नवीन लेखन...

खारीचा वाटा

“शाळकरी जिवलग मित्र .. “”रमेश आणि सुरेश”” .. नावाप्रमाणेच “मेले मे बिछडे हुए भाई “ वाटावेत …. इतकी घट्ट मैत्री. रमेशचे वडील मोठ्या हुद्यावर नोकरीत .. बलाढ्य पगार .. भलं मोठं घर .. गाडी .. वगैरे वगैरे .. एकूणच श्रीमंती थाट ..

सुरेशच्या वडिलांची छोटीशी बेकरी .. जेमतेम उत्पन्न .. कसंबसं भागायचं .. दोघांमध्ये ही परिस्थितीची खोल दरी असली तरीही त्यावर एक मजबूत पूल होता .. त्यांच्या मैत्रीचा !! त्यामुळे त्यांच्यासाठी ही दरी कधी नव्हतीच .. सुदैवाने दोघांच्या घरच्यांनीही ती कधी दाखवून दिली नाही .. दोन्हीकडचे पालक सुजाण …समजूतदार .. आणि तितकेच मनमोकळे .. रमेश घरी आल्यावर सुरेशच्या आईवडीलांना त्याच्या श्रीमंतीचं कधी दडपण आलं नाही आणि सुरेश घरी आल्यावर रमेशच्या आई वडिलांनी कधी नाकं मुरडली नाहीत .. अभ्यास असो, खेळ असो किंवा नुसत्या गप्पा .. दोघांची जोडी कायम असायची .. मजा, मस्करी ,टवाळक्यापासून ते अगदी आपापल्या आवडी निवडी , भविष्यातले प्लॅन्स अशा गंभीर विषयांबद्दल सुद्धा दोघांच्या अनेकदा चर्चा व्हायच्या.. अगदी जीवाभावाचे असले तरी काही बाबतीत मात्र मतं वेगवेगळी होती .

सुरेशला त्यांची बेकरी पुढे चालवण्यात काहीही रस नव्हता .. भविष्यात खूप शिकून एखाद्या चांगल्या कंपनीत नोकरी करायची आणि स्थैर्य असलेलं असं एक सामान्य आयुष्य जगायचं .. हे त्याचं ध्येय्य …… तर रमेशला मात्र नोकरीच्या वगैरे फंदात न पडता स्वतःचा व्यवसाय करायची , काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती .. विशेष करून रेस्टॉरंट सुरू करायचं किंवा मग फूड इंडस्ट्रीशी संबंधित काहीतरी करावं असं मनात होतं त्याच्या .. त्याला घरी नवीन नवीन रेसिपी करायला खूप आवडायच्या .. त्याची हीच आवड बरेचदा त्याला सुरेशच्या बेकरीत घेऊन यायची .. तिथे रमायचा तो.. सुरेशनी सुद्धा रमेशला कायम प्रोत्साहनच दिलं .. त्याला स्वतःला आवड नसली तरी मित्राला तो बेकरीतले सगळे बारकावे सांगायचा .. सुरेशला बेकरीचा वारसा पुढे न्यायचा नसला तरी गरीब परिस्थिती आणि सुरुवातीपासून परिवाराच्या चरितार्थासाठी उत्पन्नाचा तोच एकमेव स्त्रोत असल्यामुळे ; लहानपणापासून तो त्यांच्या बेकरीत पडेल ती मदत करायचा .. अगदी आई-बाबांच्या बरोबरीने .. .. बालपणी सुरेश “मातीत कमी” आणि “मैद्यात जास्त” खेळला होता .. वेळप्रसंगी गल्ल्यावर बसण्यापासून जवळपासची पावाची ऑर्डर सायकलवरून पोहोचवण्यापर्यंत ते अगदी अनेक पदार्थ स्वतः तयार करण्यापर्यंत कुठलही काम करायचा .. त्याच्या हातची काही ठराविक बिस्किटं तर त्याचं खास वैशिष्ट्य …खूपच चविष्ट …. डोळे मिटून सुद्धा करेल इतका हात बसला होता .. मित्र, शाळेतले शिक्षक आणि दुकानात येणारी अनेक माणसं आवर्जून मागून न्यायचे .. पण इतकं असूनही अभ्यास मात्र तो अगदी जिद्दीने करायचा ..

दिवासमागून दिवस सरले .. दोघांची बारावीची परीक्षा पर पडली .. त्याच सुमारास रमेशच्या बाबांची दुसऱ्या शहरात बदली झाली आणि लवकरच ते सगळं सोडून नवीन ठिकाणी रहायला गेले .. मित्रांचे मार्ग आता वेगवेगळे झाले .. तसे ३-४ महिन्यांनी मेसेज , फोनवरून संपर्कात होते एकमेकांच्या .. पण ख्याली-खुशाली समजण्यापर्यंतच .. बाकी आपापल्या विश्वात आणि व्यापात सगळेच !!……. सुरेश अगदी ठरल्याप्रमाणे उच्च शिक्षण घेऊन एका कॉर्पोरेट कंपनीत लागला .. मुलगा कमावता झाल्यावर आणि पुढे बेकरी चालवणारं आता कुणी नाही हे नक्की समजल्यावर त्याच्या वडिलांनी वेळीच बेकरी बंद केली .. जागा वगैरे विकून निवृत्त झाले.. मधल्या काळात सुरेशनी स्वतःच्या हिमतीवर मोठं घर घेतलं .. दिवस पालटले .. आपल्या परिवरासोबत एक स्थिर आणि नेटकं आयुष्य जगू लागला ..

दुसरीकडे रमेश सुद्धा आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम घेत होता .. मोठ्या कॉलेजात शिकला .. “हॉटेल मॅनेजमेंट” केलं आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा विचार आणि अभ्यास करू लागला .. रेस्टॉरंट चालू करावं की नुसतं कॅटरींग ?.. की कोणाची फ्रँचाईझी की अजून काही ?.. पण या सगळ्या विचारात लहानपणी सर्वांगात भिनलेला बेकरीचा तो विशिष्ट सुगंध त्याला स्वस्थ बसू देत नव्हता .. त्यात सध्याच्या काळात केक आणि इतर बेकरी उत्पादनांना असलेली मागणी लक्षात घेत त्यानी शेवटी बेकरीच सुरू करायचं ठरवलं .. मनानी घेतलं आणि तत्परतेने काम सुरू केलं ..काही दिवसातंच अद्ययावत अशी बेकरी उभी राहिली .. उद्घाटनाला सुरेशला सुद्धा बोलावलं होतं पण तो कामानिमित्त परदेशी असल्याने येऊ शकला नव्हता .. बेकरी व्यवसायातले लहानपणीच समजलेले खाचखळगे आणि रमेशनी रात्रंदिवस केलेल्या अपार मेहनतीमुळे अल्पावधीतच बेकरी चांगली नावारूपाला आली.. तो विशिष्ट “वास” हाच त्याचा “श्वास” झाला होता..

एव्हाना उद्योग क्षेत्रात त्याचा “ब्रॅंड” झाला होता पण तरीही काहीतरी कमी आहे असं सारखं वाटायचं त्याला .. अपूर्णत्वाची खंत !! .. विशेषतः आपल्या बेकरीत तयार होणाऱ्या “खारी” बिस्किटांची चव आणि त्यांचे विविध प्रकार याबाबत रमेश स्वतः समाधानी नव्हता .. त्यासाठी काय करावं हा विचार करत असताना लहानपणी “सुरेशनीच तयार केलेली खारी घेण्यासाठी धडपडणारा ग्राहक वर्ग आणि मिळाल्यावर दिसणारे तृप्त चेहरे” त्याच्या नजरेसमोर झळकले .. दुसऱ्याच दिवशी त्यानी सुरेशला गाडी पाठवून बोलावून घेतलं .. सगळं खारी बिस्किट डिपार्टमेंट सांभाळण्याची विनंती केली .. त्यासाठी त्या प्रमाणात पार्टनरशिप देखील देऊ केली .. पण
सुरेश म्हणाला .. “अरे !! ..नको रे बाबा !! हेच करायचं असतं तर स्वतःची बेकरीच नसती का सांभाळली .. ती विकायची वेळच नसती आली .. मी आपला माझ्या नोकरीत सुखी आहे .. मुळात व्यवसाय करणं माझ्या स्वभावातच नाही रे .. तू तो नक्कीच चांगला करू शकतोस .. आम्ही सगळे बघतोय की तुझी घोडदौड.. हां ss .. पण माझ्या मित्राने काही मागितलं आणि मी देणार नाही असं कसं ?? .. “खारी” और “तेरी यारी” या दोन्ही एकदम जवळच्या गोष्टी आहेत रे माझ्या … खारी करणं काही विसरलो नाही मी अजून ……..मी असं करतो ss , थोडे दिवस सुट्टी काढून येतो आणि तुला सगळं सांगतो … .माझं प्रमाण , माझी पद्धत.. सगळं सगळं समजावतो.. तुझ्या स्टाफला ट्रेन करून त्यांच्याकडून तयार करून घेतो .. एकदा सेट झालं व्यवस्थित की पुढे तू आहेसच सांभाळायला .. खमका उद्योगपती .. शिवाय टेक्नॉलजी मुळे काही गोष्टी सोप्या झाल्यात आता …… आणि त्यातून कधी काही लागलं तर मी आहेच की …” “खारी” है ईमान मेरा”.. “यार मेरी जिंदगी” !!.. हाहा ss

सुरेशचं म्हणणं रमेशनी मान्य केलं .. ठरल्याप्रमाणे काही दिवसातच रमेशची टीम आणि सुरेश कामाला लागले .. एकाची धडाडी आणि दुसऱ्याचं कसब हा योग जुळून आला आणि सगळ्या चाचण्यात ताऊन सुलाखून निघालेली ; “मस्का खारी , जिरं खारी , मसाला खारी , मेथी खारी , चॉकलेट खारी , त्रिकोणी खारी , पिळलेली खारी , गव्हाच्या पिठाची खारी , साखर लावलेली खारी” ..असे भन्नाट चवीचे , एक से एक कुरकुरीत खारींचे प्रकार बाजारात दाखल झाले .. अपेक्षेप्रमाणे ग्राहकांच्या त्यावर उड्या पडू लागल्या …. अधून मधून जेव्हा गरज पडेल तेव्हा सुरेश कन्सल्टन्सी सुद्धा करायचा ..सुरेश कितीही नाही म्हणाला तरीही रमेशनी “मैत्री आणि व्यवहार” या दोन्ही गोष्टी वेगळ्या ठेवत त्याला त्याचा योग्य तो मोबदला दिलाच .. आपल्या बेकरीत काहीतरी कमी असल्याची सुरेशच्या मनातली भावना संपुष्टात आली आणि त्याच्या मनात होता तसा .. त्याच्या स्वप्नातला एक “परिपूर्ण ब्रॅंड” आता ग्राहकांच्या मनावर राज्य करत होता ..

काही वर्ष गेली .. बेकरीच्या “दशक पूर्ती” सोहळ्याचा कार्यक्रम होता .. जवळचे मित्र-नातेवाईक , सगळे कर्मचारी आणि काही पत्रकार सुद्धा आले होते .. औपचारिक कार्यक्रम , कंपनीच्या प्रगतीचे व्हिडियो वगैरे दाखवून झाले आणि त्यानंतर मालक या नात्याने रमेश आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी पुढे आला .. काही वेळ बोलून एका टप्प्यावर थांबत त्यानी समोर बसलेल्या सुरेशला आपल्या बाजूला बोलावलं आणि मग तो पुढे सांगू लागला .. “माझ्या सगळ्या हितचिंतकांनो sss .. आज माझ्या यशात माझ्या या मित्राचा फार मोठा सहभाग आहे .. मी व्यवसाय करण्याला आणि ते ही बेकरीचा .. यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सुरेशचा खूप हातभार आहे .. लहानपणापासूनच मला व्यवसाय करायची आवड होती , पण कधीतरी वाटायचं की .. नको रे बाबा !! त्यात बरेच व्याप आणि अडचणी असतात .. त्यापेक्षा नोकरी बरी .. तेव्हा या सुरेशनेच मला प्रोत्साहन दिलं ,.. त्यावेळेस वय लहान असलं तरी शिक्षण पूर्ण झाल्यावर सुद्धा उद्योग सुरू करायच्या आधी मी एकदा द्विधा मनस्थितीत अडकलो होतो .. तेव्हाही फोनवर मी त्याच्याशी चर्चा केली .. “तुला आवड आहे ना ss .. कर तू बिनधास्त !! असं म्हणत पूर्वीसारखी नव्याने उमेद जागवली सुरेशने . बळ मिळालं .. आपण हे करू शकतो हा विश्वास वाटला आणि अखेर मी स्वतःचा व्यवसाय सुरू केला .. बऱ्याच वाटा शोधत बेकरीवर शिक्कामोर्तब केलं तेही त्याच्या अनुभवांची जी शिदोरी मला फार पूर्वीच त्यानी सुपूर्द केली होती त्याच जोरावर ..माझ्या या उत्कर्षातला पडद्यामागचा कलाकार !!….

“सगळा जम बसूनही माझा ब्रॅंड म्हणावा इतका प्रसिद्ध होत नव्हता .. शेवटी ती पोकळी सुद्धा सुरेशनेच भरून काढली .. मिसिंग लिंक जोडली .. मगाशी प्रेझेंटेशन मध्ये “खारी बिस्किटांची” जी काही व्हारायटी बघितलीत त्याचे सर्वेसर्वा माझा हा मित्र .. त्याचं संपूर्ण श्रेय सुरेशचं .. आणि या ब्रॅंडला बळकटी देण्याचं सुद्धा !!.. कारण या “खारी” ची रेंज आपण आपल्या उत्पादनात वाढवली तेव्हापासून ब्रॅंडनी उसळीच मारली .. ग्राहक “खारी” सोबत आपली इतर उत्पादनं घेऊ लागले आणि सगळीच विक्री वाढली .. मी व्यवसायात उतरण्यात किंवा बेकरी सुरू करण्यात त्याचा अप्रत्यक्ष “सिंहाचा वाटा” असला तरी गेल्या दहा वर्षात या कंपनीची जी भरभराट झाली आहे त्यात मात्र माझ्या मित्राचा “प्रत्यक्षपणे” आणि अगदी “शब्दशः”.. .. “खारीचा वाटा” आहे .. हाहा ss .. !! ….पौराणिक काळापासून चालत आलेला “खारीचा वाटा” हा शब्दप्रयोग सगळ्यांनी पूर्वी अनेकदा ऐकलाय .. पण आमच्या सुरेशचा ; आजच्या आधुनिक युगातला हा “खारीचा वाटा“ नक्कीच वेगळा आणि तितकाच समर्पक आहे ना मंडळी ??

सगळ्या उपस्थितांच्या चेहऱ्यावर एक हसू फुटलं .. आणि आपसूकच टाळ्यांचा गजर सुरू झाला .. दुसऱ्या दिवशी सगळ्या वृत्तपत्रांच्या बातमीत एकंच शीर्षक झळकत होतं ..

“एक आगळा वेगळा .. “खारीचा वाटा“.. “

©️ क्षितिज दाते.

ठाणे.

Avatar
About क्षितिज दाते , ठाणे 77 Articles
केवळ एक हौस म्हणून लिखाण सुरू केलं . वेगवेगळ्या विषयांवर पण साध्या सोप्या भाषेत लेखन . आकाशवाणीवरील कार्यक्रमात काही लेखांचं प्रसारण झालं आहे .काही लेख/कथा पॉडकास्ट स्वरूपात देखील प्रसारित झाल्या आहेत . Snovel या वेबसाईट / App वर "सहज सुचलं म्हणून" या शीर्षकाखाली तुम्ही ते पॉडकास्ट ऐकू शकता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..