नवीन लेखन...

मेरे प्यारे मित्रों ssss

 

मेरे प्यारे मित्रों ssss,

(कृपया माझी ही गंभीर आणि वैचारिक पोस्ट पूर्ण न वाचतांच क्षणार्धात ‘लाईक’ करूं नये, त्यावर थोडा शांतपणे विचार करावा ही विनंती. चर्चा झालीच तर ती निकोप, वैचारिक आणि तर्कसुसंगत व्हावी अशी अपेक्षा आहे).

मित्रांनो, माकड कसं पकडतात ते ठाऊक आहे कां ? माकड-पारधी एक मोठा भोपळा पोखरून झाडाला घट्ट बांधून ठेवतो. त्याला माकडाच्या लुकड्या हाताचं मनगट जेमतेम आंत जाईल इतक्याच आकाराचं भोंक पडलेलं असतं. लांब असलेलं माकड हे नीट पहात आहे अशी खात्री करून त्या भोपळ्यात चणे वगैरे कांहीतरी टाकतात आणि पारधी लांब निघून जातो. माकड हळूंहळूं भोपळ्याजवळ येतं, आपला पंजा अरुंद करून आपला लुकडा हात भोपळ्यात सरकवतं आणि मूठ भरभरून चणे घेतं, पण त्या भोपळयाचं तोंड त्याची मूठ बाहेर निघेल इतकं मोठं नसल्यामुळे, त्याची मूठ आतच अडकून बसते, कांही केल्या बाहेर निघत नाही, चणे सोडून देऊन आपला हात मोकळा करण्याचा माकडाला कांही केल्या मोह आवरत नाही आणि तो जास्तीत जास्त वेळ फुकट घालवून आपल्या स्वत:लाच तिथे अडकवून ठेवतो पण मूठभर चणे कांही सोडत नाही आणि हीच संधी साधून पारधी माकडावर जाळं टाकून त्याला पकडतो. केवळ मूठभर चण्यासाठी माकड आपलं स्वातंत्र्य गमावून बसतो आणि आयुष्यभर मालकाच्या तालावर उड्या मारीत रहातो आणि छड्या खात राहतो, तरीही त्याच्याच मागून धांवत असतो.

आपलं तरी वेगळं काय झालं आहे ? आपण त्रयस्थ वृत्तीने अभ्यास केला आणि नोंद ठेवली तर आपल्याला नक्की कळूं शकेल कीं आपण आपला दिवसाचा सरासरी किती महत्वाचा वेळ फेसबुक (आणि व्हॉटसअॅपवर) वर वायां घालवला, पोस्ट्सवर टाकलेल्या प्रतिक्रियांच्या वेळां पहिल्या तर) किती जागरणे केली, ज्या वेळात आपण सकारात्मक, विधायक, चिरंतन असं कांहीतरी करूं शकलो असतो, एखादे वाचानालय सुरूं करून चांगली पुस्तके वाचूं शकलो असतो, लिहूं शकलो असतो, चांगल्या विचारांचं आदान-प्रदान करूं शकलो असतो, ज्यांना गायन, वादन येतं, हस्तकला, शिल्पकला, चित्रकला येते, त्यांनी त्यात प्रगती केली असती, रीतसर फोटोग्राफी शिकूं शकलो असतो, एखादी नवीन भाषा शिकूं शकलो असतो, एखाद्या चांगल्या विषयात गाडून घेऊन त्या विषयात प्रगती करूं शकलो असतो, आपले अनुभव पेनाने कागदावर लिहून काढूं शकलो असतो, सुहृदांना पत्रे पाठवूं शकलो असतो, हेडफोन्स लावून उत्तमोत्तम गाणी ऐकून मन रिझवूं शकलो असतो, गरजू गरीब मुलांना विनामूल्य शिकवूं शकलो असतो, आपल्या कुटुंबासाठीच नव्हे तर समाजसेवी संस्थांसाठी जरा वेळ देऊं शकलो असतो, योगासने व्यायाम करूं शकलो असतो, शरीराच्या आरोग्यासाठी अधिक वेळ काढूं शकलो असतो, मोकळ्या हवेत फिरून येऊं शकलो असतो, मित्रमंडळीना, नातेवाईकांना भेटूं शकलो असतो, आपल्या डोळ्यांना आलेला धोका आणि मनाला आलेला थकवा आणि शिणवटाही कमी करूं शकलो असतो…..पण फेसबुक सोडण्याचा (निदान कमी करण्याचा) मोह आवरत नाही.

सरतेशेवटी आपण नक्की मिळवलं काय आणि किती आणि गमावलं काय आणि किती याचा जमाखर्च आपण कधी मांडला आहे कां ? एक डॉक्टर मित्र मला म्हणाले कीं हे एक विदारक आणि अटळ असं कटुसत्य आहे कीं नजिकच्या काळात डोळ्यांचे, कानाचे आणि मेंदूच्या रोगाचे पेशंटस् भयानक प्रमाणात वाढणार आहेत.

मला खात्री आहे कीं माझे हे प्रवाहाच्या विरुद्ध जाणारे विचार वाचून मला शेकडों लाईक्स, इमोजी येतील, विचार पटल्याच्या प्रतिक्रिया येतील, (झणझणीत अंजन घातलंत वगैरे..वगैरे), टीकाही होईल, पण प्रत्यक्ष त्याचा कांही सकारात्मक परिणाम झाला तर भरून पावलं.

जातां जातां : मी स्वत: अगदी सुरुवातीपासून (जाणीवपूर्वक) व्हॉटसअॅपवर नाही आणि कधीच नव्हतो. आजपर्यंत माझं कांहीही अडलेलं नाही. मी फेसबुकवर आहे, पण आतां त्याचाही प्रचंड उबग येत चालला आहे, फेसबुकमुळे अत्यंत फालतू समस्या वाढत आहेत. मी फेसबुक एकदम बंद न करतां माझी withdrawal syndrome ची (व्यसन सोडण्यापूर्वीची) प्रक्रिया हळूंहळूं कळतनकळत अलगद मी सुरूं केली आहेच. माझ्यावाचून कोणाचंच कांही अडत नाही, तर फेसबुक-फ्रेंड्स तर किस पेड की पत्ती ! ज्याच्याशी निखळ मैत्री रहायची ती रहाणारच आहे.

आधी गुंतायचं नाही आणि मग नंतर कुंथायचं नाही असं म्हटलं जातं. आपणच आपला पसारा वाढवतो आणि मग तो आवरण्यात आपला वेळ जातो, काय ठेवायचं आणि काय फेकायचं याचा निर्णय घेणं कठीण होऊन बसतं. शेवटी ज्याला त्याला सारासारविवेकबुद्धी आहे, योग्य निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य आहे, आणि ज्याचा निर्णय त्यानेच घ्यायचा आहे. मी कोण कुणाला काय सांगणार ? तो अधिकार मला नाही. सूज्ञांस सांगणे नलगे.

— सुभाष जोशी, ठाणे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..