नवीन लेखन...

जाने कहाँ गये वो दिन

आयुष्यभर ज्या चार्ली चॅप्लिनला आदर्श मानलं, त्याने जोकरपण आधीच सिद्ध केलं होतं , पण आयुष्याच्या सायंपर्वात राज कपूरला स्वतःमध्ये जोकर आहे हे मान्य करावे लागले. हा थोडासा मावळतीचा अध्याय होता, जिथे हिशेब सुरु होतात, आठवणी सतावतात आणि मनाजोगती एखादीतरी कलाकृती निर्माण करावीशी वाटते. राजने या टप्प्यावर “मेरा नाम जोकर ” नावाचे धाडस केले -आतल्या आवाजाला स्मरून ! हे ऋण फेडणे होते चित्रसृष्टीचे, भव्यतेचे वेड (“आवारा ” मधील स्वप्नगीत आणि त्यानंतर “सत्यम शिवम “मधील “चंचल शीतल”) शोमनशिप मध्ये परिवर्तित झाल्यावर अशी एखादी निर्मिती खुणाविणें स्वाभाविक होते.

अखिल चित्रसृष्टी, वयाचा मोठा कॅनव्हास आणि लांबरुंद चित्रपट (“संगम “शी स्पर्धा) अशी आयुधे घेऊन हा उतरणीला लागलेला निळ्या स्वप्नांचा जादुगार आपल्या भेटीला आला -जीवन नामक सर्कशीला पार्श्वभूमीला ठेवून ! या सगळ्या यशापयशाबद्दल पुन्हा कधीतरी ! पण हिंदी चित्रपट सृष्टीला “मेरा नाम ” ला टाळून पुढे जाता येणार नाही.

सगळं जगल्यावर,हातीपायी अपयश आल्यावर हा विदूषक आपल्या पुर्वाश्रमींच्या साऱ्या व्यक्तींना आपला “शेवटचा “खेळ पाहायला निमंत्रित करतो. कधीतरी “आतले “कढ “आपल्या (?)” लोकांसमोर व्यक्त करावेसे वाटतातच की ! जाण्यापूर्वीचे हे व्यक्त होणे सर्वांसमक्ष असले तरी विदुषकी मुखवटा अपरिहार्य असतो. त्यामुळे इतरांसाठी गाणारा विदुषक असला तरी ज्यांच्या पर्यंत ही कहाणी जावी तिथे तो पोहोचवितो. त्या तिघींच्या चेहेऱ्यावरील भाव “आपण आयुष्याच्या वाटेवर काय आणि किती मौल्यवान गमावून बसलोय ” हे चित्रित करतात.

“जाने कहाँ ‘ची धून राजच्या आधीच्या खूप चित्रपटांमधून कानावर पडल्यामुळे परिचित असली तरी निर्विवादपणे “हा” चित्रपट हेच तिचे स्थान होते. शंकर -जयकिशन बरीच वर्षे तिला मुरवून, सतत राजला विनंती करीत असावेत – ” या गीताला सुस्थळी पाठव.”
“मेरा नाम जोकर “मध्ये तिला तिचे (मानाचे आणि हक्काचे) स्थान मिळाले.

सगळी कहाणी फ्लॅशबॅकने कथन केल्यानंतर मैफिलीच्या भैरवीचा मान “जाने कहाँ ” ला मिळतो. डोळ्यांवर गडद चष्मा, आतले लपविणारा ! हातातून विदूषकाला आसमंतात त्याच्या अवकाशात सोडून देत, दुरून निरखणे ! संयमित देहबोली, फक्त “मेसेज ” पोहोचविणे ! चित्रपटभर आयुष्याची मोडतोड झाल्यावरचे दुखावणे पण त्यावरही स्वतःची मालकी ! जिवाची घालमेल करणारी सुरावट वातावरण निर्मिती करते. त्यानंतर मुकेशचा “कोरडा” धीरगंभीर स्वर कानी पडतो. असा मुकेश कधी भेटलाच नाही. अनुनासिक आवाजाचा “डाग ” लागलेला हा कलावंत पराकोटीच्या कोरडेपणाने हे गीत गातो. काय जी चलबिचल व्हायची, ती ऐकणाऱ्यांना भेटू दे ! राज कपूर जीवन नदीच्या काठावर उभा राहून सगळं स्थितप्रज्ञपणे आपल्यापर्यंत पोहोचवतोय.

“आजही आयुष्यात दिवसात काळोख भरून राहीला आहे, जी सावली पूर्वी साथीला होती तीच (आणि तेवढीच) आजही साथीला आहे ” हे त्याच्या (आणि प्रेक्षागृहात बसलेल्या “त्यांच्या”) परिप्रेक्षातील एकलेपण जीवघेणे आहे. सर्वांवर (एकतर्फी )प्रेम करणे हा (असलाच तर) त्याचा एकमेव गुन्हा, पण त्याहीबद्दल आता तक्रार नाही. ही स्वतःची घातलेली समजूत आतडे पिळवटून टाकते. हा कलाकार व्यक्तिगत आयुष्यातही एकलाच होता का ? अतिशय ताकतीचे शब्द ,त्याच तोलामोलाचे संगीत , रंगीबिरंगी अर्थहीन भवताल आणि मुकेशच्या गळ्यातून आपल्याला थेट भिडणारा राज कपूर ! लक्षात राहते ते इतकेच !! मुकेश दिव्यत्वाची अनुभूती देतो. असं आर्त तो कधीच गायला नव्हता -रित्या ओन्जळी दिलखुलासपणे दाखविणारे ! गाण्याच्या शब्दांमधील तत्वज्ञान आवाजातून व्यक्त करणारे !

गम्मत म्हणजे आपण विदूषक आहोत याचा राजला विसर पडला नाहीए ! विरागी वेदना आळवली की पुन्हा एकदा सर्कसची पार्श्वभूमी ! तात्कालिक टाळ्यांकडे पाठ फिरवून, सगळं आवरून, काचांच्या तुकड्यांमधील प्रतिमा दाखवून झाल्या की मुखवटा जागच्या जागी आणि अचूकपणे “कल खेल में हम हो ना हो , गर्दीशमें तारे ” हे चिरकालिक तत्वज्ञान सांगून जोकर अंतर्धान पावतो आणि दरवेळी मी टाळ्या वाजवायचे विसरतो.

— डॉ  नितीन देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..