नवीन लेखन...

कृष्णाष्टमी

( ज्योर्तिभास्कर माननीय जयंतराव साळगावकर यांचा मराठीसृष्टीवरील काही वर्षांपूर्वी प्रकाशित झालेला लेख आम्ही आज पुन:प्रकाशित करीत आहोत. योगायोग असा की त्या वर्षीही गोपाळकाला आणि १५ ऑगस्ट एकाच दिवशी आले होते. तेव्हा जयंत साळगावकरांनी या लेखाद्वारे भगवंता ला केलेली ही विनवणी आपण आजही करत आहोत.. भगवंता या, आता अधिक विलंब करु नका ! )


भगवंता, तुझी रुपे अनेक, सर्व चराचरातच तू अंशरुपाने वसतोस अशी आमचीही श्रध्दा. आम्ही जे जे डोळ्यांनी बघतो ते ते तुझेच रुप आहे, असा विश्वास साधुसंतांनी आमच्या मनात बाणवला. तरीही मानवरुपात तुझे जे अवतार झाले त्यापैकी सातवा अवतार प्रभूरामचंद्रांचा आणि आठवा अवतार भगवान श्रीकृष्णाचा.

प्रभूरामचंद्र हे मर्यादा पुरुषोत्तम म्हणून विशेष ओळखले जातात, तर भगवान श्रीकृष्ण या तुझ्याच रुपाकडे पूर्णपुरुष म्हणून आदराने पाहिले जाते. भगवंता, श्रीकृष्ण अवतारात तू दिलेल्या आश्वासनानुसार ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी येईल, लोक धर्म, स्वत:चे कर्तव्य सोडून वागू लागतील त्या त्या वेळी आपण अवतार घेऊ आणि दुर्जनांचे पारिपत्य करुन साधुसज्जनांची दुष्टांपासून मुक्तता करु, अशी तुझी जणू प्रतिज्ञाच आहे. कृष्णावतारात तुझा जन्म कारागृहात झाला. ती श्रावण कृष्णाष्टमीची म्हणजे आजचीच रात्र होती. चोहीकडे वादळ-वारा सुटला होता. यमुना नदीला पूर आला होता. तशा अवस्थेत तुझे वडील प्रत्यक्ष वसुदेव तुला घेऊन गोकुळाच्या दिशेने चालले होते. मार्गात आलेल्या यमुनेच्या पात्रातून ते चालत जात असताना पाणी वाढले. इतके वाढले की वसुदेवांच्या डोक्यापर्यंत चढले, डोक्यावरुनही वाहू लागले आणि काय आश्चर्य !

तुझ्या परमपावन चरणाचा त्या पाण्याला स्पर्श झाला आणि पाणी झरझर ओसरले. वसुदेवाचा मार्ग निर्वध झाला.कारागृहाच्या भिंतीआड कृष्णाष्टमीच्या काळोख्या रात्री जन्माला येऊन तू वसूदेवाच्या डोक्यावरुन यमुना पार करुन नंदाघरी पोहोचलास. देवा, यामध्ये एक रुपकच दडलेले नाही का ? काळोख्या रात्री कारागृहात जन्म, साक्षात् यमाची भगिनी असलेली यमुना पार करुन वसुदेवाच्या माथ्यावरुन केवळ आनंदरुप अशा नंदाघरी यशोमंडिता यशोदेच्या सदनात तू पोहोचलास.

वसु म्हणजे दिशा. सर्व दिशा पार करुन एक नवा आनंद आपल्या रुपाने तू नंदाघरी घेऊन गेलास, असे तर यात सुचवावयाचे नाही ना ? बरोबर एकावन्न वर्षापूर्वी आजच्याच मध्यरात्री उगवत्या १५ ऑगस्ट या दिवशी भारतीय स्वातंत्र्याचा पुन्हा नव्याने जन्म झाला. उद्या उगवणार्‍या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी या दिवसाचा योग सूचित करणारी नियती तुझा अवतार पुन्हा होणार असे सांगत नाही ना ? देवा भगवंता, आम्ही पिढय़ान्पिढय़ा तुझ्या आगमनाकडे डोळे लावून ताटकळत बसलो आहोत. वाटुली पाहातां, शिणले डोळुले ! ही अवस्था सातशे वर्षापूर्वी नामदेव महाराजांनी सांगितली. आता तर तुझी वाट पाहाण्यातली आमची आर्तता अधिकच वाढली आहे. प्राण कंठाशी आलेले आहेत. प्रतिकूलतेचा महापूर आमच्या डोक्यावरुन वाहत आहे. वसुदेवाप्रमाणे आम्हीही तुला पिढय़ान्पिढय़ा डोक्यावर घेतले आहे. आमच्या देशात सर्व तर्‍हेची सुबत्ता असलेले गोकुळ नांदावे, अशी आमची प्रार्थना आहे.

भगवंता, साधुसंताचे रक्षण आणि दुर्जनांचे निर्दाळण करणारा तुमचा धर्म, तुमचे कर्तव्य आता विनाविलंब आचरणात आणल्याशिवाय तुम्हालाही गत्यंतर नाही. आज हे जग आणि विशेषत: तुमची आवडती भारतभूमी अशा परिस्थितीत आहे की, सज्जन आणि दुर्जन यांच्यात आणि पुन्हा त्यांच्या आपापसात चालणार्‍या यादवीत सज्जन-दुर्जनांसह हे सगळे जगच नष्ट होते की काय अशी भीती कृष्णाष्टमीच्या काळोख्या रात्री आमच्या मनाला ग्रासून टाकीत आहे. भगवंता या, आता अधिक विलंब लावू नका.

(सौजन्यः महान्यूज)

— ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..