नवीन लेखन...

कोल्हापूरची अंबाबाई

त्रिगुणात्मक ही त्रिपुरसुंदर करवीरपूरवासिनी ।
भज भज मनुजा ही निशीदिनी ॥

श्री महालक्ष्मी देवीच्या नित्य निवासाने पुनित झालेले महाराष्ट्रातील महाक्षेत्र करवीर वा कोल्हापूर या नावाने ओळखले जाते. हे क्षेत्र प्राचीन शक्तिपीठ असून पुराणमताप्रमाणे याला १०८ कल्पे झाली आहेत. अठरा पुराणांपैकी काशीखंड, पद्मपुराण, देवीभागवत, हरिवंशपुराण, स्कंदपुराण आणि मार्कंडेय पुराणात करवीर क्षेत्राचा उल्लेख सापडतो.

ब्रह्मदेवाचा मानसपुत्र कोल्हासुराचा करवीर नामक पुत्र उन्मत्त होऊन साधुसंतांना छळू लागला. त्याने अनेक मंदिरांचा विध्वंस करून देवांशी युद्ध पुकारले, तेव्हा देवांच्या विनंतीनुसार शिवशंकरांनी युद्धात करवीराचा वध केला. वध होण्यापूर्वी करवीराने शिवशंकरांना प्रार्थना केली की, हे क्षेत्र माझ्या नावाने ओळखले जावे. म्हणून या क्षेत्राचे नाव ‘करवीर’ झाले. आपल्या पुत्राचा शिवशंकरांनी वध केल्यामुळे क्रोधित होऊन कोल्हासुराने अत्याचार करण्यास सुरुवात केली आणि पुत्राचा सूड घेण्यासाठी त्याने महालक्ष्मीला युद्ध करण्याचे आव्हान दिले. अर्थात या युद्धात महालक्ष्मीच्या त्रिशुळाने कोल्हासुर धरणीवर कोसळला; परंतु मृत्यू होण्यापूर्वी त्याने देवीची क्षमा मागून वर मागितला की, “हे देवी तू रूप धारण केलेस त्याच रूपाने माझ्याजवळ राहून हे क्षेत्र कोल्हासुर या नावाने प्रसिद्ध व्हावे. “देवीने तथास्तु म्हणून त्याला मुक्ती दिली. कालांतराने कोल्हासुराचा अपभ्रंश होऊन कोल्हापूर हे नाव रूढ झाले. विष्णुपुराणात अशी कथा सांगितली जाते की, भगवान विष्णूंची परीक्षा घेण्यासाठी आलेल्या भृगृऋषीने त्यांच्या छातीवर लत्ताप्रहार केला तरीसुद्धा विष्णू रागावले नसल्याचे पाहून महालक्ष्मीने त्यांचा काही काळापुरता त्याग करून ती करवीर येथे आली. करवीर महात्म्यात लक्ष्मीदेवीने पृथ्वीवर जलप्रलय झाला असता आपल्या करांनी (हातांनी) हा प्रदेश उचलून धरला म्हणून या क्षेत्रास करवीर हे नाव प्राप्त झाले.

या क्षेत्री वाहत असलेली शिवा, भद्रा, कुंभी, सरस्वती व भोगावती नद्यांचा संगम झालेली पंचगंगा नदीला कश्यप ऋषीने मोठ्या प्रयत्नाने हिमालयातून पापनाशार्थ पृथ्वीवर आणली अशी आख्यायिका आहे. इथे आठ दिशांना आठ शिवलिंगे असून पूर्वेस उजळाई देवी, पश्चिमेस सिद्धबटुकेश, दक्षिणेस कात्यायनी देवी आणि उत्तरेस रत्नेश्वर असून क्षेत्र रक्षण करणारी त्र्यंबुली म्हणजेच टेंबलाई देवी होय. हे मंदिर कोल्हापूरच्या पूर्वेस काही अंतरावर आहे. या देवीसंबंधी पुराणकथा सांगितली जाते की, भार्गव ऋषी हे महालक्ष्मीचे भक्त असल्यामुळे त्यांनी आपली कन्या तीर्थात पसरलेल्या सोन्याच्या कमळांचे रक्षण करण्यासाठी पाठविली. कालांतराने पाताळातील राक्षसांनी ती सोन्याची कमळे चोरून ते नदीमध्ये लपले असता आपल्या शक्तिसामर्थ्याने कन्येने त्यांना शोधून वाला पाडले. त्यामुळे लक्ष्मीने प्रसन्न होऊन कन्येचे नावली ठेवून तिला देवीचे रूप दिले.

महालक्ष्मीचे भव्य मंदिर शहराच्या मध्यभागी असून राजवाड्यानजीक आहे. त्याची पूर्व-पश्चिम लांबी २०० फूट असून दक्षिणोत्तर लांबी १५० फूट आहे. उंची ६५ फूट असून शिखर संकेश्वराच्या शंकराचार्यांनी बांधले आहे. असे हे मंदिर त्रिशुळाकृती किंवा पद्माकृती असून ते पश्चिमाभिमुख आहे. मंदिराचे बांधकाम दगडाचे आहे. या बांधकामास चुना वापरलेला नाही. पश्चिमेस महादरवाजा असून त्यावर देवीचा नगारखाना आहे. उत्तर, पूर्व आणि दक्षिण दिशांना छोटे दरवाजे असून उत्तरेकडच्या दरवाजावर एक मोठी घंटा आहे. ती दिवसातून पाच वेळा वाजविण्यात येते. मंदिराचे परिसरात अनेक दगडी खांब असून ते मोजले असता पोटदुखीचा त्रास होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. दरवाजाच्या खांबाला लागून दोन्ही बाजूस नक्षत्रावर जाळीसारख्या खिडक्यांच्या भिंती दिसतात. खिडक्यांच्या ओळीनंतर मोठाले जय व विजय उभे आहेत. इथे मुख्य मंडप असून त्यापुढे मुक्तीमंडप आहे.

मंदिरात प्रवेश करताना प्रथम सिद्धिविनायक गणपतीचा मंडप लागतो. उजव्या हाताला सरस्वतीचे मंदिर व डाव्या हाताला महाकालीचे मंदिर दृष्टीस पडते. पुढे गाभाऱ्यात गेल्यावर महालक्ष्मीचे दर्शन घडते.

महालक्ष्मीची तथा अंबाबाईची मूर्ती काळ्या पाषाणाची असून उंची पावणेचार फूट आहे. ती तीन फूट चबुतऱ्यावर उभी असून चौभुजा आहे. तिच्या वरच्या डाव्या हातात ढाल आणि उजव्या हातात गदा आहे. खाली असलेल्या उजव्या हातात महाकुंग असून डाव्या हातात पानपत्र आहे. मस्तकी मुकुट असून त्यावर शेषशायी नागाने छाया धरली आहे. मागे सिंह उभा असून ही मूर्ती लक्ष्मी, अंबाबाई आणि करवीरनिवासिनी या नावाने ओळखली जाते. मूर्ती सुंदर असून मनमोहक आहे. अलंकारांनी आणि उंची वस्त्रांनी सजवलेल्या मूर्तीचे दर्शन घेताक्षणीच आपण तिच्या मोहात पडतो. विशेष म्हणजे दिशासाधनांचा उपयोग करून मंदिराची निर्मिती केली आहे. दिशा साधन म्हणजे २१ मार्च व २१ सप्टेंबर या दिवशी संध्याकाळी सूर्याची सोनेरी पिवळी किरणे अंबाबाईच्या मुखमंडलावर पडल्यामुळे बाजूची प्रभावळ तेजाने उजळून निघते. हा सोहळा पाहाण्यासाठी हजारो भाविक उपस्थित असतात. महालक्ष्मीचे मंदिरातून बाहेर पडल्यानंतर शेजारी महाकालीचे मंदिर असून काळ्या पाषाणावर कोरलेले श्रीचक्र आहे. श्रीचक्र हे लक्ष्मीकारक असून त्रिपुरासुंदरी ही त्याची अधिष्ठात्री देवता आहे. आद्य शंकराचार्यांनी श्रीचक्राची तथा श्रीयंत्राची निर्मिती केली होती.

या मंदिराच्या परिसरात अनेक लहानमोठी मंदिरे आहेत. त्यात राम, केदारलिंग, कुंडलेश्वर, अगस्ती, लोपामुद्रा, सिद्धेश्वर, विठोबा, हरिहरेश्वर, गणेश, तुळजा, महासरस्वती, महाकाली, खंडोबा, राधाकृष्ण, बलेश्वर, गोकर्णेश्वर, विष्णू लक्ष्मीनारायण, नृसिंह, दशावतार, शिवपंचायतन, नवग्रह वगैरेंचा समावेश होतो.

करवीर क्षेत्राच्या आसपास कपिलमूनींचे कपिलतीर्थ परशुरामाचे सोमेश्वर तीर्थ आणि व्यासमुनींचे विशाल तीर्थ आहे. उत्तरेस रत्नागिरी शिखरावर ज्योतिबा, पन्हाळा येथे पराशरची गुहा आणि पांडवदऱ्यात देवीची मंदिरे व लेणी आहेत. पूर्वेस एकवीरेचे स्थान असून तिथे श्री गुरुदेव दत्ताचे मंदिर आहे.

महालक्ष्मी मंदिरातील कार्यक्रम शिस्तबद्ध असतो. पहाटे साडेचार वाजता घंटानाद झाल्यावर गाभाऱ्याचा दरवाजा उघडला जातो. निर्माल्य विसर्जन केल्यानंतर देवीच्या चरणावर दुग्धाभिषेक केला जातो. पंचोपचार पूजा झाल्यानंतर देवीला नैवेद्य दाखवून काकड आरती व कर्पूररती केली जाते.

आठ वाजता पुन्हा घंटा घणघणते. प्रथम पंचामृत स्नान नंतर महापूजा, अभिषेक, आरती व शंखतीर्थाने कार्यक्रम संपतो.

साडेअकरा वाजता घंटा वाजल्याक्षणीच सकाळच्या पूजेप्रमाणे सर्व कार्यक्रम झाल्यानंतर पुरणावरणाचा महानैवेद्य देवीला दाखवला जातो. दुपारी दीड वाजता घंटा वाजते आणि देवीची अलंकार पूजा केल्यानंतर तिला स्नान घालून सुवर्णालंकारांनी सजविण्यात येते.

रात्री आठ वाजता मंत्रपुष्पांजली म्हटल्यानंतर देवीला फराळाचा नैवेद्य दाखविला जातो. रात्री दहा वाजता शेजारतीची घंटा वाजते. या वेळी आरती व देवीचा जयजयकार केल्यानंतर देवीची सालंकृत पूजा उतरण्यात येते. शेजघरात पाण्याने भरलेला तांब्या नागवेली पानाचे दोन विडे आणि उदबत्ती ठेवली जाते. नंतर मंदिराचा दरवाजा बंद करतात.

ही झाली नित्यपूजा. याशिवाय दर शुक्रवारी तसेच आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष व माघ महिन्यातील पौर्णिमेस व चैत्र वद्य प्रतिपदेस महालक्ष्मीची पालखी निघते. या वेळी शिखरावर दीपज्योती प्रज्वलित करण्यात येतात. गरूड मंडपातील चबुतऱ्यावर पालखी ठेवल्यावर तोफेची सलामी देण्यात येते.

 

आश्विन मासातील नवरात्रोत्सव मोठ्या थाटामाटाने साजरा केला जातो. आश्विन शुद्ध पंचमीला त्र्यंबुली तथा टेबलाई देवीची यात्रा भरते. या वेळी महालक्ष्मी पालखीत बसून मिरवणुकीने टेबलाई देवीला भेटावयास निघते. अष्टमीलाही लक्ष्मीची समारंभपुर्वक मिरवणूक काढली जाते. दसऱ्याचे दिवशी देवीची पालखी सीमोलंघनाला जाते तिथे कोहळ्याचा भेद केला जातो. नंतर ती दसरा चौकात गेल्यावर तिथे सोने लुटण्याचा कार्यक्रम होतो, करवीरवासीयांचे नवरात्रीचे दिवस अत्यानंदाचे असतात. या दिवसात सप्तशती व श्रीसुक्त पाठाचे वाचन करतात.

सोळाव्या शतकात यवनांची थाड महाराष्ट्रावर आली असता संरक्षणाच्या निमित्ताने भक्तांनी महालक्ष्मीची मूर्ती कपिलतीर्थाच्या जवळ असलेल्या सरोवरात लपवून ठेवली होती. कालांतराने यवनांचे भय कमी झाल्यानंतर कोल्हापूरच्या संभाजी राजांनी सिदोजी हिंदूराव घोरपडे यांना कपिलतीर्थ क्षेत्राकडे पाठवले असता त्यांनी सरोवरातील मूर्ती काढून इ. सन १७९५ मध्ये विजयादशमीचे मुहूर्तावर पुनश्च तिची प्रतिष्ठापना आज उपलब्ध असलेल्या मंदिरात केली.

काही कारणास्तव उत्तर प्रदेशातील काशीक्षेत्री भक्तांना जाता आले नाही तरी ते कोल्हापूरला जाऊन महालक्ष्मीचे दर्शन घेतात कारण या क्षेत्रास ‘दक्षिण काशी’ असे संबोधिले जाते. महालक्ष्मी ही अनेक घराण्यांची कुलदेवता असून ती ‘अंबामाता’ या नावाने ओळखली जाते. ही भुक्तीमुक्तीप्रदायिनी असून सुखसमृद्धीची अधिष्ठात्री आहे. हिची अनन्यसेवा केली असता ती भक्तांचे मनोरथ पूर्ण करते, असा अनुभव हजारो लोकांना आला आहे. प्राचीन काळापासून युगपुरुषांनी आणि साधुसंतांनी महालक्ष्मीची उपासना केली होती. स्वराज्यसंस्थापक शिवाजी महाराजांनीही कोल्हापूरी येऊन मातेचे दर्शन घेतले होते. महाराष्ट्रातील साडेतीन पीठांपैकी कोल्हापूरची महालक्ष्मी हे पूर्ण पीठ मानले जाते.

विद्यावन्तं यशवन्तं लक्ष्मीवन्तं जनं कुरु ।
रुपं देही, जय देही, यशो देही द्विषो जही ॥

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..