नवीन लेखन...

जहाँ चार यार मिल जाए

माझे मित्रांचे तीन स्वतंत्र कप्पे आहेत आणि मी त्या सगळ्यांमध्ये अपरिहार्यपणे कॉमन आहे. भुसावळचे ब्राह्मण संघापासून दहावी पर्यंतचे सवंगडी, सोलापूरच्या हदेप्र मधल्या ७-८ महिन्यांचे शाळूसोबती आणि नंतरचे वालचंदच्या चार वर्षांचे अतरंगी (आणि अंतरंगीही) मित्र. या तिन्ही कप्प्यांमध्ये माझी सुखेनैव ये जा सुरु असते.

मैत्रीला काहीही वर्ज्य नाही.

यावेळी राजेंद्र गांधींच्या नव्या डेस्टिनेशनला भेटलो. सकाळी त्याला वर्दी दिली आणि बघता-बघता त्याने सोलापुरात दवंडी पिटली. जमले की ७-८ जणं – दोन नितीन (मी धरून), अरुण,राजू आणि यजमान-राजेंद्र, दोन रमेश, थोडा वेळ नंदी आणि सरदेशमुख(सेवानिवृत्त असला तरी शेवटी दयानंदचा प्राध्यापक म्हणून त्याचा एकेरी उल्लेख मी टाळतो), चेतन आणि अंत्रोळीकर- नवनिर्वाचित चेअरमन(शरद)! बाकीच्यांना फोन झाले, पण जे येऊ शकले नाही त्यांच्यासाठी काहीवेळ सोलापुरी “भडीमार” झाला.

चहाची आवर्तने सुरु झाली. मध्येच सिगारेटचे अग्निहोत्र ! अमरनाथ ची ढगफुटी सुखरूप पार करून परतलेल्या अरुणचे पाय धरून झाले, “मुंबई डायरीज ” मध्ये अप्रतिम काम केलेल्या #अक्षरकोठारीला, त्याचे वडील चेतन कडून दाद पोहोचविली गेली आणि “बाप से बेटा ” म्हणत चेतनचा उद्धार झाला. नसलेल्यांची टवाळी झाली. मुख्य म्हणजे जानेवारी २०२३ च्या स्नेहमेळाव्याचे प्राथमिक नियोजन झाले. तारखा ठरल्या आणि कोणते “कार्यक्रम “नकोत यांवर एकमत झाले.

” तुला पुढच्यावेळी चांगलं नवं हॉटेल मिळवून देतो बे ” असा एकाने मला सल्ला दिला. दुसऱ्याने ” गुलज़ारच्या तुझ्या पुस्तकाचे काय झाले बे ” अशी आत्मीय चौकशी केली. मी पडद्यामागची कहाणी सांगितल्यावर “असेच असतात बे हे कडू ” अशी त्यांची संभावना झाली.

यांतील दोघे-तिघे कोरोनाच्या भोज्याला सपत्नीक भेटून आलेले ! काहींच्या “श्रुतींनी ” दगा दिलेला, केसांनी देखणे पांढुरकेपण इमाने-इतबारे स्वीकारलेले ! पण आज सगळे एकमेकांची टांग खेचण्यात मग्न होते. हॉटेलमधील इतर गिऱ्हाईक आमच्याकडे दचकून पाहात होते. राजेंद्रच्या स्टाफला हा दर रविवारचा कट्टा नवीन नव्हता. त्यांच्या दृष्टीने नवे पात्र म्हणजे मी ! अन्यथा ते त्यांच्या कामात (सगळ्यांच्या यथाशक्ती सरबराईत) मग्न होते.

मित्र म्हणजे ज्यांच्यासमोर रोजचे मुखवटे काही क्षण काढून ठेवता येतात अशी जमात ! हरिभाईच्या चार भिंतींमधील संस्कृतीने ज्यांना आजही बांधून ठेवले आहे असे हे सारेजण ! केवढे घट्ट सिमेंट आहे हे आणि शतक पार केलेल्या शाळेसारखीच सत्तेचाळीशी पार केलेल्या आमच्या मैत्रीची ही बुलंद इमारत !
मीही दिलखुलास हसलो. आजकाल इतके हसताना मी स्वतःला पाहिले नव्हते. कॅलेंडरवरची पाने नकळत “धमाल” हिरावून नेत असतात. पण इथे तेच सगळ्यांना हरविणारे वातावरण ! दोन तास संपले तशी जाग आली. हॉटेलमधील नवनव्या गिऱ्हाईकांना आमची अडचण व्हायला लागलीए हे लक्षात आल्यावर कल्टी मारली.

निघताना हातातील स्टिक सावरत, स्कुटी चालवत घरी निघालेला चेतन कोठारी कितीतरी वेळ माझ्या नजरेसमोरून हलत नव्हता.

माझ्या कुलदेवतेच्या यात्रेचे “मावंदं ” झालं.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..