नवीन लेखन...

कालचक्र

यंदा “नववर्ष संकल्प” बराच काळ टिकला होता त्याचा.
रोज संध्याकाळी न चुकता सोसायटीच्या आवारात चालायला जायचा.
वय पन्नाशीकडे आणि वजन ऐंशीकडे झुकल्यामुळेही असेल कदाचित.
त्याच वेळेस खालच्या मजल्यावर राहणारे नवरा-बायको सुद्धा यायचे चालायला.
नेहमी हसतमुख असणारं ते जोडपं ..
याच्यापेक्षा जेमतेम “अर्ध्या” पिढीने मोठं असेल.
दादा-वहिनी म्हणा हवं तर ..
पण हा गेले काही दिवस बघतोय ; त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात उत्साह नाही.
बरेचदा लांब एका कोपऱ्यात उभं राहून शांतपणे बोलत बसायचे.
चालण्यात सुद्धा नेहमीसारखा व्यायामाचा आवेश नाही.
संथपणे चालायचे .. नाहीतर एकदम गप्प गप्प.
काहीतरी बिनसलंय हे त्याला जाणवत होतं पण विचारणार कसं?.
उगाच भोचकपणा करणं योग्य वाटत नव्हतं.
एके दिवशी थोडं फार चालून दोघं तिथल्या बाकावर बसले.
त्यांना बघून हा सुद्धा लगेच बाजूला कठड्यावर जाऊन बसला घाम पुसत.
त्याचा अतिशय बोलका आणि हसत खेळत स्वभाव ..
बोलता बोलता गप्पांची गाडी दांपत्याच्या सध्या उदास असण्यापर्यंत आली.
विषय निघताच वहिनी एकदम म्हणाली ..
“ अरेss .. मुलगा परदेशात शिकायला जायचं म्हणतोssय !! लहान असताना पासूनचं खूळ अजून काही गेलं नाही डोक्यातून !!”
“ अच्छाss बरं बरं ! .. मग तुम्हाला काय वाटतंय ??
“ त्याच्या भविष्याच्या दृष्टीने चांगलं असेल तर हरकत नाही .. पण sss.!!” .
“ पण काय ? काही आर्थिक अडचण वगैरे आहे का ?
“ हो ..तसं सोपं नाहीये..पण इकडून तिकडून काहीतरी करून ती सुद्धा व्यवस्था होईल “…… दादा म्हणाला
“ मग इतके निराश का आहात तुम्ही दोघे ?”
“ अरे .. एकुलतं एक पोरगं निघून गेलं तर पुढे आमचं काय ? ही आजकालची मुलं एकदा गेली की कायम तिकडचीच होतात. यायचं नाव घेत नाहीत परत. बघतो ना आपण आजूबाजूला कित्येक उदाहरणं. मग आमचं म्हातारपण असं एकट्यानीच घालवायचं ?? तोच घोर लागलाय बघ आमच्या जीवाला “
“ हे बघ वहिनी , तू म्हणतेस ते बऱ्याच अंशी खरं असलं तरी सरसकट असंच असतं असं काही नाही .. मला कल्पना आहे की इतक्या लांबून पटकन उठून येणं शक्य होत नाही पण तो अगदीच तुम्हाला विचारणारच नाही वगैरे असं गृहीत धरणं म्हणजे आपण आपल्या मुलांवर केलेल्या संस्कारांवरच शंका घेण्यासारखं आहे ना ? आणि सगळ्या शक्यतांचा विचार करायचा म्हणून तुम्ही म्हणता तसं जरी घडणारच असेल तर त्यासाठी परदेशात जायला हवं अस थोडंच आहे. एकाच घरात राहून आईवडिलांना न विचारणारी किंवा सुस्थिती असूनही वृद्धाश्रमात ठेवणारी मुलं सुद्धा बघतो की आपण आजूबाजूला !”
“ हम्मम्म .. तू म्हणतोस ते ही बरोबर आहे म्हणा !”
“ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या चिरंजीवांनी घेतलेला परदेश गमनाचा ध्यास. ज्यांना कामासाठी , नोकरी निमित्त वगैरे परदेशात जावं लागतं त्यांचं एकवेळ ठीक आहे पण ही अशी शाळेत असल्यापासून इंग्लंड-अमेरिकेत जायची स्वप्न बघणारे , त्याच विचारांनी पछाडलेले गडी असतात ना ss ते काहीही झालं तरी परदेशात जाताsssतsच. माझ्या कितीतरी जवळच्या मित्रमंडळींवरून सांगतोय मी हे. आणि मग तो “जाणार म्हणजे जाणारच” अशी परिस्थिती असेल तर तुम्हीही ते आनंदाने स्वीकारा आणि कौतुकाने पाठवणी करा लेकाची. म्हणजे त्याला सुद्धा आपण आई बाबांच्या इच्छेविरुद्ध जातोय म्हणून अपराधी वाटणार नाही आणि त्याच्या आनंदात जर तुम्ही सहभागी झालात तर तुमच्या मनावर आलेलं हे दडपण सुद्धा राहणार नाही !!”
“ हा म्हणतोय त्यात तथ्य आहे हं बायको !!” .. दादा म्हणाला
“ बाकी उत्तम पालक म्हणून ‘काळजी आणि कर्तव्य’ याची सांगड घालत तुम्ही योग्य ते सगळं करालंच .. ठिकाण निवडणं , राहायची-जेवायची व्यवस्था, शैक्षणिक दर्जा, सोबत राहणारे वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या त्या क्षेत्रातल्या तज्ञांशी सल्लामसलत करूनच ठरवणारच. राहता राहिला प्रश्न तुम्हाला वाटणाऱ्या चिंतेचा तर सगळं काही चांगलंच होईल असा विचार करायचा आणि पुढे जायचं !!”
दोघांच्या डोक्यात नवविचारांचं बीज पेरून तो निघून गेला.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी नेहमीप्रमाणे जोडपं आलं .
पण आज त्यांची देहबोली एकदमच बदलली होती.
प्रसन्न चेहेरे .. तोच पूर्वीचा उत्साह.
रोज चालून झाल्यावर पुढचा बराच वेळ याच्याशी गप्पा रंगू लागल्या.
व्हिसाची गडबड , इतर कागदपत्रं , कपडे खरेदी , बॅगेचं वजन , सोबत पाठवायची लोणची-मसाले वगैरे अशा कुठल्या ना कुठल्या गोष्टीबद्दल दोघेही अगदी हिरीरीने सांगायचे.
त्याच्या तयारीसाठी काय करू आणि काय नको असं झालं होतं ..
परदेशी जाणाऱ्या मुलाच्या उत्साही पालकाच्या भूमिकेत अगदी पूर्णपणे शिरले होते ते.
काही महिन्यांनी संध्याकाळी भेटले तेव्हा वहिनी अगदी आनंदाने सांगू लागली.
“ त्याचं सगळं छान सुरू आहे आता , व्यवस्थित बस्तान बसलं .. खुश आहे अगदी लेकरू.. आणि आम्हाला सुद्धा खूप समाधान वाटतंय. हे सगळं तुझ्यामुळे, तू त्या दिवशी इतका छान सल्ला दिलास म्हणून शक्य झालं रे ….मनावरचं मळभ एकदम दूर झालं. आम्हाला दोघांनाही तुझ्यासाठी काहीतरी करावसं वाटतंय अगदी मनापासून .. तूच सांग , काय करू तुझ्यासाठी की छानसं गिफ्ट देऊ ??
“ अगदी अगदी नक्कीच !!” .. दादाचंही अनुमोदन
“ अरे काय तुम्ही? .. उगाच मला इतकं मोठं करताय ? तुम्ही नीट आठवा तेव्हाचं आपलं संभाषण. मी मुळात काही सल्ला दिला नाही की कुठलं तत्वज्ञान सांगितलं नाही. तुम्हाला जो निर्णय घ्यायचा होता पण तुमचं मन धजावत नव्हतं .. तोच मी केवळ पुढे ढकलला. तोच निर्णय घ्यावा लागणार हे तुम्हालाही मनातून चांगलंच ठाऊक होतं .. तेव्हा घेणारच आहात तर मग तो निर्णय आनंदाने घ्या इतकंच मी सांगितलं फक्त …. तेही मी रेषेच्या या बाजूला आहे म्हणून त्यावेळेस मला ते सांगणं सोपं होतं . तुमच्या जागी तुम्ही तेव्हा योग्यच होतात हो ss !!” …..त्यामुळे हे माझ्यासाठी काहीतरी करण्याचं , गिफ्ट वगैरे देण्याचं डोक्यातून काढून टाका बरं आधी !!.
“ असं नाही रे पण तरीही sss !!”
“ हांss करायचंच असेल तर एक करा … आज माझा मुलगा नववीत आहे .. अजून ५-७ वर्षांनी मी आणि माझी बायको कदाचित कुठल्यातरी कोपऱ्यात असेच उदास बसलेले असू .. कदाचित आमचीही तेव्हा द्विधा मनस्थिती असेल. शेवटी कालचक्र आहे ते. कोणी सुटणार नाही त्यातून. तेव्हा मात्र आम्हाला दिशा द्यायला, आमचं मनोबल उंचावायला नक्की याss … याल ना ?? …….. हो यालंच .. कुणाला तरी यावंच लागेल .. कालचक्र आहे ते !!”
–– क्षितिज दाते.
ठाणे.

Avatar
About क्षितिज दाते , ठाणे 77 Articles
केवळ एक हौस म्हणून लिखाण सुरू केलं . वेगवेगळ्या विषयांवर पण साध्या सोप्या भाषेत लेखन . आकाशवाणीवरील कार्यक्रमात काही लेखांचं प्रसारण झालं आहे .काही लेख/कथा पॉडकास्ट स्वरूपात देखील प्रसारित झाल्या आहेत . Snovel या वेबसाईट / App वर "सहज सुचलं म्हणून" या शीर्षकाखाली तुम्ही ते पॉडकास्ट ऐकू शकता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..