नवीन लेखन...

मी आणि माझे शब्दालय

 

माणसाच्या घरात किती फर्निचर आहे , किती भारी सजावट आहे हे नेहमी बघितले जाते. माझे घर ज्यामध्ये मी राहतो तेथील सर्वात आवडती जागा कोणती असा प्रश्न कोणी मला विचारला तर माझे उत्तर माझे पुस्तकाचे कपाट म्हणण्यापेक्षा माझे ‘ शब्दालय ‘ असे उत्तर मिळेल. तिथे अनेक पुस्तके आहेत जी माझ्या मूड प्रमाणे उघडली जातात. अशा अनेक गोष्टी आहेत, की त्या शब्दाचे आणि माझे नाते दाखवतात. आपण अनेक लोकांच्या पुस्तकाच्या कपाटाबद्दल वाचलेही असेल पण माझे पुस्तकाचे कपाट तर आहेच पण त्याला काही दृश्य-अदृश शब्दाचे कपाट म्हणावे लागेल. अनेक प्रकारच्या अनेक गोष्टी त्यात आहेत कधीकधी त्या माझ्या मनात शब्दरूप घेतात , माझ्या विचाराला वेगळी दिशा देतात. सर्व काही त्यात मी अक्षरशः कोंबले आहे. त्यात अनेक पुस्तके अशी आहेत की त्या पुस्तकांना स्वाक्षरीच्या निमित्ताने त्या लेखकांचा स्पर्श झालेला आहे. अगदी इंदिरा संत याच्यापासून ते जेफ्री आर्चर किवा व्ही.एस. नायपौल किवा गिरीश कर्नाड याच्या पर्यंत अनेक पुस्तके आहेत. पण मला सर्वात विचार करायला लावतात अशी काही पुस्तके आहेत त्यात विंदा करंदीकर याचा ‘ विरूपिका ‘ हा काव्यसंग्रह त्यातील अनेक कविता मी वाचतो आणि स्वतःला आणि आजूबाजूच्या समाजाला तपासून बघतो त्यात माझे आणि माझ्या आजूबाजूच्या समजाचे विडंबन दिसते तेव्हा मी जमिनीवर येतो. तर गुरुनाथ धुरीची कविता आहे , झालेच तर लता मंगेशकर याच्यावर लिहेलेली हरीश भिमाणी आणि राजू भारतनने पुस्तके मानवी स्वभावाची दोन टोके दाखवतात.

ह्या माझ्या शब्दालयात बरेच काही आहे. कुठेतरी कोपर्यांत संत ज्ञानेश्वर यांच्या आळंदीमधील सोन्याच्या पिपळाचे सुकलेले पान आहे , तर कुठे १९८१ साली शिर्डीला गेलो असताना समाधीवरील सुकलेले फुल आहे , सर्व पुस्तके काढल्यावर सापडते हे सर्व कुठल्यातरी कोपऱ्यात , ते मी का आणले , माहित नाही, का जपले माहित नाही. पण आणले आणि ठेवले ,मी कुणाचा भक्त नाही. पण या का ला उत्तर नाही. एकदा असाच फोर्ट मधून फिरत होतो , तेव्हा एक जुने पुस्तक दिसले , वाळवी लागायला सुरवात झाली होती. त्यात ऑस्कर वाईल्डचे ज्याच्याशी सबंध होते त्याचे ‘ माय कन्फेशन ‘ हे पुस्तक पस्तीस रुपयास मिळाले. वाचता वाचता मी हादरत होतो, १९२५ चे पुस्तक असेल. फार वर्षापूर्वी मुंबईत कॅ. लक्ष्मी आणि त्यांच्याबरोबर ज्या स्त्रिया आझाद हिंद सेनेत होत्या , त्यांना राण्या म्हणत होते , ज्या जिवंत होत्या त्यापैकी काही आल्या होत्या , त्या सर्वांच्या स्वाक्षऱ्या मी त्या पुस्तकावर घेतल्या होत्या , ते पुस्तक मूड लागला की उघडतो त्यांचा सघर्ष मला उमेद देवून जातो अर्थात हे आधी वाचलेले असते पण मनाशी प्रश्न येतो का , का त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य उधळून टाकले. ही पुस्तके नुसती पाहताना अनेक विचार मनात येतात. ही अशी पुस्तके वाचून मनात विचार येतो की प्रत्येक पाच-साडेपाच फूट उंचीच्या देहात उर्जा किती ठासून भरलेली असते हे जाणवते , त्याचप्रमाणे जे. कृष्णमुर्ती , ओशो यांची पुस्तके कुठूनही , मधूनच उघडा नवा विचार देतात , अगदी वाचलेले असले तरी. ओशोच्या ‘ कठोपनिषद ‘ हे पुस्तक वाचताना प्रत्येक पान न पान विचार करण्यास अगतिक करते. लक्षात ठेवा , पुस्तके मनोरंजनही करतात आणि आपल्याला अगतिकही करतात. ती अगतिकता पराकोटीची टोकदार असते की , आपला तो संपूर्ण दिवसच खाऊन टाकते. जे,कृष्णमुर्ती पचवताना नाकेनुऊ होतात , तसेच ओशो कळतो काहीसा , पण वळत मात्र नाही. ह्या सर्वावर उतारा म्हणजे पु.ल. देशपांडे म्हटले तर तसेही नाही , त्याचा शेवट परत अस्वस्थ करतो. माझ्या ह्या पुस्तकाच्या कपाटात मला उर्जा देणारे असे अनेक शब्द आहेत. जे काही वस्तूवर आहेत , खरे तर त्या वस्तूंनी आज संपूर्ण जग खाऊन टाकले आहे. पेनने लिहिणारा मी आत्ता कॉम्पुटरवर लिहू लागलो ही प्रगती आहे. माझ्या कपाटात अशा एक दोन वस्तू आहेत त्यावरील शब्द त्या माणसाची ताकद दाखवतात. दोन पेन-drive आहेत माझ्याकडे त्याच्यावर के. एस . पुवा या माणसाची अक्षरे आहेत , स्वाक्षरी आहे , ह्या के.एस .पुआ ने पेन-drive चा शोध लावला. तो मलेशियाचा आहे , तो भेटला तेव्हा बरेच काही सांगत होता , त्याने त्याच्या स्वतःच्या कंपनीचा पेन-driveही मला स्वाक्षरी करून दिला. हा पेन drive माझ्या पुस्तकाचा कपाटाचा , शब्दालयाचा हिस्सा बनू शकणार नाही का ? असा मी विचार केला , कधी कधी तो मी हातात घेउन पाहतो आणि मनत विचार येतो ह्या लहान अक्षरांच्या मालकांनी किती क्रांती केली आहे. मला आवडलेले भन्नाट पुस्तकही त्यात आहे कदाचित अनेकांना पटणार नाही ते आहे ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचे हुसेनवरचे ‘ अनवाणी ‘ पुस्तक . हुसेनकडून मी एक गोष्ट शिकलो तो म्हणजे त्याचा ‘ कलंदर ‘ पणा. तसा तो उत्तम ‘ शो-मन ‘,पणा , तोही माझ्यात उतरला आहे असे अनेकजण म्हणतात, जाउदे . परंतु ही पुस्तके वाचता माझ्यात अक्षरशः माझ्यात उतरतात की हो …. , तोच अव्यवस्थितपणा माझ्या अंगात मुरलेला आहे, माझ्या पुस्तकाच्या कपाटात पुस्तके लावलेली नसून रचलेली आहेत, एखादे पुस्तक हवे म्हटले की बरीच काढावी लागतात आणि ती काढता काढता दुसरेच पुस्तक मिळते आणि ते मी वाचू लागतो , पहिले हवे ते पुस्तक मागे पाडते. अनेक वेळा आचार्य अत्रे यांचे ‘ समाधीवरील अश्रू ‘ पुस्तक वाचावेसे वाटते ते वाचून मी पुरता नॉस्टोलजिक झालेला असतो. शब्द , भावना , मन आणि आपण याचा भन्नाट अनुभव मला हे पुस्तक वाचताना येतो. वाचून बघा आणि मग बोला काय वाटते ते.

मला चित्राची भन्नाट आवड पण एकही चित्र काढता येत नाही, फार वर्षापूर्वी ‘ पिकासोची ‘ चित्रे मुंबईत आली होती , ती पाहिली आणि बाजारात गेलो , रंग, कागद आणले , बरेच पैसे खर्च केले. पण चित्र काढता काही आली नाहीत. पण लहानपणापसून गायतोंडे , रझा , आरा , अमृता शेरगिल , बाक्रे , राजा रविवर्मा, अकबर पदमसी , सर्वांची चित्रे पहात आलो. हुसेन , रझा, अकबर पदमसी अशा अनेकांच्या चित्राची पुस्तके माझ्या कपाटात आहेत त्यावर त्यानी केलेल्या स्वाक्षऱ्या आहेत , ती पुस्तके मी ‘ वाचतो ‘ ,आपण चित्र नेहमी बघतो असे म्हणतो , पण मी ती चित्रे वाचण्याचा प्रयत्न करतो , दरवेळी तेच तेच चित्र मला वेगवेगळे सांगते. त्या पुस्तकांना हात लावला की तो चित्रकार माझ्या बाजूला उभा आहे असे वाटते, किवा मी त्याला बघत आहे आहे असे वाटते. काही पुस्तकानी लहानपणापासून पाठ सोडली नाही ती म्हणजे ‘ नाझी भस्मासुराचा उदयास्त ” , चार्ली चाप्लीन , बाबुराव अर्नाळकर याचा काळापहाड . ही पुस्तके समोर दिसली तरी बरे वाटते. कधी मूड आला तर परत वाचून काढतो. ग्रेस माझा आवडता कवी , त्यांची पुस्तके तर परत परत वाचतो आणि भरकटतच जातो , हे भरकटणे मला खूप आवडते ,तर कधी कधी त्याचा ताण असह्य होतो तेव्हा पाडगावकरांच्या कविता , परत जागेवर वास्तवात आणतात त्या सतत सांगत असतात ‘ तुमचे आमचे सेम असते ‘ , तर कुसमाग्रज , बोरकर यांचा वेगळा रंग आठवतो आणि त्या कवितांकडे ओढला जातो. कवी नीरज , हरिवंशराय बच्चन याच्या कविता वाचणे आणि त्याच्या आवाजात आईकणे यात वेगळाच आनंद आहे. जयंत नारळीकरांची , मोहन आपटे यांची पुस्तकेदेखील कधीकधी उघडली जातात . जॉज ऑरवेलचे ‘ Animal Farm ‘ तर अजूनही वास्तवात ठेवते.
.प्रवीण दवणेचे ‘ ध्यानस्थ ‘ तर सिदार्थ पारधेचे ‘ कॉलनी ‘ अस्वस्थ करते. या सगळ्यामध्ये क्रिकेटपण आहेच. मी नेहमीच क्रिकेटला ‘ हिरवळीवरचे साहित्य ‘ म्हणतो , त्यात सुनील गास्वस्कारचे पुस्तक ,सचिन तेंडूलकरच्या भावाने अजित तेंडूलकरने ‘असा घडला सचिन ‘ हे पुस्तक तर ग्राहम गूच चे ‘ आउट ऑफ वाईल्डनेस ‘ त्याच्या स्वाक्षरीसह आहे , त्याचप्रमाणे विस्डेनची क्रिकेटची काही पुस्तके आहेत . त्यातील जुने फोटो , सदर्भ वाचताना मजा येते , त्या ‘ शब्दालयात ‘ फारुख इंजिनियर , अन्डी रोबेर्टस , अजित वाडेकर , अजिक्य रहाणे यांनी स्वाक्षरी केलेले चेडू आहेत , तर कोपऱ्यात दिनू पेडणेकर यांनी दिलेला त्यांच्या ‘ लव्ह बर्डस ‘ नाटकाचा एक ‘ मग ‘आहे त्यावर सर्वांच्या स्वाक्षऱ्या आहेत , हा सगळाच शब्दांचा मामला म्हणावा लागेल . क्रिकेटच्या पुस्तकामधील दुर्मिळ फोटो बघतो . जेव्हा मनात येते तेव्हा त्यांतील आवडता भाग अनेकवेळा वाचतो ,वाचले आहेत. तर काही अशी खूप पुस्तके आहेत माझ्या ह्या शब्दालयात ,ती माझी वाट पहात आहेत. मनात आले की पुस्तक घेतो , पण त्याच वेळी वाचतो असे नाही , ते माझ्या मूडवर अवलंबून असते, त्याचप्रमाणे काही पुस्तके सतत वाचली की बरे वाटते त्यात ओशोचे एक लहान पुस्तक ‘ ध्यान ‘ या नावाचे आहे. ते वाचताना अनेक जळमटे काढल्याचा भास होतो. जवळ पुस्तके असणे , ती वाचणे यात एक मला नशा वाटते.
काही ‘ घरात ‘ बार कॉर्नर ‘ किवा दारूच्या बाटल्यांचे कपाट असते त्याची नशा , सर्व आयुष्य खाऊन टाकते आणि पुढल्या पिढीच्या सर्वनाशासाठी हस्तांतरीत होते.

परंतु माझ्या घरचे माझे ‘ शब्दालय ‘ मला मात्र समृद्ध करते , माझ्या घरातील हे ‘ शब्दालय ‘ पाहून काहीजण विचारतात इतकी पुस्तके वाचलीस.

…..तर मी म्हणतो ‘ काही पुस्तके माझी अजून वाट पहात आहेत ?

आज या ‘ कोरोना व्हेकेशन ‘ मूळे त्या वाट पाहणाऱ्या पुस्तकांना परत भेटत आहे .

— सतीश चाफेकर

(दै. लोकमत मध्ये पूर्वप्रकाशित)

Avatar
About सतिश चाफेकर 426 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..