नवीन लेखन...

आत वेगळा बाहेर वेगळा

खळखळ वाहणारी नदी, तिच्या काठावर असलेला वटवृक्ष. त्याच्या विस्तीर्णपणे पसरलेल्या पारंब्या. पारंब्यातून पुन्हा नव्या वृक्षाची पालवी फुटतेय, असे स्वप्नवत चित्र, फार पुर्वी बघायला मिळत होते. आता तसे राहिले नाही. असेल कुठे एखाद्या गावकुसात. आपल्याला ते माहित नाही इतकेच. आपल्याला खरे तर बऱ्याच गोष्टी माहिती नसतात. आपल्याला हे ही माहिती नसतं आपल्याच आत दडलेला वटवृक्ष अन त्याच्या विस्तारणाऱ्या पारंब्या अन पुन्हा त्या पारंब्यांना फुटणारी नवी पालवी… काही म्हणता काहीच माहिती नसतं. अस होण्याचं कारण काय असलं पाहिजे. खरे तर दोन कारणं असू शकतात का? एक म्हणजे आपण बाहेर वागतो वेगळे, आत असतो वेगळे. हे आत आणि बाहेरचं जे जगणं आहे, तेच धोका देत राहतं सदैव आपल्याला आणि आपल्या मुळांना, आपल्या पारंब्यांना. वटवृक्ष जितका वर विस्तीर्णपणे पसरलेला असतो, तितकाच तो जमिनीत खुप आत गेलेला असतो ना.

आठवतोय ना गावांत राहत असतांना घराच्या भींती छेदून आत आलेली वटवृक्षांची मुळं. आठवत असतील ना शाळेच्या व्हरांड्याला तडा पाडणारी वटवृक्षाची मुळं. अशा अनेक आठवणींची जत्रा भरत असते नेहमीच आपल्या आत. आतल्या आत… कधी तिचा आपण सरळ सामना करतो, कधी जत्रेत फेरफटका मारून येतो. कधी जत्रेत हरवून देखील जातो. पण वास्तवाची धग लागली की तत्काळ भानावर येतो. जत्रेतून बाहेर पडतो. कधी-कधी जत्रेत जाव असही वाटत नाही.

आपण जसे बाहेरच्या जगासमोर असतो ना, तसे आपल्या आतल्या जगात नसतो. बाहेरच्या जगात मला एखाद्या गोष्टीचा राग येत असेल तर मी व्यक्त होत नाही, मात्र आतल्या आत व्यक्त होत राहतो… अगदी स्पष्टपणे… जसे रस्त्याने जाताना एखादा अपघात मी पाहतो आणि तिथे जखमींना मदत करायची सोडुन बघे, फोटो काढत असतात, शुटींग करत असतात. इतरांना माहिती पाठवण्याची त्यांना घाई झालेली असते. हे चित्र पाहुन मी बेचैन होतो, रागही येतो. पण तो मी त्या बघ्यांवर व्यक्त करत नाही, गप्प राहतो. आतल्या आत जळत राहतो, राखेतील निखाऱ्या सारखा.

एखाद्या घटनेचा निषेध मी थेट करू शकत नाही, मात्र आतमध्ये तो निषेध मी केव्हाच केलेला असतो. मग मी असा का वागतो वेगवेगळा. आत वेगळा, बाहेर वेगळा. का ही भूमिका मी निभावतो आत-बाहेर वेगवेगळी. एखाद्या माणसाला, तेही सर्वसामान्य माणसाला थेट व्यक्त होण्यासाठी लागणारे वातावरण निर्माण झाले नाही का या समाजात. की त्या सर्वसामान्याला सतत दाबण्याचा प्रयत्न केला गेलाय प्रभावीपणे. आरशात आपली प्रतिमा वेगळी दिसते. चांगली दिसते, सुंदर दिसते, खरीच तशी ती असते का? की केवळ असते ते आपले प्रतिबिंब. खरे, खोटे की आभासी. या आभासीत्वाचा आपल्याला नाद जडलाय. त्याच्या मागे धावताना वास्तवाला सोडून देतो ना आपण… आणि म्हणून मग पारंब्या वेगळ्या आणि मुळं वेगळं अशी परिस्थिती निर्माण होते. म्हणूनच एखाद्या घटनेत मी बाहेर वेगळा असतो आतमध्ये मी वेगळा असतो. बाहेर कितीही वणवा पेटला तरी मी व्यक्त होत नाही, शांत असतो नदीत पाय सोडून बसलेल्या वटवृक्षा सारखा.

— दिनेश दीक्षित

(९ जानेवारी २०१८)

Avatar
About दिनेश रामप्रसाद दीक्षित 46 Articles
मी जळगाव येथे वास्तव्यास असतो. जळगाव येथे गेल्या २५ वर्षापासून मी पत्रकारितेत कार्य करत आहे. दहा वर्ष मु. जे. महाविद्यालयाच्या जर्नालिझम डिपार्टमेंटमध्ये गेस्ट लेक्चर घेतले आहेत. मला सामाजिक कार्यात भाग घेण्याची आवड आहे. तसेच तरुण मुलांशी संवाद साधुन त्यांना चांगल्या गोेष्टी सांगण्याचा प्रयत्न करणे आवडते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..