नवीन लेखन...

लहानपण देगा देवा..

 

वृद्धत्वाच्या उंबरठ्यावर स्वतःला विसरणे, हे पुष्कळ कठीण असते, पण तेव्हढेच जरुरीचे असते. आईच्या गर्भात एका नव्या जीवाचा पहिलं हुंकार आणि वृद्धकाळी जीवनाच्या अंताला घेतलेला शेवटचा श्वास, हे परिघावरील दोन बिंदू समजले, तर एक वर्तुळ पूर्ण होते. याला आपण जीवनचक्र म्हणून संबोधितो.  आयुष्यातील 15 ते 65 वर्षाचा मधला काळ सोडून दिल्यास  लक्षात येते की सुरुवातीची आपल्या आयुष्यातील स्थित्यंतरे, ही उलट्या क्रमाने परावर्तीत होत आहेत.


थँक्स टु करोना, गेली तीन वर्षे अमेरिकेतील नातीला भेटलो नव्हतो. संपलेला अमेरिकन व्हिसा  मार्गी लावल्यावर शेवटी एकदा लेकी आणि नातीला भेटण्याचा योग आला. तीन वर्षापूर्वी ‘बाल’  गटात बसणारी नात ‘इरा‘ आता एकदम मोठी झालेली दिसली. शारीरिक वाढी बरोबर तिचा एकंदरीत सर्वच नूर बदलेला जाणवला. चार वर्षापूर्वी तिच्या टेडी बियर आणि तत्सम सॉफ्ट प्राण्याच्या लुटूपुटू शाळेत ‘नॉटी बॉय’ म्हणून वर्गाबाहेर बसवणारी माझी टीचर आता खरोखरच्या शिक्षकेच्या भूमिकेत गेलेली होती. इंडियातून आलेल्या आपल्या अडाणी आजी आजोबांना त्यांच्या इंग्रजी उच्चारापासून ते आमचे धेडगुजरी संगणकीय ज्ञान सुधारण्याची जबाबदारी तिने स्वखुशीने आणि जन्मसिद्ध हक्काने स्वीकारली होती. लाडाने अंगाशी खेळणारी इरा आता कमरेवर हात ठेवून उठल्या बसल्या आम्हाला तिच्या नाजुक स्वरात पण करड्या आवाजात सूचना देऊ लागली. पत्ते खेळायला माझ्याकडूनच शिकेलेली माझी नात मलाच ‘नो चिटिंग आजोबा’ म्हणून दरडावू लागली, आणि आम्हाला लक्षात येऊ लागले की आपली भूमिका आणि स्थान हे सर्व बदलेले आहे.

समस्त तथाकथित मराठी उच्च मराठी मध्यमवर्गीय कुटुंबाप्रमाणे आमचीही पुढील पिढी अमेरिकेत राहत असल्याने, साहजिकच एक छोटे कुटुंब लेकीकडे संपन्न झाले. पाच ते पंधरा वयोगटातील नातवंडे यांचा गोतावळा जमल्यावर, त्यांच्याबरोबर समुद्रात डुंबताना, किनार्यावर अथवा घरच्या आवारात बास्केटबॉल, लंगडी खेळताना जुने दिवस आठवले, तसेच बालपणीचे सवंगडी गवसल्याचा आनंद झाला. समुद्रात डुंबताना एक अनोखा अनुभव मिळाला. माझ्या पुतण्याची मुलगी ‘सारा’ वय वर्ष सात किंवा आठ. समुद्रात शिरताना तिचा हात मी धरला आणि हात सोडून ती जास्त खोल पाण्यात मोठ्या भावंडांच्या मागे जाऊ नये म्हणून तिला म्हटले, ‘सारा मी समुद्राला घाबरतो, माझा हात सोडू नको, मला भीती वाटेल’. आजोबांना सांभाळण्याची आपली नैतिक जबाबदारी समजून त्या लहान मुलीने पुढील एक तास माझा हात सोडला नाही. पाण्याची लाट आली की मला सांगायची ‘आजोबा घाबरू नकोस, मी तुझा हात घट्ट पकडला आहे.’ पुढील एक तास समुद्रात खेळताना मी तिच्यापेक्षाही लहान कधी झालो हे माझे मलाच कळले नाही. इतर भावंडे  पाण्यावर सर्फिंग करीत होती, माझ्या मुलीने तिला बोलावले. पण तिच्याकडे जाण्याच्या अगोदर तिने तिच्या आईला बोलावले आणि तिला बजावून संगितले की, ‘आजोबा घाबरतात, त्यांचा हात धरून ठेव.’ काही वेळाने, मी एकटाच पाण्यात खेळत असताना ती परत माझ्याकडे आली, ओरडून म्हणाली, “Aajoba that is dangerous, do’t go there’ आणि माझा हात धरून किनार्यावर बसवले. त्या वेळी मला तुकाराम महाराजांचा अभंग आठवला,

लहानपण देगा देवा। जसा मुंगी साखरेचा रवा,
तुका म्हणे बरवे जाण। व्हावे लहानाहून लहान॥

साराच्या निर्व्याज्य आणि निरागस प्रेमाच्या लाटेत मी विरघळून गेलो होतो.

माझे स्वतःचे अस्तित्वच मी विसरलो होतो.

वृद्धत्वाच्या उंबरठ्यावर स्वतःला विसरणे, हे पुष्कळ कठीण असते, पण तेव्हढेच जरुरीचे असते. आईच्या गर्भात एका नव्या जीवाचा पहिलं हुंकार आणि वृद्धकाळी जीवनाच्या अंताला घेतलेला शेवटचा श्वास, हे परिघावरील दोन बिंदू समजले, तर एक वर्तुळ पूर्ण होते. याला आपण जीवनचक्र म्हणून संबोधितो.  आयुष्यातील 15 ते 65 वर्षाचा मधला काळ सोडून दिल्यास  लक्षात येते की सुरुवातीची आपल्या आयुष्यातील स्थित्यंतरे, ही उलट्या क्रमाने परावर्तित होत आहेत. 15 व्या वर्षी आपण एका नवीन क्षितिज आपल्या समोर असते, आणि ते क्षितिज पादाक्रांत करण्याची उर्मी आणि ईर्ष्या आपल्या तरुण वयात आपल्याला असते. . 65 व्या वर्षी परत एकदा नवीन आव्हाने , आणि आवाहने आपल्या समोर उभी ठाकलेली असतात. सुनील गावसकर ज्याप्रमाणे एक शतक झळकवल्यावर द्वी शतकाची सुरुवात पुनश्च नवीन उमेदीने आणि ऊर्जेने करायचा. त्याच भावनेने आपण आपली पुढील आयुष्याचा डाव खेळण्याची मानसिक तयारी सुरू करतो. वयाच्या 10व्या वर्षी, कुमार वयात आपल्याला नवीन मित्र, नवीन छंद, नवी आवड याची ओढ असते, तसेच वयाच्या सत्तराव्या वर्षी आपल्याला नवीन मित्रांची, राहून गेलेल्या छंद आणि आवडीची आठवण होते, त्यांची गरज भासू लागते. पाचव्या वर्षी तुम्ही एकटे खेळण्यासाठी जरी  घरा बाहेर गेलात तरी, घरचे काळजी करतात. 75 वर्षानंतर सुद्धा हीच परिस्थिति असते. तुम्ही घरी येईपर्यंत घरच्यांचा जीव टांगणीवर असतो. 5 वर्षाखालील बालके अनेक बाबतीत परावलंबी असतात. 75 वर्षानंतरच्या वृद्धांमध्येसुद्धा हळू हळू परावलंबीपण येत जाते. हा आयुष्याचा क्रम डॉक्टर गुणवंत चिखलीकर यांनी मिस्कील शब्दात गुंफला आहे.

आठवते अजुनी, माझे बालपण मला
आई म्हणायची भारी हट्टी आहे मेला ।
आजही म्हणते, काय म्हणावे या हट्टीपणाला
वाटे परतुनी भेटले, माझे बालपण मला ॥1॥

बाबा म्हणायचे, लागा जरा अभ्यासाला
पत्नी आज म्हणते, जरा लागा देवपूजेला।
पूर्वीही नव्हता, आजपण नाही वेळ देवधर्माला
वाटे परतुनी भेटले, माझे बालपण मला ॥2॥

बाबा सांगत होते, रोज परवचा म्हणायला
आता नातू म्हणतो, शिका संगणकाला।
पूर्वीही आवडे, आता पण आवडते गप्पा मारायला

वाटे परतुनी भेटले, माझे बालपण मला॥3॥

आजीचे बोट धरून जात होतो जत्रेला
आज नातू नेतो फिर हेराफेरीला।
पूर्वी आणि आताही आवडे गोडधोड खायला
वाटे परतुनी भेटले, माझे बालपण मला॥4॥

शेवटी तुकाराम महाराज आपल्या अभंगातून  जीवनाचे तत्त्वज्ञान सहजपणे सांगून जातात, ‘व्हावे लहानाहुनी लहान’ म्हणजेच सर्व षड्रिपूंचा त्याग करून बालकासारखे, निर्मळ, निरागस व्हा. हिंदीतील प्रसिद्ध कवी योगेश सुहगवती गोयल म्हणतात,

जीवन की आपाधापी में,
चैन का एहसास कीजिये!
बेबजह की चिंता छोडकर,
बुढापे का मजा लीजिये!!

–सुरेन्द्र दिघे

(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व / ज्येष्ठत्व साजरा करणारा  दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..