नवीन लेखन...

टीव्हीच्या आठवणी…

 

पाचेक वर्षे झाली.. जवळपास टीव्ही पाहताच नाही! अगदी खास असं कारण नाही, पण वडिलांच्या हातातला रिमोट माझ्याकडे येता येता टीनेज मुलाच्या हाती गेला, मग बातम्या आणि फुटबॉल मॅचेसच्या मध्ये माझ्या आवडीच्या प्रोग्रॅमचं सँडविच व्हायला लागलं! त्यातच टॅब घेतला होता, त्यावर आवडीचं सगळं हेडफोन कानाला लावला की बघता यायला लागलं..

पण कधी कधी वाटतं, हेडफोन लावला की अक्षरशः संबंध तुटतो जगाशी..
उगाच नॉस्टॅल्जिक होऊन उमाळे आणायचे म्हणून नाही,पण पूर्वी एकच चॅनेल आणि ठराविक वेळ प्रक्षेपण असल्याने घरातील सगळे एकाजागी एकत्र जमत टीव्ही पाहण्याच्या निमित्ताने..
दूरदर्शनचं ते म्युझिक सुरू झालं की हातातील पेपरची घडी घालून घरातील बाबा बायफोकल चष्म्याच्या वरच्या भागातून समोर पहायला लागत, बाहेर खेळणारी चिल्लीपिल्ली पळत येऊन खाली जमिनीवर माना वर करुन बघत बसत, स्वयंपाकघर आणि हॉलच्या दाराशी जमिनीवर बसून घरातील आजी मटार सोलत टीव्हीकडे बघत बसे, ओट्याजवळची आई पोळ्या लाटता लाटता, कुकरचा गॅस लहान करत आतूनच टीव्हीकडे बघे..

चॅनेल्स नव्हती,रिमोट नव्हते त्यामुळे जे काही समोर सुरू आहे, ते भक्तिभावाने पाहत सगळं कुटुंब रंगून जायचं…त्यातल्या त्यात टीव्हीचा आवाज कमीजास्त करणं हीच काय ती हालचाल.. तेव्हाचा रिमोट हा घरातील शेंडेफळ असे..
छोट्याश्या फ्लॅटमधील ती संध्याकाळ..

घरात अंधार पडायला लागला की कोणीतरी उठून स्विचबोर्डकडे पळायचं, फडफडणारी ट्युबलाईट एकदाची पेटली की हातातील मटाराचं टरफल बाजूला ठेवत आजी तोंडातल्या तोंडात पुटपुटत ट्युबलाईटकडे पाहून नमस्कार करणार, आत देवघरातून दरवळणारा उदबत्तीचा घरभर पसरलेला सुवास, त्यातूनच मधूनच येणारा फोडणीचा गंध, कार्यक्रम कंटाळवाणा व्हायला लागला की आजीच्या मांडीवर हळूच डोकं ठेवून पडलेलं घरातील छोटं पिल्लू, “होईलच हं आता” असं म्हणत त्याच्या केसांतून हात फिरवत स्वयंपाकघराचा अंदाज घेत हळुवारपणे म्हणणारी आजी..

“चित्रहार थोडीही देर में” अशी पाटी दिसली की भूक विसरून टुणकन उठून बसलेलं ते पिल्लू..
चित्रहार सुरू झालं की पदराला हात पुसत दाराशी येऊन उभी राहिलेली आई, तिरक्या नजरेने ‘बस की’ असं रिकाम्या खुर्चीकडे खुणावणारे बाबा,
“असू दे” असं नजरेनेच दिलेलं उत्तर! हिरो हिरॉईनच्या झाडाभोवती फेऱ्या सुरू झाल्या की “काय बाई पाचकळपणा!” असं म्हणणारी आजी!
चित्रहार संपलं की जेवणाची तयारी सुरू..
“करा तयारी, आलोच हेडलाईन्स ऐकून” बाबा ताईला सांगतात. हेडलाईन्स ऐकून बाबा स्वयंपाकघरात येतात.

इतक्या वेळ टीव्हीसमोर सगळे एकत्र, आता डायनिंग टेबलावर..
सोसायटीच्या मधल्या चौकात उभं राहिलं की सगळ्या घरातील टीव्हीचे किंचित मागेपुढे असे एकच आवाज ऐकू येत..रात्री प्रक्षेपण संपलं की टीव्हीचा ऑफचा खटका फिरे..

खाली गाद्या टाकून पेंगुळलेलं पिल्लू त्या टीव्हीमधल्या आत आत विरत जाणाऱ्या निळसर ठिपक्याकडे बघत झोपेच्या अधीन होत असे..

डॉ.अमित बिडवे
ऑर्थोपेडिक सर्जन, लेखक
(पोस्ट शेअर करू शकता)

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 192 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..