छंद हे मानवी जीवनातील केवळ विरंगुळा असत नाहीत तर जीवनाला आकारही देतात. अभ्यास जेव्हां छंद बनतों तेव्हां नाविन्यपूर्ण व सृजन आकाराला येतं. प्रत्येक सृजन पायवाट असते प्रेरणेची. कोणत्याही छंदाचा अभ्यास केला की त्यात प्राविण्य मिळतं आणि यशा कडे जाण्याचा रस्ता मोकळा होतो.बुद्धीला व्यायाम देणारी शब्दकोडी म्हणजे अनेकांचे वेळ घालवण्याचे साधन असते. पण सहसा कोणी एखादे शब्दकोडे तयार करण्याचा विचार करत नाही. पण एका भारतीय आणि त्यातही मराठी माणसाने असा भन्नाट छंद जोपासला आणि शब्दकोड्यात वेळ घालवण्याऐवजी त्यात वेळेची गुंतवणूक केली. त्या व्यक्तीचे नाव मंगेश घोगरे. ते पेशाने इन्व्हेस्टमेंट बँकर आहेत. मात्र शब्दकोडी बनवणे हा त्यांचा छंद, आवड आणि काम असे सगळे काही आहे. शब्दकोडी बनवण्यात तरबेज असलेल्या या मराठी माणसाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली गेली आहे. त्यांनी तयार केलेली शब्दकोडी न्यूयॉर्क टाईम्स, द वॉशिंग्टन पोस्ट, द वॉल स्ट्रीट जर्नल अशा परदेशांतील प्रतिष्ठित वर्तमानपत्रांत छापून येतात.ते अमेरिकेत 2022 मध्ये स्थलांतरित झाले तेव्हा ते ‘नोमुरा इंडिया’ या कंपनीचे कार्यकारी संचालक होते.
‘फॉर्च्युन’ मासिकाच्या ’40 Under 40′ ह्या सर्वोत्तम उद्योजकांच्या यादीतही मंगेश यांचे नाव समाविष्ट आहे. त्यांनी टाइम्स ऑफ इंडियामधील ‘Speaking Tree’ ह्या स्तंभासाठीही लिखाण केले आहे.मंगेश घोगरे यांना लहानपणापासूनच शब्दकोड्यांचे वेड होते. ते शाळेतही वर्गात बसून शब्दकोडी सोडवत असत. त्यांनी इंग्लिश सुधारण्याकरता टाईम्स ऑफ इंडिया या दैनिकातली शब्दकोडी सोडवायला सुरुवात केली. ती शब्दकोडी सोडवणे हे वाटते तितके सोपे काम नव्हते.त्यांना सततच्या अभ्यासानंतर संपूर्ण शब्दकोडे सोडवता येऊ लागले. आता हा फक्त अभ्यास राहिला नसून तो छंद झाला होता.त्यांचे आयुष्य शब्दकोड्याने संपूर्ण बदलून टाकले. ते अधिकाधिक सरावाने शब्दकोडी सोडवण्यात प्रगती करत होते. शब्दकोडी सोडवता सोडवता ती तयार करण्याची आकांक्षा त्यांच्यात निर्माण झाली. मंगेश यांनी तयार केलेले शब्दकोडे बऱ्याच प्रयत्नांनंतर लॉस एंजेल्स टाईम्समध्ये पहिल्यांदा 2010 साली छापून आले. अमेरिकन शब्दकोडी सोडवणे गैर-अमेरिकन लोकांसाठी अवघड असते मंगेश घोगरे यांनी अमेरिकन शब्दकोडी सोडवण्यात प्राविण्य मिळवले इतकेच नाहीतर ‘अमेरिकन शब्दकोडी’ तयार करण्यावरही प्रभुत्व मिळवले. ‘मुंबई’ ह्या संकल्पनेवर आधारित त्यांचे दुसरे शब्दकोडे ‘मंगेश मुंबईकर घोगरे’ ह्या मथळ्याखाली लॉस एंजेल्स टाईम्समध्ये छापून आले. न्यूयॉर्क टाईम्स ह्या वर्तमानपत्रात अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनाच्या संकल्पनेवर आधारित मंगेश यांचे शब्दकोडे 2014 साली छापण्यात आले. त्यांची शब्दकोडी मुंबईतल्या ‘काळा घोडा’ महोत्सवात मोठ्या आकारात प्रदर्शित झाली होती.त्यांनी 2014 नंतर अमेरिकेतील लोकांना भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारी शब्दकोडी बनवण्याचा ध्यास घेतला आणि तशी त्यांना संधीही मिळाली. त्यांचे भारताच्या स्वातंत्र्यदिनी ‘ताजमहाल’ ह्या संकल्पनेवर आधारित शब्दकोडे न्यूयॉर्क टाईम्समध्ये छापण्यात आले.त्यांनी भारतीय शब्दांची ओळख करून देण्यासाठी महात्मा गांधी यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने एका विशेष शब्दकोड्याची रचना 2019 मध्ये केली होती आणि ते शब्दकोडे देखील न्यूयॉर्क टाईम्सने प्रकाशित केले होते. ते अमेरिकेच्या इतिहासाविषयी शब्दकोडे तयार करणारे पाश्चिमात्य जगाच्या बाहेर जन्माला आलेले एकमेव गैर-अमेरिकन आहेत. भारतात जशी शब्दकोडी सोडवणाऱ्यांची जमात आहे तशी अमेरिकेतही आहे. भारतीयांसाठी अभिमानाची बाब म्हणजे ते 2012 साली न्यूयॉर्क टाईम्स आयोजित ‘अमेरिका क्रॉसवर्ड टुर्नामेंट’चे परीक्षक राहिलेले आहेत. ते त्या स्पर्धेत परीक्षक म्हणून काम करणारे पहिले भारतीय ठरले आहेत. या सगळ्या यशोगाथेमधली अजून एक कौतुकास्पद बाब म्हणजे त्यांच्या कौशल्याची दखल घेत 2022 साली ‘असामान्य कौशल्य’ असणाऱ्या व्यक्तीला दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘EB-1 Visa’ म्हणजेच ‘आइन्स्टाइन व्हिसा’ मंगेश ह्यांना देण्यात आला.कोडं सोडविण्यासाठी जसा विचार लागतो तसंच आयुष्य जगण्यासाठी प्रेरणा लागते आणि ती आपल्या अवतीभवतीच असते. प्रेरणेची केवळ दखलच घ्यायची नसते तर तीला आपली पायवाट बनवायची असते.
डॉ. अनिल कुलकर्णी.


Leave a Reply