नवीन लेखन...

कनाक्काले

जहाज ट्युनिशिया देशातील ला बिझर्ते आणि ला गुलेट या दोन पोर्ट मध्ये कार्गो डिस्चार्ज करून काळया समुद्राकडे निघाले होते. ला गुलेट आणि ला बिझर्ते या पोर्ट प्रमाणेच ट्युनिशिया या देशाचे नाव सुद्धा त्या देशात जाईपर्यंत कधी ऐकले नव्हते. तस पाहिलं तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा देश बऱ्यापैकी मोठा आहे पण ज्याप्रमाणे गरीब, निरुपद्रवी आणि शांत लोकांबद्दल जसं कोणाला काही माहिती नसतं किंवा त्यांच्याबद्दल फारसे कोणी बोलत नाही किंवा चर्चा करत नाही असा प्रकार ट्युनिशिया सारख्या अनेक देशांबद्दल घडत असावा याची जाणीव झाली. ला गुलेट वरून जहाज निघताना प्रोसिड टूवर्ड ब्लॅक सी एवढा फक्त चार शब्दांचा मेसेज आला होता. कुठे आणि कधी पोहचायचयं हे बऱ्याचदा सांगितलं जात नाही. फक्त एकोनोमिकल स्पीड ने पुढे पुढे जात राहायचे आणि सांगितले आहे त्या रुट वर पुढील मेसेज येण्याची वाट बघत राहायचं. ब्लॅक सी मध्ये जाण्यापूर्वी इस्तंबूल लागते आणि इस्तंबूल यायच्या अगोदर सहा सात तास अगोदर म्हणजे साधारण साठ ते सत्तर सागरी मैलांवर कनाक्काले ची सामुद्रधुनी लागते. इस्तंबूल प्रमाणे या सामुद्रधुनी तून सुध्दा एकावेळी एकाच दिशेने मोठी जहाजे एका मागोमाग जाऊ दिली जातात. जहाजांना सुध्दा वन वे ट्रॅफिक चे नियम पाळावे लागतात. सुएझ, इस्तंबूल आणि कनाक्काले ट्रान्झिट इथे काही तासांपासून तर एक किंवा दोन दोन दिवस एका बाजूला येवून नंबर लागेपर्यंत थांबावे लागते.

रात्री आठ नंतर जहाज कनाक्काले जवळ पोहचणार होते ट्रान्झिट पोचल्यावर लगेच आहे की वेटींग आहे ते तिथे गेल्यावरच कळणार होते त्यामुळे रात्री आठ ते बारा वॉच ठेवायला लागेल म्हणून दुपारी बारा वाजता मला वन अवर नोटीस मिळाल्यावरच खाली ये असे सांगून सेकंड इंजिनीयर ने सुट्टी दिली होती. रात्री साडे आठ वाजता वन हवर नोटीस मिळाली मग प्री अरायवल चेकलिस्ट प्रमाणे इंजिन आणि स्टियरिंग टेस्ट करून झाल्यावर तासाभरातच कॅप्टनने जहाजाचा अँकर टाकला. चीफ इंजिनिअर वर जाताना सांगून गेला की राऊंड घेऊन इंजिन रूम अन मॅण्ड कर. रात्री अकरा च्या सुमारास इंजिन रूम अन मॅण्ड करून सरळ नेवीगेशनल ब्रिजवर गेलो आणि ब्रीज रूम च्या बाहेर पडलो. जहाजाच्या सेंट्रल एसी पेक्षा जास्त गारवा बाहेरच्या मोकळ्या हवेत जाणवत होता. एका बाजूला यूरोप खंड तर एका बाजूला आशिया खंड या दोन्ही खंडांसह तुर्की या देशाला सुध्दा यूरोप आणि आशिया या दोन खंडात कनाक्काले आणि इस्तंबूल च्या सामुद्रधुनीने तसेच या दोन्ही सामुद्र धुनी मध्ये असणाऱ्या भुमध्य समुद्रातीलच एक भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मारमरा समुद्राने विभागले होते.

कनाक्काले परिसरातील दिव्यांच्या उजेडामुळे आकाश तांबूस पिवळसर असल्यासारखे भासत होते. दोन्ही बाजूचे किनारे तीन चार मैलांवर होते तरीपण गाड्यांचे हेड लाईट चमकताना दिसत होते. तुर्कीच्या चांद सितारा असलेल्या लाल भडक झेंड्यावर मारलेल्या प्रकाशझोतात इस्तंबूल प्रमाणे इथेही त्याचे डौलाने फडकणे लांब असून सुध्दा स्पष्टपणे अनुभवता येत होते. वाऱ्याचा वेग वाढल्यावर गारवा जाऊन थंडी वाजायला लागली उसळणाऱ्या लाटा जहाजावर आदळत होत्या ब्रिजवर असलेल्या निरव आणि निर्जीव शांततेत लाटांच्या खळखळाटा मुळे जिवंतपणा आल्यासारखं वाटत होतं. तासभर इकडून तिकडे बघत बघत वेळ घालवल्यानंतर झोपण्यासाठी केबिन कडे जायला निघाल्यावर थर्ड मेट बोलू लागला सकाळी आपल्याच वॉच मध्ये अँकर उचलून ट्रान्झिट करायचा मेसेज आला आहे सकाळी साडे दहा वाजता पायलट येईल त्याच्यागोदर चार मैल अँकर उचलून पुढे जायचे आहे.
थर्ड मेट ने अजून एक माहिती दिली की, पंप मन कडे ग्रीस मधील सिमकार्ड होते संध्याकाळी साडे पाच वाजल्यापासून पंपी चार तास ग्रीसच्या किनाऱ्या जवळून जहाज येत असताना मोबाईल मध्ये सिग्नल येईल म्हणून वाट बघत बसला होता. एक दोन वेळा नेटवर्क च्या दोन काड्या आलेल्या म्हणून खुश पण झाला होता. पण चार तास ट्राय करून सुद्धा त्या बिचाऱ्या चा फोन काही कोणाशी कनेक्ट झाला नाही.
बारा वाजून गेल्यावर केबिन मध्ये जातच होतो की तेवढ्यात इंजिन रूम मध्ये अलार्म वाजल्याचा आवाज येवू लागला केबिन मध्ये अलार्म अॅक्सेप्ट करून खाली इंजिन रूम मध्ये धावत धावत गेलो. डिझेल च्या एका टाकीचा हाय लेवल अलार्म आला होता वारा आणि लाटांमुळे जहाज थोडे हेलकावे खात असल्याने डिझेल इकडून तिकडे हलायला लागल्याने अलार्म वाजला. अलार्म रिसेट करून पुन्हा वाजू नये म्हणून डिस्कनेक्ट करून ठेवला. केबिन मध्ये आल्यावर झोपेत असताना पुन्हा अडीच च्या सुमारास अलार्म वाजला. जेनेरेटर चा फ्युएल फिल्टर चोक झाल्याने अलार्म वाजला होता. दुसरा स्टँड बाय फिल्टर चेंज ओव्हर करून पुन्हा चोक झालेला काढून त्याच्याजागी साफ केलेला चांगला फिल्टर बदलता बदलता पाऊण तास गेला. तेवढ्यात दुसऱ्या जनरेटर चा पण फिल्टर चो क झाल्याचा अलार्म आला. सगळं निस्तरता निस्तरता पहाटेचे चार वाजले. इंजिन कंट्रोल रूम मधील नोटीस बोर्डवर मला सकाळी सवा अकरा वाजता वेक अप कॉल करण्याची रिक्वेस्ट लिहली आणि झोपायला गेलो. सकाळी दहा वाजता जहाजाचे मेन इंजिन सुरू झाल्याच्या आवाजाने आणि व्हायब्रेशन मुळे जाग आली. बारा वाजता खाली जायचे असल्याने अकरा वाजता डेकवर गेलो. कनाक्काले ट्रान्झिट सुरू झालं होते तुर्की झेंडा दिवसाउजेडी अजूनच लाल भडक आणि डौलाने फडकताना दिसत होता. जहाजाने वेग घेतला होता. समोरून लहान लहान होड्या आणि बोटी इकडून तिकडे जात होत्या एक मोठी रो रो सर्व्हिस करणारी बोट जिच्यामध्ये कार आणि ट्रक सुध्दा वाहून नेले जात होते ती जहाजाला क्रॉस करण्याच्या तयारीत होती पण जहाजाने मोठ्याने एअर विसल वाजवून तिला थांबण्याचा इशारा दिला तशी ती जहाजाला पुढून क्रॉस करण्याऐवजी जहाजाच्या मागच्या दिशेने जायला वळली. आणखी दहा मिनिटांनी पूर्णपणे नव्वद अंश असलेलं वळण आलं. जहाजाचा पुढील भाग वेगात असताना नव्वद अंश कोनात वळताना बघायला खूप छान दिसतं. या नव्वद अंशाच्या वळणावर दोन्ही बाजूचे किनारे खूप जवळ असल्याने जहाजावरील सगळे अधिकारी आणि इंजिनियर चिंतेत असतात, की हे वळण सुखरूप पार होईल की नाही. पण पायलट बिनधास्त पणे फुल अहेड मध्ये जहाज वेगाने घेऊन निघालेले असतात. वळण गेल्यानंतर अर्ध्या तासात पायलट जहाजावरुन उतरून पायलट बोट मध्ये निघून दुसरं जहाज ट्रान्झिट करण्यासाठी निघून जातो. कनाक्काले सामुद्रधुनी ओलांडल्यावर दोन्ही बाजूचे किनारे दुरावले जातात पण इस्तंबूल येईपर्यंत लांब असले तरी एका बाजूला यूरोप आणि एका बाजूला आशिया खंडातील तूर्कीचे किनारे दिसत राहतात.

© प्रथम रामदास म्हात्रे
मरिन इंजिनियर
B. E. (mech), DIM
कोन, भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 145 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..