नवीन लेखन...

झुळझुळणारा छायानट

“ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे
आणि ह्या मातीतुनी चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लखडून जावे”
ना. धों. महानोरांच्या प्रसिद्ध कवितेतील या ओळी राग “छायानट” रागाशी काहीसे साद्धर्म्य दाखवतात. रात्रीच्या पूर्वांगात गायला जाणारा हा राग, “षाडव/संपूर्ण” अशा जातीच्या या रागात, आरोही स्वरसप्तकात “निषाद” स्वराला स्थान नाही. “पंचम/रिषभ” हे या रागाचे वादी/संवादी स्वर असून, “षडज” आणि “मध्यम” स्वरांना या रागात भावदर्शनासाठी महत्वाचे स्थान आहे. “जोंधळ्याला चांदणे लखडून जावे” अशी असामान्य ओळ वाचताना, नजरेसमोर रात्रीच्या शांत समयी, शेतातील डुलणारी जोंधळ्याची रोपे येतात आणि या रागाच्या समयाला भाविक स्वरूप देतात.
खालील रचना, ही छायानट रागातील अप्रतिम बंदिश आहे. पंडित ओंकारनाथ ठाकुरांच्या असामान्य गायकीने नटलेला, छायानट. पंडितजींच्या गायनाची सगळी वैशिष्ट्ये यथार्थपणे दाखवणारी, ही रचना आहे. सुरवातीची मंद्र सप्तकातील घुमारेदार गायकी आणि त्या आलापीतून, पुढे विस्तारीत होणारी ही रचना म्हणजे या रागाचा “अर्क” आहे.
ओंकारनाथ ठाकुरांच्या आवाजाची काही वैशिष्ट्ये बघायला गेल्यास, आवाजाचा केलेला आवाहक उपयोग. तसे बघितले तर ग्वाल्हेर घराण्यातील गायकांच्या आवाजात एक प्रकारे एकाच स्वन डोकावत राहतो. मग, स्वरमर्यादा, गायनप्रकार, विस्तारासाठी कुठलाही राग निवडलेला असो. कारणे अनेक देता येतील पण आवाजात स्वनभेद फार क्वचित अनुभवायला मिळतो. ओंकारनाथ ठाकूर इथे स्वत:चे वेगळेपण ठसठशीतपणे जाणवून देतात. मग, तो कधीतरी हळुवार, आर्त असेल किंवा काहीवेळा विलक्षण बोचरा वाटणारा पण प्रचंड ताकदवान आवाज जोरदार तानांनी भारून टाकतो. आपण नेमके काय करीत आहोत, याची यथार्थ जाणीव गायनातून आढळते. आपल्या मांडणीत विविधता यावी म्हणून त्यांनी किराणा सारख्या वेगळ्या घराण्याच्या गायकीचा अवलंब आपल्या गायनात केल्याचे आढळते. तसेच शब्दांच्या उच्चारांवर अधिक भर दिसतो. वास्तविक, रागदारी गायनात, शब्दोच्चाराला फारसे महत्व दिले जात नाही, ओंकारनाथ अपवाद. गायनातील कारागिरी, हा भाग फार महत्वाचा आहे. सुरवातीला, गायनात, क्षमता तसेच कौशल्य, याचा आढळ दिसतो पण पुढे त्याला मात्र दुर्दैवाने, त्याला प्रदर्शनाचे स्वरूप आले. विशेषत: द्रुत लयीत, गुंतागुंतीच्या ताना घेणे तसेच तार ते खालचे स्वर व उलट अशी झेप घेणे, अवाक करणारे होते. गायनात, “नाट्यात्म” आणणे आणि रसिकांना भारून टाकणे, हा विशेष खास म्हणावा लागेल.
हिंदी चित्रपट गीतांत, शास्त्रीय नृत्य आणि त्यावर आधारित गीते, याना अपरिमित लोकप्रियता मिळाली आहे. एकात नृत्यावर आधारित गाणे म्हणजे रचना बहुतांशी द्रुत लयीत आणि अधिक आवाहक असल्याने, रसिकांचे लक्ष वेधून घेण्याचे काम, ही गाणी यथास्थित पार पाडतात. वास्तविक, शास्त्रीय नृत्यावर आधारित अशी गाणी असतात, त्यामुळे नृत्यातील जरी संपूर्ण शास्त्र जरी मांडता येत नसले तरी नृत्याबद्दल रुची निर्माण होण्यास नि:संशय मदत होते, हे निश्चित. “तलाश” चित्रपटातील “तेरे नैना तलाश कर जिसे” हे गाणे या पठडीतले आहे. या गाण्यात, “छायानट” राग जरी अस्पष्ट दिसत असला तरी जेंव्हा रचना त्या रागातील स्वरांवर “ठेहराव” घेते, ती जागा विलक्षणरीत्या झगमगून उठते. मन्नाडे यांचे गायन, अतिशय वेधक आहे. सतारीच्या द्रुत लयीतील गत आहेत आणि त्या लयीशी, गायन अप्रतिमरीत्या जुळून आलेले आहे.
“खोयी खोयी आंख हैं झुकी पलक है;
जहां जहां देखेगा तू, वही झलक है खोयी, खोयी;
तेरे नैना तलाश कर जिसे वो है तुझी में कही दिवाने”.
मन्नाडे  यांचा आवाज खुला आणि मर्दानी आहे. त्याचा पल्ला चांगला, अतिशय विस्तृत आहे. याचा परिणाम असा होतो, गाण्यात सर्वत्र, खुलेपणा आणि ताकद राखणे, त्यांना जमू शकत होते. त्यांचा आवाज हलका (सुगम संगीताला अतिशय पूरक) असल्याने, सर्व प्रकारच्या ताना, सहजतेने घेता येतात. भारतीय शास्त्रीय गायनात स्वच्छ “आ”करणे गायन करण्यावर भर असतो आणि हे देखील मन्नाडे, सहज करू शकतात. (खरे सांगायचे तर अनेकदा व्यावसायिक शास्त्रीय गायकांना देखील हे जमत नाही, हे लक्षात ठेवणे आवश्यक) आकाराने शक्य होणारा विशेष गुण म्हणजे सहकंपन वा गुंजन हा परिणामत: त्यांच्या गायनात ओतप्रोत भरला आहे. दुसरा भाग असा, प्रत्येक रचनेनुरूप जी एक भावस्थिती ढोबळमानाने निश्चित झालेली असते, ती दाखवणारा आवाजाचा लगाव, ते देऊ शकतात. वास्तविक चित्रपट गीतास, सांगीत कल्पनांची बढत करायची नसून, एक संबंधित मूड निर्माण करून, बाकीची कार्ये साधायची असतात. म्हणून, सुरेलपणा, भरीवपणा आणि यथायोग्य उच्चार या बाबी अत्यावश्यक ठरतात आणि हे करताना, आवाजातून, चित्रपटीय व्यक्तिमत्व मिळावे लागते. मुख्य बाब, म्हणजे हे सगळे करताना, त्यांचा आवाज कुठेही नाटकी होत नाही भावनिक संतुलन करून, चित्रपट संगीत अधिक परिणाम करते, हे वैशिष्ट्य, त्यांनी सतत कायम राखले.
आता आपण, लताबाईंच्या सुरवातीच्या काळातील एक अतिशय सुश्राव्य गाणे ऐकुया. गाण्याची चाल खरोखरच अतिशय गोड, ओघवती आहे. प्रसंगी रचना द्रुत लयीत जाते परंतु शब्दकळेच्या आस्वादाला कुठेही बाधा पोहोचत नाही. गाण्याच्या सुरवातीपासून, रागाची ओळख होते, म्हणजे  बघा,”चंदा रे जा रे” ही ओळ गाताना, स्वरांच्या हेलाकाव्यातून, आपल्याला छायानट भेटतो आणि पुढे, अंतरा आणि मधले संगीत ऐकताना, याच रागाचे सूर ऐकायला मिळतात पण तरीही, हे गाणे म्हणजे या रागाचे लक्षणगीत नव्हे!! या गाण्यात, बहुतेक हिंदी गाण्यात सहजपणे वावरणारा केरवा ताल आहे. प्रेमाची कबुली देणारे गाणे आहे पण, तेंव्हाच्या संस्कृती नुसार गाण्याची हाताळणी अतिशय संयत रीतीने झाली आहे.  आता, गाण्यात कुठे छायानट बाजूला पडतो? हे बघायला गेल्यास, गाण्याचा पहिल्या अंतरा सुरु होताना, स्वरांची जी “उठावण” आहे, ती बारकाईने ऐकायला हवी. तिथे, रचनेने, हलक्या हाताने, रागाला बाजूला सारले आहे. अर्थात, ही कारागिरी, संगीतकार म्हणून नि:संशय, खेमचंद प्रकाश यांची.
“चंदा रे जा रे जारे, पिया का संदेसा मोरा कहियो जा;
मोरा तुम बिन जियरा लागे रे पिया, मोहे इक पल चैन ना आये”.
एकूण कारकीर्द ध्यानात घेत, या संगीतकाराला, “पियानो”,”सेक्साफोन” ,”क्लेरीनेट ” इत्यादी पाश्चात्य वाद्यांची आवड लक्षात येते. एक तांत्रिक विशेष इथे मांडणे जरुरीचे ठरते. तसे बघितले तर ही तिन्ही वाद्ये एका वेधक सीमारेषेवर उभी आहेत. एक तर अखंड व सलग ध्वनी पुरवायचा किंवा सुटेसुटे, तुटक पण ठोस ध्वनी पुरवायचे, या दोन टोकांच्या दरम्यानची जागा या वाद्यांनी व्यापली आहे. “सतार”,”जलतरंग” इत्यादी वाद्ये वापरली नाहीत, असे नाही (वरील गाणे या संदर्भात ऐकावे) पण त्यांची वाद्ययोजना आधी उल्लेखलेल्या अभारतीय वाद्यांनी निर्माण केलेल्या ध्वनीप्रतिमांशी अंतरंग नाते जोडून आहे. आणखी एक बाब बघता येते. खेमचंद प्रकाश, यांना नाट्यात्म क्षण उभा करण्यासाठी ताल व ठेका आणि वाद्ये न वापरण्याचे तंत्र मनपसंत आहे, असे ठामपणे म्हणावे लागते. अशा वेळेस, गाता आवाज जेंव्हा सुरावट रेखायला लागतो, तेंव्हा ही वाद्ये, त्या सुरावटीला पाठींबा देतात, पण ध्यानात येईल इतक्या नरमाईने. गाणारा आवाज तार स्वरांत जाईल किंवा खालच्या पट्टीवर पोहोचेल पण, त्याचे परिणामकारक कार्य अतिशय नियंत्रित गतीने होत राहील. वरील गाण्याचाच आधार घ्यायचा झाल्यास, सुरवातीचे शब्द किंवा “मुखडा” कानावर पडेपर्यंत सुरावट खालच्या स्वरांवर रुंजी घालत असते आणि जेंव्हा ठाशीव किंवा वरच्या स्वरावर झेप घेणारा मुखडा येतो, तेंव्हा गीताचा रोख(च) बदलतो. आणि हे सगळे करताना, गाण्याची लय देखील, मंद्र सप्तकात वावरत असते.
“पापा कहते है” या चित्रपटात, संगीतकार राजेश-रोशन या जोडीने असेच सुंदर गाणे दिले आहे – मुझ से नाराज हो तो हो जाओ. सोनू निगम यांनी हे गाणे गायले आहे. सत्कृत्दर्शनी ऐकायला घेतले तर, काही वर्षापूर्वी “जहांआरा” म्हणून आलेल्या चित्रपटात याच चालीच्या धर्तीवर – “बाद ए मुद्दत तो ये घडी आई” या गाण्यावर आधारित या गाण्याची चाल वाटते आणि याचे कारण, दोन्ही गाणी ही “छायानट” रागावर आधारित आहेत!!
“मुझ से नाराज हो तो हो जाओ,
खुद से लेकिन खफा खफा ना रहो.”
अर्थात जरी गाण्यांच्या चालीत साद्धर्म्य दिसत असले तरी गाणे म्हणून ही चाल अतिशय श्रवणीय आहे. चाल काहीशी संवादात्मक असल्याने बहुतेक सगळी रचना सलग, एक statement केल्यासारखी विस्तारत जाते. या गाण्यातील प्रत्येक “वळणावर” आपल्याला छायानट राग भेटतो आणि याचा परिणाम, या रागाची केवळ ओळखच नव्हे तर सगळे सौंदर्य आपल्या नजरेत सामावले जाते. अर्थात, सुगम संगीताचे हे एक खास वैशिष्ट्य मानायलाच हवे.
असेच एक अप्रतिम गोडवा लाभलेले गाणे,”जहांआरा” या चित्रपटात, संगीतकार मदन मोहन यांनी दिलेले आहे. “बाद ए मुद्दत तो ये घडी आई” हे गाणे म्हणजे युगुलगीत कसे गावे, याचे सुंदर उदाहरण आहे. प्रणयी थाटाचे गीत आहे पण हळुवार, संयत चालीने त्या गीताचा गोडवा अधिक वाढला आहे. खरेतर कविता म्हणून देखील ही रचना आगळा आनंद देते आणि याचे श्रेय निश्चितपणे, राजेंद्र कृष्ण यांच्याकडे जाते. शायरीत काही उर्दू शब्द आहेत पण त्याचे प्रमाण तसे अल्प असल्याने, ज्यांना उर्दू समजत नाही, त्यांच्या वाचनात देखील किंचितही विक्षेप येत नाही.
“बाद ए मुद्दत तो ये घडी आई,
आप आये तो जिंदगी आई;
इश्क मर मरके कामयाब हुआ
आज एक जर्रा आफताब हुआ”.
गाण्यात कुठेही अनावश्यक वाद्यमेळ नसल्याने, गाणे ऐकताना देखील आपण काव्यास्वाद घेऊ शकतो. रफी आणि सुमन कल्याणपूर यांनी गायन केलेले आहे. लताबाईंच्या सार्वभौमत्वाला जर त्याच शैलीत कुणी आव्हान देऊ शकले असते तर ते केवळ सुमन कल्याणपूर, या गायिकेने!! आवाजाची जात बरीचशी मिळती जुळती असल्याने आणि आवाज निमुळता होत, शेवटी आवाजाला लोचदार टोक येत असल्याने, लताबाईंची गायकी आत्मसात करणे, या गायिकेला जराही अवघड गेले नाही (असे म्हणतात, हीच त्यांच्या गायनाबाबत मर्यादा ठरली!!) दाट बासुंदीत हळूहळू केशर विरघळत जावे त्याप्रमाणे ही चाल आपल्या मनात उतरत जाते. चाल तशी सहजपणे मनाची पकड घेणारी नाही पण जरा बारकाईने वेध घेतला तर गाण्याची सगळी सौंदर्यस्थळे जाणवतात आणि हे गाणे परिचयाचे होऊन बसते.  राग छायानट तसा इथे काही ठिकाणी स्पष्टपणे आढळतो पण हा संगीतकार, नेहमीच रागाच्या सावलीत “तर्ज”बांधून पुढे रागाला बाजूला सारतो आणि चालीला स्वतंत्र अस्तित्व प्रदान करतो. या गाण्याच्या बाबतीत तीच शैली वापरली आहे आणि त्या दृष्टीने, गाणे फारच बहारीचे होते.
– अनिल गोविलकर

Avatar
About अनिल गोविलकर 92 Articles
मी अनिल गोविलकर. उभरता लेखक असे म्हणता येईल. माझा ब्लॉग आहे – www.govilkaranil.blogspot.com ही वेबसाईट आहे. या वर्षी, माझ्या ब्लॉगला ABP माझा स्पर्धेत २रे पारितोषिक मिळाले आहे. तसेच "रागरंग" नावाचे पुस्तक – रागदारी संगीतावरील ललित आणि तांत्रिक, लेखांवर आधारित- प्रसिद्ध झाले आहे. मी १९९४ ते २०११, दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्ताने वास्तव्याला होतो. त्याचा परिणाम म्हणून त्या देशावरील ललित लेख – जवळपास ३५ ते ४० लेख लिहिले आहेत तसेच संगीतावर आधारित ( जागतिक स्तरावरील संगीत) १०० पेक्षा जास्त लेख लिहून झाले आहेत. काही आवडलेल्या पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..