नवीन लेखन...

मधु’रिमा’

हिंदी चित्रपटातील हिरोची आई १९५० ते १९८० या तीस वर्षांत अगदी ‘टेलरमेड’ होती. तिचा मुलगा अभ्यास न करता, उनाडक्या करुन कॉलेजमध्ये पहिल्या नंबरने पास होत असे. घरी आला की, वडिलांच्या तसबिरी समोर त्याची आई ‘देखो तुम्हारे बेटेने, तुम्हारा सपना पुरा कर दिया’ असा ती डायलॉग मारायची. एखाद्या चित्रपटाच्या शेवटी, आईच्या मांडीवर भरमसाठ डायलॉग बोलून गोळी लागलेला हिरो शेवटचा श्वास घ्यायचा. सुलोचना, निरुपा रॉय, कामिनी कौशल, दुर्गा खोटे, लीला चिटणीस, इ. अभिनेत्रींनी अशी टिपिकल आई अनेक वर्षे साकारली.

मराठी अभिनेत्री रिमा लागूने शशी कपूरच्या ‘कलयुग’ चित्रपटापासून हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. ९० च्या दशकापासून तिने सलमान खान, अमिर खान, शाहरुख खान, ऋषी कपूर, संजय दत्त, सैफ अली, अजय देवगण, इ. अनेक हिरोंच्या, ‘ग्लॅमरस आई’ची भूमिका करुन पूर्वीच्या ‘गरीब आणि बापुडवाण्या आईची’ चाकोरी तिने मोडीत काढली.

रिमा म्हणजेच पूर्वाश्रमीची नयन भडभडे हिचा जन्म २१ जून १९५८ साली गिरगाव, मुंबई येथे झाला. मराठी रंगभूमीचा वारसा तिला आईकडून मिळाला. तिचं प्राथमिक शिक्षण मुंबईत झालं. लहानपणी तिने छोटे मोठे रोल केले. नंतर शिक्षण महत्त्वाचे,म्हणून पुण्यात इयत्ता आठवीपासून ती हुजूरपागेत दाखल झाली. मॅट्रिक होईपर्यंत तिने अनेक नाट्यस्पर्धांतून आपली नाट्यकला जोपासली.

कॉलेज शिक्षणासाठी ती पुन्हा मुंबईला गेली. श्याम बेनेगल यांच्या एका जाहिरातीत तिने काम केले, तिथून तिच्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीचे दरवाजे खुले झाले. त्या दरम्यान ती बॅंकेत नोकरी करीत होती. अभिनयातील करीयर व नोकरी यांचा मेळ बसणे अवघड होऊ लागल्यामुळे शेवटी तिने नोकरी सोडली व अभिनयाला वाहून घेतले.

१९७९ साली प्रदर्शित झालेल्या ‘सिंहासन’ या चित्रपटापासून तिने सिने कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. त्यानंतर नाटक आणि चित्रपट दोन्ही क्षेत्रात तिचे नाव गाजू लागले. नाना पाटेकर सोबत केलेल्या ‘पुरुष’ नाटकाचे प्रयोग ‘हाऊसफुल्ल’ होत असत. ‘ती फुलराणी’, ‘बुलंद’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘तो एक क्षण’, इ. नाटकांतून तिने आपल्या कसदार अभिनयाची छाप पाडली.

‘कयामत से कयामत तक’ चित्रपटापासून तिने केलेल्या आईच्या भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. ही ‘आधुनिक’ गोल आणि गोड चेहऱ्याची आई सर्वांना आवडू लागली. सूरज बडजात्यांच्या प्रत्येक चित्रपटात, रिमा लागू एकमेव ‘आई’ राहून, राजश्री बॅनरची एक अविभाज्य घटक झाली.

महेश मांजरेकर निर्मित व दिग्दर्शित ‘वास्तव’ मधील, पोटच्या मुलाला गोळ्या घालणारी तिची कठोर आई, अविस्मरणीय ठरली.

दूरदर्शनवरील गाजलेल्या अनेक मालिकांमधून रिमाने काम केले आहे. ‘तू तू मैं मैं’, ‘श्रीमानजी श्रीमतीजी’ अशा विनोदी मालिकांमधून तिने रसिकांना मनमुराद हसवलंय.

सदाशिव पेठेत रहात असताना एकदा तिला मी भरत नाट्य मंदिरासमोरुन चालत जाताना पाहिलेलं होतं. नंतर तिने केलेल्या अनेक मराठी चित्रपटांच्या जाहिराती केल्या, मात्र प्रत्यक्ष भेट, अशी कधीही झाली नाही.

‘सातच्या आत घरात’ चित्रपटासाठी मी स्थिरचित्रणाचं काम करीत होतो. त्या चित्रपटात तिची मुलगी, मृण्मयी काम करीत होती. एके दिवशी सेटवर रिमा मृण्मयीला भेटायला आलेली होती. तेव्हा शुटींगमध्ये काढलेले मृण्मयीचे फोटो मी तिला दाखवले. ते फोटो पाहून तिने माझे कौतुक केले. एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराला, दाद दिल्याचा मला मनस्वी आनंद झाला.

२०१६ सालच्या ‘जाऊ द्या ना बाळासाहेब’ या मराठी चित्रपटापर्यंत रिमाने अभिनयाची कारकिर्द केली. सलग चाळीस वर्षं चित्रपट आणि नाटकांच्या धामधुमीत तिला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष काही देता आलं नाही, परिणामी १८ मे २०१७ साली हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने ही मधु’रिमा’ काळाच्या पडद्याआड कायमची निघून गेली…

आज रिमा हयात असती तर त्रेसष्ठ वर्षांची झाली असती..मात्र सिनेरसिकांना वृध्द झालेली ‘आई’ पहावणार नाही, म्हणून की काय देवाने तिला लवकर बोलावून घेतले…

रिमाच्या आजच्या जन्मदिनी, तिला विनम्र अभिवादन!!!

© सुरेश नावडकर.

मोबाईल: ९७३००३४२८४

२१-६-२१.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..