नवीन लेखन...

जीवन म्हणजे ‘भेळ’ आहे..

कोणत्या तरी एका नाटकामध्ये मी ‘जीवन म्हणजे भेळ आहे, सुख दुःखाचा मेळ आहे..’ हे गाणं पाहिलं होतं आणि मला ते पटलंही.
खरं तर आपण, साधारण मुरमुरे असतो. आई-वडील, भाऊ-बहीण, काका-आत्या, आजी-आजोबा, इत्यादी आप्तजणांचा फरसाण त्या मुरमुऱ्यात मिसळल्यावर ती साधी भेळ होते. नंतर त्यात चवीसाठी कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, पाणीपुरीच्या पुरींचा चुरा घातला जातो. अनुभवांचं चटकदार चिंचेचं पाणी मिसळल्यावर ती भेळ अधिक चवदार होते. त्यात आवडीनुसार हिरव्या मिरचीची चटणी आणि चवीनुसार मीठ घातल्यानंतरच भेळ टेस्टी होते. आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणींचे मोजकेच खारे दाणे व आंबट कैरीचे तुकडे टाकल्यावर चटकदार भेळ खाल्याचे ‘स्वर्गीय सुख’ लाभते.
भेळ हे सर्व सामान्यांना परवडणारं, टाईमपासचं खाणं आहे. त्यात दोन प्रकार, सुकी व ओली. सुकी हवी तेव्हा खाता येते, खाऊन उरली तर ठेवून देता येते. ओली भेळ मात्र एका बैठकीतच संपवावी लागते.
पूर्वी प्रत्येक सिनेमा थिएटरच्या बाहेर त्या थिएटरच्या नावाच्या भेळगाड्या मी पाहिलेल्या आहेत. जशा भानुविलास भेळ, विजय भेळ, प्रभात भेळ, आर्यन भेळ, इ. या गाड्या वर्षानुवर्षे त्याच थिएटरबाहेर उभ्या असायच्या. मंडईच्या टिळक पुतळ्याजवळ ओळीने भेळगाड्या उभ्या असायच्या, आता हे प्रमाण फारच कमी झालंय. नेहरु चौकात भेळ व फरसाणची दुकानं मोठ्या संख्येने आहेत. अल्पना टाॅकीजच्या अलीकडे देखील भेळीची मोठी दुकाने आहेत. या दुकानांच्या नावांमध्ये ‘गिरे’ हे आडनाव खूप ठिकाणी पाहिलंय. बहुधा भेळ व्यवसायात त्यांची मक्तेदारी असावी. वीस पंचवीस वर्षांपूर्वी भेळीच्या दुकानात मुरमुरे, भडंग, खारे दाणे, शेव, फरसाण एवढंच असायचं. आता त्यामध्ये चिलीमिली, कुरकुरे, बाॅबी, व्हील, केळीचे वेफर्स, सोयास्टीक, चकली, बाकरवडी, इ. ची भर पडली आहे.
पूर्वी सुटीच्या दिवशी बागेत गेल्यावर भेळ खाण्याचा सामूहिक कार्यक्रम असायचा. शनवार, नारायण, सदाशिवमधील कुटुंबं घरुनच भेळ घेऊन जात असत. सारसबाग, पेशवे पार्क, संभाजी उद्यान, शनवार वाडा पटांगण, पार्वती पायथा ही भेळीची केंद्रस्थानं होती. ओळीने स्टाॅल असले तरी प्रत्येकाला चांगली मिळकत होती. त्यांच्या जवळून जाताना ते भेळीच्या भांड्यामध्ये मोठ्या चमच्याने आवाज करुन ग्राहकांचे लक्ष वेधायचे.
चाळीस वर्षांपूर्वी टिळक रोडवरील माडीवाले काॅलनी चौकातील ‘कल्पना भेळ’ फार प्रसिद्ध होती. तिथं कोपऱ्यावर एक दाढीवाला माणूस भेळीची गाडी दुपारी चार वाजता लावायचा. पांढरी टोपी, पांढरा झब्बा व पायजमा अशा वेशभूषेत तो एकटा भेळीचा खाद्योत्सव चालवायचा. रात्री नऊपर्यंत त्याच्याकडे भेळीसाठी इतकी गर्दी व्हायची की, त्याचं तोंडही दिसत नसे. फडतरे चौकात एक भेळीचे दुकान होते. रविवारी त्याच्याकडे खूप गर्दी दिसायची. सदाशिव पेठेतील ‘पुष्कर्णी भेळ’ एकेकाळी फार प्रसिद्ध होती. जोंधळे चौकातील भेळीच्या अद्ययावत दुकानात कधीही गेले तरी खवय्यांची रांग लागलेली दिसते.
पासोड्या विठोबा मंदिराशेजारी एक मटकी भेळवाला फक्त संध्याकाळीच असायचा. त्याच्या हाताला अशी चव होती की, संध्याकाळी दोन तासात त्याचा मालच संपून जायचा. असे पोर्टेबल भेळवाले आता दिसायचे कमी झालेत.
पुणे सातारा हायवेवर खेड शिवापूर येथे पंचवीस वर्षांपूर्वी साध्या पत्र्याच्या शेडमध्ये ‘कैलास’ भेळीसाठी प्रवासी थांबायचे. वर्तमानपत्राच्या कागदावर चवदार भेळ व तोंडी लावायला तळलेल्या मिरच्यांसाठी ग्राहकांची गर्दी असायची. आज त्याच मालकाने भेळीच्या व्यवसायातूनच आलिशान हाॅटेल उभे केले आहे. भेळी बरोबरच पिठलं भाकरी पासून पिझ्झापर्यंत सर्व काही तिथं मिळतं.
अलीकडे भेळीची दुकानं कमी संख्येने दिसू लागली. भेळीला दुसरा पर्याय आला… वडापाव! जोशी वडेवाले, रोहित वडेवाले, एस. कुमार वडेवाले यांच्या अनेक ठिकाणी शाखा दिसू लागल्या. नाही म्हणायला ‘कल्याण भेळ’चा ब्रॅण्ड झालाय. शहरात त्यांच्या काही शाखा देखील आहेत.
शेवटी काहीही नवीन पर्यायी पदार्थ आले तरी देखील आपण दोन भेळींची ऑर्डर दिल्यानंतर भेळवाला मुठीने मुरमुरे त्या पातेल्यात टाकण्यापासून ते शेवटी मोजून चारच खारेदाणे भेळीवर टाकेपर्यंत त्याच्या हस्तकौशल्याकडे पहात राहण्यात जी मजा आहे, ती शब्दांत वर्णन करणे अशक्य आहे. तो जेव्हा तिखट विचारतो तेव्हा ‘चिक्कार’ म्हणण्याची इच्छा असूनही घाबरून आपण ‘मिडीयम’ म्हणतो. पूर्वी भेळ ग्लाॅसी कागदावर मिळायची. भेळ खाण्यासाठी जाड कागदाचे चौकोनी तुकडे मिळायचे, जे भेळ खाऊन संपण्याआधी ओले होऊन लेचेपेचे व्हायचे. आताची भेळ पेपरप्लेट किंवा द्रोणामध्ये, प्लास्टीकच्या चमचासह मिळते.
अरे हो, माझं हे भेळ पुराण तुम्हाला सांगेपर्यंत, मी ऑर्डर दिलेली भेळ तयार झाली आहे… आता मी तिचा समाचार घेतो, तुम्हाला जर सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही आत्ताही येऊ शकता…
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२२-९-२०.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

2 Comments on जीवन म्हणजे ‘भेळ’ आहे..

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..