नवीन लेखन...

कलेचं “राज”कारण !!

 

शिवसेना या राजकीय पक्षाचे चमकेश नेते, आतल्या वाटेने झालेले खासदार आणि सतत चर्चेत राहण्यासाठी लिखाण करणारे दैनिक सामना या वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी निव्वळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेल्या ‘ठाकरे’ या सिनेमाची निर्मिती केली. आणि एका महानेत्याच्या आयुष्यावर बनत असलेल्या एका मोठ्या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची जबाबदारी जाणीवपूर्वक अभिजित पानसे यांच्यावर सोपविली.

खरोखरच, ‘रेगे’ हा एक अप्रतिम सिनेमा होता आणि त्याचा दिग्दर्शक म्हणून अभिजित पानसे यांचं नाव मराठी सिनेसृष्टीत अत्यंत आदराने घेतलं जाऊ लागलं. कदाचित त्यामुळेच ठाकरे सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली असावी असा माझ्या मनात विचार आला होता, परंतु तेव्हाच खरंतर माझ्यासारख्या असंख्य लोकांच्या मनात एक वेगळीच पाल चुकचुकली होती. खरं सांगायचा मुद्दा इतकाच की, जर मनसेचा एक नेता शिवसेनेच्या एका नेत्याची निर्मिती असलेल्या सिनेमाचं दिग्दर्शन करत असेल, तर कदाचित पुढे जाऊन कथेच्या होणाऱ्या विरोधाला म्हणजे चित्रपटात राज ठाकरे यांचे अस्तित्व नगण्य दाखविण्यात आले तर भविष्यात मनसेकडून होणाऱ्या विरोधाला ब्रेक लागावा म्हणूनच जाणीवपूर्वक मनसे नेते अभिजित पानसे यांच्यावर नवखे असताना देखील एवढी मोठी जबाबदारी दिली असण्याचा आता संशय येऊ लागला आहे. तरीही या एवढया मोठ्या जबाबदारीचं आम्हा सर्व महाराष्ट्र सैनिकांना कौतुकच होतं.

साहजिकच दस्तुरखुद्द राज ठाकरेंनीही या निर्णयाला कधी आडकाठी केली नाही, कारण राज ठाकरे हे स्वत: एक उत्तम कलावंत आहेत, आणि सिनेमावरचं त्यांचं प्रेम सर्वश्रुत आहे. आणि दुसरं महत्वाचं कारण असं की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा होता. कारण साक्षात सन्माननीय बाळासाहेब ठाकरे म्हणजे राजसाहेबांचे दैवत ! या दोनच कारणांमुळे एक दिग्दर्शक म्हणून पानसेंच्या कामात मनसेकडून कोणताही हस्तक्षेप केला गेला नाही.

“माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय” असं म्हणत जेव्हा राज ठाकरे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला. आणि त्यानंतर आणि भारतीय विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदासह शिवसेनेतील सर्व पदांचा राजीनामा दिला. तेव्हापासून जर हे तथाकथित शिवसेनेचे नेते राज ठाकरेंना सतत पाण्यात पाहत होते. मग असे असतानाही त्यांच्या पक्षाच्या नेत्याला एवढी मोठी संधी कशी काय देऊ केली ? हा प्रश्न गेल्या काही दिवसांत माझ्यासारख्या अनेकांना पडला होता.

हल्ली काही गोष्टी तर हमखास खटकत होत्या. पण उगाच चांगल्या कामात अडथळा नको, म्हणून त्या गोष्टी आम्ही कधी चव्हाट्यावर मांडल्या नाहीत. मात्र आज नाईलाज झाला आहे. ‘ठाकरे’ सिनेमाचं प्रमोशन करताना, मग ती टाइम्स ऑफ इंडियाच्या ‘बॉम्बे टाइम्स’ पुरवणीतील पेड पब्लिसिटी असो किंवा मराठी-हिंदी वाहिन्यांवरील विविध कार्यक्रमांमधील ‘ठाकरे’ सिनेमाचं प्रमोशन असो, आम्हाला कुठेच अभिजित पानसे दिसले नाही. एकाही वृत्तवाहिनीत, वर्तमानपत्रात एक दिग्दर्शक म्हणून पानसेंची छोटीशी का होईना पण एखादी मुलाखत दिसली नाही. जिकडे पहावे तिकडे सिनेमाचे चमकेश निर्माते संजय राऊतच पुढे पुढे करताना दिसायचे. मग एखादा विषय त्या सिनेमात वापरण्यात आलेल्या आवाजाचा असो अथवा म्यूझिक लांच पार्टीचा, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला निर्माता हजर!! पण असं कधी कुठे असतं का?

आजवर आम्ही असंख्य सिनेमांच्या प्रमोशनचे इव्हेंट पाहिले, बातम्या केल्या, पण असा ‘चमकेशगिरी’ करणारा निर्माता कधीच पाहीला नाही. खरंतर सिनेमाच्या दुनियेत दिग्दर्शक हाच सिनेमाचा कॅप्टन असतो, त्यामुळे एक कलावंत म्हणून दिग्दर्शक हाच त्याने बनवलेल्या सिनेमाचा सर्वेसर्वा असतो. सिनेमा काय आहे ? तो बनवताना काय आव्हानं होती ? ती कशी पेलली ? प्रत्येकाने काय योगदान दिलं ? या आणि अशा सगळ्या बाबींवर दिग्दर्शकच अधिकारवाणीने बोलत असतो. कारण, आपण बनवलेल्या सिनेमाचा आवाका प्रत्यक्षात काय आहे, याची कल्पना फक्त दिग्दर्शकालाच असू शकते.

पण, ‘ठाकरे’ सिनेमाबाबत गेले काही दिवस नेमकं उलट पाहतो आहे. एकाही कार्यक्रमात, मुलाखतीत, बातमीत दिग्दर्शक म्हणून अभिजित पानसेंसाठी काहीच जागा ठेवण्यात आली नाही. बातमीतली जागा तर सोडाच ….नुकताच, ठाकरे सिनेमाचा खास शो आयोजित करण्यात आला होता. त्या शोमध्ये त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकालाच योग्य जागा बसण्यासाठी दिली गेली नाही, असं बातम्यांवरून समजलं. एका बातमीत असं म्हटलंय की, श्री. पानसे उशीरा आल्यामुळे जागा मिळाली नाही. परंतु दुर्दैवाने इथेही राजकारण घडले. या लोकांना कुणीतरी सांगायला हवं की, विशेष खेळांमध्ये प्रत्येकाच्या जागा आरक्षित असतात. तिथे कुणीही येऊन कुणाच्याही जागेवर बसत नाही. ती काही गल्लीतली प्रचारसभा नाही. आणि ही बाब अतिशय अशोभनीय आहे. त्यामुळे या ठिकाणी एका राजकीय पक्षाने निश्चितच कलेचं चिरहरण केलं आहे , असंच दुर्दैवानं म्हणावं लागेल.

— डॉ. शांताराम कारंडे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..