नवीन लेखन...

माध्यम शिक्षण

व्यवस्थापकीय संचालक एन्स्पायर वर्ल्ड प्रा. लि.

कोण म्हणत पॉलिटिक्समध्ये म्हणजे राजकारणात जायला शिक्षणच हवे असते.. आणि काय गरज आहे पत्रकार म्हणजे चांगला शिकलेला, विचारवंतच असला पाहिजे. दोन्ही वर्गातील लोकांनी काही बोलले, काही लिहिले की, समाजाला नवीन दिशा मार्ग दाखवला जातोच की, खरंच! काय गरज आहे का पत्रकार शिकलेला असण्याची. हल्ली तर कोणीही उठतो गाडीवर प्रेसचा स्टिकर लावतो आणि पत्रकार असल्याचे समाजात मिरवत त्याला मिळत असलेला मान सन्मान घेत बसतो.. कशासाठी हे सगळे सुरू आहे.

पॉलिटिक्स व प्रेस या दोन पी अक्षराने सुरू होत असलेल्या व्यवसायात उतरायला कोणत्याही शिक्षणाची अट लागत नाही हे आता तरी दिसत असलं तरी, आजही समाजात शिक्षणाला व बुद्धिमत्तेला मान आहे. ज्यांना शिक्षणाचे महत्त्व कळलेले आहे ते अशा व्यक्तीला मान देतात. भारतीयाना विशेषत नवीन पिढीला शिक्षणाचे महत्व समजलेले आहे.

दीडशे वर्षांच्या ब्रिटीशांच्या आणि त्याआधी कित्येक पिढ्यांच्या राजेशाहीच्या गुलामगिरीतून भारत स्वतंत्र झाला आणि २६ जानेवारी १९५० पासून आपण लोकशाही स्वीकारली. लोकशाही म्हणजे लोकांचे लोकानी लोकांसाठी चालवलेले राज्य ही सोपी व्याख्या असली तरी, ही लोकशाही टिकून आहे ती चार भक्कम पायांवर. ज्याप्रमाणे आपली खूर्ची चार पायांवर उभी असते यापैकी एक जरी पाय तुटला, वाकला तर खूर्चीवर बसणारा पडू शकतो. तसे लोकशाहीचे आहे. या चार पायांपैकी एक स्तंभ पत्रकारिता आहे. उरलेले तीन स्तंभ कोणते असा प्रश्न पडला तर, पत्रकाराला त्याचे उत्तर माहीतच असायला हवे. लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी व न्यायव्यवस्था आणि पत्रकारिता..या चार स्तंभावर लोकशाही टिकून आहे. भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतातील साक्षरता होती फक्त १२ टक्के ती २०११ च्या जनगणनेनुसार पोचली आहे ७४ टक्क्यांवर. १९४० च्या दशकात युरोपातील देशांमध्ये साक्षरता होती ९० टक्के ती आता १०० टक्के आहे. जो समाज साक्षर आहे तो वृत्तपत्र वाचतो, टीव्हीवरील बातम्या पाहतो, त्या समजून घेतो. त्यावर विचार करतो, चर्चा करतो आणि त्याचे मत बनवत असतो. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात १९४७ आधीच्या काळात महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, आगरकर, राजा राममोहन राय, सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा अनेक विद्वानानी लोकांमध्ये जागृतीसाठी वृत्तपत्र प्रकाशित केले, जे काही सुशिक्षित आहे त्यांच्यापर्यंत स्वातंत्र्याचे विचार पोचावे हा त्यामागचा विचार होता. हे सगळे संपादक उच्च शिक्षित होते. भारतातील पहिले वृत्तपत्र प्रकाशित केले जेम्स हिकी नामक ब्रिटिशाने. बेंगाल गॅझेट नावाचे पहिले इंग्रजीतील वृत्तपत्र जेम्स हिकी याने १७८० साली सुरू केले कोलकात्ता येथून. दोन वर्षे ते सुरू होते. महाराष्ट्राचा इतिहास पाहिला तर, बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक मानले जाते. ६ जानेवारी १८३२ साली मराठी व इंग्रजी भाषेतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ हे त्यानी प्रकाशित केले ते समाजप्रबोधनासाठी. या माणसाचे शिक्षण व कर्तृत्व पाहाल तर थक्क व्हाल. वयाच्या तिशीच्या आता एलफिस्टन कॉलेजला प्रोफेसर म्हणून शिकवण्याचा मान त्यांना मिळाला. बाळशास्त्रींना मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन व ग्रीक या भाषांचे ज्ञान होते. फ्रेंच भाषेतील नैपुण्याबद्दल फ्रान्सच्या राजाकडून त्यांना मानसन्मान देण्यात आला.

जांभेकरांनी प्राचीन लिप्यांचा अभ्यास करून कोकणातील शिलालेख व ताम्रपट यांचे शोधनिबंध लिहिले. मुद्रित स्वरूपातील ज्ञानेश्वरी त्यांनीच प्रथम वाचकांच्या हाती दिली. त्यांच्यात पांडित्य आणि अध्यापनपटुत्व या गुणांचा मिलाफ होता. गणित व ज्योतिष यांतही ते पारंगत असल्यामुळे त्यांची कुलाबा वेधशाळेच्या संचालकपदी नियुक्ती झाली होती. शिवाय त्यांना रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, न्यायशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र या विषयांचे उत्तम ज्ञान होते.

, महात्मा गांधी, वि. दा. सावरकर, लोकमान्य टिळक सारखे संपादक तर त्याकाळात इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर झाले होते. या सगळ्या बुद्धिवान संपादकांमुळे वर्तमानपत्राचा संपादक म्हणजे अत्यंत हुशार व्यक्ती असे मानले जाते. पूर्वीच्या काळातील ही परंपरा आजच्या काळात खंडित झालेली दिसते. लोक तुमच्या बुध्दीला किंमत देऊन मानसन्मान देतात. मात्र आता कमी शिकलेले देखील पत्रकार म्हणून समाजाने आपल्याला मान मिळवायचा प्रयत्न करताना दिसतात. काही जण तर, त्या पदाचा वापर एखाद्या दहशतीसारखा देखील करताना दिसतात. माध्यम क्षेत्रात यायचे तर, शिक्षण आता आवश्यकच आहे.

आता तर, पत्रकारिता अभ्यासक्रमाचे तंत्रशुध्द शिक्षण देणारे कोर्सेस विविध ठिकाणी उपलब्ध आहेत, सरकारमान्य विद्यापीठातून डिग्री, डिप्लोमा केला तर शासकीय नोकरी देखील हमखास मिळू शकते. या क्षेत्रातही मेहनत आहे. डोके वापरले तर पैसा मिळू शकतो. रोज नवीन काहीतरी शिकण्याची, माहिती गोळा करण्याची आवड़ हवी. बारावीनंतर तीन वर्षाचे डिग्री कोर्सेस, पदवीनंतरचे डिप्लोमा कोर्सेसची सोय आहे.

मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत हे कोर्सेस उपलब्ध आहेत. पत्रकारितेबरोबर जनसंपर्क, जाहीरात, इव्हेंट मॅनेजमेंट, भाषांतर, कन्टेंट रायटिंग, रेडीओ, टिव्ही, कॅमेरामागील तंत्रज्ञ अशा अनेक क्षेत्रात स्पेशलायिज कोर्सेस उपलब्ध आहेत. आता ही सगळी माहिती कुठे मिळेल असा भाबडा प्रश्न असेल तर, त्याचे उत्तर तुमच्या हातात आहे. तुमचा मोबाईल, लॅपटॉप उघडा आणि गुगलवर सगळी माहितीचा खजाना तुमच्यासमोर येईल. पूर्वीप्रमाणे बारावी झाली की, बीए, बीकॉम नाहीतर, बीएसएससी असा सरधोकट मार्ग स्वीकारून चांगल्या पगाराची हवी तशी नोकरी मिळेल याची गॅरंटी नाही. व्यवसायाभिमुख शिक्षण घेतले तर, भविष्यात आपल्याला आवडत्या क्षेत्रात करिअर करता येईल. समाजाला दिशा दाखवणारा पत्रकार असतो, त्यामुळे तो नक्कीच शिकलेला असला पाहिजे.

कारण या क्षेत्रात करिअरला खूप मोठी संधी आहे. एका आकडेवारीनुसार भारतातील वृत्तपत्र वाचकांची संख्या २०१४ ते २०१७ या तीन वर्षाच्या काळात ४० टक्क्यांनी वाढली आहे. २०१८ ते २०१९ या एका वर्षाच्या काळात प्रिंट मीडियाचा जाहिरातीचे उत्पन्न ५.६ टक्केनी वाढले आहे. २०१८ साली ही आकडेवारी २२,१२१.८ कोटी होती ती, २०१९ साली २२,४२४.३ कोटी जाईल असा अंदाज आहे. प्रिंट, टिव्ही, इंटरनेट, रेडीओ, आऊटडोअर, सिनेमा या सगळ्यांचा जाहिरातीचा टर्नओव्हर २०१८ साली ६८,७५२ कोटी होता. तो २०१९ साली ७९,३१४ कोटीवर जाईल असा अंदाज आहे. पब्लिक रिलेशन व मिडिया मॅनेजमेंट सारख्या मिडिया रिलेटेड क्षेत्राची २०१७ सालची उलाढाल १,३१५ कोटी होती. २०२० साली ही उलाढाल २,१०० कोटीवर जाईल असा अंदाज आहे. ही सगळी आकडेवारी मांडायची कारण माध्यम या क्षेत्रात किती करोडोंची उलाढाल आहे हे लक्षात यावे. या क्षेत्रात करिअर करू इच्छित असलेल्या मुलांना, व्यक्तीला माध्यम क्षेत्रातील पैसा, येथील संधी याची माहिती व्हावी हाच हेतू आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल भारतात माध्यम क्षेत्रात होत असल्याने त्या गंगेत हात धुऊन घेण्याचा विचार करायला हरकत नाही. अर्थात त्यासाठी योग्य नियोजन हवे, शिक्षण हवे.

व्यास क्रिएशन्सच्या चैत्र पालवी 2019 या अंकात शशिकांत कोठेकर  यांनी लिहिलेला लेख.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..