काही महिन्यांपूर्वीची गोष्ट….
एक दिवस मला अचानक खोकला सुरू झाला…काहीतरी खाण्यात आले असेल म्ह्णून जुजबी काही उपाय करून जरा दुर्लक्ष केले…पुढे दोन चार दिवस तो सुरूच राहिला म्हणून मग मी आमच्या फॅमिली डॉक्टरकडे गेलो…हे आमचे डॉक्टर म्हणजे एक भारी माणूस…नुसतं त्याच्या समोर जावून बसलं तरी अर्धा आजार बरा होतो…बरं त्याच्याकडे गेलं की इलाज पाच मिनिटांचा आणि इतर अवांतर कौटुंबिक गप्पा अर्धा तास…
मी आपला त्यांनी लिहून दिलेल्या औषध गोळ्या घेऊन घरी आलो…पुढच्या तीन चार दिवस तो डोस सुरू होता…खोकला कमी झाला, पण बंद झाला नाही….मग पुन्हा गेलो …डॉक्टरांनी पुन्हा नवीन औषध बदलून दिली…पण फरक काही पडेना….खोकला कमी जास्त होतं राहिला…
तशातच मी माझा सह-कुटुंब युरोप दौरा ही आटोपला….तिथली स्थानिक औषधे पण घेऊन झाली…पण फरक काही पडेना….
तिकडून परत आलो….आता खोकला हे प्रकरण चांगलं दीड दोन महिन्याचे झाले होते…पहिल्यांदाच कुठला आजार एवढा लांबला होता…फोनवर बोलताना, कुठे मिटिंगमध्ये किंवा नाटक सिनेमा बघताना त्यामुळे खूप विचित्र वाटायचं…
शेवटी आमच्या फॅमिली डॉक्टरांनी मला एका स्पेशालिस्टकडे जाण्याचा सल्ला दिला…चेस्ट स्पेशालिस्ट….छातीचे डॉक्टर…
मी आपला त्यांची चिठ्ठी घेऊन या स्पेशालिस्ट डॉक्टर कडे गेलो….त्या स्पेशालिस्ट डॉक्टरांनी तपासणी केली….’ सिगारेट पिता का?… तंबाकू खाता का?… दारू पिता का?…. ई ई असंख्य प्रश्न त्यांनी विचारले’….सगळ्या गोष्टींना मी नाही म्हंटल्यावर मग ते म्हणाले कदाचित तुम्हाला धुळीची एलर्जी असेल….त्यांनी काही औषधे लिहून दिली…पाच दिवसांची…. पाच दिवसांनी पुन्हा या म्हणाले….
आता मी एवढा जगभर बोंबलत फिरत असतो आणि अचानक कसली धुळीची एलर्जी?…..पण काहीही न बोलता चुपचाप पाच दिवस ती औषधे घेतली….परिस्थिती जैसे थे…खोकला कमी जास्त व्हायचा इतकंच…..बंद काही होतं नव्हता…मी आपला पाच दिवसांनी पुन्हा त्या स्पेशालिस्टकडे गेलो…दरवेळी ही म्हाळशी नाही पण माझी पोरगी मात्र बरोबर यायची… म्हणून मी म्हणतो प्रत्येक बापाला एक पोरगी असलीच पाहिजे….घरी मला औषधांची आठवण करुन द्यायची…..डॉक्टर काय म्हणतात ते समजून घ्यायची…त्यांच्याशी बोलायची…मी लपवलेल्या काही गोष्टी गपचूप डॉक्टरांना सांगायची… कार्टी लै चाभरट… आता कधी मधी येतात आमचे मित्र खंड्या आणि बडी गप्पा मारायला..आता हे काय डॉक्टरांना सांगायची गोष्ट आहे का?…..पण असो..
डॉक्टरांनी मग पुन्हा नवीन औषध लिहून दिली आणि मला काही टेस्ट करायला सांगितल्या… छातीचा एक्सरे काढायला सांगितला….’खुन की तपासणी’ करायला सांगितली…
मी मनात म्हंटल च्यामारी आपल्या छातीत असून असून काय असणार तर ही म्हाळसाबाई ठाण मांडून बसलेली असणार…दुसरं काय असणार? ….पण मला एक शंकाही आली….म्हंटल कसं हे ही म्हाळसा आत बसून दसरा दिवाळी आल्यावर कसे घरातले जाळे जळकटे मोठ्या काठीला झाडू बांधून काढते तसं ही आत माझ्या छातीत बसून वर काठीने घसा तर नाही ना साफ करतं बसली असलं….त्यामुळेच कदाचित मला खोकला येतोय, माझ्या मनातील शंका……मनात म्हंटल चला या एक्सरे मूळे समजलं तरी ही बया आत काय गोंधळ घालतेय….
असो…तर एक्सरे झाला….तो एक्सरेवाला बाबा म्हणाला रिपोर्ट थेट डॉक्टरांना मेल करतो ….येथेही पोरगी बरोबरच होती…मग रक्त तपासणीसाठी लॅबमध्ये गेलो….येथे मात्र एक गडबड झाली….
त्या लॅबवाल्याने बचकन बाटलीभर रक्त काढलं रावं… मी कुठंतरी वाचलंय की थेंबभर रक्त तयार होण्यासाठी दोन तीन भाकरी खाव्या लागतात…याने तर बाटली भर काढलं म्हणजे मला आता किती खावे लागणार?…माझ्या मनात आकडेमोड तयार झाली होती…
रक्त काढत असताना पोरगी बरोबर होतीच…त्या लॅबवाल्याने त्याचे सोपस्कार आटोपले…मी आणि पोरगी बाहेर कॅश काऊंटरवर पैसे द्यायला आलो आणि अचानक पोरगी चक्कर येईन धाडकन खाली कोसळली…माझी हवा टाईट…क्षणात मी जबरदस्त घाबरलो….सगळा स्टाफ, आजूबाजूचे लोकं जमा झाले….तिथले डॉक्टर ही पळत आले…पोरीला तिथेच बाकड्यावर झोपवले…डॉक्टरांनी काही प्राथमिक तपासण्या सुरू केल्या….मी चांगलाच तंतरलो होतो….घाबरून मी म्हाळशीला फोन करून झाला प्रकार सांगितला…ती आहे तशी रिक्षा करून लॅबकडे यायला निघाली…डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून मला म्हणाले काळजीचे काही कारण नाही, काही जणांना हे असं रक्त वगैरे बघितलं की भोवळ येते पण काही वेळात सगळं नॉर्मल होतं…. आणि झालंही तसेच…काही वेळात पोरगी नॉर्मल झाली….तिला मग पाणी दिले, थोडी खडीसाखर दिली….ती आता शांत आणि ओके झाली तेवढ्यात म्हाळसाबाई आल्या आणि तिने पोरीला मिठी मारत तिचा ताबा घेतला…
काही वेळाने सगळं आलबेल झाल्यावर आम्ही तिघेही तिथून निघालो….पायी गाडीच्या दिशेने काही अंतर गेलोच असेल की म्हाळसाबाईचा इतका वेळ साचून राहिलेला बांध फुटला आणि तिने रस्त्यातच भोकाड पसरलं….मी पुन्हा टरकलो… आजूबाजूचे लोक माझ्याकडे संशयाने बघतं होते…एकतर माझा गबाळा अवतार, दाढीची खुरट वाढलेली आणि त्यात तिथेच बाजूला एक ‘देशी अमृत प्राशन’ चे दुकान होते….वेळ संध्याकाळची…लोकांना भलताच संशय येतं असणार…कसंबसं हे प्रकरण गाडीत कोंबलं आणि घरी आलो…हुश्श…
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी सगळे रिपोर्ट घेऊन त्या स्पेशालिस्ट डॉक्टरकडे गेलो…यावेळी बरोबर म्हाळसाबाई होत्या….सगळे रिपोर्ट नॉर्मल…. कशातच काही सापडले नाही….मग आता काय?
पुढे जे झाले ते खूप गमतीशीर बरं का…
डॉक्टरांनी सगळे रिपोर्ट पाहून, सगळं काही आलबेल आहे हे पाहून ते मला म्हणाले…
” मला वाटतं तुम्हाला ऍसिडीटीचा त्रास असावा…तुम्हाला मी काही औषधे लिहून देतो ती पुढचे पाच दिवस घ्या आणि मला पुन्हा दाखवायला या…आणि हो तुम्ही अजून एक काम करा….दर दोन तासांनी काहींना काही खात रहा…”
तुम्हाला सांगतो त्यांनी ते शेवटचं वाक्य उच्चारलं आणि मला कोण आनंद झाला म्हणून सांगू?…त्यांच्या त्या वाक्याने मला पार गदगदून, फदफदून, गहिवरून आलं…असं वाटलं की टुणकन उडी मारून त्या टेबलाच्या पलीकडे जावं…त्या डॉक्टरला एक घट्ट मिठी मारावी आणि त्याचा एक झकास गालगुच्चा घ्यावा …
आयला दर दोन तासांनी काहीतरी खायचं म्हणजे किती मज्जा रावं…. हा आनंद केवळ मीच समजू शकतो….
मी आनंदाने बाजूला म्हाळशीकडे बघितलं….रागाने तिचा चेहरा लालबुंद झाला होता…डोळे अक्षरशः आग ओकत होते….त्या डॉक्टरकडे खाऊ की गिळू या नजरेने ती बघतं होती….मी पटकन उठलो…सगळे पेपर घेतले आणि पटकन बिल देवून म्हाळसाला घेऊन बाहेर आलो….
मी जरा उशीर केला असता तर या महिषासुरमर्दिनीने त्या डॉक्टरचा तिथेच वध केला असता….
पुढे कसं काय कोण जाणे पण खोकला आपोआप गायब झाला….त्यालाही आता दोन तीन महिने झाले…औषध, गोळ्या, डॉक्टर केंव्हाच बंद झाले… पण अर्थात अजूनही मी दर दोन तासाला खाणे सोडलेलं नाही…न जाणो खोकला परत आला तर?…
कुलकर्ण्यांचा ” ‘म्हातारा ना इतुका की अवघे चाळीशी वयोमान’ असलेला ” प्रशांत
फोटो – माझ्या मुलीसाठी मी केलेला स्वयंपाक
मऊमधाळ खमंग भरपूर तूप लावलेली पुरणपोळी…
सणसणीत कटाची आमटी…
चटकदार घोसाळे भजी…
आणि बटाट्याची चमचमीत भाजी…
— प्रशांत कुलकर्णी
Leave a Reply