नवीन लेखन...

खल्वायन रत्नागिरी

खल्वायन रत्नागिरी, सादर करीत आहे …

असे शब्द कानावर पडले की सुरू होते एखादी सुरेल मैफल , एखादं संगीत नाटक , एखादं गद्य नाटक , एखादी संगीत स्पर्धा किंवा एखादं प्रशिक्षण शिबीर …

आणि सगळ्याच वयोगटातील रसिक आतुरतेनं समोरच्या रंगमंचाकडे पाहू लागतात .
हे आजचं नाही .

गेली २२ वर्षे अव्याहतपणे , अविरत सुरू आहे संगीताचा अवीट प्रवाह .

दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी मैफल रंगत असते .

गुढीपाडव्याला , दिवाळी पाडव्याला विशेष मैफल , सांगितिक विश्वाला समृद्ध करीत असते .
रसिकांचं मनोरंजन करायला रंगभूमीवर जुनीनवी संगीत नाटके सादर केली जातात .
उदयोन्मुख कलाकारांसाठी जाणीवपूर्वक परिश्रम घेतले जात असतात .
शासकीय असो वा अन्य कुठल्याही संस्थेचा संगीत विषयक कार्यक्रम असो नांदीसाठी साद घातली जाते ती याच संस्थेला

बावीस वर्षापूर्वी विजयादशमीच्या सुमुहूर्तावर संस्थेची स्थापना झाली आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक नकाशावर रत्नागिरीचे नाव अधोरेखित झाले .

जिद्द , परिश्रम , चिकाटी , अंगभूत कलागुणांना जोपासण्याची वृत्ती , नटेश्वरावर अपरंपार श्रद्धा , निस्वार्थी वृत्ती , व्यावसायिक स्वरूपाचे सादरीकरण करण्यासाठी शारीरिक , आर्थिक भार सोसण्याची मानसिकता , मुंबई पुण्यावर अवलंबून न राहता सर्व काही कोकणातून उभं करण्याची धडपड , आपल्या कलाकारांचं , लेखकांचं आपुलकीनं कोडकौतुक करून स्नेहबंध जोपासण्याची आगळी सवय ,आपल्या संस्थेप्रमाणे इतर संस्थांतील प्रतिभावंत कलाकारांचे सन्मान करण्याची गुणग्राहकता ,आपल्या लेखकाच्या पुस्तकांचे प्रकाशन समारंभ ….

हे सगळं गेल्या बावीस वर्षातील संचित !
आज सगळं आठवलं .

आणि अभिमान वाटला या संस्थेचा मी लेखक असल्याचा .

अगदी अनपेक्षितपणे या संस्थेचा मी लेखक झालो .
संगीत स्वरयात्री , संगीत घन अमृताचा , संगीत शांतिब्रह्म , संगीत राधामानस , संगीत ऐश्वर्यावती , ही संगीत नाटके आणि चिन्नूचं घर हे गद्य नाटक , अशी अनेक नाटकं याच संस्थेनं रंगमंचावर आणली . महाराष्ट्र शासनाच्या संगीत नाट्य स्पर्धेत अभूतपूर्व यश मिळालं . आकाशवाणी च्या सर्व केंद्रावरून नाटकं प्रक्षेपित झाली . महाराष्ट्र ,दिल्ली, मध्यप्रदेश , कर्नाटक , गोवा , अशा अनेक राज्यात त्या नाटकांचे प्रयोग झाले . मानसन्मान , पुरस्कार जसे मला लाभले तसे या संस्थेने केलेल्या नाटकांमुळे, अनेक गायक कलाकारांना , संगीत दिग्दर्शकांना , दिग्दर्शकांना , नेपथ्यकाराना , पारितोषिकं , मानसन्मान लाभले . दिग्दर्शनातील , संगीतातील नावीन्यपूर्ण रचनांना मान्यवरांच्या पसंतीची दाद मिळाली . या संस्थेमुळे अनेक प्रतिभावंत,मान्यवर झाले . त्यांना स्वतःच्या करिअरची वाट उपलब्ध झाली .आपल्या अंगभूत गुणांची जाणीव झाली .

या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या माझ्या तीन संगीत नाटकांच्या त्रिदल या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्ममय निर्मितीचा कुसुमाग्रज पुरस्कार मिळाला .

एखादी संस्था नावारूपाला येत असते ती, त्यात निरलसपणे कार्य करणाऱ्या , स्वतःला झोकून देणाऱ्या आणि काहीतरी विधायक घडवायचं आहे या भावनेने अखंड धडपडणाऱ्या निःस्वार्थी कार्यकर्त्यांमुळे .
त्यामुळेच आज या संस्थेला कार्यक्रमासाठी रसिक येतील का याची वाट बघावी लागत नाही .
एकेकाळी पदरमोड करून कार्यक्रम करणाऱ्या या संस्थेच्या कार्यकर्त्यांना आता आर्थिक गोष्टीसाठी थांबून राहावे लागत नाही , कारण रसिक तत्परतेने पुढे येऊन गरज भागवत असतात . हे रसिकत्वाचे अहेव लेणे , हे रेशीमबंध , हे संस्थेचे सांस्कृतिक , सांगितिक संचित म्हणायला हवे .

सर्व प्रतिभावान कलाकारांसाठी प्रेरणादायी असणाऱ्या या संस्थेला वर्धिष्णू स्वरूप लाभावे , बावीस वर्षांपूर्वी लावलेल्या बीजाचा वटवृक्ष झाला आहे , तो विशाल व्हावा आणि आसमंत संगीताच्या इंद्रधनुषी रंगाने व्यापून जावा यासाठी , संस्थेचे आद्यदैवत असणाऱ्या श्री नटेश्वर चरणी विनम्र प्रार्थना !!!

— डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी.

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 109 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..