नवीन लेखन...

कोकणचा मेवा – भाग १

उन्हाळा लागला की समुद्र किनाऱ्याची मजा लुटण्यासाठी पर्यटकांची पाऊले कोकणाकडे वळतात. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, गणपतीपुळे, मुरुड, केळशी, भाट्ये समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. निसर्गाचा मनमुराद आनंद लुटल्यावर परतीचा प्रवास गोड करण्यासाठी आणि या आनंददायी सफरीच्या आठवणी घरापर्यंत पोहचविण्यासाठी सोबत असतो तो कोकणचा मेवा…आंबा, काजू, फणस, करवंद, जांभुळ, कोकम, जाम, तोरणे, आळू, आवळे… कोकणात सर्वत्र आढळणाऱ्या या मेव्याची गोडी निराळीच असते.

रत्नागिरी जिल्ह्यात विस्तारलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगांमधून दाट वनराई आढळते. डोंगर उतारावरच्या जमिनीमध्ये अनेक प्रकारची फळझाडे चांगल्या प्रकारे उभी राहतात. भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेतांना कोकणी माणसाने फळबागा उभ्या केल्यात. सोबत डोंगर उतारावर मोठ्याप्रमाणात निसर्गत: येणाऱ्या करवंद आणि जांभूळाच्या झाडांमुळे विपूल प्रमाणात फळे उन्हाळ्यात बाजारात येतात.

उन्हाळा सुरू झाला की रस्त्याच्या कडेला असलेल्या काजूच्या झाडातून चमकणारी पिवळीशार किंवा लालभडक रंगाची काजूबोंड लक्ष वेधतात. त्याच्या खालच्या बाजूस काजू बी असल्याने आकारही आकर्षक असतो. बाजारात ओले काजूगर १०० ते १५० रुपये शेकड्याप्रमाणे मिळतात. त्याची उसळ चविष्ट असते. लांजा-राजापूर परिसरातील विक्रीकेंद्रात ताजे काजू मिळतात. काही ठिकाणी काजूबोंडापासून बनविलेल्या सरबताची चवही चाखता येते. मार्च महिन्यात इतरत्र अभावानेच आढळणारी पांढरट पिवळी टपोरी तोरणीची फळे बाजारात येतात. अलिकडे या फळांचे प्रमाण कमी झाले आहे. आंबट-गोड चवीची ही फळे इथल्या विविधतेची ओळख करून देतात. रस्त्याच्या कडेला बसलेल्या माम्यांकडे मिळणारी बोरआवळेही कोकणात विशेषत्वाने आढळतात. हिवाळ्यात येणारी लालचुटुक कणेरी आणि हिरवी आंबट-गोड अळूची फळेदेखील बाजारात मिळतात.

उन्हाळा वाढत असतांना काजूसोबतच उभ्या असलेल्या आंब्याच्या झाडाला लगडलेल्या कैऱ्या दिसू लागतात. हापूसला चांगली किंमत येत असल्याने बागेची राखण करण्यासाठी गड्यांची हालचाल सुरू झालेली दिसते. आंब्याच्या पॅकींगसाठी लाकडी पेट्या बनविण्याचा व्यवसाय सुरू होतो. वखारीत तरुणांना दिवसाला १५० ते २०० रुपये रोजगारही मिळतो. एका पेटीची किंमत साधारणत: १०० ते १३० रुपये असते. बाजारात आकर्षक स्वरुपातील रंगीत खोकेदेखील मिळतात.

भातशेतीनंतर उरलेला पेंढा शेतकरी उडवी (ढीग) करून जपून ठेवतात. या पेंढ्याला आंबा पॅकींगसाठी मागणी असते. एका लहान पेंढीची किरकोळ किंमत ५ रुपयापर्यंत असते. स्थानिक बाजारापासून सातासमुद्रापारही हा हापूस जातो. मुंबई-गोवा महामार्गावरही अनेक ठिकाणी शेतकरी आंबा विक्रीसाठी बसलेले असतात. रत्नागिरीकडून मुंबई-पुण्याकडे जाणाऱ्या प्रत्येक खाजगी वाहनात किंवा एसटीमध्ये हापूसची पेटी या दिवसात दिसतेच. सिझनमध्ये ५०० रुपये डझनापासून सुरू होणारी आंब्याची किंमत पावसाळा सुरु होताना १५० रुपयापर्यंत येते.

आंब्याबरोबरच काळसर लाल रंगाचे कोकमही लक्ष वेधून घेतात. ताजे कोकमही बाजारात मिळतात. कोकमच्या सारची चवही पर्यटकांना या दिवसात घेता येते. मात्र सोबत पॅकींगमध्ये उपलब्ध असलेले गोड-आंबट कोकम किंवा कोकम सरबतालाच पसंती जास्त असते. नारळ आणि कोकमापासून बनविलेल्या सोलकढीची लज्जतही काही निराळीच असते.

— डॉ.किरण मोघे, जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी

(‘महान्यूज’ च्या सौजन्याने)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..