नवीन लेखन...

माझे प्रजासत्ताक

वर्ग भरला होता, गुरूजी मुलांना काहीतरी समजावत होते. वातावरण हलकं-फुलकं होतं. दोन दिवसावर प्रजासत्ताक दिन आला होता. त्यामुळे देशासाठी बलीदान देणाऱ्यांच्या गोष्टी गुरूजी मुलांना सांगत होते. मध्येच एका मुलाने ‘प्रजासत्ताक म्हणजे काय?’ असा प्रश्न गुरूजींना विचारला… गुरूजी हसले म्हणाले, ‘सोपं आहे, ज्या ठिकाणी प्रजेचं म्हणजे लोकांचं राज्य आहे, सत्ता आहे ते म्हणजे प्रजासत्ताक’ गुरूजींनी सोप्या शब्दात उत्तर दिले होते…. खरे होते का ते….!

वर्षानुवर्ष हे उत्तर आपण ऐकत आलेलो. कुठे दिसते का हे प्रजासत्ताक…

बाजार समितीच्या दारात बैलगाड्यात भाजी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांची रांग लागलेली होती. चांगला भाव मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. व्यापाऱ्यांची बैठक सुरू झालेली. ती संपल्यावर व्यापारी बाहेर आले, शेतकऱ्यांच्या मालाची पाहणी करून अगदीच कमी भाव त्यांनी फोडला होता. जो शेतकऱ्यांना परवडणारा नव्हता, पण पर्याय नव्हता. भाजी परत नेण्यासारखी नव्हती… मिळेल त्या भावाने विकणे हाच पर्याय होता. व्यापाऱ्याच्या दारात माल टाकुन नाडले गेलेले शेतकरी निघाले होते… प्रजासत्ताकाच्या दिशेने…

कॉलनीतील तो तिला सारखा त्रास देत होता. मनाशी ठरवून ती पोलिसात गेली होती, तक्रार दाखल करायला. पण पोलिस साहेबानी त्याची बाजु घेत हिच्या चारित्र्यावर बोट ठेवले होते. तशी हिच्या पायाखालची जमिन सरकली होती. पण  काय करू शकत होती ती. लढण्याचं बळ तिच्यात नव्हतं, मनोधैर्य आधीच खचलं होतं… हताश मनाने ती पोलिस ठाण्याच्या बाहेर पडली होती… निघाली होती प्रजासत्ताकाच्या दिशेने…

नोकरीसाठी वणवण फिरणारा तरुण सरकारी कार्यालयात पोचला होता, नोकरी मिळवण्यासाठी… त्याच्याजवळ डिग्री होती, गुणवत्ता होती… त्याने अर्ज केला होता. पण सरकारी साहेबांनी दुसऱ्याला घेतले होते, याच्याजवळ वशील्याचा कागद नव्हता.. हिरमुसला झालेला तो निघाला होता… प्रजासत्ताकाच्या दिशेने…

पाणी येत नव्हते, रस्ते खराब होते, जिथे-तिथे कचरा साचलेला होता… गटारी तुंबल्या होत्या… त्या साफ करायला कुणी येत नव्हते… म्हणून कॉलनीतल्या माणसाने नगरसेवकाला फोन केला होता. स्वच्छतेची मागणी केली होती… विनवणी केली होती… नगरसेवकाने विनवणी धुडकावून, माणसाला धमकी दिली होती… निराश झालेल्या माणसाने फोन ठेवला होता…. प्रजासत्ताकाची आठवण त्यालाही येत होती…

निवडणूकीचे पडघम बाजू लागले होते… जिकडे तिकडे विविध पक्षांचे बॅनर, पोस्टर लागले होते… जो तो आपण कसे जनतेचे कैवारी आहोत हे सांगण्यासाठी पुढाकार घेत होता. मतदारांना मतदानाच्या हक्काची जाणीव करून देत होता… राज्यात प्रजेला किती महत्व आहे, हे सांगत फिरत होता… प्रजेला तिचा हक्क बजावण्याचा दिवस जवळ आला होता… प्रजाही चालली होती… हक्क बजवायला एका दिवसापुरता……

प्रजेची सत्ता असलेल्या राज्यात प्रजेला अडविण्याच्या घटना रोजच कुठेना कुठे घडत असतात. आपण रोज वाचत असतो… कुठे ना कुठे… मग प्रजेचं राज्य कुठे आहे… प्रजेची सत्ता कुठे आहे….!

दिनेश दीक्षित, जळगाव (९४०४९५५२४५)

Avatar
About दिनेश रामप्रसाद दीक्षित 46 Articles
मी जळगाव येथे वास्तव्यास असतो. जळगाव येथे गेल्या २५ वर्षापासून मी पत्रकारितेत कार्य करत आहे. दहा वर्ष मु. जे. महाविद्यालयाच्या जर्नालिझम डिपार्टमेंटमध्ये गेस्ट लेक्चर घेतले आहेत. मला सामाजिक कार्यात भाग घेण्याची आवड आहे. तसेच तरुण मुलांशी संवाद साधुन त्यांना चांगल्या गोेष्टी सांगण्याचा प्रयत्न करणे आवडते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..