नवीन लेखन...

लाटांवरचे करिअर

लेखक व्यापारी नौदलातील
निवृत्त कॅप्टन आहेत.
शिवाय लेखक आणि कवीही आहेत.

कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या ‘कोलंबसचे गर्वगीत’ ह्या कवितेने नाविकांची, त्यांच्या धैर्याची, चिकाटीची चपखल ओळख आपल्या कवितेतून करून दिली आहे. नौदल म्हणजे नेव्ही. राष्ट्रीय सागरी सीमांचे रक्षण करणारे दल.

जगात सर्वात आधी कुठल्या उद्योगाचे जागतिकीकरण झाले असेल तर ते जहाज उद्योगाचे. अनेक लहान-मोठ्या बंदरांनी युक्त असलेला आणि साडेसात हजार किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेल्या भारताने एक प्रशिक्षित आणि उत्तम दर्जाचे मनुष्यबळ पुरवणारे राष्ट्र म्हणून ह्या क्षेत्रात नेहमीच आघाडी घेतलेली आहे.

जागतिक व्यापारात नौवहन (शिपिंग) क्षेत्राचे व पर्यायाने नाविकांचे महत्त्व अनन्य साधारण झाले आहे. आपल्या दैनंदिन गरजांतील सर्वच जीवनावश्यक गोष्टींचा जहाज वाहतुकीशी संबंध येतोच. व्यापारी नौदल (मर्चंट नेव्ही) हे कोणत्याही देशाच्या राष्ट्रीय नौदलापेक्षा वेगळे दल आहे. ह्यात सर्व प्रकारच्या युद्धनौका आणि आंतरराष्ट्रीय मालवाहतूक करणाऱ्या लहान-मोठ्या आकारांच्या जहाजांचा समावेश होतो.

ह्या जहाजांचे आकार म्हणजे महाकाय असतात. कंटेनर कॅरियरमधून शेकडो कंटेनर्स वाहून नेले जातात. एकेका कंटेनरचा आकार २० फूट x ८ फूट x ८.५ फूट असा असतो. टिम्बर कंटेनरमधून हजारो टन लाकडाचे ओंडके नेले जातात, एवढे सांगितले म्हणजे जहाजांच्या प्रचंड भव्यतेची कल्पना यावी. तेल, धान्य, खनिजे, खते, दगडी कोळसा, सप्त-पंचतारांकित प्रवासी जहाजे, मोटरगाड्या, ट्रक, बसेस अशी अवजड वाहने असा माल ही जहाजे वाहून नेतात. खोल समुद्रात जाणारी, किनाऱ्याजवळ काम करणारी आणि समुद्रात उत्खनन करणारी, पाईप लाईन केबल टाकण्याचे विशिष्ट काम करणारी अशीही जहाजे असतात. पण ती आकाराने लहान असतात. अशी पन्नास हजाराहून जास्त विविध प्रकारची व्यापारी जहाजे जगभरातल्या समुद्रावर आहेत. त्यांच्यासाठी साडेनऊ टक्के मनुष्यबळ भारताकडून पुरवले जाते. मालवाहू जहाजांची संख्या आज १३०० पेक्षा अधिक आहे. त्यावर साधारणपणे १० लाख कर्मचारी काम करत आहेत. व्यापारी नौदलात मनुष्यबळ प्रमाणित संख्येत लागते. परंतु ते प्रशिक्षित असावे लागते.

व्यापारी जहाजावरील कामकाज प्रामुख्याने तीन विभागात चालते: डेक, इंजिन आणि सलून म्हणजे केटरिंग विभाग. डेक विभागाचे कार्य म्हणजे जहाजावरील मालाची चढउतार, त्यावेळी त्या मालाची देखभाल, जहाजाचे नेव्हिगेशन, जहाजावरील लाईफ सेव्हिंग, फायर फायटिंगची साधने तसेच जहाजाच्या (इंजिनरूम सोडून) सर्व भागांची देखभाल करणे. चीफ ऑफिसर हा डेकचा प्रमुख असतो. त्याच्या हाताखाली सेकंड, थर्ड, डेक कॅडेट असा अधिकारी वर्ग असतो. इंजिन विभागाचे प्रमुख कार्य म्हणजे जहाजाचे मेन इंजिन, इंजिनरूममधील जनरेटर्स, बॉयलर्स, फ्युएल प्युरीफायरसहित सर्व मशिनरी, क्रेन्स, स्टिअरिंग गिअर इत्यादी यंत्रांची देखभाल करणे. इथे चीफ इंजिनीअरच्या हाताखाली सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ असे इंजिनीअर्स असतात. इलेक्ट्रिकल ऑफिसर किंवा इलेक्ट्रो-टेक्निकल ऑफिसर असा अधिकारी वर्ग असतो. जहाजावरील खानपान व्यवस्थेशी निगडित सर्व जबाबदाऱ्या सलून विभागाकडे असतात. ह्या विभागाचा चीफ कुक हा प्रमुख असतो. त्याच्या हाताखाली सेकंड कुक, मेसमन असा कर्मचारी वर्ग असतो. कॅप्टन हा तिन्ही विभाग प्रमुखांचा अंतिम वरिष्ठ आणि सर्वोच्च अधिकारी असतो. संपूर्ण जहाजाची जबाबदारी कॅप्टनवर असते. कॅप्टन हा डेक विभागातून येतो म्हणजे चीफ ऑफिसरला बढती मिळाल्यावर त्याला हे पद मिळते. ह्याशिवाय इंजिन विभागात काम करण्यासाठी ८ ते १० रेटिंग्ज म्हणजे खलाशी वर्ग असतो. असा साधारण २२ ते २७ प्रशिक्षित लोकांचा चमू एका व्यापारी जहाजावर कार्यरत असतो.

जहाजावर विविध प्रकारची कामे असतात. पदे, वेतन, आणि जहाजावर विविध प्रकारची कामे असतात. पदे, वेतन, आणि कामाच्या वेळा त्यानुसार असतात. कोणत्याही विभागात काम करायचे तर अधिकृत संस्थेकडून प्रशिक्षण घेणे आवश्यक असते. जहाज सेवापूर्व प्रशिक्षणाचा अधिकारीपदासाठी साधारणपणे खर्च ३ ते ६ लाख, खलाशासाठी १ ते १.५ लाख असा असतो. संस्थेच्या धोरणानुसार हा खर्च वेगवेगळा असू शकतो. Indian Maritime University (IMU) हे भारतातील व्यापारी नौदलातील शिक्षण-प्रशिक्षण देणारे केंद्रीय विद्यापीठ आहे. ह्या क्षेत्रातील प्रवेशपरीक्षा ह्यांच्या मार्फत घेतल्या जातात. पुढील व्यावसायिक परीक्षा भारत सरकारच्या जहाज उद्योग मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली STCW नियमांतर्गत घेतल्या जातात. मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्थांची यादी https://www.dgshipping.gov.in ह्या संकेतस्थळावर आहे.

आधी जमिनीवरील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर जहाजावरील प्रशिक्षण घ्यावे लागते. प्रशिक्षण घेतल्यानंतर जहाजावरील नोकरीची-बढतीची शक्यता आहे काय, हे आधी पडताळून पाहणे आवश्यक आहे. लेखीतोंडी परीक्षा पास झाल्यानंतर STCW च्या नियमानुसार व्यावसायिक प्रमाणपत्र प्राप्त झाल्याशिवाय जहाजावर नोकरी करता येत नाही.

मर्चंट नेव्ही हे प्रामुख्याने व्यावसायिक असे खाजगी उद्योगक्षेत्र आहे. कामाचे करार हे हुद्यांनुसार काही कालावधीसाठी केले जातात. भारतीय महिलाही ह्या क्षेत्रात आता येऊ लागल्या आहेत. जहाजाच्या रोजच्या कामात विविधता असते. तरुण वयातच उत्तम वेतन मिळते त्यामुळे आर्थिकदृष्ट्या स्थैर्य फार लवकर मिळते. संपूर्ण वेतन करमुक्त असते. प्रवासाची संधी मिळाल्याने वेगवेगळे देश पाहायला मिळतात. जहाजावर काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला कंपनीच्या सोयीनुसार जहाज जिथे असेल त्या देशात विमानाने पाठवले जाते. त्यांच्या जहाजावर जाण्या येण्याच्या, त्यासाठी आवश्यकतेनुसार व्हिसा मिळवण्याच्या तसेच प्रवासादरम्यान आवश्यकतेनुसार होटेलमध्ये राहण्याच्या खर्चाची व त्यासाठी आवश्यक व्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी जहाज कंपनीकडूनच घेतली जाते.

ह्या क्षेत्रातली आव्हानेही लक्षात घेतली पाहिजेत. कुटुंबापासून अनेक महिने दूर राहावे लागते. फोनवरही संपर्क होईलच असे नाही. भिन्न भाषा, भिन्न संस्कृती असलेल्या वेगवेगळ्या देशातील लोकांशी संपर्क येतो. त्यांच्याशी जुळवून घेता आले पाहिजे. हवामान अस्थिर असते. त्यातील धोक्याच्या प्रसंगी प्रसंगावधान राखता आले पाहिजे. थोडक्यात, मानसिक आणि शारीरिक संतुलन राखता आले पाहिजे. टँकर जहाजांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेचे खास प्रशिक्षण दिले जाते. व्यक्तिगत संरक्षक साधने वापरून, सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन केल्यास टँकर जहाजांवर तेल-रसायनांची हाताळणी सुरक्षितपणे होते.

नैतिकता, प्रामाणिकपणा, कर्तव्यकठोरता, कामावरील निष्ठा, कार्यकुशलता, नेतृत्वगुण, नम्रता, स्वावलंबन, चिकाटी, संघभावना, सातत्य, उत्तम वागणूक, इंग्रजीवरील प्रभुत्व अशा अनेक गुणांमुळे भारतीय नाविकांनी अधिकारी आणि खलाशी म्हणूनही आंतरराष्ट्रीय क्षेत्रात खूप मोठे नाव कमावलेले आहे. तसेच व्यापारी नौदलातही मोलाचे योगदान देऊन अभिमानास्पद अशी परंपरा निर्माण केली आहे. हा नावलौकिक अबाधित राखून भारतीयांसाठी नोकरीच्या अधिकाधिक संधी ह्या क्षेत्रात उपलब्ध आहेत. ह्यासाठी सुयोग्य तरुणांची ह्या क्षेत्राला नक्कीच गरज आहे. पर्यावरणाविषयी आत्मीयता, संगणक वापरण्याचे ज्ञान हेसुद्धा ह्या क्षेत्रातील निवडीसाठी उपयुक्त गुण आहेत. कामाची विविध कौशल्ये लवकर शिकून आत्मसात करण्याची आणि प्रतिकूल परिस्थितीत साहसी आणि खिलाडू वृत्तीने जुळवून घेण्याची क्षमता, विश्लेषणात्मक तार्किक बुद्धिमत्ता, बहुकार्यात्मक उपयोगिता ज्यांच्यामध्ये आहे, अशा तरुणांनी अवश्य हे क्षेत्र निवडावे.

-कॅप्टन वैभव दळवी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..