उंच उंच नारळाच्या बागा आणि त्या झावळ्या वर बसलेले पक्षी,किनाऱ्यावर पोहचताच होणारा तो वाळूचा स्पर्श,गलबताकडे धाव घेणारी कोळ्यांची पोरं. समुद्राच्या भोवताली असलेल्या किनाऱ्यावर तासनतास घालवलेला वेळ, आल्हाददायक होणारा हवेचा स्पर्श, त्यातून मिळणारा आनंद; अपर्णाला कायमच शहरातून तिच्या छोट्याश्या समुद्रकिनारी असणाऱ्या गावात ओढून आणायचा. दोन दिवसांनी ती पुन्हा तिच्या कामात व्यस्त असायची.. तिच्या नोकरीच्या निमित्ताने तिला पुन्हा परत जायला लागायचं, मन मात्र तिथच राहिलं आहे सतत असंच वाटायचं तिला. आपल्या स्वतःच्या कामाची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मात्र अपर्णा फारच तत्पर होती.
एकेकाळी तिच्या बरोबर मजेत वेळ घालवण्यासाठी भरपूर मैत्रिणी होत्या रोज एकमेकांच्या खोड्या, कधीं चोरुन कैऱ्या पाडून खाणं, शाळेला दांडी मारून खाडी वर जाऊन फेरफटका मारणं, छोट्या छोट्या गोष्टींसाठी रूसवे-फुगवे.. पुन्हा एकत्र येणं.. कधी ते दिवस सरले आणि भरभर ती संसाराच्या कर्तव्याशी वचनबद्ध झाली.
एके दिवशी ती बाजारात गेली असता सावित्री भेटली.. तिची जुनी बालपणीची मैत्रीण, किती आनंद झाला होता. बऱ्याच दिवसांनी भेट घडली आणि जुने दिवस आठवून पुन्हा गत काळात मन रमून गेले. सावित्रीने सगळ्या मैत्रिणींची खुशाली कळवली. पण सुगंधाबद्दल तिने काही सांगितले नाही. सुगंधा नावाप्रमाणेच मनाचा गंध उधळणारी थोडी अल्लड, अवखळ चंचल पण निःस्वार्थी प्रेम करणारी, आपल्या हातातले सगळं काही देऊन रिकामी.. सुगंधा आणि अपर्णा दोघी जवळजवळ राहायच्या एकत्र शाळेत जायच्या. सुगंधाची परिस्थिती बेताचीच पण रोज तीच्यामुळे अपर्णा ला रानमेवा चाखायला मिळायचा..आणि त्याबदल्यात सुगंधा गोळ्या बिस्किटे खायची.. एकमेकांच्या वेण्या ओढून मागे मागे धावत शाळा ते घर आणि घर ते शाळा..फुलांची ओंजळ घेऊन रोज सुगंधा अपर्णाच्या घरी सकाळी देवपूजेला हजर असायची. अपर्णाच्या आईच्या हातचा प्रसाद तिला फार आवडायचा.. अशी सुगंधा घरातल्यांनी नववीत असतानाच तिचं लग्न ठरवून दिले. अचानक निरोप घेऊन तिची आई घरी आली. अपर्णाच्या घरची लोकं त्यांना फार वेळ समजावत होतें.. “एवढ्या कोवळ्या वयात मुलीच्या लग्नाचा विचार करू नका” पण कोणी ऐकतच नव्हते.
सुगंधा लग्नाआधी खाडीजवळ भेटायला आली. ओंजळीत करवंद,जांभळं घेऊन.. अपर्णाचा जीव तुटत होता तिच्यासाठी. फारच जवळची मैत्रीण दूर निघून जाणार होती, आता तिचे जगच बदलणार होते. सुगंधाचे मन म्हणजे जणु निर्मळ झराच. जाईल तिकडे खळखळून वहायचं… हेच फक्त माहिती होतं तिला.. मैत्रीच्या नात्याला आज ओंजळीतून आणलेला प्रेमाचा गंध कायमचा देऊन गेली सुगंधा.. नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी चाललेली ती आणि अपर्णाच्या मनात फक्त किनाऱ्यावरची आठवण उरली होती.
अपर्णाला राहून राहून सारखी सुगंधाची आठवण येत होती खासकरून ती जेव्हा गावाकडे जात असे.शेवटी तिने तिला शोधण्याचा प्रयत्न चालू केला.ज्या गावी तिला लग्न करून दिलं ते गावं अखेरीस अपर्णाने शोधून काढले.लवकरच सकाळी ती तिथे पोहचली.सुगंधा ची सासू पायरीवरच बसली होती.अपर्णा ने तिला विचारले,”सुगंधा कोठे आहे”? मी तिची लहानपणीची मैत्रीण तिच्या घराशेजारी रहायचे.हे ऐकताच सासूच्या चेहऱ्यावर दुःखाचे सावट पसरले.ती बोलू लागली, “सुगंधा माझी धाकटी सून पोरगं सुधरल म्हणून घाईन लगीन लावून दिलं ,” पोरं लय चांगली सगळं सांभाळून घेत राहिली..पण दारूच्या नादापाई माझ्या लेकानं तिच्या जन्माच वाटोळं केलं,घरातली समदी कोण त्याला किंमत देत नव्हती.. सुगंधा पण छोटीमोठी काम करून संसार पुढे ढकलत होती.. अन् एकेदिवशी माझा लेक दारू पाई सारं जग सोडून गेला.सुगंधा मात्र एकटी पडली पदरात एक पोर टाकून नवरा निघून गेला.”आता मात्र हे सगळं ऐकून अपर्णाचा जीव कासावीस झाला
सुगंधा कोठे दिसत नव्हती..तिची सासू म्हणाली ,इथं गरीबीत आमची ओढाताण त्यात लेकाने केलेलं कर्ज, म्हणून तिला शहरात धाडली हाय , माझ्या नणंदजवळ तीनं काम मिळवून दिलं हाय तिला,ती इकडबी पैका पाठवती.,” हे सर्व ऐकून हताश अपर्णा तिचा शहरातील पत्ता घेऊन आली. इकडे परतल्यावर तिला तिचे काम पहायचे होते पण सुगंधाचा विचार मनातून जातं नव्हता.आता रविवारी पुन्हा सुगंधाच्या शहरातील पत्त्यावर ती निघाली.
जाताना ती रिक्षाने निघाली,रिक्षा अर्ध्या पाऊण तासाने एका गलिच्छ वस्तीत रिक्षा गल्लीबोळातून जाऊ लागली.. पत्र्याची ती घरे तेथील अस्ताव्यस्त पसरलेले सामान पाहून सुगंधा कोणत्या अवस्थेत राहत असेल ह्याची अपर्णाला जाणिव झाली.
रिक्षा जीथपर्यत जाते तेवढी गेली व एका बोळाजवळ थांबली.अपर्णा ने सुगंधाचे नाव घेऊन पत्ता विचारत तिचे घर शोधले.
त्या घराजवळ समोर पाण्यात खेळणारी तिची छोटीशी मुलगी दिसली.. डोळे अगदी सुगंधा सारखे चेहरा केस एखाद्या बाहुली प्रमाणे पण अंगावर फाटके कपडे होते..तिने बाहेरून सुगंधा अशी हाक दिली.
” सुगंधा ,.. सुगंधा” तशी लगबगीने सुगंधा बाहेर आली.. पाहते तो काय, बालपणीची मैत्री, जीवाला जीव देणारी अपर्णा आणि तिची मैत्री , शाळेतील आठवणी, तिच्या घरातील आठवणी, आणि किनाऱ्यावर खेळलेले तासनतास खेळ , गप्पा सारं चित्र डोळ्यासमोर तरळलं, नकळत डोळ्यांत आसवांची गर्दी झाली.. दोघीही एकमेकींना मिठीत घेऊन रडू लागल्या.सुगंधाला तिच्या साठी काय करु असे झाले.. आपल्या परिस्थितीने ती अपर्णा पुढे ओशाळली…पण अपर्णा ने तिला सावरून घेतलं..” सुगंधा, किती गोड मुलगी आहे तुझी.. काय नाव ठेवलं आहेस तिचं? ” सुगंधा म्हणाली “, ज्ञानेश्वरी ‘ तुझ्या घरी मी येत असायचे फुल घेऊन सकाळी सकाळी, तेव्हा तुझे बाबा ज्ञानेश्वरी वाचायचे.. माझ्या घरी तर तुला माहीत झाले असेल अशी अशिक्षित माणसं मग मीच नाव ठेवलं तिचं “ज्ञानेश्वरी” .. अपर्णाच्य चेहऱ्यावर गोड हास्य आले… अपर्णाने तिला ती कोणत काम करते हे विचारलं तेव्हां ती म्हणाली,इथं दहा घरची धुणीभांडी करून मी मुलीला सांभाळते..आणि गावाकडे पैशे पाठवते..ह्या दारिद्र्याच्या खाईतून तुला बाहेर पाडण्यासाठी मी इथवर आले माझ्या घरी चल असे अपर्णा व्याकूळतने म्हणाली..पण स्वाभिमानी सुगंधा मात्र तयार झाली नाही.. शेवटी तुला आपण चांगली नोकरी शोधू तुझा अन् तुझ्या मुलीचा पुढचा विचार कर आणि माझ्या सोबत चल अशी फारच विनवणी केल्यावर ती तयार झाली… अपर्णा तिला स्वतःच्या घरी घेऊन आली.. तिला तिच्या मुलीला तिने नवीन कपडे खरेदी केले… तिच्या साठी जवळच एक खोली पाहिली.. सुगंधा मैत्रीच्या ह्या गंधातून भारावून गेली.. काही दिवसांसाठी तिला एका कापड दुकानात व्यवसायाचे ज्ञान घेण्यासाठी अपर्णाने तिला ओळखीच्या ठिकाणी पाठवले.. हळूहळू सुगंधाने व्यवसायातील अचूकता,
सातत्य,परिश्रम आत्मसात केले.. आणि अवघ्या वर्षभरात तीने स्वतः नव्याने एक कापड व्यवसाय सुरू करण्याचे ठरले.
अपर्णा ने तिला थोडीफार आर्थिक मदत केली.. सुगंधाच्या आयुष्यात नवी आशेची पहाट झाली.. त्यादिवशी दुकानाचे उद्घाटन होते.. सुगंधाच्या ओळखीचे अपर्णाच्या ओळखीचे सारे पाहुणे, मित्रपरिवार उपस्थित होते.सुगंधाने अपर्णास उद्धाटन करण्याची विनंती केली, तिच्या दुकानाचे नाव तिने ” मैत्रगंध ‘ असे ठेवले.. अपर्णा चे मन गलबलून आले.दोघींनी मिळून एकत्र प्रवेश केला आणि देवासमोर हात जोडून प्रार्थना केली.सुगंधा ने ही आपल्या जीवलग मैत्रिणीला व्यवसायात भागीदार केले.. सुगंधा ने जिथे जाईल तिथे समाधानाचा सुगंध पसरवला तर अपर्णा ने मैत्री रूपाने तिच्या जीवनात सुगंध पसरवला.. अशा रीतीने” मैत्रगंध” दिवसेंदिवस वाढतच आहे.
– प्रतिभा महादेव चौगले
कोल्हापूर


Leave a Reply