नवीन लेखन...

मैत्रीच्या नव्या नात्यांसाठी ‘कुछ मीठा हो जाय’

‘कुछ मीठा हो जाय’ असो कि ‘पप्पू पास हो गया’ असो, कॅडबरी ब्रँड जाहिरातीतही आपला एक उच्च असा दर्जा सांभाळून आहे. ‘कुछ खास है हम सभी में’ ची सिरीज आठवते ? सुमारे 15-20 वर्षांपूर्वीची ती जाहिरात मालिका रसिकांना विसरणं अशक्यच. त्या मालिकेला जागतिक स्तरावरील उत्कृष्ट जाहिरातीचा प्रथम पुरस्कार मिळाल्याचं कुठंतरी वाचण्यात आलं होतं.

आणि आजची कॅडबरीची नवी, सासू-सुनेचं नवं नातं नव्यानं अधोरेखित करणारी समाजमनाचा ठाव घेणारी, आबालवृद्धांना आकर्षित करणारी, उत्पादकास, निर्मात्यास १००% परिणाम, पूर्ण पैसा वसूल करून देणारी, लिंगभेदाच्या पुढे जाऊन कायम स्मरणात राहील अशी ही अवीट जाहिरात. कॅडबरी चॉकलेटची ही नेहमीप्रमाणे आणखी एक, बाजारातील तिचा तोरा आणि वकूब वाढवणारी उत्तम जाहिरात.

उत्पादकाचे संभाव्य ग्राहक – मध्यमवर्गीय,
संभाव्य ग्राहकांचा वयोगट – प्रौढ

कारण उच्चवर्गीय आणि तरुणाई आधीच कॅडबरीवर फिदा आहे, म्हणून कॅडबरी आता तरुणाईच्या वरच्या ज्येष्ठ पिढीवर, त्यांच्या आई-वडिलांवर, सासू-सासऱ्यांवर लक्ष्य केंद्रित करू पाहत आहे. भारत देश त्यासाठी त्यांना खूप मोठी बाजारपेठ आहे.

म्हणून जाहिरातीची मूळ संकल्पना – लग्नाची वरात
कारण तो सकल जनमानसाच्या आवडीचा, जिव्हाळ्याचा आणि जीवनातील अविभाज्य घटक असलेला विषय.

गीत-संगीत-नृत्य हे तर हृदयाच्या लयबद्ध ठोक्यांमुळे निसर्गतः प्रत्येकात वसलेलं. उडत्या चालीवरील गीताच्या ठेक्यावर बिछान्यावर आडव्या पडलेल्या आजारी माणसाचेदेखील पाय ताल धरायला लागतात. इथं तर चक्क वरात दाखवलीय. वरातीत नाचण्याचा आनंद लहान-थोर सारेच घेतात. नव्हे, ते व्यासपीठंच असं असतं जिथं नाचणारा अगदी जवळचा आप्त-मित्रादी असणे जरुरी नाही, कुणीही या अन त्या जल्लोषात सामील व्हा. अगदी अनोळखी असलेलेच काय वरातीच्या मार्गावरून जाणारे अगदी असंबंधीत वाटसरूदेखील आपली गाडी बाजूला लावून आपली नाचण्याची हौस भागवून मग पुढे जातात. ते जर उत्तम नर्तक असतील तर वरातीतील अधिकृत नातलग बाजूला होऊन त्यांच्या नृत्याविष्काराचा आनंद तर घेतातच पण त्यांना वरतून हार्दिक प्रोत्साहनही देतात. माणसातील नेमक्या याच हळुवार भावबंधाचा नाजूक धागा या जाहिरातीच्या सृजनशील टीमनं मस्त पकडलाय. आणखीही बरंच काही भावणारं आहे या जाहिरातीत. काय ते पाहूया …….

सासूचा आदर करणारी, नवखी दिसणारी पण निवांतपणे, म्हटलं तर एकांतात, म्हटलं तर चोरून कॅडबरी खाणारी सून, चाळीच्या दुसऱ्या-तिसऱ्या मजल्यावरून खालच्या रस्त्यावरून जाणाऱ्या वरातीच्या गाण्या-बजावण्यावर तिनं हलकेच धरलेला नृत्याचा ठेका, सासूला पाहताच तिच्या त्या पदर सावरून घेण्यामागचे उत्तम संस्कार, क्षणार्धासाठी सुनेच्या चेहऱ्यावर उमटलेले स्त्रीसुलभ लज्जायुक्त भीतीचे भाव तर लाजवाब. जाहिरातीच्या या लख-लख चंदेरी दुनियेत मॉडेल म्हणून तिचं भविष्य उज्ज्वल नक्कीच आहे.

‘कामं सोडून इथं काय करते आहेस? असं बाल्कनीत उभं राहणं बरं नसतं!’ अशी सासूची प्रथमदर्शनी केवळ नजरेतूनच नाराजी, नंतर चलाखी म्हणा कि संस्कार ते तिचं सासूला कॅडबरी शेअर करणं. मग सासूच्या चेहऱ्यावरील ते नाराजीचं मळभ हटून रिलॅक्स होणं, त्या रिलॅक्सेशनमूळे सासूचंही मग त्या गाण्यावर ठेका धरणं, मग खुणेतूनच त्यांचं खाली त्या वरातीत जाऊन नाचण्याचा निर्णय घेऊन दुसऱ्या क्षणी वरातीत सामील होणं, स्थळ-काळ विसरून ते त्या दोघी सासू-सुनेचं बेभान नाचणं, अधिकृतपणे नाचणाऱ्या वरातीतील आप्तांनी त्या दोघींना सामावून घेऊन टाळ्या वाजवणं, आता प्लिज पुरे करा अशा अर्थानं प्रत्यक्ष नवरदेवाचं त्यांना ते सन्मानानं बाजूला होण्यास खुणावणं, शेवटी नाचण्यातली धमाल मजा लुटून तृप्त-आनंदी होऊन, भीतीयुक्त आदराचं नातं धूसर होऊन नवीन मैत्रनात्यास सुरुवात झाल्याचं दाखवण्यासाठी ते एकमेकींच हातात हात घेऊन बागडत-हुंदडत परत फिरणं, अगदी लहान मुलींसारखं. असं सारं काही केवळ अवघ्या काही सेकंदांत. कास्टिंग, कॉस्चुम्स, हेअर स्टाईल मेकअप, लोकेशन, लाईट्स, दिग्दर्शन, डबिंग, म्युझिक, सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग, डायलॉग्स, स्क्रिप्ट, स्टोरी इ. इ. सगळ्या टीम्सनं फार कष्ट घेतलेत. उच्च दर्जाचं टॅलंट वापरलंय. केवळ अप्रतिम, इतकं कि ही जाहिरात पाहण्यासाठी अप्रिय अशा ब्रेकची वाट पहाण्यास बाध्य व्हावं इतकं अप्रतिम. ऑनस्क्रीन डायलॉग फक्त एकाच शब्दाचा- “आई!”. कॅप्शनही समर्पक, तीही प्लेबॅकमध्ये – ‘वाढत्या नवीन मैत्रीसाठी.’

यांतील आणखी वैशिष्ट्यपूर्ण बाबी म्हणजे आउटफिट्स आणि कास्टिंग. सून नवविवाहिताच दिसते पण एकविसाव्या शतकातील तरुणीचा असावा तसा माफक असा बोल्डनेस आहे तिच्याकडे तर सासू जुन्या चाली-रितींचं ओझं वाहतं ठेऊन नव्या पिढीत सामील होऊ पाहणारी, तो दुवा साधणारीच दिसते.

साड्याच का ? तर सुसंस्कृत मध्यमवर्गीय भारतीय स्त्रीचं प्रतिनिधित्व करण्यात भारतात सर्वांत जास्त टक्का साडीचाच आहे म्हणून.

सगळे लाँग शॉट्स, रात्रीचं संपूर्ण आऊटडोअर शूट, त्यात हवं तेच दाखवता येतं. आणि इतर पेहरावही साधे, कारण जाहिरात चॉकलेटची आहे. इथ फेस व्हॅल्यू, मॉडेल्स नव्हे तर कौटुंबिक आणि सामाजिक जाणिवा उठून दिसायला हव्यात आणि हेच घडतं इथे. यात ही जाहिरात यशस्वी होते.

नृत्याच्या स्टेप्स अगदी साध्या. नपेक्षा त्यांत कुठेही उन्माद, उत्तेजना अथवा अश्लीलता नाही पण उदंड, उत्कट उत्साह मात्र आहे जो उत्स्फूर्तपणे आलेल्या नृत्याच्या उर्मीमध्ये हवाच.

गाणं हिंदीच का, प्रादेशिक भाषेतलं का नाही तर बॉलिवूडचा समग्र भारतावर असलेला कमालीचा प्रभाव आणि परत हिंदीचाच टक्का जास्त म्हणून. नाही तर सर्व प्रादेशिक भाषांत गाणं डबिंग करण्याचा अतिरिक्त पण अनावश्यक खर्च निर्मात्यास उचलावा लागला असता.

मुख्य लक्ष्य असलेला मध्यम आणि निम्नमध्यमवर्गीय प्रौढ किंवा पन्नाशीत पोचलेला वर्ग. तरुणाईलाच त्यांनी सुचवलंय कि कॅडबरी आता तुम्ही एकटे खाऊ नका तर वडीलधाऱ्यांनाही खाऊ घाला. आणि वयस्कांना सुचवलं आहे कि तुम्ही कॅडबरी खा म्हणजे तुमचा मूड रिलॅक्स होईल, आणि घरातलं, तुमच्या कुटुंबातील वातावरण आनंदी राहील, त्यातही यशस्वी. अगदी शंभर टक्के! उत्पादकास आणखी काय हवंय.

पाहिली नसेल तर अवश्य पहा – ‘कॅडबरीज डेअरी मिल्क – मैत्रीच्या नव्या नात्यांसाठी.’

— सिद्धू चिलवंत 

— गोडवावंत

`आम्ही साहित्यिक’ या फेसबुक ग्रुपवरील लेखक

 

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 346 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..