नवीन लेखन...

मराठमोळ्या फार्सचे जनक: श्याम फडके

ठाणे रंगयात्रामधील शशिकांत कोनकर यांचा लेख.


नाटककार श्याम फडके आणि माझी खास दोस्ती होती. आमच्यातला सामायिक दुवा म्हणजे श्याम फडके नाटककार होते आणि मी नुकताच नाटके लिहू लागलो होतो. व्यावसायिक रंगभूमीवर आमची दोघांची नाटके येत होती.
श्याम फडक्यांचे ‘तीन चोक तेरा’, ‘काका किशाचा’, ‘बायको उडाली भुर्र..’, ‘खोटे बाई आता जा’ हे फार्स त्या काळात खूप गाजत होते. श्यामराव केवळ फार्स लिहून थांबले नाहीत. ‘अर्ध्याच्या शोधात दोन’, ‘का असंच का?’, ‘खरी माती खोटा कुंभार’ अशी विविध प्रकारची नाटके त्यांनी लिहिली. एकांकिका लिहिल्या, बायकांसाठी पुरुषपात्र विरहित नाटके लिहिली. मुलांसाठी आकाशवाणी व टीव्हीसाठी लेखन केले.

ठाण्यातील अनेक नामवंत संस्थांशी ते जोडले गेले होते. मित्रसहयोग, कलासरगम, नाट्याभिमानी यासारख्या मातब्बर संस्थांनी त्यांची नाटके केली. त्यांनी गंभीर समस्याप्रधान नाटकेही लिहिली. नाट्याभिमानीच्या शशी जोशींनी त्यांचे ‘खरी माती खोटा कुंभार’ हे नाटक बसवले. त्या नाटकाचे पुस्तक छापायची वेळ आली, तेव्हा प्रकाशक म्हणाले, ‘फडकेसाहेब, धंदा करायचा म्हणजे पुस्तकाच्या मुखपृष्ठावर बाईचं चित्र हवं.’ फडके म्हणाले, ‘नाटकातील मुख्य व्यक्तिरेखा कुलकर्णी मास्तर आहेत. कुलकर्णी मास्तरांची भूमिका करणाऱ्या नटाचाच तेथे फोटो हवा,’ आणि त्यांनी आग्रहाने प्रकाशकाला श्रीराम देवांचा फोटो छापायला लावला.

सुटसुटीत, खुसखुशीत छोटे संवाद हे त्यांच्या यशाचे गमक. असे संवाद ते सहज लीलया लिहीत. त्यांच्या संवादात मिस्कीलपणा होता. त्यांच्या नाटकांचा जीव छोटा होता. पण ते त्यांचे नाटक इतके फुलवित की नाटक बघताना प्रेक्षकांना तीन अंक कधी संपले हे कळत नसे. प्रेक्षक खुर्चीला खिळून बसत. हंशा आणि टाळ्यांचा नाट्यगृहात वर्षाव करत.
‘काका किशाचा’ हे त्यांचे गाजलेले नाटक. या नाटकाचा जीव छोटा आहे. फडके एका वाक्यात ते नाटक सांगत.

‘नाटकाचा विषय काय?’ असे कोणी विचारल्यावर ते म्हणत, ‘काही नाही हो, एके ठिकाणी तीन काका येतात. बस्स.’ खरंच या मुंगीएवढÎा कल्पनेवर त्यांनी नाटक लिहिले व त्याचे त्याकाळी महाराष्ट्रात अनेक प्रयोग झाले. त्यांच्या या काकाने किशोर प्रधानांना दिग्दर्शक व नट म्हणून अमाप लोकप्रियता मिळवून दिली. छोट्या छोट्या प्रसंगांतून व घरगुती घटनांतून नेमका विनोद हेरून त्यातून नाट्य फुलवण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. सहजता आणि स्वाभाविकता हा त्यांच्या लेखनाचा पाया होता. नावीन्यपूर्ण कल्पनांचा पाठपुरावा ते करत असत.

1987 साली आपल्या राम गणेश गडकरी रंगायतनचे उद्घाटन झाले. त्यावेळी संपूर्ण उद्घाटन सोहळ्याची व कार्यक्रमाची आखणी माननीय सतीश प्रधानांनी श्याम फडके यांच्यावर सोपवली होती. त्यांनी त्या सोहळ्याचे पु.लं.च्या हस्ते उद्घाटन केले. ‘कट्यार काळजात घुसली’ हे नाटक, सचिन शंकर यांचा बॅले अशा उत्तमोत्तम कार्यक्रमांचे आयोजन त्यांनी केले. त्यावेळी व्हिडियो नव्हते. आज त्या उद्घाटन सोहळ्याचे फोटोदेखील कोणाकडे मिळणार नाहीत. पण गडकरी रंगायतनच्या संपूर्ण सोहळ्याचे कार्य फडके यांनी परिश्रमपूर्वक केले. त्यासाठी त्यांनी दिवस-रात्र कष्ट घेतले.

त्यांनी ठाण्यात प्रायोगिक रंगभूमी रुजवण्याचे बरेच प्रयत्न केले. छबिलदासच्या तोडीस तोड रंगभूमी त्यांना उभी करायची होती. प्रायोगिक रंगभूमीचे अनेक प्रयोग त्यांनी ठाण्यात केले. त्या चळवळीसाठी त्यांनी स्वत नाटके लिहिली. व्यावसायिक नाटकांपेक्षा ती नाटके वेगळी होती. प्रायोगिकता त्यांच्या अंगी मुरली होती आणि म्हणूनच त्यांनी शिक्षणक्षेत्रापासून ते ग्रंथालय दालनापर्यंत अनेक प्रयोग केले. त्यांच्या प्रायोगिक रंगभूमीबद्दल तेव्हा ‘ठाणे वैभव’ या वृत्तपत्रातून खूप लिहून आले होते.

श्यामरावांच्या अनेक आठवणी माझ्या मनात जपून ठेवल्या आहेत. श्याम फडक्यांचे खरे नाव दिगंबर फडके. ते नेहमी गमतीने म्हणत, ‘माझ्या नावाने मला उघडे पाडले हो, पण आडनावाने झाकले.’

एकदा त्यांनी एक भरलेली पिशवी घरी आणली. घरातील बायकांपैकी कोणीतरी त्यांना विचारले, ‘काय आणलंय पिशवीत?’ त्यांनी पिशवी उपडी केली. त्यातून नुकतीच जन्मलेली गोजिरवाणी कुत्र्याची चार पिल्ले बाहेर आली.

‘बायको उडाली भुर्रss’ चा प्रयोग होता. इन्स्पेक्टरचा रोल करणारे मधू कडू आले नव्हते. मधू कडूंची भूमिका महत्त्वाची. प्रयोग सुरू करणार कसा? प्रयोग बघायला श्यामराव आले होते. ते म्हणाले,‘मधू नसेल तर मी आहे ना!’ आणि ‘बायको उडाली…’ चा लेखक एका क्षणात नट झाला.

श्यामराव कधीच फारसे कोणाकडे जात नसत. पण माझ्याबद्दल त्यांना आपुलकी होती. माझ्याकडे ते अनेकदा येत असत. त्यांना पक्षाघाताचा सौम्य झटका आला. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी मला फोन केला.

‘कसे आहात?’ मी विचारले.

‘बरा आहे.’ ते म्हणाले.

आणि दहा मिनिटांतच ते किती बरे आहे हे दाखवण्याकरिता माझ्या घरीच आले. मी चकित झालो. गहिवरलो. अचानक काहीतरी नावीन्यपूर्वक करून दाखवणे ही त्यांची हौस होती.

श्यामराव नाट्यवाचन फार छान करायचे. माझे मित्र आणि नाट्याभिमानी संस्थेचे शशी जोशी एकदा मला म्हणाले होते, ‘श्यामरावांच्या वाचनामुळे ऐकणारे त्यांच्या नाटकाच्या प्रेमातच पडतात.’

ते एक मेहनती लेखक होते. प्रयत्नांवर त्यांचा विश्वास होता. ‘तीन चोक तेरा’ या त्यांच्या फार्सने बाजीच मारली. या फार्समधील सर्व कलाकार हौशी होते.

त्यांच्या फार्सच्या मुंबईतील एका प्रयोगाला पु. ल. देशपांडे यांना बोलवायचे ठरले. पु.लं. ना निमंत्रण दिले. तेव्हा ते म्हणाले होते, ‘मी प्रयोगाला येईन. पण एक शब्दही बोलणार नाही.’

‘हरकत नाही. पण तुम्ही या.’

पु.लं. पुढे म्हणाले, ‘फार्स फारसा आवडला नाही, तर सरळ घरी निघून जाईन.’

त्यांचे तेही म्हणणे निमंत्रकांनी मान्य केले.

पु.लं. आले. पहिला अंक संपला. पु.लं. रंगपटात आले. सर्व कलाकारांच्या चेहऱ्यावर उत्सुकता. काय म्हणताहेत पु.लं? फार्स आवडला की नाही, की सरळ सांगताहेत, ‘अच्छा, मी घरी जातो.’ पण पु.लं. आले ते लेखकाला शोधतच. पु.लं.नी श्याम फडक्यांना मिठी मारली. त्यांच्याबरोबर खूप गप्पा केल्या. पु.ल. स्वतहून नाटकाच्या मध्यंतरात बोलले. श्याम फडक्यांकडे बोट दाखवत ते म्हणाले, ‘मराठी मातीतील स्वतंत्र फार्स लिहिणारा हा नाटककार आहे.’
पु.लं.च्या शाबासकीपेक्षा आणखी बहुमोल श्यामरावांना काय हवे होते?

मराठी रंगभूमीवर ‘तीन चोक तेरा’ च्या आधी आलेले सर्व फार्स हे भाषांतरित होते. त्यांचे मूळ इंग्रजीत होते. कल्पना ‘मोलियर’च्या होत्या. श्याम फडके यांचे फार्स अस्सल मराठी होते. मराठी मातीतील कौटुंबिक फार्स श्याम फडक्यांनीच लिहिला.

त्यांच्या फार्सचे त्या काळी व्यावसायिक रंगभूमीवर खूप प्रयोग झाले आणि हौशी रंगभूमीवर त्याहीपेक्षा कितीतरी जास्त प्रयोग झाले. हौशी नटमंडळींना सुद्धा त्यांच्या सुटसुटीत फार्सचे असंख्य प्रयोग करावेसे वाटले. महाराष्ट्रातल्या छोट्या-छोट्या गावात आणि उत्सवात गल्लीबोळातही श्याम फडक्यांची नाटके होत होती.

लेखक म्हणून व नाटककार म्हणून त्यांचे त्यावेळच्या टीकाकारांनी विशेष कौतुक केले नाही. त्या काळच्या नाट्यसंस्थांनी त्यांच्या गळ्यात मानाचे हार घातले नाहीत की त्यांना पुष्पगुच्छही दिले नाहीत.

त्यांना बरीच महत्त्वपूर्ण पदे मिळाली. ते ‘बेडेकर विद्यामंदिर’ मध्ये मुख्याध्यापक होते. ‘ज्ञानसाधना’ कॉलेजमध्ये प्रिन्सिपॉल होते. मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष होते. ‘उद्योग प्रबोधिनी’ या संस्थेसाठी त्यांनी तन, मन, धनाने काम केले. त्यांची लेक्चर्स रिलायन्स कंपनीच्या कामगारांनाही खूप आवडत. माझ्या ‘कोनकर स्टडी सर्कल’ मध्येही ते S.P. हा विषय शिकवत असत. श्यामराव हे कॉमर्स ग्रॅज्युएट नव्हते. ते सायन्सचे ग्रॅज्युएट होते. तरी ते कॉमर्सचे विषय तितकेच उत्तम शिकवत. कारण त्यांच्या रोमारोमात शिकवणे भिनले होते. ते हाडाचे लेखक होते. नाटककार होते आणि शिक्षकही होते. एक दिवस आम्ही दोघे संध्याकाळी कोपरीच्या पुढे फिरायला गेलो असताना ते हळवे होऊन माझा हात धरत म्हणाले, ‘शशिकांत, मला एक शाप आहे. जीव तोडून मी एखादी संस्था लोकप्रिय केली, त्या संस्थेला नाव मिळवून दिले की मला तेथून अत्यंत वाईट पद्धतीने जावे लागते. माझा उपयोग संपला की अनेकजण आपले संबंध आटोपते घेतात.’

श्याम कोणत्याही साहित्य वर्तुळात किंवा कंपूत कधीही नव्हता. टीकाकारांनी या लोकप्रिय नाटककाराची उपेक्षाच केली. तरी एक निश्चित की श्यामने तो काळ नाटककार म्हणून गाजवला. तो ताठ मानेने जगला. कोणापुढेही त्यांनी मान वाकवली नाही की झुकवली नाही. तरीही त्यांचा मित्र म्हणून मला वाटते की इतकी नाटके लिहूनही त्यांना म्हणावे तसे फारसे काही मिळाले नाही, ही खंत माझ्या मनात आहे. माझ्यासारख्या असंख्य नाट्यरसिकांच्या मनातही आहे. श्याम फडके नव्या पिढीतील तरुण नाट्यरसिकांना माहीत असायलाच हवे. माझ्या या मित्राची ही ओळख तरी नाट्यजगतातून कधीही पुसली जाऊ नये… कधीही पुसली जाऊ नये!

— शशिकांत कोनकर – 9892259960

(साभार – ठाणे रंगयात्रा २०१६)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..