नवीन लेखन...

जहाजावर न दिसलेली भूतं

एक पेशंट हॉस्पिटलमधून बरा होऊन घरी चालला होता. डीसचार्ज झाल्यानंतर त्याच्या डिलक्स रूमची सफाई करायला आलेला वॉर्डबॉय त्या पेशंट ला म्हणाला साहेब बर झालय तुम्ही जिवंतपणी बाहेर जाताय या रूम मधून, नाहीतर या रूम मध्ये ऍडमिट असणारे बरचसे पेशंट या रुममध्येच जीव सोडतात. डिलक्स रूम मध्ये मागील 8 दिवस घालवलेल्या त्या पेशंटला हे ऐकून धक्का बसला त्याच्या मनात विचार आला ही गोष्ट आपल्याला ऍडमिट व्हायच्या अगोदर माहिती असती तर आपण नक्कीच दुसरी रूम घेतली असती. मागील 8 दिवस आपण या रूममध्ये कसे काय शांत झोपलो आणि बरे झालो याचा विचार करता करता त्या पेशंट ने त्या डिलक्स रूमला भुतांची खोली अस नाव देऊन टाकलं.
माझं दुसरंच जहाज होत फोर्थ इंजिनियरची परीक्षा पास करून ज्युनियर मध्ये जॉईन झालो होतो. जहाजावर पहिलेच एक फोर्थ इंजिनीयर आणि ज्युनियर इंजिनीयर होता त्यामुळे मी जॉईन केल्यावर मला जहाजावरील स्पेयर केबीन मध्ये राहायला सांगितलं. फोर्थ इंजिनीयर गेल्यावर मला ज्युनियर वरून प्रमोट करून फोर्थ इंजिनीयर बनवणार होते. त्यानंतर मला फोर्थ इंजिनीयर च्या केबिन मध्ये शिफ्ट करणार होते. जहाजावर दोन ते तीन स्पेयर केबिन असतात. कंपनीचा स्टाफ पैकी, सर्वे किंवा इंस्पेक्शन करणारे अधिकारी तसेच म्हत्वाच्या मशिनरी चे टेक्निशियन या सर्वांना कधी कधी जहाजावर राहायला लागतं त्यासाठी प्रत्येक जहाजावर स्पेयर केबिन्स असतातच. आमचं जहाज इटली वरून निघालं होत आणि इस्तंबूल जवळील ड्राय डॉक मध्ये काम करून घेण्यासाठी पोचलं होतं. जॉईन झाल्यापासून पंधरा दिवसांनी फोर्थ इंजिनीयर ड्राय डॉक मधून घरी गेला आणि त्याच्या जागेवर मला प्रमोट करुन फोर्थ इंजिनीयर बनवण्यात आले. मी वरच्या डेकवरील फोर्थ इंजिनियरच्या केबिन मध्ये शिफ्ट झालो होतो. पंधरा दिवस मला जहाजावर रोज कोणी ना कोणी विचारायचा कि तुला व्यवस्थित झोप लागते का , काही त्रास तर नाही ना. खलाशी व इतर अधिकारी सुद्धा विचारायचे पण मी जहाजावर नवीन नवीन जॉईन झालो होतो म्हणून सगळेजण अस विचारत होते असे वाटतं होत. शेवटी न राहवून मी ज्युनियर इंजिनियरला विचारलंच कि सगळे माझ्या झोपेबद्दल कशासाठी चौकशी करतात ते सांग मला. त्याने सांगायला सुरुवात केली आणि म्हणाला की काही वर्षांपूर्वी या केबिन मध्ये एक टेक्निशियन राहायला होता जहाजावर आल्यावर दुसऱ्या रात्री त्याला हार्ट अटॅक येऊन त्याने या केबिनमध्ये जीव सोडला होता. तेव्हापासून या रूम बद्दल कोणाला काही सांगण्याची मनाई केली आहे. तुमची केबिन आता शिफ्ट झाली आहे मग तुम्ही आता बिनधास्त राहा. हे ऐकून मला प्रश्न पडला की जर मला हे माहिती असत तर मी त्या केबिन मध्ये पंधरा दिवस राहिलो असतो का ? अज्ञानातच सुख असत त्यामुळे मला रोज रात्री शांत झोप लागत होती. जहाजाने पोर्ट सोडल्यानंतर त्या टेक्निशियनला हार्ट अटॅक येऊन तो मरण पावला होता त्यामुळे त्याच प्रेत जहाजावरील फिश रूम मध्ये पुढील तीन दिवस ठेवलं होतं अशी माहिती सुद्धा मिळाली होती. त्यामुळे कूक आणि स्टिवर्ड फिश आणि मीट रूम मध्ये एकटे कधीच जात नसत असे पण किस्से ऐकायला मिळाले. बऱ्याचशा जहाजांवर बऱ्याचवेळा अपघात होऊन खलाशी किंवा अधिकाऱ्यांना जीव गमवावा लागतो. कोणी आगीत होरपळून मरतो, कोणी उंचावरून खाली पडून मरतो, कोणी विषारी वायूमुळे टाकीमध्ये गुदमरून मरतो, कोणी शॉक लागून मरतो तर कोणी कोणी आत्महत्या पण करतात. लाईफ बोट या खऱ्या म्हणजे जीव वाचवण्यासाठी जहाजावर बसवण्यात येतात, पण आजपर्यंत या लाईफ बोट चा प्रत्यक्ष वापर करून जेवढे जीव वाचवले नसतील तेवढे जीव अशा लाईफ बोटच्या ट्रायल घेताना किंवा मेंटेनन्स करताना गेले आहेत अशी माहिती आहे. प्रत्येक जहाजावर वर्षातून एकदा तरी लाईफ बोट मध्ये काही खलाशी बसवून तिची ट्रायल घ्यावी लागते पण नेमकी ट्रायलच्या वेळेसच अपघात होतात आणि त्यामध्ये खलाशी आणि अधिकारी मरण पावतात.

घरदार सोडून आलेले खलाशी आणि अधिकारी जेव्हा जहाजावर मेल्यावर त्यांच प्रेत घरी पोचायला किती तरी अडचणी येतात. जहाज किनाऱ्यापासून लांब असेल तर दहा दिवस लागो की वीस दिवस ते प्रेत बंदर येईपर्यंत सांभाळायला लागतं. बंदरात पोचल्यावर त्या त्या देशातल्या कायद्यप्रमाणे चौकशी आणि पोस्ट मॉर्टेम झाल्यावर ते प्रेत कंपनीला दिले जाते मग कंपनी ते घरी पोचवायची व्यवस्था करते.

जहाजावर अशा मरण पावलेल्या खालाशांचे आत्मा भटकत असतात असे बोलतात. अपघातात कोणी स्वतःच्या चुकीमुळे मरतो तर कोणी दुसऱ्याच्या चुकीमुळे पण बहुतेक अपघात हे मानवी चुकांमुळेच होतात. जसे की एखाद्या टाकीत काम करायचं असेल तर त्या टाकीतील विषारी वायू पूर्णपणे बाहेर काढून त्यामध्ये शुद्ध हवा भरली जाते. त्यामध्ये असणारे ऑक्सिजन आणि इतर वायूंचे प्रमाण मोजण्यासाठी उपकरणे असतात. पण बऱ्याचवेळा घाई मध्ये किंवा काम लवकर संपवण्याच्या नादात खालाशांना टाकीत उतरवले जाते आणि ज्यात त्यांचा गुदमरून मृत्यू होतो. काहीजण सेफ्टी बेल्ट आणि दोरी न बांधता उंचावर चढतात आणि तोल जाऊन खाली पडले की लोखंडी डेक वर डोकं फुटून मरुन जातात.
जहाजावर कोणी मेला कि त्याचा आत्मा भटकत असतो किंवा भूत बनून तो त्या जहाजावर फिरत असतो असे बरेच किस्से आणि कहाण्या खालाशांकडून ऐकायला मिळत असतात. गेल्या दहा वर्षात अजूनपर्यंत तरी भटकती आत्मा किंवा भूत जहाजावर फिरताना मला तरी दिसलं नाही. कित्येक वेळा तर जहाजावरील अनेक भागात एकटं काम करावं लागतं. रात्री दीड दोन वाजता इंजिन रूम मध्ये एखादा अलार्म वाजला तर एकट्याला जाऊन अटेंड करावा लागतो त्या वेळेस संपूर्ण इंजिन रूम मध्ये सोबतीला कोणीच नसतं. अलार्म रिसेट करून मग पुन्हा झोपायला परत यायचं. रात्री वाजणारे अलार्म पण 3 मिनिटांच्या आत जाऊन अटेंड करावे लागतात नाहीतर तोच अलार्म मग सगळ्या इंजिनियरच्या केबिन मध्ये वाजायला लागतो मग सगळ्यांचीच झोपमोड होते.

एका जहाजावर तर एका इंजिनीयर ने प्रेयसी सोबत वाद झाला म्हणून गळ्याला फास लावून घेतला होता. त्याने ज्या भागात फास घेतला होता तिथे कोणी एकट्याने फिरकण्याची हिम्मत करत नव्हता. मी जॉईन केल्यावर 2 महिन्यांनी मला हा किस्सा समजला होता तो पर्यंत मी त्या भागात रोजचा राऊंड घ्यायचो पण मला कोणी सांगितलं नव्हतं कि तिकडे जाऊ नकोस. एकदा टी ब्रेक मध्ये असाच विषय निघाला आणि मी विचारलं की आपल्या कंपनीत कोणीतरी गळफास घेतल्याची घटना घडल्याची ऐकलं होतं, ती घटना कुठल्या जहाजावर घडली होती. त्यावेळेस चीफ इंजिनियर म्हणाला की मागील वर्षी याच जहाजावर ही घटना घडली आहे आणि त्या वेळेस तो सुद्धा याच जहाजावर सेकंड इंजिनीयर म्हणून काम करत होता. सुरवातीला त्याने पुन्हा याच जहाजावर यायला नकार दिला होता पण कंपनीने त्याला चीफ इंजिनीयर चे प्रमोशन दिल्याने तो या वर्षी पुन्हा या जहाजावर जॉईन झाला होता.

मेलेल्या माणसांची भूतं किंवा त्यांचे भटकणारे आत्मा वगैरे सगळे मनाचे खेळ असतात पण जेव्हा काही जिवंत माणसेच भुतासारखी वागतात आणि आत्म्यासारखी भटकत असतात तेव्हा त्यांच काय करायचं आणि त्यांच्याशी कस वागायचं हे समजत नाही.

इंजिनियरिंग करताना सोमैया कॉलेज मध्ये आमच्या वर्गात विचित्र प्रकारचा वास यायचा सुरवातीला काही कळलं नाही पण नंतर लक्षात आलं कॉलेज च्या कम्पाउंड ला लागून स्मशान भूमी होती. घाटकोपरसारख्या मोठ्या परीसरात रोज कोणी ना कोणी मरायचं कॉलेज ला येता जाताना बऱ्याच वेळा अंत्ययात्रा दिसायच्या. कुठल्या तरी समाजातल्या अंत्ययात्रेत म्हातारा किंवा म्हातारी असेल तर बँड बाजा वाजवून आणि गुलाल उधळत नाचणारे लोकं पण दिसायची. कॉलेज कम्पाउंड आणि स्मशानामध्ये गर्द झाडी होती त्यामुळे बाजूला स्मशान आहे ते पण माहिती नव्हतं. अंत्ययात्रा बघून आणि तो विचित्र वास हा प्रेतं जाळल्याचाच आहे हे समजेपर्यंत इंजिनियरिंगचे तिसरे वर्ष लागले होतं. मग वर्गात वास यायला लागल्यावर आज परत कोणाचा तरी आत्मा मुक्त झाला अशी मित्रांमध्ये चर्चा रंगायला लागली होती.
शरीरातून जीव सोडल्यावर आत्मा बाहेर पडतो की प्रेतावर अंतिम संस्कार झाल्यावर बाहेर पडतो? दहाव्याला दशक्रिया विधी झाल्यावर आत्मा बाहेर पडतो कि मुक्त होतो? जस जहाज कधीच कोणासाठी थांबत नाही तसंच कोणी कितीही जवळच गेलं की काही दिवस किंवा काही महिने गेले की कोणासाठी थांबत नाही. जहाजावर कोणी मेल्यावर त्याच भूतं होत असेल किंवा त्यांचे आत्मा भटकत असतील तर घरोघरी, दवाखाने, रेल्वेचे रूळ,रस्ते अशा सर्व ठिकाणी जिथे जिथे लोकं मारतात तिथे तिथे अशा भटकणाऱ्या आत्मा आणि भूतं असली पाहिजेत.

© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनीयर
कोन, भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 57 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..