नवीन लेखन...

मरीन ड्राइव्ह १०२ वर्षाचे झाले !!

मरिन ड्राइव्ह म्हणजे ‘क्वीन्स नेकलेस’ इतकीच बहुसंख्य मुंबईकरांना त्याची ओळख आहे. मात्र हा नेकलेस तयार होण्याच्या काही वर्ष आधी नेकलेससमोरच्या अरबी समुद्रात भराव टाकून समुद्र मागे हटवण्यात आला होता. मावळत्या सूर्याला साक्ष ठेवून सध्या जिथं प्रेमीयुगुलं जिने-मरने की कसम खातात, तो समुद्रासमोरचा कठडा आणि पाथ-वे बांधण्यात आला, त्या घटनेला १८ डिसेंबरला तब्बल १०२ वर्षे पूर्ण झाली. ‘युनेस्को’ने वर्ल्ड हेरिटेज प्रथम श्रेणीचा मान या पाथ-वे आणि कठड्याला दिला आहे.

ब्रिटिशांच्या आमदानीत मुंबई हे दुसरं लंडन शहर वसविण्याचे स्वप्न पाहिलं जात होतं. त्यानुसार व्हिक्टोरिया टर्मिनस, जनरल पोस्ट ऑफिस, पश्चिम रेल्वे मुख्यालय, मुंबई महापालिका मुख्यालय अशा कलात्मक वास्तूशैलीचा अद्भूत नमुना असलेल्या अनेक वास्तू उभारण्यात आल्या. ब्रिटिशांची कलासक्त दृष्टी लंडनमधील वास्तूंसारखं बांधकाम मुंबईत व्हावं अशी होती. मरिन ड्राइव्ह पाहाण्याचा दृष्टिकोन तसाच होता. इंग्लंडमधून मुंबईत स्थलांतर केलेल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांना मुंबईची दमट हवा सहन होईना. त्यांनी समुद्राच्या ताज्या हवेत फेरफटका मारण्यासाठी ब्रिटिश सरकारकडे दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटी ते नरिमन पॉइंटपर्यंतचा अरबी समुद्राचा शेकडो एकर भूभाग मागे हटवून पाथ-वे बांधण्याचा प्रस्ताव मांडला व तो मंजूर झाला.

सरकारने मागणी मंजूर केली, तरी समुद्र मागे हटविणे वाटतं तितकं सोपे नव्हतं. मरिन ड्राइव्ह ते नरिमन पॉइंट अशा मोठ्या पट्ट्यात भराव टाकण्याचं निश्चित करण्यात आलं. त्यावेळेस अरबी समुद्राची हद्द गिरगावच्या सध्याच्या केळेवाडी, चंदनवाडी स्मशानभूमीपर्यंत होती. तिथपर्यंतच्या चौपाटीवर भराव टाकण्यासाठी मुंबईच्या आसपासच्या भागातून माती आणून टाकण्यात आली. भराव टाकण्याच्या कामासाठी स्थानिक मजुरांचा वापर करण्यात आला. मुंबईच्या नैसर्गिक कलात्मक सौंदर्यांत भर टाकणाऱ्या या पाथ-वेचे बांधकाम डिसेंबर, १९१५ मध्ये सुरू झाले आणि पाच वर्षांत म्हणजे १९२० मध्ये पूर्ण करण्यात आले. समुद्रात एकूण १६०० एकर भूभागावर भराव टाकण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र फसलेले नियोजन, दलदलीचा कमी झालेला उपसा आणि कामात झालेल्या भ्रष्टाचाराचे आरोप यांमुळे प्रत्यक्षात फक्त ४४० एकर भूभागावर भराव टाकण्यात ब्रिटिश सरकार यशस्वी ठरले. गिरगाव चौपाटी ते नरिमन पॉइंटच्या किनाऱ्यालगत असलेला उलट्या ‘सी’ आद्याक्षरासारखा किंवा चंद्रकोर आकाराचा हा पाथ-वे ४.३ किमी इतका विस्तारला आहे.

ब्रिटिश बांधकाम शैलीचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी मुंबईतील अशा अनेक वास्तूंची बांधकामं क्रिसेन्ट (चंद्रकोर) पद्धतीने केली आहेत. या पाथ-वेचे बांधकाम सुरू झाल्याचे आणि कधी संपल्याची साक्ष देणारा फाऊंडेशन स्टोन आजही चौपाटीजवळच्या मफतलाल तरणतलावच्या प्रवेशद्वाराजवळ आहे. मरिन ड्राइव्ह भागात ब्रिटिशांची मरिन बटालियन लाइन्स होती. त्या नावावरून मरिन लाइन्स तसेच बटालियन्सच्या परेडमुळे मरिन ड्राइव्ह हे नाव पडलं असल्याचं सांगितलं जातं. पुढे या बटालियन्सच्या जागी एअरफोर्स कर्मचारी वसाहती आल्या. ब्रिटिश राजवटीत केनेडी सी-फेस नावाने ओळखला जाणारा हा परिसर स्वातंत्र्योत्तर काळात नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग नावाने ओळखला जाऊ लागला. मुंबईतील बेफाम आणि बेभान पाऊस पाहण्यासाठी मुंबईकरांसह परदेशी पर्यंटकांची पावलेही मरिन ड्राइव्हकडे वळतात. पहिल्याच पावसात पाणी तुंबून मुंबईकरांची दैना उडते. तसाच काहीसा प्रकार प्रकार मरिन ड्राइव्हबाबत पाथ-वे आणि कठडा बांधल्यानंतर झाला. पाथ-वेच्या भुपृष्ठातून अनेक ठिकाणी समुद्राचे पाणी शिरकाव करू लागले. त्यामुळे हे बांधकाम केल्यानंतर अवघ्या सहा वर्षांतच १९१६मध्ये पुन्हा पाथ-वेची डागडुजी ब्रिटिशांना करावी लागली. त्यानंतर तब्बल ८६ वर्षांनंतर पुन्हा पाथ-वेवर समुद्रातून पाणी शिरू लागल्याने २००६ मध्ये राज्य सरकारमार्फत दुरूस्ती करण्यात आली.

अलीकडे म्हणजे १९८० पर्यंत चर्नी रोडवरून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या लोकलमधून उसळता अरबी समुद्र सहज दिसत असे. मात्र समुद्रासमोरच्या वास्तूंच्या वाढत्या आकारामुळे मुंबईकरांना समुद्र आणि दिसणं बंद झालं आहे. मुंबईत जागेला आलेल्या सोन्याचा भाव दक्षिण मुंबईसाठी फलदायी ठरला आहे. ब्रिटिश राजवटीत एक रुपयाच्या भाडेपट्टयावर घेतलेल्या जमिनीवर उभ्या राहिलेल्या इमारतीतील घरे चार-पाच कोटीपर्यंत सहज विकली जातात. मरिन ड्राइव्ह ते कफ परेडचा घरांचा दर तब्बल एक लाख रुपये प्रति चौरस फूट इतका आहे. म्हणजे जमीनमालकांच्या सात पिढ्या बसून खातील इतकं मोठं घबाड त्यांच्या हाती लागलं आहे. अर्थात हा चमत्कार समोरच्या अरबी समुद्राच्या बे-व्ह्यूमुळे झाला आहे.

क्वीन्स नेकलेसचा उल्लेख केला नाही, तर मरिन ड्राइव्हच्या इतिहासावर अन्याय केल्यासारखे होईल. मरिन ड्राइव्हसमोर असलेला इंग्रजी अक्षर ‘सी’सारख्या रचनेचा रस्ता रात्रीच्या वेळी पिवळ्या दिव्यांनी उजळला की त्याला पाहून राणीच्या गळ्यातला रत्नहारासारखा दिसतो, त्यामुळेच क्वीन्स नेकलेस म्हणून तो देश-परदेशातही प्रसिद्ध पावला. दुसर्‍या महायुद्धापूर्वी म्हणजे १९३५च्या सुमारास मरिन ड्राइव्हच्या पाथ-वेला जोडून असलेल्या रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. १९४० मध्ये हे काम पूर्ण झाले. रस्त्याच्या पलिकडे पश्चिम रेल्वेचे चर्नी रोड, मरिन लाइन्स स्टेशन आणि आताचा महर्षी कर्वे रोड बांधण्यात आला. त्यानंतर या भागात निवासी इमारतींच्या बांधकामांच्या हालचाली सुरू झाल्या. १९३० साली जे. जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी मरिन ड्राइव्ह रोडसमोरच्या भागात कलात्मक रचना असलेल्या घरांचे डिझाइन तत्कालीन जमीन मालकांना करून दिली. समुद्रासमोर असलेल्या या घरांचे दर त्यावेळेसही प्रचंड महाग होते. पारसी आणि इंग्रज वगळता मुंबईतील सामान्य वर्गाला ही घरे परवडणारी नव्हती. त्यावेळी बर्‍यापैकी गर्दी आटोक्यात असतानाही मुंबईत घरे भाड्याने घेणं लोक पसंत करीत. दरम्यान १९४५च्या सुमारास भारत-पाकिस्तान फाळणीच्या चर्चा होऊ लागल्या. त्याचा लाभ जमीनमालकांनी उठवला. फाळणीनंतर हजारो श्रीमंत हिंदू कुटुंबीयांनी मुंबईत मरिन ड्राइव्हला स्थलांतर केले.

या कुटुंबीयांचे नातलग आजही या भागात वास्तव्यास आहेत. मरिन ड्राइव्हच्या जुन्या इमारती जवळपास दादरच्या शिवाजी पार्क किंवा हिंदू कॉलनीतील इमारतींसारख्या दुमजली ठेंगण्या-ठुसक्या आहेत. कमी मजल्यांमुळे इमारतींना कलात्मक टच देणे शक्य झाले आहे. या बांधकामांचे वैशिष्ट्य म्हणजे मरिन ड्राइव्ह सी-फेस मोकळा सोडून गिरगाव चौपाटीसमोरच्या भागात या इमारती बांधण्यात आल्या आहेत. सी-व्ह्यू स्पष्ट दिसावा असा यामागचा उद्देश असावा. काही वषानंतर चर्नी रोड आणि मरिन ड्राइव्ह समुद्राच्या भागात क्लब, जिमखाने उभे राहिले आहेत. योग शिक्षण देणारी कैवल्यधाम ही वास्तू मरिन ड्राइव्हच्या समुद्रासमोर १९३९ला बांधण्यात आल्याचा उल्लेख संस्थेत पाहायला मिळाला. स्वातंत्र्योत्तर काळात सरकारी मुद्रणालय, मित्तल आयुर्वेदिक हॉस्पिटल, तारापोरवाला मत्स्यालय, जवाहर बालभवन या वास्तू उभ्या राहिल्या. पुढे नरिमन पॉइंट ते कफ परेडपर्यंत हजारो इमारतींचे बांधकाम झाले आहे. त्यातील बहुसंख्य बांधकामे ७० नंतर उभी राहिली आहेत.

समुद्राकडून येणाऱ्या भन्नाट वारा आणि मरिन ड्राइव्हचा कठडा प्रेमीयुगलं आणि मुंबईत येणाऱ्या हौशा-गवशांचे आकर्षण आहे. पावसाळ्यातली मुंबई पाहणं एक नेत्रसुखद अनुभव आहे. तो घेण्यासाठी परदेशी पर्यटक पावसाळ्यात मरिन ड्राइव्हला हटकून भेट देतात. तसेच मुंबईकरांची पावलं या दिवसांत कठड्याकडे वळलेली असतात.

संकलन.संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..