नवीन लेखन...

‘माणसं’ ब्लाॅक होतात, ‘मन’ नाही

माणसाच्या जीवन प्रवासात त्याला वेगवेगळ्या रुपानं असंख्य माणसं भेटतात. त्यातील काही जण काही काळापुरतीच असतात तर काही शेवटपर्यंत साथ देतात.
अगदी पहिल्यांदा आई-वडील, भाऊ, बहीण हे झालं कुटुंब. त्यानंतर जवळचे नातेवाईक, लांबचे नातेवाईक. शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या निमित्ताने ही संख्या वाढत जाते. लग्न झाल्यावर त्याचा गुणाकार होतो. निवृत्त होईपर्यंत ही संख्या शेकड्याने वाढते. पुन्हा मुला-मुलींची लग्न झाल्यावर चक्रवाढीने संख्येत वाढ होते. शेवटी तो किती ‘माणसां’तला होता याचे मोजमाप होते.
पन्नास वर्षांपूर्वी सदाशिव पेठेत रहात असताना आजूबाजूचे शेजारी हे एकमेकांना आधार देणारे होते. एका मोठ्या कुटुंबाप्रमाणे समोरच्या माणसाची काळजी घेणारे होते. आमच्या वरती घाणेकर कुटुंब रहायचं. पती-पत्नी आणि तीन मुलं. जिन्यापलीकडं आंग्रे कुटुंब. तीन कुटुंबांत सार्वजनिक एकच मोरी, एकच नळ. सकाळी लवकर पाणी यायचं. पहिला नंबर आंग्रेंचा असायचा. त्यांचं झाल्यावर घाणेकर. ते खूपच वेळ लावायचे. आमचा नंबर आल्यावर पाणी जाण्याची वेळ झालेली असे. अशाच वादामुळे घाणेकरांशी आमचं बोलणं बंद झालं. आताच्या भाषेत आम्ही त्यांना ‘ब्लाॅक’ केलं. अशी सहा वर्षे गेली. माझ्या मोठ्या बंधूच्या चि. उदयच्या जन्मानंतर घाणेकर कुटुंब पुन्हा बोलू लागलं. या सहा वर्षांच्या अबोल्यात त्यांच्याबद्दल राग होता मात्र अढी अजिबात नव्हती.
जोशी वाड्याच्या पलीकडे बाबुलाल शेठजींचं किराणा मालाचे ‘जय भारत स्टोअर्स’ दुकान होते. जोशी मालकाने त्याच्या बंगल्यातील टाॅयलेटऐवजी आमच्या वाड्यात टाॅयलेटला जायला त्यांना सांगितले. त्यामुळे त्यांच्या येण्या-जाण्याने परिचय वाढला. रात्री दुकान बंद केल्यावर ते गप्पा मारायला आमच्याकडे येत असत. मी घरात लहान असल्यामुळे माझ्याशी त्यांची दोस्ती होती. कधी लहर आली की, चित्रपट पहायला ते मला घेऊन जात असत. त्यांनाही माझ्याच वयाचा मुलगा राजस्थानला होता, कदाचित माझ्यामध्ये ते त्याला पहात असावेत. मी अकरावीला असताना त्यांनी माझी एकदा मुलीच्या विषयावरुन मस्करी केली. मला फार राग आला. मी त्यांच्याबरोबर बोलणे बंद केले. ते वारंवार येऊन विनवणी करायचे. मात्र मी हट्टाला पेटलो होतो. दरम्यान त्यांनी गावाकडील आपल्या मुलांना दुकानात मदतीसाठी पुण्याला आणले. त्यांच्याशी माझी छान मैत्री जमली. बाबुलाल शेठजी वय झाल्याने गावी जाऊन राहिले. काही वर्षांनंतर ते गेल्याचे समजले. मला फार वाईट वाटलं. अजूनही माझं मन मला सांगतं, त्यांच्याशी धरलेला अबोला मी तेव्हाच सोडायला हवा होता….
काॅलेजमध्ये असताना एक सिनियर मित्र होता. काॅलेजमधील सांस्कृतिक कामाच्या निमित्ताने आम्ही एकत्र यायचो. तो बोलघेवडा असल्याने त्याच्या सर्व प्राध्यापकांशी ओळखी होत्या. त्याचा गैरवापर करून तो माझ्यावर दबाव आणू लागला.
अशा राजकारणी व्यक्तीपासून दोन हात दूरच राहिलेलं बरं या विचाराने मी त्याला दूर ठेवले. इतक्या वर्षांनंतरही तो आता समोरून आला तरी त्याच्याशी बोलावंसं मला वाटत नाही. तो कायमस्वरूपी ब्लाॅक झालेला आहे.
माझी मुखपृष्ठं करण्याची सुरुवात एका प्रकाशनापासून झाली. मला काम करण्याचा, नवीन शिकण्याचा उत्साह होता. मी सायकलवरून त्यांच्या घरी जाऊन काम घेऊन यायचो, कधी पुस्तकाची हस्तलिखितं अक्षरजुळणी करणाऱ्याकडे पोहोचवायचो. मुखपृष्ठाचे ब्लाॅक करायला देणे-आणणे करायचो. काही वर्षांतच त्यांच्या प्रकाशनाच्या गाडीने वेग घेतला. १९८७ ला माझं लग्न झालं आणि त्या प्रकाशनाशी संपर्क संपुष्टात आला. असं का घडलं, हे अद्यापही मला पडलेलं कोडं आहे. प्रकाशनाच्या रौप्यमहोत्सवी समारंभाला त्यांनी मला आमंत्रण दिले होते मात्र मला जावं असं अजिबात वाटलं नाही.
व्यवसायाच्या निमित्तानं एक लेखक संपर्कात आला. त्याच्या मदतीने व्यवसायामध्ये प्रगती करू शकू असं मला वाटलं. एका संस्थेला फर्निचर पुरविण्याचे काम माझ्याकडे आले होते. मी या लेखकाला भेटून कामाचे स्वरुप व अटी सांगितल्या. त्याने त्या मान्य करून ते फर्निचर एका मित्राच्या कारखान्यातून पुरविले. व्यवहार पूर्ण झाला. मात्र त्याने अटी काही पाळल्या नाहीत. लेखकाने व त्या फर्निचरवाल्याने संगनमत करून मला रितसर बाजूला केले. विचारल्यावर लेखक उडवाउडवीची उत्तरं देऊ लागला. अशा या व्यक्तीला सध्या मी एकट्यानेच नव्हे तर कित्येक मान्यवरांनी, संस्थांनी ब्लाॅक केलेले आहे.
जाहिरातीच्या व्यवसायात नाट्य-सिने, साहित्य, कला क्षेत्रातील असंख्य स्नेही, हितचिंतक भेटले. त्यातील काहींशी काही कारणास्तव संबंध दुरावले, मात्र ते काही काळापुरतेच! माणूस हा सवयीचा गुलाम आहे, त्याला एकदा सवय लागली, की मग ती सहसा सुटत नाही.
लहानपणी दुसरीत असताना मला एक धडा होता. हत्तीची व एका शिंप्याची मैत्री असते. तो हत्ती रोज त्याच्या दुकानापुढे आला की, शिंपी त्याला खायला केळी देत असे. एकदा शिंप्याला हत्तीची खोड काढावी असे वाटले, हत्तीने आशेने सोंड जवळ आणताच त्याने सुईने सोंडेला टोचले. हत्ती माघारी फिरला. नदीवर जाऊन त्याने गढूळ पाणी सोंडेत भरले व शिंप्याच्या दुकानात फवारुन त्याचे कामाचे कपडे खराब केले. या धड्यातून मिळणारी शिकवण ही जीवनात उपयोगी पडणारी आहे. एकतर कुणाला एखाद्या गोष्टीची सवय लावू नये, लावली तर ती निभवावी…
या लेखाचा सारांश सांगणाऱ्या या चार ओळी….
माणसं ब्लाॅक होतात
मन ब्लाॅक होत नाही,
रागाचा कुठलाही टप्पा
आठवणी पुसत नाही..
सोयीने अर्थ बदलणे
फक्त माणसाला जमते,
शाळेपेक्षा जास्त ज्ञान
दुनिया आपल्याला शिकवते..
– स्वाती ठोंबरे
(फेसबुकच्या सौजन्याने)
— सुरेश नावडकर.
२५-६-२०.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..