नवीन लेखन...

जीवनाची गुणवत्ता !

१९५० पासून जीवनाची गुणवत्ता आणि त्याची मोजदाद याबाबत मानसशास्त्रात विचारमंथन सुरु आहे. प्रत्यक्षात २००३ मध्ये जॉन फ्लॅनागन (John Flanagan) या अमेरिकन मानस शास्त्रज्ञाने एक प्रश्नावली सुचवली-

समाधान, आयुष्यावरील नियंत्रणाची भावना , सहभाग, बांधिलकी (वचनबद्धता), दैनंदिन जीवनात कामाचा समतोल इत्यादी घटकांबाबत एखाद्याचे व्यक्तिगत आकलन काय आहे, मूल्यांकन काय आहे हे घटक जीवनाची गुणवत्ता मोजण्याच्या प्रक्रियेत महत्वाचे ठरतात.

कामाबाबतचे समाधान या प्रश्नावलीत हवे असेल तर समाविष्ट करता येईल कारण जेथे आपण नोकरी /व्यवसाय करतो तेथेही दिवसातील बराच मोठा वेळ (१०-१२ तास ) आपण घालवीत असतो. हा घटक त्यामुळे अनिवार्य ठरतो. साधारण आजच्या युगात आपण २५ व्या वर्षी शिक्षण संपवून नोकरीस लागलो आणि अंदाजे ६० व्या वर्षी सेवानिवृत्त झालो असे गृहीत धरले तर ३५ वर्षातील एक तृतीयांश काळ ( दिवसाच्या २४ तासांपैकी ८ तास धरूया ) म्हणजे १२ वर्षे, त्यातही रजा /सुट्ट्या वजा केल्या तरी किमान १० वर्षे आपण कोठेना कोठे नोकरी करीत असतो. हा केव्हढा मोठ्ठा काळाचा तुकडा झाला नाही? आजच्या हिशेबाने आयुर्मान ७० वर्षे सरासरी धरले तर त्यापैकी चक्क १० वर्षे (म्हणजे एकूण १४ टक्के आयुष्य ) आपण कार्यस्थळावर घालवीत असतो. त्यामुळे कामाबाबतचे समाधान हा घटक महत्वाचा ठरतो. विशेषतः फार कमी मंडळी स्वतःच्या कामाबाबत आणि जेथे काम करतो त्या संस्थेबाबत, वरिष्ठांबाबत, कार्यपद्धतींबाबत संतुष्ट असतात.

अर्थात जीवनाची गुणवत्ता व्यक्तिनिष्ठ असते आणि ती सतत बदलत असते. जीवनाची प्रत्येकाची व्याख्या आणि समज वेगवेगळी असते. जगाकडे आणि स्वतः कडे बघण्याचा दृष्टिकोन हरघडी रंग बदलत असतो. बहुतांशीवेळी इतरेजन आपल्यापेक्षा अधिक सुखी , आनंदी ,समाधानी आहेत असं मानण्याकडे लोकांचा कल असतो- त्यांची दुःखे, संघर्ष ,अंतर्गत पडझडी याबाबत काहीही माहित नसले अथवा वरवरची माहिती असली तरीही हे निष्कर्ष घाईघाईने काढण्यात आपण समाधान मानतो. यालाच “कुंपणाच्या पलीकडील हिरवळ ” असे संबोधतात.

मानस शास्त्रात मात्र ही संकल्पना काहीशी अमूर्त आहे म्हणूनच तिची व्याख्या आणि मोजमाप आव्हानात्मक ठरते. एखाद्याच्या जीवनाची गुणवत्ता समजून घेण्यासाठी त्याच्या आसपासच्या परिस्थितीचे आकलन महत्वाचे ठरते. त्या व्यक्तीची जीवनमूल्ये ,त्या व्यक्तीचे अनुभवविश्व, त्याच्या तात्कालिक अथवा सार्वकालिक समजुती, त्याचे दृष्टिकोन इत्यादींचा विचार अपरिहार्य ठरतो.

गेल्या काही वर्षांमध्ये शारीरिक आणि मानसिक अवस्थांचा परिणाम माणसाच्या जीवनाच्या गुणवत्तेवर होतो असे दिसून आले आहे. त्यामुळे वैद्यकीय मोजमापापेक्षा मानस शास्त्रीय मोजमाप अधिक महत्वाचे ठरत आहे. दिवसेंदिवस सकारात्मकतेचे आकारमान घटताना दिसते आहे आणि त्या पोकळीत नकारात्मकता आपोआप भरली जात आहे. याचाच एक भाग म्हणून व्यक्तिनिष्ठ सकारात्मकता आणि समूहाची / समाजाची सकारात्मकता यांत अंतर पडू लागले आहे. “रामराज्य ” सारख्या संकल्पना खरेच संभवतात कां असे प्रश्न पडू लागले आहे.

सकारात्मकता हाच एक बहु पैलूंचा संच असल्याने त्याला शोभादर्शकाची (Kaleidoscope) उपमा देणे अधिक संयुक्त ठरेल. सारख्या बदलणाऱ्या देखाव्यातून विविध मनोहारी आकृत्या तयार होताना बघणे हे आनंदाचे निधान असते. त्यासाठी सभोवतालचे सामाजिक, राजकीय, मानसिक, बौद्धिक पर्यावरण विचारात घ्यावे लागते.

जीवनाची गुणवत्ता म्हणजे तुम्ही शोभादर्शकातून बघताना खालील घटकांचे अनुसंधान कसे जोडता यावर सारे अवलंबून असते –

१) मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य यांच्यातील सामंजस्य

२) नातेसंबंध- ताण, अधिकार, अतिक्रमणे इ

३) व्यक्तिगत विकास आणि सार्थकतेची संकल्पना

४) मौजमजा आणि फुरसतीचा वेळ सत्कारणी लावणे

५) समाजातील घटकांशी देवाणघेवाण

एवढे मात्र खरे- एखाद्यासाठी अंतर्गत शांततेची अनुभूती म्हणजे गुणवत्तापूर्ण जीवन अशी व्याख्या संभवते तर दुसऱ्यासाठी प्रयत्नपूर्वक काहीतरी यश साध्य करणे अशी असू शकते.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

2 Comments on जीवनाची गुणवत्ता !

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..