नवीन लेखन...

खादाड संगीतप्रेमींसाठी

माझ्यासारख्या खादाड संगीतप्रेमींसाठी अज्ञाताकडून दिवाळी भेट…..मला आणि अज्ञाताला उचक्या लागणारच आहेत…पण तुम्ही खाद्यपंगतीचा आकंठ आस्वाद घ्यावा ..

“रुके क्यू बेटा; गाओ सदाशिव गाओ, और गाओ” असे म्हणणारे खाँ साहेब असतील तर सदाशिव आणखीन झकास गातो… दिवाळीच्या फराळाचं असंच आहे. “रुके क्यू बेटा; खाओ और खाओ” असा आग्रह करणारे कोणी ‘खा’ साहेब असतील तर आणखीन एक बेसन लाडू तोंडात सरकवायला जास्त मजा येते!

फराळाचे पदार्थ करणे हे याग किंवा यज्ञकर्म असेल तर तो असा साग्रसंगीत खावा कि जणू संगीताची मैफलच आहे.

तुमचे बर्गर वगैरे टेबलावर बसून खावे, पण फराळासाठी झकास बिछायत असावी. लोड तक्के असावेत. अत्तराचा कानात बोळा आणि डाव्या पालथ्या हातावर ते फासलेलं असावं.

शक्यतो सुरवार-कुर्ता आणि स्त्री वर्ग साडीत असेल तर पदार्थांची चव दुपटीने वाढते.

पहिल्या षड्जासाठी कान आतुरलेले असतात तसा पहिल्या घासासाठी घसा आतुर असावा. मैफलीच्या आधी जसे तंबोरे, तबला सुरात लावताना बाहेर गोड आवाज येतो तसा आत डबे उघडल्याचा, चहाच्या कपाचा किणकिणाट बाहेर यायला हवा. मांडीवर शाल ओढून जसे गवई दोन तंबोऱ्यात बसतात तसे रेशमी रुमालाने झाकलेले फराळाचे ताट दिमाखात खाद्यमंचावर यायला हवे; आणि जशी पहिल्या ‘सा’ ला ओठातून ‘क्या बात है!’ अशी दाद येते तशीच लाडवाच्या पहिल्या तुकड्याला किंवा चकलीच्या पहिल्या तुकड्याला पोटातून ओठात आणि ओठातून जिभेवर दाद यायला हवी!

काही राग काफी थाटाचे असतात तसे इथे देखील कॉफीथाट असेल तर मजा कुछ औरच! अर्थात पदार्थाची बैठकही जमलेली असावी.

काही स्वर आरोहात वर्ज्य असतात तसे पदार्थाचे बाह्य रूप असावे. म्हणजे चकली थोडी अबोली रंगाकडेच झुकलेली हवी. ती चवीला कितीही चांगली असली तरी काळपट दिसली की उगीच सम चुकते.

बेसन लाडू बाळसेदार आणि पठाणी जपानी अशा मिक्स ब्रीड रंगाचाच हवा. अवरोह म्हणजे चव आणि जिभेवरील त्याचे विरघळणे.

भीमपलासी रागात अवरोहात धैवताला पंचम आणि रिषभला षड्जाचा कण जरा चिकटला कि जशी खुमारी वाढते तसेच चिवड्यात दाणे, काजू याचं अस्तित्व हवं. नाहीतर मूळ रागच बेसूर होऊन जातो.
🍽

यमनात गंधार आणि निषाद हे वादी-संवादी आहेत तसे लाडवात बेसन, रवा ही मंडळी वादी आणि साखर संवादी आहे. त्यामुळे यांचे प्रमाण अचूक हवे. गवयाच्या गळ्यासारखा रवा, बेसन व्यवस्थित तापलेला म्हणजे भाजलेला हवा.

चकली ही अनेक रागांचे मिश्रण असलेली पण शृंगारप्रधान ठुमरी आहे. तिला एक ठसका आहे, लय आहे. चकली त्याच ठसक्यात असायला हवी. उगीच बेचव करून ठुमरीचं भावगीत करू नये.

शंकरपाळे वगैरे मंडळी हे मूळ गायक नव्हेत. मुख्य गायकाला श्वास घेण्यासाठी किंवा विश्रांती साठी त्यांच्या बरोबर ते ओढे म्हणजे कट्यार मधले चांद आणि उस्मान आहेत तसे असतात.

करंजी, अनारसे या बाबत मी फार भाष्य करणार नाही.

शेवटी सर्व स्वर कोमल असलेली भैरवी म्हणजे चहा, कॉफी, मसाला दूध ही मंडळी.

मैफिलीत सुरांनी सचैल स्नान घडावं आणि खाद्य मैफिलीत उत्तम चवीचं सचैल स्नान घडावं.

— प्रकाश तांबे 

Avatar
About प्रकाश तांबे 45 Articles
मी प्रकाश तांबे, पुणे. गेले तीन-चार वर्षे मी वर्तमानपत्रे व सोशल मीडीयावर सातत्याने लिहित असतो. जाणकार वाचकांच्या प्रतिक्रीयेने मला नेहमीच स्फूर्ती मिळत असते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..