नवीन लेखन...

जीव

“अरे ए, थांब थांब. आजोबांना आधी इथे बाकावर बसव दोन मिनिटं.”
गृहसंकुलाच्या आवारात चालता चालता चिंटूच्या आजोबांचा पाय सटकला आणि ते एकदम खालीच बसले. तिथेच फिरणारे काही शेजारीपाजारी लगेच आले आणि त्यांना बाजूच्या बाकावर बसवलं. हे सगळं बघून जवळच मित्रांसोबत खेळणारा लहानगा चिंटू धावत आला.

“काय झालं काका ?? आजोबा पडले का ?? ”
“अरे फार काही नाही बाळा. त्यांचा थोडा पाय मुरगळलाय बहुतेक. तू जा खेळायला बिनधास्त. आम्ही दोघे नेतो तुझ्या आजोबांना घरी व्यवस्थित!”.
असं म्हणत ते दोघे आजोबांच्या सेवेत रुजू झाले.
“आजोबा ss खांद्यावर हात ठेवा माझ्या. आणि तू त्याबाजूने धर रे त्यांना.!”

अशा खेळीमेळीच्या वातावरणात आणि एकमेकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर अशा शेजाऱ्यांच्या गोतावळ्यात चिंटू आणि त्याचा परिवार राहायचा. शेजारधर्माच्या बाबतीत चिंटूचे आई-बाबा सुद्धा तितक्याच आपुलकीने सगळ्यांच्या मदतीला धावून जायचे. अगदी रात्री अपरात्री जरी कोणाला काही लागलं तरीही. नुसते शेजारीपाजारीच नाही तर चिंटूचे सगळे नातेवाईक सुद्धा एकमेकांना धरून होते. अधून मधून चिंटूच्या आजी-आजोबांना काही बरं नाहीसं झालं ; वयोपरत्वे छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया वगैरे झाल्या तरी नातेवाईक आणि सोसायटीतले सगळे जण ताबडतोब मदतीला, विचारपूस करायला यायचे.

“आजोबांना इथे बसू दे, अमुक करू या म्हणजे आजींना त्रास होणार नाही, आजोबांसाठी हे आणू का? ते करू का ? अशा एक ना अनेक प्रकारांनी जो तो आपापल्या परीने काळजी घ्यायचा..
वर्ष सरत होती. चिंटू आता बऱ्यापैकी मोठा झाला होता आणि ओघाने आजोबा तितकेच वयस्कर. एके दिवशी आजोबांना कसलासा त्रास होऊ लागला. हॉस्पिटल मध्ये न्यावं लागणार होतं. लिफ्ट नसलेल्या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर चिंटूचं घर. पण नेहमी प्रमाणे सगळी मंडळी हजर.
“खुर्चीवर बसवून नको. त्रास होईल आजोबांना. आडवं करूनच नेऊ त्यांना खाली!”
“हे बघ तू पायाकडून धर आजोबांना. आपण हळूहळू नेऊ अगदी!”.
“तू मामाची ही उशी घेऊन बस !”
“थांब आता आजोबांना कमरेतून धरू म्हणजे नीट नेता येईल!”.
“तू गाडीचा दरवाजा उघड आणि आजोबांना त्या बाजूने आत घे!”
असं प्रत्येक मजल्यावर मजल दरमजल करत अगदी अलगदपणे काही नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी आजोबांना गाडीत बसवलं. वेळेत इस्पितळात दाखल केलं आणि उपचार सुरू झाले.

पुढचे काही दिवस आजोबा तिथेच होते पण उपचारांना फारसा प्रतिसाद देत नव्हते. अखेर जे होऊ नये असं सगळ्यांना वाटत होतं तेच घडलं. चिंटूच्या बाबांचा हॉस्पिटलमधून फोन आला. आजोबा गेल्याची दुःखद बातमी देणारा. थोड्याच वेळात नातेवाईकांपैकी एक जण काही आवश्यक कागदपत्र घ्यायला घरी आला.
“काय रे ? आता पुढचं काय ??” – चिंटूच्या आईचा प्रश्न
“बॉडी ताब्यात द्यायला थोडा वेळ लागेल. काही फॉरमॅलिटीज बाकी आहेत. ते सगळं पार पडलं आणि “बॉडी” घेऊन निघालो की फोन करतो !“
नंतर काही कामासाठी चिंटू खाली उतरला होता तेव्हा शेजारचे एक काका फोनवर काकूंशी बोलत होते.
“अगं. . आता “बॉडी” आणतील ५-१० मिनिटांत त्यामुळे तु मुलांना शाळेतून आणशील तेव्हा मागच्या गेटने आत ये. कारण बॉडी मेन गेट जवळच ठेवतील. तसे लहान आहेत दोघेही. बॉडी आणि बाकीच्या गोष्टी बघून नसते प्रश्न विचारत बसतील उगाच! “
काही मित्रमंडळी पुढची तयारी करत होते. त्या घोळक्यातले एक आजोबा बाकीच्यांना सांगत होते.
“ते दिशा वगैरे आत्ताच नीट बघून घ्या रे. नाहीतर नंतर बॉडी ठेवल्यावर पंचाईत होईल.!”
चिंटू काम आटोपून वर घरी गेला. आजोबांना थोडावेळ घरी दर्शनासाठी ठेवून मग खाली आणलं. तीन मजल्यांची जिन्यातली कसरत होतीच. आता आधीपेक्षा जास्तच कठीण.

“मधून धरा, बॉडी मधून धरा रे नीट. जिन्यातून वळताना बॉडीला खालून आधार द्या. !” अशी व्यवस्थित काळजी घेत आजोबांना खाली आणलं. सर्वांनी आजोबांना अखेरचा निरोप दिला आणि ती “बॉडी” पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाली.

अंत्यविधी झाले. दिवसकार्य वगैरे सगळं आटपलं. ४-५ दिवसांनंतर चिंटूची आजी आणि बाबा जुन्या फोटोंचे अल्बम बघत बसले होते. चिंटूसुद्धा आला. फोटो बघता बघता एकदम बाबांना म्हणाला. ..
“बाबा ss बरेच दिवस सांगीन म्हणतोय पण सांगू की नको असं वाटतंय.!”
“काय रे ? सांग की मग !”
“मागे एकदा शेजारच्या विंग मधल्या काकू गेल्या किंवा अगदी आत्ता गेल्यावर्षी तुमची मावशी गेली तेव्हाच खरं तर मला हे थोडं खटकलं होतं पण आपल्या आजोबांच्या वेळेस मात्र अगदी प्रकर्षाने जाणवलं!”.
“कशाबद्दल बोलतोयस तू नक्की ?”.
“बघा ना बाबा ss. . जे सगळे काही वेळापूर्वी आजोबांना अमुक, आजोबांना तमुक असं म्हणत होते ते सगळे आजोबा गेल्याची बातमी समजताच त्यांना एकदम ‘बॉडी” म्हणू लागले.

“हम्ममम्. . अरे पण ते असं कुणी मुद्दामहून करत नाही. आपसूक म्हंटलं जातं !”.
“बाबा मला अगदीच माहिती आहे की असं म्हणणाऱ्या सगळ्यांनाच आजोबांविषयी खूप आत्मियता आहे. ते गेल्याचं दुःख देखील आहे पण मग असं म्हणायचंच का ?. आपल्या मनात आणि विचारात जर आपुलकी आहे तर बॉडी-बॉडी उल्लेख करून लगेच परकं का करून टाकायचं? आणि तुम्ही म्हणता तसं जर आपसूक होत असेल तर मग ते होऊ नये म्हणून प्रयत्न का नाही करायचा ? “
“बाळा. . ज्यात प्राण नाही असं ते अचेतन शरीर असतं म्हणून बॉडी म्हंटलं जातं. मराठीत आपण पार्थिव म्हणतो तसंच.!” – बाबा समजावण्याचा प्रयत्न करत होते.
“एग्झॅक्टली बाबा. तेच तर म्हणतोय मी. ती हयात नसलेली व्यक्ती अचेतन आहे. पण आपण तर सचेतन आहोत ना?. आपल्यात भावना शिल्लक आहेत ना अजून ? मग आपण भावनाशून्य असल्यासारखं बॉडी-बॉडी का म्हणायचं?” मला कल्पना आहे की त्यांचा “आजोबा” असा उल्लेख करून वास्तव बदलणार नाहीये. ते पुन्हा आपल्यात येणार नाहीयेत. पण तरीही. ….
चिंटूच्या बोलण्यात तथ्य असल्यामुळे निरुत्तर झालेले बाबा फक्त ऐकत होते. चिंटू मात्र मन मोकळं करत बोलतच होता.

“हां ss. . हॉस्पिटलमधले-स्मशानातले कर्मचारी किंवा ज्यांना ती गेलेली व्यक्ती माहितीच नाही अशा अन्य तिऱ्हाईत व्यक्तींनी बॉडी म्हणून संबोधलं तर मी एकवेळ समजू शकतो पण काही क्षणांपूर्वी आजोबा, काका, मामा, दादा, भाऊ वगैरे म्हणणारे पुढच्या क्षणाला बॉडी म्हणायला लागतात हे काही पटत नाही मला. आणि हे सगळं जर सजीव-निर्जीव च्या चौकटीत अडकून होत असेल तर आता हा फोटोच बघाना ss. . म्हंटलं तर आजोबांचा चेहरा छापलेला एक कागदाचा निर्जीव तुकडा. पण तो बघून आपल्या डोळ्यात पाणी येऊ शकतं. आजोबांच्या एखाद्या वस्तूला कवटाळल्यावर आजोबांनाच मिठी मारतोय असं वाटू शकतं. म्हणजेच त्या निर्जीव फोटो आणि वस्तूंना आपण नुसत्या आठवणींनी सजीव करू शकतो. मग त्यादिवशी ते समोर असलेलं शरीर तर स्वतः आजोबांचं. ते सुद्धा काही वेळात पंचत्वात विलीन होणारच आहे. मग त्याला झटक्यात बॉडी बॉडी म्हणत आधीच अंतर द्यायचं ?. त्या शरीरात त्यावेळेस प्राण नसला, जीव नसला तरीही आपल्या सगळ्यांचाच त्यांच्यावर खूप जीव होता ना.? तो देह त्यावेळेस निर्जीव असला तरी त्या व्यक्तीबरोबरचं आपलं नातं आजही सजीव आहे ना ? – चिंटू फार कळकळीने बोलत होता.
बापलेकाचा हा सगळा संवाद ऐकून आत स्वयंपाकघरात असलेल्या आईचे डोळे पाणावले. नातवाचे विचार ऐकून भावूक झालेली आजी उठली आणि चिंटूला कवटाळून घेतलं.
“लहान लहान वाटणारा माझा चिंटू. किती मोठा झालास रे ? खरं तर किती साधी गोष्ट पण त्यामागे इतका विचार केलास तू !”
बाबा मात्र अजूनही निःशब्द.
“सॉरी बाबा. . तुम्हाला लहान तोंडी मोठा घास वाटलं असेल कदाचित पण जे मनात आलं ते व्यक्त झालो फक्त!”.
आता मात्र बाबांनी चिंटूचा हात घट्ट धरला.
“अरे नाही रे सोन्या. उलट तू एक चांगला विचार दिलास. मनात ओलावा असताना शब्दात कोरडेपणा का आणायचा हे मनोमन पटलं बघ. आमच्या पिढीच्या सगळ्यांनीच विचार करावा असा सकारात्मक मुद्दा मांडला आहेस तू चिंटू!” खरं आहे बाळा, जे विधिलिखित आहे ते कोणीही टाळू शकत नाही पण जाणाऱ्या व्यक्तीला निरोप देताना अनावधानाने होणारे असे उल्लेख जरी टाळले तर ते जास्त योग्य ठरेल. आपला “जीव असणं” आणि “जीव नसणं” हे नियतीच्या हातात आहे पण जीवात जीव असेपर्यंत महत्वाचं आहे ते तुझ्यासारखं हे असं “जीव लावणं” !

— क्षितिज दाते, ठाणे

Avatar
About क्षितिज दाते , ठाणे 77 Articles
केवळ एक हौस म्हणून लिखाण सुरू केलं . वेगवेगळ्या विषयांवर पण साध्या सोप्या भाषेत लेखन . आकाशवाणीवरील कार्यक्रमात काही लेखांचं प्रसारण झालं आहे .काही लेख/कथा पॉडकास्ट स्वरूपात देखील प्रसारित झाल्या आहेत . Snovel या वेबसाईट / App वर "सहज सुचलं म्हणून" या शीर्षकाखाली तुम्ही ते पॉडकास्ट ऐकू शकता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..