नवीन लेखन...

फ्रान्सच्या स्वातंत्र्यसंग्रामातील रणरागिणी जोन ऑफ आर्क

फ्रान्सच्या स्वातंत्र्यसंग्रामातील रणरागिणी

फ्रान्सच्या एका लहानशा खेड्यात १४१२ साली जन्मलेली एक मुलगी मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी अल्पवयात जगातील महान योद्ध्याची भूमिका बजावून इंग्रजांशी लढा देता देता आपल्या प्राणाची आहुती देते, ही घटना आश्चर्यकारक आणि प्रेरणादायी वाटते. जोन ऑफ आर्कचे अल्पवयीन परंतु चित्तथरारक आयुष्य युरोपच्या इतिहासातील एक चिरंतन स्वरूपाचे झगमगते पान आहे. फ्रान्स या आपल्या परमप्रिय जन्मभूमीच्या स्वातंत्र्यासाठी प्रत्यक्ष रणांगणावर जाऊन पुरुषी वेशात शत्रूच्या सैन्यात कापाकापी करणारी रणरागिणी जोन ऑफ आर्क हिचे कर्तृत्व भल्याभल्या सैनिकांना, सेनाधिकाऱ्यांना आणि राजेमहाराजांना लाजविणारे आहे.

इ.स. १४१२ मध्ये जेव्हा जोन ऑफ आर्कचा जन्म झालेला होता, तेव्हा फ्रान्स हे एक पराभूत आणि असंतुष्ट लोकांचे राष्ट्र होते. फ्रान्सवर इंग्रजांची अनेक वर्षांची सत्ता होती. इंग्रजांची सत्ता झुगारण्याची ताकद नसलेल्या फ्रान्समध्ये तेव्हा कुणीही राजा वा समर्थ नेता नव्हता. अशा सत्त्वहीन फ्रान्सच्या इतिहासात त्या वेळी डुमरेमाय (Domremy) या खेड्यात जोन ऑफ आर्क १२ वर्षे वयाची असताना तिच्या कानात विविध संतांचा आवाज घुमत असे. ते संत तिला सांगत असत की, तिच्या देशाला जर कुणी वाचवू शकणार असेल तर तीच! हे स्वतः जोन ऑफ आर्कनेच सांगितलेले आहे.

तिच्या कानात संतांच्याद्वारे घुमणारा आवाज हा भास नसून सत्यच आहे, हे वयाच्या सतराव्या वर्षी तिने आपल्या मनाशी निश्चित केले. ती फ्रान्सचा भावी राजा असलेल्या सातव्या चार्लस्ला भेटण्यास गेली. आपणास किमान एक तरी संधी देण्याची त्या राजाला तिने विनंती केली.

चार्लस् सातवा, यास जोन ऑफ आर्कच्या दैवी शक्तीची खात्री पटल्यावर त्याने तिला सैनिकांच्या तुकड्यांची सोबत देऊन कॅप्टन म्हणून नेमणूक करून ऑरलिन्स (Orleans) शहराची इंग्रजांच्या ताब्यातून सुटका करण्यासाठी दूर पाठविले. वस्तुतः ही कामगिरी बजावणे ही गोष्ट पूर्णपणे अशक्यप्राय अशीच होती. फ्रेंच सैनिकांच्या तुकड्यांची संख्या अत्यंत मर्यादित होती.

संख्येने कमी असलेल्या त्या सैनिकांना ऑरलिन्स शहराचे संरक्षण करण्याबाबत यत्किंचितही विश्वास वाटत नव्हता. त्यांच्या ठायी कोणताही आशावाद नव्हता. निराशेनेच ते ग्रासलेले होते.

आणि हीच नेमकी अशी वेळ होती, की जेव्हा जोन ऑफ आर्क ही स्वातंत्र्यलढ्यासाठी योद्ध्यांच्या पुरुषवेशात घोड्यावर स्वार झालेली होती.एकूण सर्व परिस्थितीचा अत्यंत चातुर्याने तिने आढावा घेतला होता. विलक्षण शांत चित्ताने आणि थंड डोक्याने तिने आपल्या सैनिकांचे नेतृत्व करून पाहणाऱ्यांचे श्वासच रोखतील असे शौर्य दाखविले. त्या शतकातील आश्चर्याने थक्क करायला लावणारा (ऐतिहासिक स्वरूपाचा) रणांगणातील लष्करी विजय जोनने मिळवून दाखविला होता. तिचा हा विजय चार्लस्ला आणि लष्करी अधिकाऱ्यांनाही स्तंभित करून गेला. अनेकांना तर जोनचा विजय म्हणजे एक अद्भुत चमत्कारच वाटला.

परंतु ऑरलिन्सचा विजय हा अनेक विजयांच्या मालिकेतील प्रथम क्रमांकाचा एक होता, असे जोन ऑफ आर्कने दाखवून दिले. पुढील वर्षात अनेक शहरांना शत्रूच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी तिने लढाया करून विजय संपादन केला होता. अखेर शेवटी सातव्या चार्लस्ला तिने फ्रान्सचा राजा म्हणून गादीवर बसलेले पाहिले.

दुर्दैवाने फ्रान्सची अत्यंत प्रसिद्ध सेनानी म्हणून जोनची कारकीर्द अल्पकालीनच ठरली. ऑरलिन्समधील विजयानंतर केवळ एक वर्षाने इंग्रजांनी जोनला जेरबंद केले. परंतु इंग्रजांच्या कैदेत असतानाही जोनने रणांगणावर दाखविले तसेच शौर्य दाखविले होते. इंग्रजांनी तिला कैदेत साखळदंडांनी बांधून ठेवून सातत्याने तिच्यावर अनेक प्रश्नांचा भडिमार केला होता. तिचा तुरुंगात इतका शारीरिक छळ करण्यात अ आला, की ती अत्यंत अशक्त होऊन मरणोन्मुख झाली.

जोनने अशाही अवस्थेत इंग्रजांच्या तुरुंगातून निसटून जाण्याचा प्रयत्न केला होता. तुरुंगाच्या मनोऱ्यावरून खूप खोलवर तिने उडीही घेतली. परंतु तिला पुन्हा पकडण्यात आले आणि तुरुंगात डांबण्यात आले.

जोनमधील अलौकिक दैवी अंशाची जाणीव तुरुंगाधिकाऱ्यांना झालेली होती. त्यामुळे तिचा संतांशी कोणत्याही संबंध वा नाते नसल्याचे तिच्याकडून जबरदस्तीने वदवून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु कोणी कितीही वा कसाही छळ केला तरी संतांशी आपले नाते आहे यावर असलेला आपला विश्वास आपण नाकारणार नाही, असे जोनने तुरुंगाधिकाऱ्यांना सांगितले. पुरुषवेश परिधान करण्याचा आपला हक्कच आहे, असे तो अट्टाहासाने सांगे. त्याचप्रमाणे आपल्या देशाच्या रक्षणासाठी सैनिकाचा पोषाख घालणे हा आपला अधिकार आहे, असेही तिने सांगितले. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. तिला देहान्ताची शिक्षा झाली.

जोनला जिवंत जाळण्यात आले. या आग्नदिव्यातून जाताना तिने उंचावर क्रॉस धरून मृत्यूनंतरच्या मुक्तीचे मंत्र मोठ्याने ओरडून म्हणण्यास डॉमनिकन साधूंस सांगितले. भडकणाऱ्या ज्वालांच्या रोरावणाऱ्या आवाजावर त्या मुक्तीच्या आश्वासक मंत्रांनी मात करावी, अशी तिची इच्छा होती.

जेव्हा जोनला जिवंतपणी प्रत्यक्षात अग्नी दिला गेला तेव्हा एक पांढरे कबुतर फडफडत त्या आग्नज्वाळांतून तिच्या आवडत्या फ्रान्स देशाच्या दिशेने उडत गेल्याचे सर्वांना दिसले, असे सांगितले जाते.

जोनची नाचक्की करण्याच्या हेतूने जोनला जिवंत जाळण्याची शिक्षा देण्यात आली होती. परंतु तिला शिक्षा देणाऱ्यांचा हेतू सफल झाला नाही, झाले ते उलटच! तिला दिलेली शिक्षा ही चुकीची होती, हा निर्णय तिला शिक्षा दिल्यानंतर वीस वर्षांनी जाहीर झाला होता. १९२० साली तर चर्चच्या निकषांनुसार जोन ऑफ आर्क ही संत म्हणून जाहीर करण्यात आली आहे.

जोन ऑफ आर्क ही जशी रणरागिणी होती, तशीच ती गरिबांच्या दृष्टीने अतिशय उदारवृत्तीची आणि दयाधर्म करणारी अशी निःस्वार्थी व्यक्तिमत्त्वाची होती. लढाई करताना तिच्या ठायीची करूणा वा सहृदयता तिला सोडून गेलेली दिसे. शत्रूचा निःपात ती अत्यंत क्रूरपणे वा कडवटपणे करीत असे.

जोनची शारीरिक शक्ती आणि सहनशक्ती म्हणजे दंतकथाच आहे. लढताना ती अनेकदा जखमी व रक्तबंबाळ होत असे; परंतु रणांगणातून हटण्यास ती कधीही तयार नसे. जखमी अवस्थेत रणांगणातून तिच्या हितचिंतकांना तिला नाइलाजाने दूर न्यावे लागत असे.

जोन ऑफ आर्कच्या जीवनावर इंग्रजीत एक चित्रपटही निघाला आहे. अद्भुत, वीरतायुक्त आणि अनन्वित छळाला सामोऱ्या गेलेल्या तिच्या एकूण जीवनाचा विचार करताना आपणास झाशीची राणी, संभाजी महाराज, वीर सावरकर आणि अनेक क्रांतीकारक जोनच्या व्यक्तिमत्त्वात एकवटलेले आढळतात.

(व्यास क्रिएशन्स् च्या ‘जगावेगळ्या’ ह्या पुस्तकातील प्रा. अशोक चिटणीस ह्यांचा हा लेख)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..