नवीन लेखन...

कारगिल पर्व आणि ‘ ते ‘

गेले तीन तास तो बंकरमध्ये उभा होता.
दुर्बिणीतून आसमंत न्याहाळत होता.
सगळीकडे शांत होतं ,कसलीही हालचाल जाणवत नव्हती , तरीही पापणी लवू न देता तो कर्तव्य बजावत होता.
अंग बधीर होत होतं ,पण भारतमातेच्या संरक्षणाची जाणीव त्याला अकल्पित ऊब पुरवीत होती.
समुद्रसपाटीपासून अठरा हजार फूट उंचीवरच्या कारगिल क्षेत्रात तो उभा होता .

त्याचा दुसरा सहकारी विश्रांती न घेता , बंकरमध्ये साठलेलं बर्फ काढून टाकत होता, कारण बसायला पुरेशी जागा नव्हती.

हे नित्याचच होतं.
जागा बदलली की विश्रांतीचा , भुकेचा , झोपेचा विचार न करता प्रामाणिकपणे निष्ठेनं कर्तव्य करीत राहायचं .

अविश्रांत ,अथक आणि अपरिमित कष्ट !
मनात असीम धैर्य आणि शरीरात अतुलनीय शौर्य !
आणि डोळ्यासमोर फक्त दिलेलं ‘लक्ष्य ‘ .

— त्याला १९९९ च्या जुलैची याद आली .
हेच ते ठिकाण .असाच बर्फ . अशीच अवघड अवस्था .
शत्रूचा अचानक हमला .
आणि आपण त्याला तितक्याच त्वेषाने दिलेलं उत्तर …
तहान नाही ,भूक नाही, दिवस नाही की रात्र नाही …
सगळा अवघड डोंगराळ, पर्वतीय प्रदेश…
सगळ्या प्रतिकूल परिस्थितीही पाकड्याना चारी मुंड्या चित करून विजय खेचून आणला…

त्यानं त्वेषाने पाय आपटला .
‘ क्या कर रहे हो ? ‘
दुसऱ्यानं विचारलं.
‘ गनिम को कुचल रहा हूँ ‘
दुसरा हसला .
‘ पैर तो सम्हाल बेटे , निचे पत्थर है ‘
आता तोही हसला .
‘ यार एक बता दे, हम किधर हैं, क्या कर रहे हैं, किस हालात में हैं इस बारे में पुरे देश को कुछ मालुम हैं की नही? ‘
‘ शायद ! पर ऐसा क्यों सोचते हो ?’
तो गप्प बसला .
त्याला कालची रात्र आठवली .

काल रात्री जेवताना मेजर सांगत होते,
“आता आपण अधिक सुसज्ज आणि शक्तिशाली होणार .कारण सरकार राफेल विमान खरेदी करतंय. दोन इंजिन आहेत त्याला ,एका मिनिटात साठ हजार फूट उंच जातं ते.चौविस हजार पाचशे किलोग्रॅम वजन घेऊन जाऊ शकतं ते.खतरनाक मिसाईल नेण्याची क्षमता आहे त्याची. शत्रूचा पार खात्मा . पाकड्यांकडे आणि चीनकडे सुद्धा नाहीयेत अशी विमानं. अशी आणखी आपली ताकद वाढणार आहे नवनवीन शस्त्रांमुळे . आपण कल्पनासुद्धा करू शकणार नाही अशी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे .’
सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, थाळ्या आणि मग वाजवले, भारतमाता की जय चे गगनभेदी नारे दिले .

— पण नंतर कॅम्पच्या मेसमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली.
— शस्त्र घेतायत खरी पण त्याच्यावरून फालतू राजकारण सुरु झालंय म्हणे…
— सुप्रीम कोर्टालासुद्धा विरोधक जुमानत नाहीयेत …
— गोंधळ सुरु केलाय त्यांनी…
— मीडिया आणि विरोधक गडबडी करतायत…
— तांत्रिक मुद्दे शोधतायत, शस्त्र खरेदी बंद करण्यासाठी …
— काय होईल मग…
— शक्तिशाली शस्त्रांची सैन्याला गरज आहे, हे कधी कळणार…

चर्चा आणखी वाढली असती पण कुणाचं तरी लक्ष गेलं, मेजरसाब येत होते .
‘ ये क्या हो रहा है, मी ऐकतोय तुमचं बोलणं ,पण एक लक्षात घ्या ,आपण सैनिक आहोत, आपण देशसंरक्षणाशिवाय कसलाही विचार करायचा नाही, आपण फक्त आणि फक्त देशाचा विचार करायचा, उपलब्ध असेल
त्या सामुग्रीसह प्राणपणाने लढायचं . कळलं ? ‘
‘ यस सर ! ‘ सगळ्यांनी होकार भरला…
सगळे आपापल्या जागी गेले .

हा टक्क जागा . तळमळत . तडफडत .
त्याला कळत नव्हतं हे काय चाललंय…

शत्रूकडे अत्याधुनिक शस्त्र आहेत आणि आपल्याला आहे त्या शस्त्र सामुग्रीत, प्रचंड, प्रखर प्रतिकूल परिस्थितीत देशाच्या नागरिकांचं देशाच्या सीमांचं संरक्षण करावं लागतंय . क्षणाक्षणाला जीव धोक्यात असतो, हे कुणाच्याच कसं लक्षात येत नाही ?

देशहित , देशप्रेम म्हणून काही आहे की नाही …
की केवळ आम्हाला इथं बलिदानाला पाठवलंय ?
द्या आमच्या हाती अत्याधुनिक नवनवीन शस्त्र , नवीन प्रकारची युद्धसमुग्री आणि बघा आमचा पराक्रम …
विरोध करायचा म्हणून करून देशाला खड्यात घालायचा अधिकार तुम्हाला कुणी दिला.
आमच्या भरवशावर तुम्ही शांत झोपता आणि देशाच्या भवितव्याचा खेळखंडोबा का करता ?
आमच्याही भावनांचा विचार करा जरा , आमच्या प्राणांचा विचार ठेवा जरा…

— तो किती तरी वेळ आतून फुटत होता , अस्वस्थ होत होता ..
त्याची संवेदनशीलता घुसमटु लागली होती.
सरावानं तो सर्वत्र पाहत होता पण डोळे भरून आल्यानं त्याला काही दिसत नव्हतं.
त्यानं दुर्बीण दुसऱ्याच्या हाती दिली .
दुसऱ्यानं डोळे पुसत कर्तव्याला प्राधान्य दिलं,

— आणि मनातल्या सर्व शंकांना दूर करण्यासाठी तो जोरात ओरडला .

भारत माता की जय !

— डॉ.श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
*************************
( कथा आवडल्यास नावासह सर्वदूर पसरवायला हरकत नाही.

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 150 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..