नवीन लेखन...

कथा हरवलेल्या वॉलेटची!

नमस्कार मित्रांनो, आजची कथा थोडी मोठी आहे, पण सत्य आहे आणि माझ्याच बाबतीत घडलेली आहे.

कथा हरवलेल्या वॉलेटची!

जेंव्हा मार्च १९८४ मधे माझं लग्न झालं, तेंव्हा मी बदलापूरला रहात होतो, आणि मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वडाळा येथील कार्यालयात तीन शिफ्ट्स मधे काम करत होतो. लग्न झालं ते ब्राह्मणआळी- भिवंडी येथील श्री. एकनाथ रामकृष्ण उर्फ आप्पा कुलकर्णी यांची लेक शुभांगी हिच्याशी. लग्नानंतर तिचं नाव जरी सौ. सेवा गोखले झालं तरी तिला ओळखणारे सर्व लोक तिला ‘माई’ म्हणून ओळखत. आजही तिला त्याच नावाने ओळखतात.

त्याच वर्षी दिवाळीच्या काही दिवस आधी मी पहिल्या शिफ्टसाठी (सकाळी ८ ते संध्याकाळी ५) पहाटे पाच-वीस च्या गाडीने कामावर गेलो. एक दिवस माहेरी जाऊन यावं म्हणून दुपारच्या गाडीनं सौ. सेवा भिवंडीला गेली. “ऑफीस सुटलं की तुम्ही पण भिवंडीला या” असं तिनं सकाळीच सांगून ठेवलं होतं. त्याप्रमाणे संध्याकाळी मी भिवंडीला गेलो.

आगत स्वागत आणि चहापान झाल्यावर सौ. आईंनी (सासूबाई) विचारलं –
“उद्या सुटी आहे का कामावर जायचंय?”
“छे…सुटी कसली? कामावर जायचंय… सकाळी आठ ची ड्यूटी आहे.”
“हो का, मग कसे जाणार आहात?”
“कसे म्हणजे? बसने…ठाणे मार्गे? का हो?”
“काही नाही, कल्याण मार्गे जाणार असतात तर शेखरला एक निरोप द्यायचा होता.”
(शेखर म्हणजे माझे मेहुणे – डॉ. चंद्रशेखर कुलकर्णी. तेंव्हा ते भिवंडी कल्याण रोडवर, पण कल्याण मधे असलेल्या ठाणकर पाड्यात रहात असंत.)
“हात्तिच्या, एवढंच ना, मग जाईन की कल्याण मार्गे. फार तर तासभर लवकर निघावं लागेल इतकंच. आणि तसंही, मी उद्या ‘स्पेअर’ असणार आहे. त्यामुळे थोडा उशीर झाला तरी चालेल. जाईन मी कल्याण मार्गे!”

मग दुसऱ्या दिवशी पहाटे उठून आणि शेखरला द्यायचा निरोप घेऊन मी भिवंडी-कल्याण बस पकडली. नेहमीप्रमाणे बसला चांगलीच गर्दी होती. ठाणकर पाड्याला उतरतांना खूपच लोटालोटी झाली. कसाबसा मी खाली उतरलो. खाली उतरल्यावर लक्षात आलं, माझ्या छोट्याश्या हँडबॅगची चेन उघडून त्यातलं वॉलेट मारलं गेलं होतं. छातीत धस्स झालं, पण क्षणभरच. कारण आदल्या दिवशी मिळालेल्या बोनसचं पाकीट – सरकारी ब्राऊनपेपरचं – जे बॅगमध्ये वॉलेटच्या बाजूलाच ठेवलेलं होतं, ते मात्र वाचलं होतं. ते बघून जीव भांड्यात पडला.

गेलेल्या वॉलेटमधे पैसे नसले तरी ड्रायव्हिंग लायसन्स, रेल्वेचा तीन महिन्यांचा पास, त्यासाठी लागणारं रेल्वेचं फोटो आय-कार्ड, एक टेलरची रिसीट आणि काही किरकोळ चिठ्या-चपाट्या होत्या.

लायसन्स गेलं म्हटल्यावर डुप्लिकेट मिळवण्यासाठी पोलिस कंप्लेंट करणं गरजेचं होतं. आणि नवीन पास काढायचा तर फोटो आय-डी साठी फोटो काढण्यापासून तयारी होती. एकूण काय, त्या दिवशी मी कामावर जाऊ शकणार नव्हतो.

मग काय, शेखर कडे गेलो, त्याला निरोप दिला. निवांतपणे पोहे आणि चहा चा आस्वाद घेतला आणि मग स्टेशन जवळील पोलीस स्टेशनला गेलो. लायसन्स मारलं गेल्याची रीतसर तक्रार नोंदवली, तसं सर्टिफिकेट घेतलं आणि परत फिरलो. तोपर्यंत दहा वाजून गेले होते. ऑफिसला तर जायचं नव्हतं आणि बदलापूरला जावं तर घरी कोणी नव्हतं. मग तिथूनच भिवंडी ला जाणारी शेअर रिक्षा पकडून भिवंडी च्या घरी गेलो.

धावत्या रिक्षात मला एक कल्पना सुचली. त्या दिवसांमध्ये मी कुठल्यातरी पुस्तकात वाचून मन एकाग्र करण्याचा अभ्यास करत असे. मन एकाग्र करून कोणताही संकल्प केला तर तो सफल होतो असं त्यावेळी माझ्या वाचनात होतं. त्याची आठवण झाली आणि मी एक प्रयोग करून पहायचं ठरवलं.

रिक्षात बसल्या बसल्याच थोडा थोडावेळ मन एकाग्र केलं आणि “चोवीस तासात मला माझं लायसन्स आणि पूर्ण वॉलेट परत मिळालं पाहिजे” असा संकल्प केला.

दुपारी बाराच्या दरम्यान घरी पोहोचलो घरातल्या सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. मी कामावर न जाता परत घरी आलो त्याचा. मग जेवता जेवता घडलेला सगळा घटनाक्रम मी सांगितला.

संध्याकाळचा चहा घेऊन आम्ही उभयता बदलापूरला परत आलो.
तेव्हा आमच्या इमारतीमध्ये डॉक्टर प्रमोद भोगावकर यांचं मॅटर्निटी हॉस्पिटल होतं. नयना नावाची त्यांची एक असिस्टंट होती. आम्ही घरी येताना तिनं पाहिलं, तशी धावत पुढे आली आणि म्हणाली –

“तुमच्यासाठी एक तार आली आहे. डॉक्टरांकडे ठेवली आहे. मिनीटभर थांबा, मी तुम्हालाा आणून देते.”

तार म्हटल्यावर आम्ही दोघंही हबकलो. नात्यातलं कोणीही आजारी असल्याची माहिती नव्हती. मग तार कसली? कोणाकडून आली? “मन जिंती ते वैरी न चिंती” असं का म्हणतात, त्याचा त्यावेळेला अनुभव आला.

मिनिटा भरातच नयना तार घेऊन आली. तारेत मजकूर होता –
‘See Mohinder Singh Kabul Singh automobiles for your pass and licence found’.
तार वाचून आश्चर्याचा सुखद धक्का बसला. हे मोहींदर सिंग यांचे दुकान कुठे असेल याची कल्पना नव्हती, पण ज्या अर्थी माझं लायसन्स कल्याणला हरवलं होतं, त्याअर्थी त्यांचं दुकानही कल्याणमध्येच असावं असं मला वाटलं.

त्यानंतरची मुंबईकडे जाणारी पहिली गाडी पकडून मी कल्याण गाठलं. एका रिक्षावाल्याकडे मोहिंदर सिंह काबूल सिंह ऑटोमोबाईल्सी चौकशी केली. तो म्हणाला “ते दुकान यावेळेला बंद असतं. कशासाठी जायचं होतं तुम्हाला तिथे?” मी त्याला घडलेली सगळी हकीकत सांगितली.
“असं होय, मग चला मी तुम्हाला त्यांच्या घरी सोडतो. ते ठाणकर पाड्यात राहतात.”

रिक्षावाल्यांने मला त्यांच्या घरी सोडलं. त्यांच्या कडूनच आलेली तार दाखवल्यावर त्यांनी बसायला सांगितलं आणि पाकिटात काय काय होतं त्याची चौकशी केली. मी सांगितलेली माहिती तंतोतंत जुळल्या वर त्यांनी मला माझं वॉलेट परत केलं. वॉलेट परत करतांना त्यांचा मुलगा म्हणाला-

“माझ्या दुकानाच्या बाहेर दुरुस्तीसाठी आलेला एक ट्रॅक्टर उभा होता. त्याच्या मागे हे वॉलेट पडलं होतं. दुकान उघडल्यानंतर माझा मेकॅनिक जेंव्हा दुरुस्तीसाठी ट्रॅक्टरजवळ गेला, तेंव्हा त्याला हे वॉलेट दिसलं. ते त्यानं माझ्याकडे आणून दिलं. मी ते उघडून त्यात काय काय आहे ते पाहिलं. त्यात लायसन्स नसतं तर कदाचित मी ते तसंच टाकून दिलं असतं. पण लायसन्स आहे म्हटल्यावर ते तुमच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजे असं वाटलं. म्हणून मग त्यातला तुमच्या ऑफीसचा नंबर घेऊन फोन केला, तर तुम्ही कामावर आला नाहीत असं कळलं. म्हणून मग लायसन्सवरील पत्यावर तार केली. ती तुम्हाला मिळाली.”

त्यांचे आभार मानताना मी म्हणालो, “खरंच किती केलंत तुम्ही माझ्यासाठी. खूप खूप आभारी आहे मी. बरं, ट्रंक कॉल आणि तारेच्या खर्चाचे किती पैसे द्यायचे मी?”

“छे छे….पैसे कसले देता….पैसे नकोत मला. जशी मला कोणीतरी मदत केली होती, तशी मी तुम्हाला केली इतकंच. तुमची वस्तू तुम्हाला मिळाली यातच आनंद आहे मला. पण एक सांगतो, तुम्हाला कधी अशी कोणाला मदत करण्याची संधी मिळाली, तर ती चुकवू नका. खूप आनंद असतो निरपेक्ष मदत करण्यात!”

त्यांना तसं वचन देऊन आणि पुन्हा त्यांचे आभार मानून मी घरी परतलो. (दुसऱ्याला निरपेक्ष मदत करण्याची संधी पुढे काही वर्षांनी मला मिळाली, त्याबद्दल नंतर लिहीन).

ह्या सगळ्या प्रकारात मन एकाग्र करून केलेल्या संकल्पाचा काही लाभ झाला का नाही ते मला माहीत नाही. पण माझं गेलेले वॉलेट लायसन्स सह परत मिळालं, आणि तेही चोवीस तासांच्या आत हे मात्र नक्की!

संजीव गोखले, पुणे
२९ जून २०२२.

Avatar
About संजीव सदाशिव गोखले 8 Articles
मी ज्येष्ठ नागरिक असून अधून मधून लिहित असतो, नियमित लेखक होण्याची मनीषा असली तरी अजून झालेलो नाही. यापूर्वी मी आनंदवन हेमलकसा सोमनाथ प्रत्यक्ष पाहिल्यावर त्याबाबत फेसबुक वर लिहिले आहे. माझ्या आयुष्यात घडलेल्या एका घटनेबद्दल मी केलेले लेखन ""ब्रह्मांड – एक आठवणे"" या शीर्षकाखाली दैनिक सकाळच्या मुक्तपीठ या सदरात प्रसिद्ध झाले आहे. २००४ साली मी मुंबई पोर्ट ट्रस्ट मधून स्वेच्छा निवृत्त झालो.तेंव्हापासून वास्तव्य पुणे. थोडीफार लेखनाची आवड आहे. कोणत्या एखाद्या खास विषयावर नाही, जे सुचेल ते लिहितो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..