नवीन लेखन...

श्री गणेश चतुर्थी पूजेमागील विचार व आशय

गणपती ही विद्येची व सकल कलांची आराध्य देवता,गणांचा अधिपती म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे.प्रतिवर्षी येणा-या गणेश उत्सवाची प्रतीक्षा सर्व भक्त आतुरतेने करीत असतात. गणेशाची प्रतिष्ठापना आणि त्यामागील आशय समजून घेतला तर या उत्सवाची खुमारी अधिकच वाढेल.

व्रतविचार-

गणेश पुराण, मुद्गल पुराण यासारख्या ग्रंथांमध्ये गणेश देवतेच्या आख्यायिका, पूजाविधी आपल्याला पहायला मिळतात. व्रतराज,कृत्यकल्पतरू यासारख्या ग्रंथांनी विविध देवतांची व्रते सांगितली आहेत त्यामध्ये गणेश व्रताचाही समावेश आहे.वस्तुत: भाद्रपद महिन्यात हरितालिका,गणेश स्थापना,गौरी पूजन,अनंत चतुर्दशी अशी व्रते पाठोपाठ येतात. परंतु ही सर्व स्वतंत्र व्रते आहेत हे आधी ध्यानात घ्यायला हवे.

भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केले जाणारे व्रत हे पार्थिव गणेश व्रत’ म्हणून प्रसिद्ध आहे.पार्थिव म्हणजे पृथ्वीतून आलेले.गाणपत्य संप्रदायाच्या उपासकाला विहित असे हे व्रत आहे. श्रावण शुक्ल चतुर्थी ते भाद्रपद शुक्ल चतुर्थी या एक महिन्याच्या काळात करावयाचे हे व्रत आहे. उपासकाने दररोज नदीवर जाऊन स्नान, संध्या करावी.त्यानंतर नदीकाठची माती घेवून आपल्या तळहातावर आपल्या हाताच्या अंगठ्याएवढ्या आकाराची गणेशमूर्ती तयार करावी.अथर्वशीर्ष म्हणून तिची विधिवत् पूजा करावी आणि लगेच ती विसर्जन करावी.आता आपण या व्रताच्या शेवटच्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला मृण्मय मूर्तीची स्थापना व पूजा करतो.या व्रताची आख्यायिका अशी-एक गरीब क्षत्रिय होता. त्याला कोणत्याच व्यवसायात यश येईना. कंटाळून तो रानात निघून गेला.तेथे त्याला सौभरी ऋषी भेटले. त्यांनी त्याला श्रावण शुक्ल चतुर्थी ते भाद्रपद शुक्ल चतुर्थी या काळात गणेशाची आराधना करण्यास सांगितले. पुढील जन्मात तो क्षत्रिय; कर्दम ऋषी म्हणून जन्म पावला.

व्रतराज या ग्रंथात सांगितले आहे की भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेशाची सुवर्णमूर्ती स्थापन करावी. पूजा व होमहवन करावे व त्यानंतर ती ब्राह्मणाला दान करावी.भाद्रपद शुक्ल चतुर्थीला वरद चतुर्थी ,शिवा किंवा महासिद्धीविनायकी चतुर्थी म्हणूनही ओळखले जाते.ज्ञान किंवा निर्वाण सिद्धीच्या प्राप्तीसाठी गणेशाचे पूजन करावे.

या व्रताविषयी विविध आख्यायिका प्रचलित आहेत असे दिसते. तथापि संघटनेचा अधिपती असलेल्या गणेशाचे पूजन आवर्जून करावे व त्यानिमित्ताने कुटुंब,समाज व राष्ट्राचेही संघटन बल वाढावे.

श्री गणेशाच्या प्रतिमेचे पूजन,त्याची प्रतिष्ठापना,अथर्वशीर्ष म्हणून अभिषेक असे या पूजेचे प्रामुख्याने स्वरूप असते.’पार्थिव’संकल्पनेला अनुसरून आपण मातीची मूर्ती आणून तिची स्थापना करतो.

देवता विकास

काही अभ्यासकांच्या मते गणपती ही आर्येतर लोकांची देवता होती. ग्रामदेवता म्हणूनही तिचे पूजन केले जाता असावे.गणांची अधिपती असलेली ही देवता संस्कृतीच्या ओघात वैदिक आर्यांनी स्वीकारली व तिला गणानां त्वा गणपतिं हवामहे .. |असे म्हणत आपल्या धार्मिक जीवनात स्थान दिले असावे.भूतान प्रांतात विविध सण व उत्सवांच्या वेळी प्राण्यांचे मुखवटे घालून नृत्य करण्याची प्रथा प्रचलित आहे.त्यातूनच कदाचित हतीचा मुखवटा घातलेली देवता म्हणून गणपती या देवतेचे स्वरूप विकसित झाले असावे.ब्रह्मणस्पती या वैदिक देवतेला वाणीची देवता म्हणून ओळखले जाते. या देवतेचे पुराण कालातील विकसित रूप म्हणजे विद्या व कलांची देवता गणपती असेही काही अभ्यासक मानतात. विनायक ही देवता विघ्ने निर्माण करणारे होती तथापि काळाच्या ओघात ती विघ्ने निवारण करणारी म्हणून मानली जावू लागली. ही प्रक्रिया गुप्त काळात घडलेली असावी असे धर्मशास्त्र अभ्यासक म.म.पांडुरंग वामन काणे यांनी मांडले आहे.गणपती ही देवता बौद्ध धर्मातही असून गौतम बुद्धाने आपल्या आनंद या शिष्याला गणपतिह्रदयमंत्र दिला असल्याचे उलेख सापडतात.गणेशाची केवळ पूजा करणे यापेक्षा देवतेच्या बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अभ्यास करणे असेही या पूजेच्या निमित्ताने ठरविता येईल.

पूजाविधी

वडत्या पाहुण्याचे पूजन केले जाते. त्याला हात-पाय धुवायला पाणी, प्यायला पाणी, स्नानासाठी पाणी अर्पण केले जाते. पाच अमृत स्वरूपच जणू अशा आरोग्य हितकारक पंचामृताने देवाला स्नान घातले जाते.या निमित्ताने त्याचे तीर्थ म्हणून आपण पंचामृत घेतो.

अथर्वशीर्ष हे एक नव्य उपनिषद आहे. उपनिषद म्हणजे गुरूजवळ बसून परमार्थ विद्या समजून घेणे. सगुण साकार गणेशाच्या रूप वर्णन केल्यानंतर त्यांच्याआध्यात्मिक स्वरूपाचे वर्णन अथर्वशीर्ष करते. अथर्व म्हणजे चंचल. अथर्व म्हणजे स्थिर. मानवी बुद्धीला स्थिरता देणारे हे उपनिषद आहे म्हणून त्याचे पठन करण्याची परंपरा प्रचलित आहे.

गणपती ही संघटनेची देवता. तिच्या पूजेच्या निमित्ताने कुटुंब,समाज, राष्ट्र यांचे एकत्रीकरण व्हावे असे अपेक्षित आहे. त्यामुळे गणेशाच्या मूर्तीची स्थापना व प्राणांची प्रतिष्ठा ही सामूहिक चैतन्याच्या शक्तीतून व्हावी हे औचित्यपूर्ण ठरावे.आपल्या प्रत्येकात एक चैतन्यशक्ती वास करते, जिच्या मुळे आपल्या प्राणांची धारणा होते. असे आपल्या सर्वांचे चैतन्य एकत्रित होऊन ते गणेशाच्या मृण्मय मूर्तीत प्रक्षेपित करावे व त्याद्वारे त्यामध्ये प्राणांची प्रतिष्ठापना व्हावी असे अपेक्षित आहे. चराचरात भरलेला सर्वव्यापी परमेश्वर माझ्यासाठी या मूर्तीतही येवून निवास करतो आणि माझी पूजा गोड मानून घेतो ही भावनाच ह्र्द्य आहे, नाही का?

देवतेला अर्पण केल्या जाणा-या विविध पत्री या निसर्गाशी जवळीकच साधणे आहे. पावसाळ्यात उपलब्ध असणा-या या सर्व औषधी वनस्पतींचे शरीर उपयोगी गुणधर्म जाणून घेणे हे यामध्ये अपेक्षित आहे.

आर्त भावनेने देवाला मारलेली हाक म्हणजे आरती. समूह भावनेने देवाची केलेली आळवणी ऐकून देव भक्ताच्या सद्भावपूर्ण कार्यात मदतीला येईलच अशी भक्ताची धारणा असते.आरतीनंतर सामान्यत: मंत्रपुष्प वाहण्याची प्रथा आहे. पूजेत काही कमी अधिक राहिले असेल तर त्याचे प्रतीक म्हणून अक्षता व फुले अर्पण केली जातात त्यावेळी म्हटले जाणारे ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवा:…| हे सूक्त ही वैदिकांची राष्ट्रीय प्रार्थनाच आहे. ती म्हणून सर्वांच्या मनात आपल्या राष्ट्राविषयी आदरभाव व आस्था उत्पन्न होणे स्वागतार्हच आहे.

प्रतिवर्षी होणा-या या व्रताला लोकमान्य टिळकांनी स्वराज्य स्थापनेसाठी सार्वजनिक स्वरूप दिले हे विसरून चालणार नाही. आज देशावर विविध प्रकारची संकटे दिसत असताना सर्व भारत वासियांनी एकत्र येवून समूह भावना वाढीला लावणारा हा उत्सव देशप्रेमाने भारलेला व अभ्यासपूर्ण कसा होईल असे पहायला हवे. आपल्यातील कला-गुणांना वाव देणारा, आपले व्यक्तिमत्व विकसित करणारा हा उत्सव देवाच्या साक्षीने साजरा करणे आणि राष्ट्राच्या विकासाची भावना जोपासणे व ती प्रत्यक्ष कृतीतून जगणे हेच खरे गणेशपूजन व्हावे.

— आर्या आशुतोष जोशी

Avatar
About आर्या आशुतोष जोशी 21 Articles
संस्कृत विषयातील विद्यावाचस्पती पदवी. हिंदू धर्म, भारतीय संस्कृती, तत्वज्ञान, इतिहास या विषयातील संशोधन आणि लेखन, व्याख्याने आणि शोधनिबंध

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..