळण्यात लक्ष्य सोडून कुठेही लागत होते. म्हटलं मरूदे ते लक्ष्य इथे डोळा कायमचा जायचा. सगळ्या गोळ्या फायर केल्यावर लक्ष्य (टार्गेट ) पाहायला गेलो. त्यावर एकही गोळी लागलेली सोडाच चाटूनही गेलेली दिसत नव्हती. तो लष्करी जवान माझ्याकडे खाऊ की गिळू अशा नजरेने पहात होता. कुठून आलो NCC मध्ये अशी भावना प्रथमच माझी झाली.
मी नवव्या इयत्तेत गेलो. या वर्षी आम्हाला NCC कॅम्पला जावं लागणार होतं. बरं कॅम्प ठरला तो ही दिवाळीच्या आधी देवळाली नाशिकला. NCC कॅम्प म्हणजे काय असतं काहीच कल्पना नव्हती. महाराष्ट्रातल्या ज्या शाळांमध्ये NCC विषय होता त्या शाळांचे कडेट्स तिथे येणार होते. कॅम्प दहा दिवसांचा होता. ठाण्याहून ट्रेनने निघालो तेव्हा ट्रिप असल्यासारखं वाटत होतं. फक्त गणवेश आणि बूट यामुळे मोकळेपणा नव्हता. धमाल मज्जा करत आम्ही कॅम्पस्थळी पोहोचलो. खूप मोठ्ठया मैदानावर जिकडे तिकडे लहान मोठे अनेक तंबू बांधलेले दिसत होते. जणू एक गावंच वंसलेलं दिसत होतं. आम्ही दिवसाच पोहोचलो. सगळीकडे लष्करी जवान, विविध शाळांचे NCC प्रमुख आणि कॅडेट्स दिसत होते. आम्हाला तीन तंबू मिळाले. एका तंबूत दहा कॅडेट्स झोपण्याची सोय होती. तंबूच्या भिंतीकडे तोंड आणि मध्यभागी पाय अशी झोपायची व्यवस्था होती. आम्ही आपापलं बेडींग रांगेत ठेवलं. इतक्यात दुपारच्या जेवणाचा बिगुल वाजला. आम्हाला सांगितलं गेलं होतं बिगुल झाल्यानंतर ठराविक वेळात पोहोचलं नाही तर जेवण मिळणार नाही. जेवण घेऊन येण्यासाठी आम्हाला नव्या बदल्या, वाढण्यासाठी डाव चमचे दिले होते. ताटं वाट्या मात्र स्वतःची. आमच्या चमुमधले दोन कॅडेट्स जेवण घेऊन आले. आम्ही गोल करून बसलो. भाजी नावाचं काहीतरी होतं, आमटी नावाचं तिखट पाणी आणि रोट्या. पहिला घास मुखात जाताच तो घशाखालीच उतरेना. भाजी आमटी दोन्हीला एकच चव होती. कसंबसं अन्न पोटात ढकललं आणि आटोपलं एकदाच जेवण. दिलेल्या वेळेतच जेवण उरकून, बादल्या भांडी धुवून आपापल्या तंबूत जायचं होतं. दुसऱ्या शाळेच्या कॅडेट्सना थोडा उशीर झाला त्याची शिक्षा ते भोगताना दिसत होते. लष्करात शिस्तीला फार महत्व असतं. पहिला दिवस असल्याने आराम होता. आम्ही संपूर्ण कॅम्प भागात फिरत होतो. प्रातर्विधीची सोय पाहावी (महत्वाची गोष्ट ) म्हणून विचारत विचारत लांबवर गेलो. तांबूपासून लांब अंतरावर एके ठिकाणी लांबच लांब खूप खोल चर खणलेले होते. वरून प्रातार्विधीसाठी मध्ये जागा ठेवून लाकडी फळ्या लावलेल्या होत्या आणि दोन्ही बाजूनी पडदे लावून प्रत्येक संडास वेगळा केलेला होता. आम्ही जवळ जाऊन पाहिलं ( कारण अजुन त्याचा वापर झालेला नव्हता ) तर खोली एव्हढी होती की चुकून फळी निसटली तर गुदमरून मृत्यू याशिवाय काही घडलं नसतं. अर्थात लष्करी व्यवस्था असल्यामुळे तसं काही झालं नसतं हा भाग वेगळा. जसजशी सायंकाळ होऊ लागली तसा थंडीचा कडाका जाणवू लागला. रात्री पुन्हा जेवणाचा कार्यक्रम. आमच्या पोटात गोळाच आला. जेवत असताना एक वरच्या हुद्याचे लष्करी अधिकारी आमच्याजवळ आले आणि जेवणाचा दर्जा, चवीबद्दल आमच्याकडे चौकशी करू लागले. आम्ही हीच संधी आहे हे जाणून तरीही भित भितच चांगली नसल्याचं सांगितलं. आपण तक्रार केली हे कळलं तर शिक्षा व्हायची ही मनात भिती होतीच. परंतू तसं काहीही झालं नाही. दुसऱ्या दिवसापासून आम्हाला जेवणात अंडी, गोड शिरा, चिकन असे पदार्थ मिळू लागले. भाजी आमटीचा दर्जाही सुधारला. फक्त त्या रोट्या मात्र अखेरपर्यंत तशाच होत्या.
पहाटे अक्षरशः थंडीने काकडत आम्ही प्रातार्विधीला गेलो. प्रचंड थंडी आणि त्या चरात पडायची भिती यामुळे output काहीही न येता आम्ही परतलो . अंघोळ करण्याचा प्रश्नच नव्हता. सगळं आटोपून नाश्ता करून तयार झालो. पहिला दिवस म्हणून प्रत्येक शाळेच्या कॅडेट्सची सलामी परेड कॅम्पच्या प्रमुख कमांडर समोर झाली. त्यानंतर संपूर्ण कॅम्पचा कार्यक्रम सांगितला गेला. औषधपाणी, वैद्यकीय मदत या सगळ्या सोयी तिथे होत्या. एका लहानशा तंबूत हॉटेल सुद्धा होतं.
सकाळचा कार्यक्रम सुरु झाला. एका ग्रुपला कवयातीचं शिक्षण , एका ग्रुपला स्वच्छता करण्याचं काम, दुसऱ्या ग्रुपला एखाद्या विषयाची माहिती असे कार्यक्रम सुरु होते. इतक्यात एका कॅडेटला परेड करताना उन्हामुळे चक्कर आली आणि तो पडला. असली कौतुकं लष्करात चालत नाहीत. त्याला उठवून पाणी वगैरे पाजून दुसऱ्या हलक्या कामाला पाठवण्यात आलं. हे बऱ्याच जणांना आवडून गेलं. पुढे काही कॅडेट्सनी चक्कर आल्याचं नाटक केलं पण त्यांनी ते लगेच ओळखलं आणि गंमत म्हणजे त्या कॅडेट्सना जास्त मेहनतीच्या कामाला पाठवण्यात आलं. सायंकाळी सहा वाजता सगळा कार्यक्रम संपत असे. बिगुल वाजायचा आणि सगळे आपापल्या तंबूत जायचे. त्यानंतर रात्रीच्या जेवणापर्यंत आम्ही मोकळे असायचो. रात्री प्रत्येकाला आळीपाळीने पेट्रोलिंग करायचं आहे हे ऐकून माझ्या पोटात गोळाच आला. नशीब ! मला एकदाही रात्री जावं लागलं नाही. आम्हाला तंबूत उजेडासाठी कंदील दिलेले होते. ते रोज साफ करून त्याची काच स्वच्छ करून पेटवावे लागायचे. बाहेर मात्र दिवे होते पण ते ही बल्बचे. संडासाच्या भागातही असेच कमी प्रकाशाचे दिवे होते. रात्री जरूर लागली (अर्थात लागायचीच ) तर जायला भीतीच वाटायची. आम्ही झोपताना पूर्ण कपडे, त्यावर स्वेटर, कानटोपी किंवा मफलर, पायात बूट हे सगळं घालून आणि अंगावर जाड पांघरूण घेऊनही मध्यरात्री पोटातून प्रचंड थंडी वाजायची. तंबूच्या कनातीखालून थंड हवा आत येत असे. जरा झोप लागते न लागते तोच जागे होण्याचा बिगुल वाजायचा.
दिवसभर कवायत, लष्कराच्या विविध अंगांची माहिती, रायफल चालवण्याचं प्रशिक्षण, कॅम्प भागाची स्वछता, लढाईच्या वेळी घेण्याची काळजी त्याची माहिती आणि प्रात्यक्षिक असा भरगच्च कार्यक्रम असायचा. सायंकाळी आम्ही अक्षरशः गळपटून जायचो. आणि रात्री थंडीने बेजार व्हायचो. पळून जावं असं वाटायचं, घरी दिवाळीच्या फराळाचे पदार्थ बनत असतील त्यांची आठवण यायची.
आम्हाला कधी एकदा कॅम्प संपतोय असं झालं होतं. आंघोळी न केल्याने आम्ही अक्षरशः काळवंडून गेलो होतो. आमच्या शिक्षकांचं वास्तव्यही तंबूतच होतं, पण त्यांना झोपायला लोखंडी खाटा तरी होत्या.
आणि अखेर शेवटचा दिवस उजाडला. आम्ही खूप आनंदात होतो. शेवटच्या दिवशी सायंकाळी campfire झाला. करमणूकीचे कार्यक्रम झाले. प्रमुख कमांडरनी आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि आमची रात्रीची ट्रेन असल्यामुळे आमच्या सामानासहित लष्करी ट्रकमधून आम्ही कॅम्पचा तळ सोडला.
परतताना एक मनापासून वाटू लागलं, फक्त दहा दिवसांत आम्ही एव्हढे हैराण झालो, मग आपले शूर जवान तिन्हीत्रिकाळ, कडाक्याची थंडी, कडकडीत ऊन आणि कोसळणारा पाऊस याची जराही पर्वा न करता डोळ्यात तेल घालून आपली ड्युटी करत असतात, सीमेचं रक्षण करत असतात, आराम नाही, पुरेशी झोप नाही, खाण्या जेवण्याच्या खोडी ठेवता येत नाहीत. त्यांच्या जीवावर सुरक्षित असणाऱ्या आपल्यासारख्या शहरवासियांना याची जाणीवही नसते की आपण जेव्हा शांतपणे ऊबदार गादी पांघरूणात निवांत झोपलेले असतो त्यावेळी हे जवान देशाच्या संरक्षणाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत असतात. त्रिवार सलाम त्यांच्या देशप्रेमाला, देशसेवेला आणि निधड्या छातीने शत्रूवर आक्रमण करत विरमरणाला सामोरं जाण्याला.
जय हिंद.
प्रासादिक म्हणे,
— प्रसाद कुळकर्णी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..