नवीन लेखन...

केस भादरणे ते हेअर कटींग

पूर्वी, अमुक अमुक यांचं केशकर्तनालंय अशा नावांच्या पाट्या असायच्या. आता तेच झकपक होऊन, त्याचं ‘Salon’ असं नामकरण झालं. आत शिरताच वातानुकुलीत वातावरण, आरामदायी खुर्च्या, आपल्या मागे पुढे चकचकित, चेहरा स्पष्ट दिसणारे भले मोठे आरसे, सुंदर सजावट, वाद्यसंगीताची वाजणारी धून, टेलिव्हिजन, आपल्याला गळ्यापासून अंगावर पांघरले जाणारे सुळसुळीत एप्रन, स्वतःचीही केशभूषा केलेले केशकर्तनकार आणि त्यांची आपल्या केसांवरून अलगद फिरणारी आयुधं आणि कसबी हात. केस कापून झाल्यावर डुलकी लागणारा मसाज (फक्त मान मोडणं सोडून) आणि या सगळ्या आनंद मिळणाऱ्या सेवेनंतर त्यांच्या मुखातून येणारा बिलाचा मोठ्ठा आकडा.
तर, हे सगळं सगळं काहीही नव्हतं तेव्हाचा काळ म्हणतोय मी. त्या कर्तनालयात कडक लाकडाच्या कंबर दुखून येणाऱ्या खुर्च्या, पारा उडालेले आरसे, कित्येक दिवसांत पाणी दाखवलेलंच नाही अशी जबरदस्त शंका येणारे, गळ्याला करकंचून आवळले जाणारे आणि त्याच्या कुबट वासामुळे श्वास घुसमटणारे एप्रन आणि मख्ख चेहेऱ्याने भादरायला (डोकं) सज्ज असलेले नाभिक. केस कापताना बोचणारी, टोचणारी आयुधं असा सगळा सरंजाम असायचा. अनेकदा नाभिक घरी येऊनच केशकर्तन दाढी करायचे. घरातल्या मुलांसाठी तर त्यांना दर एक दीड महिन्यानंतर येण्याची standing instructionच दिलेली असायची. या बहुतेक नाभिकांचा पेहरावही सारखाच असायचा. काळी टोपी, अंगात बुशशर्ट आणि धोतर किंवा लेहंगा. हातात पत्र्याची वरून उघडणारी पेटी. आमच्याकडेही सीताराम नावाचा नाभिक यायचा. मुलांनी केस वाढवून फॅशन वगैरे करणं हे त्या काळात मान्यच नव्हतं. त्यामुळे मुलांचे सोललेल्या नाराळासारखे केस भादरले जायचे. सीताराम आला की मला रडायलाच यायचं. म्हणजे भितीमुळे वगैरे नाही तर त्याच्या केस कापण्याच्या पद्धतीमुळे. तो उकिडवा बसून आपल्या दोन्ही मांड्यात आमची मुंडी पकडायचा, आणि मानेला अगदी रग लागेपर्यंत केस कापत रहायचा. त्याच्या मनाप्रमाणे डोकं भादरून झालं की मुंडी सोडायचा. अक्षरशः जोखडातून मुक्त झाल्यासारखं वाटायचं. डोक्यावर हात फिरवला की शेतात बारीक तण उगवतं तसे केस हाताला लागायचे. मानेच्या वर सगळं खरखरीत लागयचं. त्याच्या पेटीत एक कटकटकटकट आवाज येणारं हत्यार असायचं. सुताराकडे नाही का रंधा मारायचं असतं ज्याने तो लाकूड तासतो तेच केसांबाबतीत करायचं हे हत्यार.
“मशीन मारू का “
असं विचारायचा घरच्यांना.
“हो हो! मार मार “
त्याला काही करायची पूर्ण मोकळीक होती. ते केसातून मानेवरून चालायला लागलं की शेतात उगवलेलं नको असलेलं तण साफ होतय असा feel यायचा. त्यानंतर एका काळ्या तळव्याएव्हढ्या चामडी पट्ट्यावर वस्तरा नावाचं सुरीसारखं हत्यार चटकपटक फिरवून त्याने कानामागून आणि डोक्याच्या चारही बाजुने शिल्लक राहिलेलं बारीक तण साफ करून सगळं गुळगुळीत करायचा. त्याच्याकडे एक जस्ताची वाटी असायची. त्यामध्ये तो फक्त गरम पाणी मागायचा. खाली एक वर्तमानपत्र अंथरलं की सुरु. त्यावेळी डेटॉल, ब्लेड बदलणारे वस्तरे, आयुधं नीर्जंतुक करणे अशा लाडांना पूर्णपणे फाटा दिलेला असायचा. सगळंच निर्मळ स्वच्छ. केस भादरणे आणि दाढी करणे याशिवाय केसांचे कसलेही लाड पुरवले जात नसत.
आज मुलांना salon मध्ये बसवल्यावर तो कर्तनकार त्याच्याशी गोड बोलतो, त्याला खुर्चीवर आणखी एक मऊ गादी ठेवून अलगद उंचावर बसवलं जातं. हळुवारपणे त्याच्या अंगाभोंवती एप्रन लपेटला जातो. त्या मुलाचे मम्मी किंवा पप्पा बाजुला उभे राहून कर्तनकाराला सूचना देत असतात,
“बाजूचे जास्त कापू नका हं” किंवा
“वरचे राहूदे ना बेटा?”
मग बेटा होकारार्थी मान हलवतो. लगेच,
“ओके बेटा ठीक आहे ना?”
किती भाग्यवान आजची पिढी. त्यांना विचारून केस कापले जातात. आमच्या लहानपणी आम्हाला व्हॉइसच नव्हता. काळाचा महिमा, दुसरं काय?
आज केस कापले की अंगावर नॅपकिन पांघरून दाढी करताना मागे डोकं टेकायला छानसं मऊ टेकण, कुणी केसांना डाय करतय तर कुणी चेहऱ्याला फेशियल करून घेतंय. कित्येक चेहऱ्यांकडे पाहून विचार येतो, असा फारसा काय फरक पडणार आहे फेशियल करून यांच्या दिसण्यामध्ये. आणि घरी आल्यावर हा विचार मी हिच्याकडे बोलूनही दाखवतो. त्यावर लगेच ही म्हणते,”तुला ना स्वतःला काही चांगलं करून घ्यायचं नसतं, फक्त दुसऱ्यांवर कमेन्ट करत राहायचं बस्स.”
आता यामध्ये एव्हढं चिडण्यासारखं काय आहे हेच मला कळत नाही.
अहो, माझ्या लेकीच्या लग्नापूर्वी हिने मला फेशियल की क्लीनप… म्हणजे चेहरा गोमंटा करण्याला जे काही म्हणतात ते करून घ्यायला सांगितलं. मी ही आज्ञा प्रमाण मानून लगेच salonकडे कूच केलं. दीड दोन तास खर्चून आणि विविध प्रकारची क्रीम माझ्या चेहऱ्यावर चोपडून माझा खिसा हलका झाल्यावर उत्सुकतेने आरशात पाहिलं, पण माझा चेहरा पहिल्यासारखाच दिसत होता. मी फारच नर्व्हस झालो. माझ्या चेहऱ्यावरचे भाव ओळखून तो salon वाला म्हणाला,
“साब एक बार करके कुछ फर्क नही पडेगा. हर महिने आ जाना. फिर देखो आपका फेस एकदम ग्लो करेगा “
मी मनात म्हटलं ‘ मग हे आधी सांगायला काय झालं होतं साल्या..वेड्या. माझे आजचेही पैसे वाचले असते. आता आमचा चेहरा आणि चेहऱ्याचा रंग तो काय आणि तो ग्लो होऊन होऊन होणार तरी किती? मी त्याच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष न देता झालेले भरमसाठ पैसे त्याच्या हातावर टेकवून घरी आलो झालं. घरी येताच माझ्याकडे पाहून ही म्हणाली,
“काय रे आलास करून की अजून गेलाच नाहीयस salon मध्ये…” म्हणजे सहज चौकशी अधिक टोमणा हे एकदम झालं. असो,
आता डोक्यावर फार केस उरलेलेही नाहीत. आपल्या आयुष्यातून कायमच्या निघून गेलेल्या आप्त, स्वकीय, सुहृदांसारखा त्यांनीही निरोप घ्यायला सुरवात केलीय.
आजही दोन तीन महिन्यांनी salon मध्ये जाऊन बसतो, तो पाच दहा मिनिटातच थोडेफार असलेले आणि वाढलेले केस कापून देतो. पण अजुनही पैसे मात्र तेव्हढेच घेतो, वाईट याचं वाटतं ?.
प्रासादिक म्हणे,
— प्रसाद कुळकर्णी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..