नवीन लेखन...

कावळे (कथा) – भाग 1

उपनगरातील भर वस्तीत, आजूबाजूला नवीन नवीन भव्य काँक्रिटच्या इमारतींच्या गराड्यात हा आमचा एकमेव बंगला, वासंती व्हिला’. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या डोळ्यात भरल्याशिवाय रहात नाही. एखादं मरायला टेकलेलं जनावर, कधी मरतंय याची वाट पाहत, आजूबाजूच्या परिसरात, कावळे वाट पाहत बसतात तसे ‘बिल्डर’ नावाची आधुनिक कावळे जमात या बंगल्यावर डोळा ठेवून आहे. अर्थात मी चांगला खमक्या आहे आणि जोपर्यंत मला ‘वासंती’ची साथ आहे तो पर्यंत तरी मी या कावळ्यांना अजिबात भीक घालणार नाही, घालतही नाही.

मी एक व्यावसायिक डॉक्टर आहे. आता माझे वय सत्तर आहे. प्रॅक्टिस बंद केली आहे पण प्रकृती अजून ठणठणीत! आवाज वाघासारखा! इथे व्हरांड्यात बसून नुसतं काय रे’ म्हणून आवाज दिला तरा फाटकाजवळचा माणूस टरकतो! आजूबाजूचे लोक मला विक्षिप्त’ म्हाताराच म्हणतात! मी त्यांना बंगल्यातल्या झाडांच्या एका फुलालाही हात लावू देत नाही म्हणून! अहो यांच्या घरच्या देवांना फुले आणि आमच्या झाडांचे खराटे!

‘वासंती व्हिला’ हे माझ्या बायकोच्या म्हणजे वासंतीच्या नावाने ठेवलेले नाव. तिला जाऊन आता चांगली पंधरा वर्षे होऊन गेली! मी या बंगल्यात एकटाच राहतो. लोक म्हणतात, भुतासारखं! आता यात भुतासारखं काय आहे?

नाहीत आमच्या घरात इतर माणसं त्याला काय करायचं? पण मला मात्र मी एकटा आहे असं नाही वाटत. माझी वासंती पण इथेच माझ्या सोबत आहे यात मला काही शंका नाही!

बंगला चांगला ऐसपैस आहे. पोर्तुगीज, गोवानीज वास्तुशास्त्राचा नमुना आहे. एका गोवानीज माणसाकडून मी तो चाळीस वर्षांपूर्वी विकत घेतला होता. त्याची गोष्ट पुढे सांगीनच. बंगल्याची गंमत म्हणजे, याचा तळमजला जमिनीपासून चांगला आठफूट उंचीवर आहे. मोजून सोळा पायऱ्या चढाव्यात तेव्हा मुख्य मजल्यावर येता येते. पायऱ्या पण कशा, अगदी गुळगुळीत, इटालियन मार्बलच्या! बाजूला तसेच घोटीव मार्बलचे कठडे! कठड्याच्या टोकावर सुरुवातीलाच दोन्ही बाजूला भाला घेतलेले दोन चिलखतधारी ग्रीक योद्ध्यांचे सुंदर पुतळे! वर आल्यावर आठ फूट रूंदीचा प्रशस्त व्हरांडा, बंगल्याच्या सभोवार, बंगल्याच्या समोर प्रशस्त बाग. बागेत कारंजे, त्याच्या बाजूने मार्बलचे सुंदर पुतळे, ग्रीक, रोमन पद्धतीचे. फाटकापासून पायऱ्यांपर्यंत सुंदर गोलाकार रस्ता. दोन्ही बाजूला आणि मागे प्रशस्त आवार. जुनी रेनट्रीची झाडे आणि वासंतीने आवडीने लावलेली सोनचाफ्याची आणि बुकळीची झाडे. प्रशस्त शांत, सुंदर परिसर! माझ्यासारख्या एकांतप्रिय माणसाला आणखी काय हवं?

सगळ्या बंगल्याची आणि आवाराची देखभाल मी स्वतः करतो. पूर्वी या परिसरात असेच खूप बंगले होते. वस्ती बहुतांशी ख्रिश्चन. झाडी भरपूर. त-हे त-हेचे पक्षी यायचे. आता काँक्रिटच्या जंगलात फक्त कावळे आणि चिमण्या. लोक घरात स्वत:ला कोंडून घेतात. मोठ्यमोठ्या खिडक्या, बाल्कन्या सुद्धा लोखंडी पिंजरे लावून लोकांनी बंद केल्या आहेत! सगळे पक्षी तर पळालेच पण आजूबाजूचे सगळे कावळे मात्र आमच्या बंगल्याच्या आवारातील झाडांवर मुक्कामाला येऊन बसले! गंमत म्हणजे मला हा पक्षी बिलकुल आवडत नव्हता. पण वासंतीचा तो सर्वात आवडता पक्षी होता! त्याची पण एक गंमत आहे बरं का. पुढे सांगेनच. आता मलाही हा पक्षी आवडायला लागलाय!

मला एकांत आवडतो. रिकामटेकडे लोक चौकशा करतात. ते मला मुळीच खपत नाही. तरीही काही अति चिकट, चौकसखोर असतातच! ते काही तुमचा पिच्छा सोडत नाहीत.

असेच एक सद्गृहस्थ! रोज सकाळी या बंगल्याच्या समोरून जॉगींग पार्कला फिरायला जातात. अर्धी निळी पँट आणि पांढरा टी शर्ट असतो त्यांचा. मी रोज सकाळी व्हरांड्यात बसून पेपर वाचत वाचत चहा घेत बसतो. बरोबर नऊ वाजता मी ब्रेकफास्ट करतो. हे गृहस्थ येताजाता बंगल्यासमोर उभे राहून, बंगला आणि परिसर न्याहाळत असत. कोणाला संशय येऊ नये म्हणून ते समोरच्या बसची वाटत पाहत आहेत असे दाखवायचे. बरेच वेळा मी पाहिले आणि एक दिवस आवाज दिला त्यांना, “अहो तुम्ही, या वर या इकडे!” माझा आवाज ऐकला आणि गृहस्थ जाम टरकला! आपण त्या गावाचेच नाही म्हणून इकडेतिकडे पहायचे नाटक करायला लागला. मी पुन्हा आवाज दिला, “अहो तुम्ही निळी पँटवाले, जरा इकडे या!’ आता मात्र त्यांना नाईलाज झाला. घाबरत घाबरत तो गृहस्थ, सोळा पायऱ्या चढून वर आला. मी विचारले त्यांना, “काय हो, रोज रोज या बंगल्याकडे टक लावून पहात असता, काय विचार काय आहे तुमचा?”

माझा आवाज, भेदक नजर याने तो आधीच गांगरून गेला होता. चांगला साठीचा म्हातारा दिसत होता, पण एखाद्या लहान पोरासारखा त-त-प-प करायला लागला. मला मनातून खूप हसू येत होतं. पण मी ते बाहेर दिसू दिलं नाही. म्हणाले, “अहो असे घाबरताय काय, नीट सांगा.” तेव्हा ते म्हणाले, “अहो हा बंगला मला खूप आवडतो आणि आश्चर्य वाटते की हा अजून कसा काय टिकला?” मी जरा दमात म्हणालो, “मग काय, विचार काय आहे तुमचा? घ्यायचाय का विकत? बांधायचीय काय नवीन टोलेजंग इमारत?” तो गृहस्थ म्हणाला, “पाफ करा हं. माझा तसा काही उद्देश नव्हता. मी आपलं सहज उत्सुकतेपोटी विचारलं.” “अस्स!” मी म्हणालो.

मग मला काय वाटले कोण जाणे, मला तो माणूस पापभिरू आणि निरूपद्रवी वाटला. मग मीच त्याला म्हणालो, “ठीक आहे. हा बंगला अजून कसा टिकला, त्याची एक गोष्ट आहे. पण आता मला वेळ नाही. तुम्ही उद्या ठीक साडेसात वाजता आलात तर मी सांगेन ती गोष्ट. याल का?”

आता गोष्ट आणि ती ही दुसऱ्याची, शिवाय फुकटात ऐकायला मिळतेय म्हटल्यावर कोण नाही म्हणणार हो? ते गृहस्थ तर एका पायावर तयार झाले. त्यांना कधी स्वप्नातही वाटलं नसणार की हा खडूस म्हातारा असे काही करेल म्हणून. त्यांच्या हालचालींवरून मी ताडले होतेच मी माझी ‘कीर्ती’ यांच्या कानावर गेली असणार. कारण या परिसरात ‘वासंती व्हीला’ ला ‘जमदग्नी आश्रम’ असं टोपण नाव आसपासच्या लोकांनी दिलं आहे हे मला माहीत आहे! तर मी त्या गृहस्थांचीच वाट पाहत आहे.

मी पहाटे पाच वाजता उठतो. प्रातर्विधी आटोपून सहा वाजता या व्हरांड्यात माझा मुक्काम असतो तो नऊ वाजेपर्यंत. चहा, पेपर वाचन, ब्रेकफास्ट सावकाश उरकून नऊ नंतरच मी इथून उठतो! आणि इतर कामाला लागतो.

व्हरांड्यात तीन ऐसपैस वेताच्या खुऱ्या आहेत. एक वेताचाच टी-पॉय आहे. मी आणि वासंती बरोबरच ब्रेकफास्ट घ्यायचो. आणखी एक खुर्ची, कोणी आलं गेलं तर त्याच्यासाठी.

माझा ब्रेकफास्ट म्हणजे दोन डबल आम्लेट, पाव, लोणी, आणि किटलीभर चहा! तो ही एकदम नाही घ्यायचा. थोडा थोडा. आता बी.पी.चा थोडा त्रास होतो म्हणून मी उकडलेली अंडी खातो. फक्त त्यातला पिवळ्या बलकाचा गोळा खात नाही.

तर काय, सगळा सरंजाम घेऊन मी आमच्या पाहुण्याची वाट पाहत होतो. साडेसात वाजले आणि त्याचवेळी फाटकातून पाहुणे आत आले. सोळा पायऱ्या चढून वर आले. मी म्हणालो, ‘बसा.’ पाहुणे बसले. डोळ्यात अपार उत्सुकता. गोष्ट ऐकायला अगदी उतावीळ झाले आहेत हे मी ताडले. म्हणालो, “काय घेणार, चहा कॉफी?” तर म्हणाले, “नको, नको मी सगळं उरकूनच आलोय! तुम्हाला कशाला त्रास उगीच?” “अहो त्यात त्रास कसला? ही किटली भरलीय चहानं, घ्या तुमच्या हातानं. तुम्हाला वाटेल तेव्हा!” असे म्हणून मी माझा मग चहाने भरला आणि एक गरम घुटका घेऊन पाहुण्याकडे एकटक पाहू लागलो.

पाहुणा जागच्या जागी चुळबुळत होता. असा बसला होता की वेळ आलीच तर ताबडतोब समोरच्या पायऱ्यांवरून धूम ठोकता यावी! मला कळेना, याला एवढी कसली भीती वाटतेय ते! मी तर अजून काहीच बोललो नव्हतो. कदाचित माझ्या ‘कीर्ती’चा तो परिणाम असावा. पण मग माझ्या लक्षात आलं की तो माझ्या पाठीमागे भिंतीकडे पाहतो आहे. मी वळून मागे पाहिले आणि मला खूप हसू आले. भिंतीवर एक हिरवा मुखवटा होता. त्याला लाल टोपी आणि पिवळे टप्पोरे गोळे होते. शिवाय सर्कसच्या बँडमधले लोक जसा खांद्यावर नक्षीदार तुरा लावतात तसा त्या मुखवट्याला खांद्याचा आकार पण होता. इंग्लिश पिक्चरमध्ये, ‘जिम कॅरी’, नावाचा अॅक्टर असा मुखवटा घालतो आणि त्याचे पिवळे डोळेही हातभर बाहेर येतात याची मला आठवण झाली. मी म्हणालो, “अहो घाबरू नका, असे मुखवटे गोव्याला कार्निव्हलच्या जत्रेत खूप मिळतात. वासंतीनेच आणला होता तो. अरे हो पण तुम्हाला हे सगळं काहीच माहीत नाही. नाही का? बरं नीट बसा. थोडा चहा घ्या, ऐका आता…

-विनायक रा. अत्रे

विनायक रा अत्रे
About विनायक रा अत्रे 91 Articles
श्री विनायक अत्रे हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य वास्तुविशारद (Retd Chief Architect) आहेत. हास्यनाटिका, कथासंग्रह, काव्यसंग्रह तसेच विविध मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी बालगोपालांसाठी अनेक पुस्तके, एकांकिका वगैरे लिहिल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..