नवीन लेखन...

जाणिवांची अंतरे (कथा)

‘Application rejected..!’

भाऊच्या जामीन अर्जावरील कोर्टाचा आदेश वाचल्यावर ‘बेल मिळणार नाही!’ हे माहीत असूनही माझी निराशा झाली..

‘स्वतःचं सगळं आयुष्य ज्या माणसाने समाजासाठी समर्पित केलं, त्याच समाजाने त्याच्या पाण्यासारख्या निर्मळ चारित्र्यावर शिंतोडे का उडवावेत? जीचं आयुष्य सावरण्यासाठी भाऊंनी इतका संघर्ष केला, तिनेच त्यांच्यावर बलात्कारासारखा घाणेरडा आरोप का लावावा..?’, याचा विचार करुन करुन माझं डोकं खराब झालंय..माणसाच्या बदलत्या तऱ्हा आणि समाजाच्या निरनिराळ्या भूमिका समजून घेतांना माझा गोंधळ उडाला आहे..खरं म्हणजे, भाऊवर गुन्हा दाखल झाल्यापासून ‘हे असं का?’ ह्या तीन शब्दांनी मला व्यथित केलंय.

पण, भाऊ वर याचा काही फारसा परिणाम झाल्याचा दिसला नाही. वरवर काही दाखवत नसला तरी, कदाचित तो मनातून हादरला असेल..! किंवा, याही घटनेचा नेहमीप्रमाणे त्याने कुठलातरी अन्वयार्थ लावून घेतला असेल..! भाऊ आहेच तसा..!! प्रत्येक घटनेला आपल्या स्व तत्त्वज्ञानाच्या कक्षेत बसवून तिचा मनाजोगा अर्थ काढणं त्याला चांगलंचं जमतं. शिवाय समाजाचा आणि त्यातील माणसांचा त्याला इतका अभ्यास आहे की त्याचा आखाडा सहजासहजी चुकतच नाही. विचार करून करून संभ्रमित अर्जुनासारखी अवस्था होते ती फक्त माझीच!

भाऊ आणि माझी ओळख साधारण दहा वर्षापूर्वीची. त्या वेळी मी नुकताच वकिलीचा व्यवसाय सुरू केला होता. सुरुवातीला फारशी काम मिळतच नसत. कामाचा शोध हाच खरा व्यवसाय असायचा. एक दिवस कोर्टात रिकामा बसलो असताना भाऊ माझ्या टेबल समोर येऊन उभा राहिला. त्याला कुणाची तरी जमानत करायची होती. पण त्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. मी हे काम सामाजिक दायित्व म्हणून स्वीकारावं, असा त्याचा आग्रह होता.

“मी इथं समाजकार्य करायला बसलेलो नाही..!”

सरळ आणि स्पष्ट शब्दात मी त्याला सुनावलं. पण त्याचा त्याच्यावर काहीच असर झाला नाही.  आपल्या मधाळ शब्दात त्याने मला समजाविण्याचा प्रयत्न सुरू ठेवला.

“साहेब तो एक सत्तर वर्षाचा वयोवृद्ध माणूस आहे.. सकाळपर्यंत त्याची माझी साधी ओळखही नव्हती. पोलीस त्याला ज्या बसमधून तुरुंगात नेत होते योगायोगाने मी त्या बस मध्ये चढलो.. त्याच्या शेजारी बसल्यावर मीच त्याची चौकशी केली. त्याची हकिकत हृदयद्रावक आहे. एका रूमच्या घरांमध्ये सासू-सासर्‍याची अडचण होत असल्याने सुनेने सत्तर वर्षाच्या आपल्या सासऱ्यावरचं चोरीचा खोटा आळ घेतला अन त्याला तुरुंगात डांबलं. त्याची जमानात सोडा साधी चौकशी करायलाही कुणी गेलं नाही. दोन महिन्यापासून तो माणूस न्यायालयीन कोठडीत खितपत पडलेला आहे. त्याच्या पश्चात मागे राहिलेल्या त्या म्हातारीचे काय हाल होत असतील, याची कल्पनाही मला करवत नाही. मी त्या व्यक्तीचा जामीनदार व्हायला तयार आहे..तुम्ही माणूसकीच्या नात्याने फक्त त्याचा जामीन अर्ज दाखल करा..साहेब या समाजाने आपल्याला एवढ दिलं त्याचं ऋण फेडण्यासाठी म्हणून का होईना, तुम्ही इतकं काम करा..”

भाऊच्या हकीकतीने मलाही विचारात टाकलं.. रिकामा बसण्यापेक्षा हे काम करायला काय हरकत आहे, असा विचार करुन मी त्यासाठी तयार झालो. दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीची जमानतही झाली. दहा- बारा दिवसात तो किस्सा माझ्या विस्मरणातही गेला. मात्र महिना होत नाही तोच एक दिवस भाऊ पुन्हा माझ्या टेबल समोर उभा. पुन्हा एक नवं समाज कार्य.. पुन्हा तेच त्याच ‘ समाज’ कीर्तन. याहीवेळी मी पुन्हा त्याच्या गळाला. भाऊ मुळे सहा महिन्यात चार समाजकार्य केल्याची नोंद माझ्याही नावे झाली. त्यानंतर मात्र मी खरोखरच वैतागलो. त्याच्या समाजकार्याला मी चांगलंच फैलावर घेतलं.

“ भाऊ तू नेहमी इतक्या सामाजिक दायित्वाच्या डिंगया मारतोस..हा समाज म्हणजे नेमकं काय ते तरी तुला माहीत आहे का? समाजाने तुला असं काय दिलं की त्याचं ऋण फेडण्यासाठी तू स्वतःच्या आयुष्यावर तुळशीपत्र ठेवण्याच्या गोष्टी करतोय. अरे तुझ्या ह्या कामाची साधी दखल घ्यायला तरी तुझा समाज तयार आहे का? ”

भाऊला आशा चर्चा फार आवडतात हे मला त्यावेळी माहीत नव्हतं. मोठ्या उत्साहाने त्याने उत्तर दिलं..

“अरे, समाज हा काय कुणी व्यक्ती आहे का? समाज म्हणजे आपणचं की..मग, आपण आपल्यासाठी काम केलं तर बिघडलं कुठे? आणि तू मला विचारतोस समाजाने आपल्याला काय दिलं? मित्रा, समाज आहे म्हणून आपण आहोत.. आणि आपण आहे म्हणून समाज आहे. तू आता वकील आहेस..तू काय जंगलात जाऊन प्रॅक्टिस करणार आहे का? आपल्याला समाजातचं रहावं लागलं..मग या समाजाला समृद्ध करायला नको का..समाजाच्या अडीअडचणी आपणचं समजून घ्यायला नकोत का? हे बघ, आपली जाणीव प्रगल्भ असली पाहिजे..”

“मान्य, पण सेवा करण्याचा ठेका आपणचं का घ्यायचा?”

“आपण कोण ठेका घेणारे..? जो तो त्याचं काम करतच असतो..शिक्षक मुलांना शिकवत असतात, डॉक्टर रोग्यांना सेवा देत असतो, बस ड्रायव्हर लोकांची ने-आन करत असतो, सफाई कामगार सफाई करतो, वकील न्याय मिळण्यात मदत करतो, नोकरदार प्रशासकीय व्यवस्था चालवतात, राजकारणी राजकीय व्यवस्था चालवतात. ही सगळी काम प्रामाणिकपणे केली तर समाज उपयोगीचं आहेत..मला अस वाटत की मी एक व्यक्ती म्हणून जगत असताना माझ्या गरजा भागवण्यासाठी इतरांनी केलेल्या कामाचा उपयोग मला होतो तसच मी पण इतरांची कुठलीतरी गरज भागवणारं काम कराव म्हंजे मग या देवाणघेवाणीतून समाज नावाची यंत्रणा चालू राहील.
आणि राहिला प्रश्न दखल घेण्याचा.. तर ती कधी ना कधी घेतला जातेच. तुम्ही चांगलं काम करत असाल तर समाज तुमच्या पाठीशी उभा राहतोच. इतिहासाचं पुस्तक उघडून पहा.. सगळी पान समाज सुधारकांच्या कर्तुत्वाने भरलेली तुला दिसतील!”

“ तुझा हाही युक्तिवाद खरा मानला भाऊ. पण मला सांग, तू म्हणतो त्या समाजात खरंच सगळे प्रमाणिकपणे काम करतात का? आजची समाजव्यवस्था, त्यांचे समज, रुढी, परंपरा,  नियम, वर्तवणूक हे सगळं तुला पटत का? ”

या प्रश्नावर मात्र भाऊचा चेहऱ्यावर विषाद उमटला.. तरीही त्याने आपले तत्त्वज्ञान मांडलंचं

“ असं आहे,  समाज म्हटला म्हणजे मत मतांतरे येणार, आवडी निवडी येणार आणि निरनिराळ्या प्रकृतीचे लोक सुद्धा येणारच आणि लोकांचे धार्मिक किंवा तात्विक विश्वास पण वेगवेगळे रहाणारच.. समाजात शारीरिक, आर्थिक आणि बौद्धिक उच्च नीचता सुद्धा रहाणारच … प्रत्येकाचे एक दुसऱ्याशी पटणे पण शक्य नाही..त्यासाठी तर कुणीतरी हे बदलण्यासाठी किंबहुना सुधारणा करण्यासाठी काम केलं पाहिजे. शेवटी बदल घडवणे हाही एक समाजकार्याचा भाग आहे.  नैतिक बदल घडविणे. तो बदल मग गरजू व्यक्तीच्या मुलभूत गरजा मिळण्याचा असू शकतो, पर्यावरणाच्या विकासाचा असू शकतो किंवा कोणाची वैचारिक पातळी सुधारण्याचा असू शकतो.
हे बघ, एकदा कशासाठी जगायचंय हे लक्षात आल्यावर कसं जगायचं हा प्रश्न उरत नाही..!”

भाऊंचा प्रतिवाद करणे खरंच अवघड आहे.. त्याची भूमिका आणि त्याचे विचार इतके सुस्पष्ट असतात की, आपले सगळे युक्तिवाद त्यासमोर थिटे पडतात. त्यानंतर भाऊंचा एक नैतिक प्रभाव माझ्यावर पडला.. भाऊच्या जिवनाचा एक एक पदर ही हळूहळू माझ्यासमोर उलगडत गेला..

भाऊच्या नजरेतुन एक नवा समाज मला कळू लागला. त्याचं म्हणणं बऱ्याच अंशी खरं होतं. त्याच्या कामाची खरोखरच दखल घेतल्या जात होती. हळूहळू समाज त्याला ओळखायला लागला.. त्याच्या कामाची कदर करू लागला.. त्याचा सन्मानही समाजाने केला.

पूर्वी मला वाटायचं की, समाजकार्य म्हणजे सर्व सुखवस्तूंचा त्याग करून समाजसेवा करणे. पण माझा हा समज लवकरच दूर झाला. माझे शिक्षण, कौशल्य, माझी मूल्ये व आवड या सर्वांची सांगड घालून कोणाचे हित होईल असे काम केलं तर ते सुद्दा सामाजिक काम असतं, हे मला उमगलं. आशा कामासाठी कोणताही मोठा त्याग करावा लागत नाही. उलट असे काम करत असताना आपलीच सर्वांगीण वाढ होते..जगण्याला एक अर्थ मिळतो, हा माझा समज दृढ होऊ लागला. पण समाज आणि समाजातली माणसं समजून घेताना मात्र माझा कायम भ्रमनिरास होत राहिला.

श्रद्धाचंच उदाहरण घ्या…
एक दिवस सकाळी सकाळी मला भाऊंचा फोन आला..
“ एका अल्पवयीन मुलीचा तिच्या मर्जीविरोधात विवाह केला जातोय..आपल्याला संबंधित यंत्रणेला सूचित करुन तो विवाह रोखायचा आहे..!”
एक पत्ता देऊन भाऊने फोन कट केला. पोलिसांना सोबत घेऊन मी तिथं गेलो तेंव्हा भाऊने आधीच लग्न विधी रोखून धरला होता. पोलिसांचा हस्तक्षेप आणि श्रद्धाचं रोखठोक बयान असल्याने तिच्या घरच्यांचा नाईलाज झाला. लग्न रोखल्या गेलं. पण श्रध्दाच्या आईवडिलांनी तील घरात घेण्यास नकार दिला. भाऊ ने आपल्या ओळखीत तिची रवानगी एक गर्ल्स होस्टेलवर केली.

दुसऱ्या दिवशी सकाळी भाऊंच्या कार्यकर्तृत्वाची एक बातमीही वर्तमानपत्रात छापून आली. पण तो विषय तिथेच संपला नाही. पंधरा दिवसातच श्रद्धा तिच्यापेक्षा दहा वर्षे मोठा असलेल्या एका मुलासोबत पळून गेली. मुलगा दुसऱ्या धर्माचा असल्याने मोठाचं गजहब उडाला. श्रध्दाच्या घरचे आणि समाजातील तथाकथित धर्मरक्षकांनी भाऊला धारेवर धरले. सुदैवाने श्रद्धा आठ दिवसात परत आली आणि त्याही अंकावर पडदा पडला. मात्र त्या घटनेनंतर श्रद्धाच्या आईवडिलांनी तिचं नाव आपल्या आयुष्यातुन काढून टाकलं होतं. आता तिला नैतिक, तात्त्विक विरोध कुणाचाच असा राहिला नाही. तिने त्या मुलासोबत एकत्र राहणं सुरु केलं. याचा तिच्या आईवडिलांना झाला नसेल तितका त्रास भाऊला झाला. श्रध्दा ज्या मुलासोबत राहत होती तो तिचा वापर करतोय, हे सगळ्यांना समजत होतं. पण श्रध्दाला कळत नव्हतं. मी भाऊला अनेकदा समजावून सांगितलं..

“ भाऊ, ते तिचं आयुष्य आहे..त्याची माती करायची की सोनं हे तिला ठरवू दे..आपण तिच्या वयक्तिक भानगडीत पडायला नको..!”

पण भाऊ ने ऐकलं नाही..

“ एका सोन्यासारख्या अजाण मुलीचं आयुष्य आपल्यासमोर बरबाद होतंय..आणि आपण नुसतं बघत बसायचं..समाज आपल्याला काय म्हणेल?”

मी त्याला हरतऱ्हेने समजावुन सांगण्याचा प्रयत्न केला..

“ अरे बाबा आपण ज्या समाजासाठी धडपड करतो ना तो समाज मोठा विचित्र आहे..त्याच्या धारणा आणि नियम फार पोकळ, भुसभुशीत आणि दुर्बळ आहेत. चांगल्याच जराही चुकलं तर समाज त्याला स्वीकारत नाही. आणि वांगल्याच कसंही असलं तर ते समाज स्वीकारतो.. तू टेन्शन घेऊ नको..!”

पण ऐकेल तो भाऊ कसला! त्यांनी त्या मुलाचा सगळा इतिहास शोधून काढला. त्याचं आधीच लग्न झालं असल्याचा पुरावा त्याने श्रध्दासमोर ठेवला. शेवटी श्रद्धा त्याच्यापासून विभक्त झाली. पुन्हा तिची रवानगी नव्या लेडीज हॉस्टेल वर झाली. मात्र भाऊच्या चित्ताला अजूनही स्थैर्य लाभलं नव्हतं. श्रद्धाचं आयुष्य स्थिर करण्यासाठी तो धडपडू लागला. तिने आपलं शिक्षण पूर्ण करावं, एखादी नोकरी धरावी यासाठी त्याची तडफड सुरु होती. मात्र श्रध्दाच्या मनाचा ठाव त्याला घेता आला नाही. शरीरसुखाला चटवलेल्या त्या मुलीने पुन्हा त्या दुसरपरण्या मुलासोबत सूत जुळवलं. इकडे भाऊ तिला सामाजिक नैतिकतेचे पाठ शिकवत राहिला आणि ती नीतिमत्तेची होळी करत गेली. शेवट दुःखद होणारचं होता. एक दिवस भाऊने दोघांना रंगेहाथ पकडलं..त्यांचा पारा चढला..भाऊ पोलिसांची धमकी देऊ लागले..त्यानं भाऊचचं अस्त्र भाऊवर उलटवल..श्रद्धाला भाऊ विरोधात बलात्काराची तक्रार द्यायला लावली. भाऊ हतबल झाले.
जसा समाज आंधळा तसा कायदाही आंधळाचं..! घडला नसूनही कोणत्याही चौकशीविना गुन्हा दाखल झाला. कायद्याची तरतूदचं तशी. भाऊला अटक झाली. पेपरवाल्यांनी भडक मथळ्याखाली बातम्या छापल्या. जी तोंड भाऊच्या कामाची आजवर स्तुती करत होती, तीच तोंड भाऊ बाबत भलतसलत बोलू लागली.. ज्यां हातांना भाऊंनी बळ दिलं होतं, त्यांच्या विरोधातल्या मोर्चात त्याच हातांनी पोष्टरं घेतली होती..ज्यांचा दबलेला आवाज फोडण्यासाठी भाऊ झटले होते, तेच आवाज भाऊच्या विरोधात नारे देत होते. ज्या समाजासाठी भाऊ सर्वस्व अर्पण करायला निघाले होते, तो समाज त्यांना नराधम म्हणून हिनवत होता.

सेशन कोर्टानंतर उच्च न्यायालयानेही भाऊंचा जामीन अर्ज रद्द केला. बलात्कारासारख्या गंभीर आरोपात बेल मिळण्याची शक्यता कमीच होती. बुद्धीला समजलं तरी मनाला न पटल्यामुळे आणि जे समाजाने समजून घेतलं नाही ते न्यायालय समजून घेईल, ही वेडी आशा मला उच्च न्यायालयात घेवुन आली होती. पण तीही फोल ठरली.

सहा महिने झाले आहेत.  हे का आणि कसं घडलं? याचा विचार करुन करुन करुन माझं डोकं शिनल आहे. भाऊ म्हणतो ‘समाज म्हणजे एक बटाट्याचं पोतचं..विविध विचारांच्या माणसांना रितीरिवाजाच्या, नीतिबंधनाच्या पोत्यात भरलेले असते, म्हणून तो एकसंधपणे उभा असतो. जेव्हा नीतिमत्तेची शिवण सैल होते, त्या वेळी पोत्यातील बटाटे खाली घसरू लागतात. ही घसरण रोखण्यासाठी कुणीतरी पुढे आलं पाहिजे. परिणामाची चिंता करून कसं चालेल? हे काम कुणीतरी केलेच पाहिजे, मग आपणच का नको?’
भाऊंच मला कळतं पण वळत नाही..! जो समाज भाऊला नावं ठेवतो तो समाज श्रध्दाचा स्वैराचार कसा स्वीकारतो?, हे मला कळत नाही. यावरही भाऊंची एक थियरी आहे..तो म्हणतो..
‘समाज त्याला स्वीकारत नाही तर त्यांच्या आजूबाजूची माणसं त्यांना स्वीकारतात. कारण त्यांचे हितसंबंध त्यात गुंतलेले असतात. आता हेच बघ, कितीही केलं तरी श्रद्धा तिच्या आईवडिलांना एकुलती एक त्यामुळे तिला स्वीकारणं त्यांची मजबुरी आहे. परिचित लोकांचेही तसेच त्यांचे काही ना काही कामापायी, स्वार्थापायी तुमच्याशी जखडलेले असतात. तुम्हाला दुखवणं हे त्यांना न झेपणारं असतं. त्यामुळे ते तुम्हाला भानगडीसकट स्वीकारतात..मुळात, समाज समजून घ्यायचा असेल तर आपल्याला माणसं समजून घ्यावी लागतील.. आणि माणूस समजण्यासाठी त्याची वेदना आपल्याला कळली पाहिजे. खरं तर जाणीव, जाण, संवेदना, सहवेदना हे जवळपास समान अर्थ असणारे शब्द..पण आज लोकांच्या जाणिवा बोथट झाल्याने त्यांना संवेदना जाणवत नाहीत..ते काय इतरांची सहवेदना ओळळणार?

किती अवघड गोष्ट? माणूस कुणाला समजला? मोठंमोठ्या विचारवंतांना जिथं माणसाचा ठाव घेता आला नाही, तिथं आपली काय कथा ! समाज राहू द्या, समाजातली माणसं ही बाजूला।ठेवा. रोज आपण ज्यांच्या जवळ असतो ते तरी आपल्याला कधी समजतात का? आपण आपल्या स्वतःला तरी पूर्णपणे समजू शकतो का? प्रश्न.. प्रश्न आणि नुसते प्रश्न! भाऊ म्हणतो,
तू जास्त विचार करू नकोस. शांत राहा.
Everything will be all right…

‘ सर्व काही सुरळीत होईल’ हे भाऊंचे शब्द म्हणजे नुसता एक उपचार आहेत, हे मला चांगलंच कळतं. शब्दाशब्दागणिक कीस पाडणारी, भुगा करणारी, भावनांना ठोकरून लावणारी व्यवसायिक कायदेशीर भाषा मलाही अवगत झालेली आहेच. म्हणून तर, श्रद्धाचं त्याच्यासोबत पुन्हा बिनसलं, ही बातमी कानावर येताच मी तिची भेट घेतली. भाऊला सोडवण्यासाठी तिच्यासोबत तडजोड करण्याचा माझा विचार होता… माझा तो प्रयत्न यशस्वीही झाला. पण त्याचे परिणाम असे असतील याचा मी विचारही केला नव्हता..!

श्रद्धाच्या बाबतीत जी भीती भाऊला वाटत होती तीच अखेर खरी ठरली होती.. तिचा तो साथीदार तिचा पूर्ण उपभोग घेऊन परागंदा झाला होता.     ‘ आता काय करावं?’ या विवंचनेत असलेल्या श्रद्धाला माझा प्रस्ताव म्हणजे एक अपॉर्च्युनिटी वाटली. भाऊंनी आपल्याला आधार द्यावा, आणि त्यांच्याशी मला बोलू द्यावं.. या साध्या अटीवर तिने तडजोड स्वीकारली. आठवडाभरातच भाऊ तुरुंगातून बाहेर आला.. थोड्याच दिवसात ‘आधार द्यावा’ याचा काय अर्थ होता हे माझ्या लक्षात आलं.

महिनाभराची गोष्ट असेल! एका दुपारी भाऊ आणि श्रद्धा गळ्यात माळा घालून माझ्यासमोर हजर झाले.. ते दोघं विवाहबद्ध झाले होते.. चाळीस वर्षाचा भाऊ आणि 21 वर्षाची श्रद्धा.. जोडा जरा चमत्कारिक होता.. पण, त्याचा स्वीकार जवळपास सगळ्यांनीच केला होता. श्रद्धाच्या आई-वडिलांनी आणि इतर नातलगांनीही हे नातं मान्य केलं… समाजानेही त्यावर मान्यतेचा ठपका उमटविला.
उरलो मी, तर मी आता भाऊंचा सल्ला गंभीरपणे घेतला आहे..मी आता कशाचाचं जास्त विचार करत नाही..
भाऊंचा निर्णय मला पटलाय का? हेदेखील मला विचारु नका..!

भाऊ नेहमी म्हणतो,

‘ माणूस समजून घ्यायचा असेल तर त्याच्या वेदनेची जाणीव झाली पाहिजे..ती जाणीवच मग समोरच्या व्यक्‍तीला समजून घ्यायला मदत करते..!’

कदाचीत भाऊ आणि माझ्या जाणिवेत काही अंतर असेल! भाऊ असो की श्रद्धा त्यांची वेदना समजून घेतांना माझ्या संवेदना कमी पडल्या असतील!

काहीही असो..मी त्याचा विचार करत नाही…राहिला समाज तर…. समाज..मान्यता..नीतिनियम..हे सगळे निव्वळ ‘उपचार’ असले तरी समाजाचा घटक म्हणून ते आपल्याला अपरिहार्यपणे पाळावेचं लागतात..मलाही ते बंधन आहेच की…. !

— अँड. हरिदास बाबुराव उंबरकर 

Avatar
About अँड. हरिदास बाबुराव उंबरकर 65 Articles
मी बुलडाणा येथे सांय दैनिक गुड इव्हिनींग सिटी वृत्तपत्रात संपादक पदावर कार्यरत असून येथील जिल्हा न्यायलयायत वकील म्हणुन सुद्धा काम करतो.. दैनादिन घडामोडी, राजकीय, सामाजिक, कृषि,कायदा आदि विषयांवर मी लेख लिहत असतो.

2 Comments on जाणिवांची अंतरे (कथा)

  1. अॅड हरिदास उंबरकर,
    भाऊ व श्रद्धा यांच्या कथानकातून आपण, समाज व्यवस्था, समाज सेवा, भाव-भावना नाते संबंधी वगैरे वरील भाष्य भावले.
    मोजक्या शब्दातील लेख, विषय आणि मांडणी छाप टाकणारी आहे.

    • मनःपूर्वक आभार🙏 आपली प्रतिक्रिया प्रेरक आहे🙏

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..