नवीन लेखन...

कोटा फॅक्टरी – तारुण्याचे हडप्पा, शिक्षणाचे मोहेंजोदरो ! – ३

या पोस्ट-सीरिज च्या नावाचा विचार करीत असताना अचानक उत्खननाशी जोडली गेलेली दोन गांवे माझ्या मनात आली – “हडप्पा आणि मोहेंजोदारो !”
तारुण्याचे सांगाडे कोटाच्या उत्खननात आढळतात. कोणीही शिक्षण मनापासून आनंदाने घेताना आढळत नाही. सगळे एका ध्येयाच्या मागे लागलेले. त्यामुळे यशापयशाची व्याख्या सोपी- नव्या भाषेत “क्रॅक ” केली का एंट्रन्स ? मग गंगेत घोडे न्हाले. पण त्यांची टक्केवारी किती, याचा विचार ना पालक करीत ना परीक्षार्थी ! क्लासवाल्यांना मी दोष देत नाही, कारण बकरे आपणहून त्यांच्या तावडीत सापडतात, अगदी शोधत शोधत येतात ! मग कोटा फॅक्टरीतला रिक्षावाला त्यांचा गाईड बनतो आणि वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसवर फिरवून आणतो. आम्हीही आजकाल प्रवेशाच्या वेळी “पर्याय (ऑप्शन्स ) देतो- ” तू नही तो और सही !” पण कोट्याहून रिक्त हस्ताने परतणार नाही. कोटा हे शहर आता देश-विदेशात नावाजलं गेलं आहे – शिक्षणाच्या पर्यायांबद्दल, सॉरी क्लासच्या पर्यायांबद्दल !
पुण्यातील एकेकाळच्या प्रसिद्ध “अमृततुल्य ची जागा जशी ” सायबा,येवले “अशा चेन्सने घेतली तसे आमच्या शिकवणी वर्गांच्या जागी कोचिंग क्लासेस आले. महाराष्ट्रात “चाटे ” निघाले सर्वप्रथम या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर पाऊल टाकणारे आणि त्यानंतर आता गल्लीबोळात त्यांच्या आवृत्त्या आहेत.
” काला पत्थर ” मधील नीतू सिंग जशी कोळसा खाणींच्या परिसरात सौभाग्याची स्वप्ने विकत फिरत असते तसे हे क्लासेस आय आय टी आणि मग स्पर्धापरीक्षा JEE, NEET, TOFEL, GRE, OLYMPIAD अशी काहीबाही स्वप्ने तरुणांच्या डोळ्यात पेरत असतात – क्वचितच खरी होणारी स्वप्ने !
आम्ही नशीबवान- एफ वाय बी एस सी झालो आणि मेरिट च्या आधारे अभियांत्रिकी महाविद्यालयात दाखल झालो. त्याकाळी महाविद्यालये कमी होती, संधी कमी असायच्या आणि पर्यायही मर्यादित ! स्पर्धा त्याकाळीही होती, पण स्पर्धा परीक्षा नव्हत्या. एकतर व्यावसायिक महाविद्यालयात सरळ प्रवेश किंवा नाही. अनेक परीक्षांच्या मांडवांखालून जायचे नाही की पुन्हापुन्हा “अटेम्प्ट “करायचे नाहीत.
मी एफ वाय ला असताना फिजिक्स आणि गणित दोन शिकवण्या लावल्या. तिसरा विषय केमिस्ट्री- तुलनेत सोपा, त्यामुळे वर्गात बसून समजायचा. ४०० पैकी ( गणिताला प्रॅक्टिकल परीक्षा नसायची) मार्क्स मिळवायचे आणि अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश. तिथेही सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल एवढेच पर्याय ! किती सोपं होतं सारं (आणि बाहेर पडण्यापूर्वी कॅम्पस प्लेसमेंट – म्हणजे तीही काळजी नाही).
या साऱ्याला केव्हातरी दणकून दृष्ट लागली आणि तारुण्य रेसमधल्या घोड्यांसारखे संपू लागले- जीवापाड धावणे फक्त – जगणे नाही, मौजमजा नाही. रात्रंदिवस कोणत्या ना कोणत्या परीक्षेची तयारी. या ध्यासाचं रूपांतर मग दमछाकी मध्ये होतं. अशक्यप्राय स्वप्नांचा स्वतःच्या कुवतीचा विचार न करता फक्त पाठलाग !
कोटा आणखी एका (वाईट ) कारणासाठी प्रसिद्ध आहे- अपयशी(?) विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांसाठी ! मला आठवतं, इस्लामपूरला आमच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याने सेमिस्टर परीक्षेत नापास झाला म्हणून होस्टेलच्या खोलीची कडी आतून लावून हाताची नस कापून घेतली होती. केवढी धावाधाव करून आम्ही त्याला वाचविले होते आणि त्यानंतर प्रत्येक सेमिस्टरला हॉस्टेलमधील रेक्टरला डोळ्यांत तेल घालून लक्ष देण्याच्या सूचना प्राचार्यांनी दिल्या होत्या.
स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास नसलेली पिढी पाहायला, अनुभवायला सुरुवात मी केली १९८३ साली. सदैव भेदरलेले, आत्मविश्वासहीन, रात्रंदिवस रट्टा मारणारे ( आमच्या इंजिनीयरिंग च्या काळात ” घासणारे “), अगदी परीक्षाकेंद्रात प्रवेश करेपर्यंत पुस्तके,नोट्स हातात बाळगणारे ! या स्पर्धेने, अभ्यासक्रमांनी पाठीचा कणा काढून घेतला आहे. लाखो तरुण आपली मौल्यवान वर्षे अशा प्रकारे वाया घालवत आहेत जे आपल्या देशाचे मोठे नुकसान आहे.
मग तेथे हडप्पाच उरणार आणि अभ्यासातील आनंद संपून फ्लेक्सवर झळकण्याची ,AIR(ऑल इंडिया रँक) ची चटक लागल्यावर शिक्षणाचे मोहेंजोदारो होण्याला कितीसा वेळ ! शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी, शिक्षक मागे पडले आणि क्लासवाले सगळ्या श्रेयांचे धनीपण मिरवू लागले.
अवघ्या ३०-४० वर्षांमध्ये शिक्षण क्षेत्राला ग्रासणारे हे महाकाय बदल झाले.
महाराष्ट्राने एका रात्रीतून असंख्य अभियांत्रिकी महाविद्यालयांना जन्म दिला १९८३ साली. त्याकाळचा विनोद होता- ” तुला अभियांत्रिकीला प्रवेश हवा- सॉरी ! तुला अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करायचे आहे -हे घे परवानगी पत्र !”
सर्वांनी या वाहत्या गंगेत हात धुवून घेतले आणि गंगा “मैली ” झाली. रायपूरला तर चक्क एका प्रसिद्ध ज्वेलरने अभियांत्रिकी महाविद्यालय काढले होते.
कोटा येथील मोठाले वर्ग,एकाच वर्गातील भलीथोरली विद्यार्थीसंख्या, अभ्यास उरकणे आणि पहिल्या भागातील रिक्षावाला उद्वेगाने म्हणतो तसे- ” कोटा आता बिग बॉसचे घर झालेले आहे.” असे फिलिंग ही वेब सिरीज बघताना येते. माजुर्डे क्लासवाले येथे दिसतात.
धनिकांच्या एका पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील सेक्रेटरीने माझ्या वालचंदच्या शिक्षकांचा अपमान केला होता- त्यांनी तोंडी परीक्षेत मुलाला कमी मार्क्स दिलेत म्हणून ! सरांनीही तेथल्या तेथे मानधनाचा चेक फाडून टाकला होता.
माझाच एक विद्यार्थी एका अभियांत्रिकी महाविद्यालयात विभागप्रमुख झाल्यावर मला वारंवार गेस्ट लेक्चर, स्पर्धेचा परीक्षक म्हणून बोलवायचा.
एकदा म्हणाला – ” विद्यापिठाच्या परीक्षेला परीक्षक म्हणून तुम्हाला बोलवायचे धाडस मला होत नाही, कारण कॉलेज नवे असल्याने आमच्या व्यवस्थापनाची आम्हाला सक्त ताकीद आहे – विद्यार्थ्यांना भरपूर मार्क्स देणारेच परीक्षक बोलवायचे. आणि मी तुम्हाला ओळखतो- तुम्ही असे अजिबात करीत नाहीत.”
कोट्यातच नव्हे तर शोषण करणारे संस्थाचालक महाराष्ट्रालाही हडप्पा /मोहेंजोदारो करण्याच्या मार्गावर आहेत.
याला कारणीभूत कोण? मला वाटते –
ज्याक्षणी द्रोणाचार्यांनी धृतराष्ट्राकडे शिक्षक ही नोकरी स्वीकारली त्या क्षणापासून त्या पदाची अवमानना सुरु झाली आहे. त्यापूर्वी गुरुकुल संस्कृतीत रामाला आणि कृष्णालाही गुरुगृही, आजच्या भाषेतील LIFE SKILLS शिकायला /अध्ययन करायला जावे लागले होते.
म्हणूनच कोटा शहरात ” इस शहरमे हर शक्स परेशान सा क्यूँ हैं ? ” हा प्रश्न पडत नाही.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..