नवीन लेखन...

मेस्सीचे ( Lionel Messi) धडे

 

नाटकाचा शेवटचा प्रयोग असो की दूरचित्रवाणीवरील मालिकेचा शेवटचा भाग असो किंवा आयुष्यातील शेवटचा खेळ असो, कोठलाही अंतिम सामना बघताना गलबलून येते.(सचिनने क्रिकेट मधून संन्यास घेतल्यानंतर मी क्रिकेट पाहणेच सोडून दिले). अंतिम शब्द असतो, एका अध्यायाची समाप्ती आणि आयुष्य बदलाच्या/वृद्धीच्या वाटेने मार्गक्रमण करीत असते, याचा तो इशारा असतो.

मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिनाने वर्ल्ड कप च्या अंतिम फेरीत धडक दिली. हा असा नेता आहे, ज्याने याआधी आयुष्यात सर्व काही जिंकले होते , स्वतःच्या देशासाठी जगज्जेतेपण सोडून. अविश्वसनीय प्रतिभा असलेल्या या खेळाडूने अनेकवार निराशेला तोंड दिले आहे. खरेतर या वर्ल्ड कपच्या सुरुवातीलाच त्याने निवृत्तीची घोषणा केली होती. यंदाच्या हंगामातील पहिल्याच सामन्यात अर्जेंटिनाला अनपेक्षितपणे सौदी अरेबियाकडून पराभूत व्हावे लागले. त्यावेळी मेस्सी साठी हा बहिर्गमनचा रस्ता वाटला अनेकांना (गच्छंती हा खरंतर अधिक सुयोग्य शब्द, पण त्याच्या चाहत्यांच्या भावना दुखविण्याचे पाप कां करावे?) पण स्पर्धेतील हा लाजिरवाणा पराभव अर्जेंटिनासाठी पहिला, शेवटचा आणि एकमेव ठरला. त्यानंतर मेस्सीने संघ पाठंगुळीवर घेत “गोल्डन बॉल अवार्ड” हाती पडेपर्यंत अथक वाटचाल केली. आपली सर्वोत्तम खेळी त्याने अंतिम सामन्यासाठी राखून ठेवली. मेस्सीने मैदानावरील नेतृत्वाचे खालील धडे आपणांस शिकवले-

(१) पीछेहाट/माघार यांवर मात करणे- सौदी अरेबियाकडून हाती पडलेली हार मेस्सी आणि त्याच्या संघाने स्वीकारत स्वतःला ट्रॅक वर ठेवले, डिरेल होऊ दिले नाही. पीछेहाट तात्कालिक असते असे स्वतःला समजावत विजेते आगेकूच करीत असतात.

(२) परिस्थितीशी जुळवून घेणे- वयाच्या पस्तिशीत सलग ९० मिनिटे आणि नंतरचे ३० मिनिटे खेळणे मेस्सीला शक्य झाले कारण त्याने परिस्थितीनुरूप स्वतःला बदलले. सगळा भार स्वतःच्या खांद्यांवर न घेता त्याने आपली ऊर्जा योग्य क्षणांसाठी राखीव ठेवली. स्वतःचे कर्तृत्व उतरणीला लागले असताना हा विचार अधिक महत्वाचा ठरतो. मगच यशातील सातत्य राखता येते.

(३) राखीव साठ्यांचा सुयोग्य वापर- आपणा सर्वांजवळ सुप्त सामर्थ्य असते. स्पर्धेच्या सीमारेषेपाशी आल्यावर त्याचा वापर खुबीने करायचा असतो.( अमिताभ सध्या हेच करीत आहे- नायक म्हणून तो जितका सुपरहीट झाला, त्याहीपेक्षा आता उत्तरायणात आपल्या भात्यातील अविश्वसनीय बाण तो बाहेर काढतोय. आठवा- ब्लॅक, सरकार राज, पा आणि अलीकडचा उंचाई. त्याचा अभिनय वयाच्या ८० व्या वर्षी बहरत चाललाय).

(४) केव्हा अलविदा म्हणायचे- कारकीर्द ऐन बहरात असताना सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकरने आपल्या आवडत्या खेळाला रामराम केले. शिखरावर पोहोचणे सर्वांचेच स्वप्न असते, पण तेथूनच खाली उतरणे जिवावर येते.(मनस्वी देवानंद आपली सद्दी संपली तरीही अखेरपर्यंत चित्रपट बनवत राहिला, पण गुलज़ारने “मला या नवीन पिढीसाठी चित्रपट नाही बनवता येत ” म्हणत शस्त्रसंधी केली आणि मैदान सोडले.) शेवट सुखांत असला तर त्याच्या स्मृती अनंतकाळापर्यंत टिकून राहतात.

नवीन अध्यायाकडे जाण्याआधी जुने पान अलगद मागे टाकता आले पाहिजे.

शेवट आनंदी हवा असेल तर आपण गोष्ट कोठे संपवितो याला महत्व असते.
( “If you want a happy ending, that depends, of course, on where you stop your story.”- Orson Welles)

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 374 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..